
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
भारतात ईव्ही वाहनांचा वाढता ट्रेंड हा केवळ फॅशनचा भाग नसून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक असणारा बदल आहे. जगभरातील मोटार आणि दुचाकीबरोबरच वाहतुकीच्या वेगवेगळ्या साधनांचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर भर दिला जात असताना भारतही अपवाद राहिलेला नाही. चीनमध्ये वाहन बाजारात सध्या निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात ई-वाहनांचीच विक्री होत आहे. भारतातही ईव्ही संस्कृती रुळत आहे. यासाठी खासगी आणि सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. प्रदूषणाचा स्तर कमी राहणे, आर्थिक विकास, इंधन सुरक्षा, ध्वनी प्रदूषणाला आळा आणि अत्याधुनिकतेचा स्वीकार या कारणांमुळे भारतात ईव्ही वाहनांची खरेदी वाढत आहे. २०००च्या दशकात भारतात जेव्हा ईव्ही वाहनाने पाऊल टाकले तेव्हा अडखळत सुरुवात झाली; पण भारतीय ग्राहकांना त्याची अनिवार्यता वाटत असल्याने अनेक कंपन्यांनी ईव्ही वाहनांची निर्मिती करण्यावर भर दिला. अडीच दशकांच्या कालावधीत ईव्ही वाहनांनी वाहन बाजारपेठेवर चांगली हुकूमत प्रस्थापित केली.