
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात अद्याप लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. चीन, अमेरिका व युरोपियन देशांच्या तुलनेत भारत नेहमीच मागे राहिला आहे. आगामी वर्षांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रातील परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. सरकारी योजनेंतर्गत खेळाडूंसाठी आर्थिक सहाय्य, अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांची नियुक्ती, परदेशात सराव अशा महत्त्वपूर्ण बाबी केल्या जात आहेत. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चमक दाखवणाऱ्यांना स्कॉलरशिप देण्यात येत आहेत. तरीही बराच पल्ला गाठायचा आहे. याप्रसंगी भारताने क्रीडा क्षेत्रात महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे, असे म्हणायला हरकत नाही.