उत्फुल्ल ‘आनंद’ संगीत

साधी राहणी, उत्तम निरीक्षण, माणसांत राहण्याची सवय, उत्तम ‘कान’ आणि सर्जनशीलता यांतून कल्याणजी-आनंदजी यांची गाणी तयार झाली. त्यांची गाणी आजही सहज लक्षात राहतात याचं कारण हेच असावं.
Indian Musician anandji
Indian Musician anandji Sakal

मंदार कुलकर्णी

ज्यांच्या नावातच ‘आनंद’ आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि वृत्तीबद्दल काय बोलणार? कल्याणजी-आनंदजी या संगीतकारद्वयीपैकी आनंदजी भेटतात तेव्हा त्यांच्या या वृत्तीसह; त्यांना आनंदी ठेवणाऱ्या त्यांच्या पत्नी-मुलांसह भेटतातच; पण एका काळाचा संपूर्ण पट घेऊनही भेटतात.

एका किश्शातून दुसरा किस्सा उलगडतो, एक गाणं संपेपर्यंत दुसरं गाणं त्यांना आठवतं आणि विनोदाचा एक बाण पोहोचेपर्यंत दुसरा बाण त्यांनी सोडलेला असतो. वय ९१; पण स्मृतीपासून विनोदबुद्धीपर्यंत सगळं तल्लख. तपशील तर इतके पक्के की, एखादं गाणं अगदी कालच झाल्यासारखं वाटावं. सुरकुतीसुद्धा नसलेले कपडे रसिकवृत्तीनं परिधान करणारे, सदोदित हसरा चेहरा असलेले आनंदजी अधूनमधून समोरच्यालाही प्रश्न विचारून त्याची गंमत बघतात.

आनंदजी पुण्यात ‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’च्या ‘जिंदगी का सफर’ या कार्यक्रमानिमित्त आले होते तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तेव्हा ती जणू एका कालचक्रातली ‘सफर’च होती.

‘या वयातही इतके फिट कसे’ या पहिल्याच प्रश्नावर त्यांनी पत्नी शांताबेन यांच्याकडं बोट दाखवलं.

‘‘पत्नी माझी काळजी घेते, मला सगळ्या गोष्टींची आठवण करते,’’ असं त्यांनी सांगितलं आणि ‘पत्नीबरोबरच्या संवादातून अनेक गाणीही तयार होतात,’ अशीसुद्धा पुस्ती जोडली.

Indian Musician anandji
Goa Crime News : धक्कादायक! सामूहिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या

‘‘एकदा आम्हाला कुठं तरी कार्यक्रमाला जायचं होतं. निघायचं होतं पाच वाजता आणि मी घरी पोचलो सात वाजता. त्यामुळं बायको रुसून बसली. मग तिला खुलवायला म्हणून मी म्हणून गेलो, ‘क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...’ तिचं त्यावर जे उत्तर होतं त्यातून पुढची ओळ तयार झाली, ‘फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है’. हे गाणं आम्ही नंतर पुढं चित्रपटात वापरलं,’’ आनंदजी म्हणाले.

‘तुमचा दिनक्रम काय असतो’, या प्रश्नावर एक पॉज घेत ‘‘सकाळी सात वाजता झोपी जातो. झोपल्यावर मग दुपारी अकरा-बारापासून इतर कामं सुरू होतात,’’ असं सांगून त्यांनी धक्का दिला.

‘‘मी निशाचर आहे. अनेक लेखक, संगीतकार असेच असल्याचं आढळून येईल. कारण, रात्रीची वेळच विलक्षण असते. कुणाचा डिस्टर्बन्स नसतो, त्रास नसतो. ‘यू गो विदिन...’ त्यातून अनेक गोष्टी सापडतात,’’ असं त्यांचं म्हणणं.

‘त्या विशिष्ट वेळी तयार झालेलं कुठलं गाणं आठवतं का’ असा प्रश्न विचारायला जावं तर त्यांचं उत्तर : ‘‘मला कुठल्याही सिच्युएशनला गाणी सुचली आहेत. एकदा आम्ही विमानातून जात होतो. अचानक काही तरी बिघाड झाला आणि विमान जोरजोरात हलायला लागलं. सगळे उलटेपालटे व्हायला लागले. कुणी विनोद करायला लागलं, कुणी देवाचा धावा करायला लागलं. मला मात्र त्या प्रसंगात अक्षरशः चालीसकट एक ओळ सुचली... ‘सुख के सब साथी, दुख में ना कोई!’’

‘तुमच्या कामाची प्रक्रिया कशी असायची’ या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं : ‘‘आमच्याकडं निर्माता-दिग्दर्शक आले की ‘तुमची गरज काय आहे...खर्चाची तयारी किती आहे...चित्रीकरण कुठ करायचं आहे... प्रसंग काय आहे...अभिनेते कोण आहेत,’ असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारायचो. त्यांच्याकडूनच एकेक गोष्ट काढून घ्यायचो. त्यानुसार गाणी तयार करायचो. आम्ही खूप नवीन लोकांबरोबर काम केलं. अगदी मनोजकुमार यांच्यापासून ते फिरोझ खान यांच्यापर्यंत अनेकांबरोबर आमचं काम झालं. गाणी प्रचंड गाजली ती आमच्या या प्रक्रियेमुळे. आमच्या वडिलांचं किराणामालाचं दुकान होतं, आम्ही स्वतः चाळीत वाढलो आहोत.

या अतिशय साध्या वातावरणातून पुढं आल्यामुळं अनेक प्रसंग सुचायचे, माणसांशी सहज संवाद असायचा आणि आमची निरीक्षणंही खूप काटेकोर होती. या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब आमच्या गाण्यांमध्ये उमटलेलं दिसेल.’’

साधी राहणी, उत्तम निरीक्षण, माणसांत राहण्याची सवय, उत्तम ‘कान’ आणि सर्जनशीलता यांतून कल्याणजी-आनंदजी यांची गाणी तयार झाली. त्यांची गाणी आजही सहज लक्षात राहतात याचं कारण हेच असावं.

आनंदजी यांना विचारलं तर ते म्हणाले : ‘‘आम्ही आमचा आत्मा त्या गाण्यात ओतायचो. दुसरं म्हणजे, आम्ही अतिशय ‘ॲडजस्टेबल’ होतो. आपलं गाणं सहज, साधं असावं यावर आमचा भर असायचा.’’

शब्दांना चाल देणं आणि चालीवर शब्द लिहून घेणं या दोन्ही पद्धतींनी त्यांनी काम केलं.

‘‘चित्रपटातला प्रसंग महत्त्वाचा. ज्या प्रसंगामध्ये काव्यात्म भाव हवे आहेत, भावनिक प्रसंग आहे तिथं शब्द महत्त्वाचे. दुसरा कुठला प्रसंग असेल तर चालीवरून शब्द. आमची कुठलीही चौकट आणि साचा नव्हता,’’ असं त्यांनी सांगितलं.

Indian Musician anandji
PM Modi Visited Amman Temple: नरेंद्र मोदींनी भगवती अम्मान मंदिराला दिली भेट, पुजा थाळीत वापरलेल्या लाल केळींची काय आहेत वैशिष्ट्ये

‘तुम्ही केलेल्या कामापैकी सर्वांत आवडता चित्रपट कोणता’ या प्रश्नाचं ‘जॉनी मेरा नाम’ हे उत्तर सांगायला त्यांना जरासुद्धा वेळ लागला नाही.

‘‘या चित्रपटात आम्हाला खूप वैविध्यपूर्ण गाणी द्यायची संधी मिळाली. एक संगीतकार काय करू शकतो, याचं सगळं वैविध्य या चित्रपटातल्या गाण्यांत दिसेल,’’ असं त्यांचं म्हणणं.

‘‘जुन्या काळात ‘हेल्दी कॉम्पिटिशन’ होती, त्यामुळं संगीताचा दर्जाही उत्तम असायचा. आम्ही एकमेकांना सूचना करायचो, त्यानुसार बदलही करायचो,’’ असं ते म्हणाले.

‘आजच्या काळात तुम्ही काम करू शकला असता का’ असं विचारल्यावर ते ताडकन् म्हणाले : ‘‘नक्कीच करू शकलो असतो. कारण, आजच्या काळातले कित्येक प्रयोग आम्ही आधीच करून ठेवले आहेत.’’

विनोदी चित्रपट बघणं हा त्यांचा आवडता छंद आहे. नवीन संगीतकारांच्या कामावर त्यांची अजूनही नजर असते. आजही ते कार्यक्रमांच्या निमित्तानं जगभर फिरत असतात.

‘‘लोक मला बोलावतात. माझं बोलणं त्यांना ऐकायचं असतं, माझी गाणी अजूनही त्यांच्या लक्षात आहेत, ही गोष्ट माझ्यासाठी सर्वांत आनंदाची आहे,’’ असं सांगणारे आनंदजी विलक्षण आत्मीयतेनं बोलत असतात, गाणी गुणगुणत असतात.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या ‘आयकॉनिक’ संगीतकारांपैकी आपण एक आहोत, असा कुठलाही बडेजाव त्यांच्या वागण्यात नसतो. प्रेमाच्या धाग्यानं बांधलेलं, त्यांच्या सतत अवतीभवती असलेलं त्यांचं कुटुंब ही अतिशय सुरेख गोष्ट आहे. त्यांच्या गाण्यांमधले सूर कमी-जास्त झाले नाहीतच; पण माणूस म्हणून जो जिव्हाळ्याचा सूर त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वातून सतत झिरपत असतो तो आपल्यालाही ऐकू येतो... त्यामुळंच त्यांना भेटल्यावर त्यांच्या नावातला आणि वृत्तीतलाही आनंद आपल्यातही कधी झिरपून जातो ते आपल्यालाही समजत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com