esakal | ‘...राणी दिवाळी खरी!’ (इंद्रजित भालेराव)
sakal

बोलून बातमी शोधा

‘...राणी दिवाळी खरी!’ (इंद्रजित भालेराव)

सर्वत्र आनंदीआनंद असतो. दिवाळीचा आनंद प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार व आपापल्या पद्धतीनुसार साजरा करतो. साधं मातीचं घर असेल तर ते  सडा-सारवणानं सजवलं जातं. बंगला असेल तर त्याची रंगरंगोटी केली जाते.

‘...राणी दिवाळी खरी!’ (इंद्रजित भालेराव)

sakal_logo
By
इंद्रजित भालेराव (saptrang.saptrang@gmail.com)

दिवाळीचा सण हा कृषिजीवनातला सर्वोच्च आनंदाचा काळ असतो. दिवाळीचा आनंद प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार व आपापल्या पद्धतीनुसार साजरा करत असतो. साधं मातीचं घर असेल तर ते सडा-सारवणानं सजवलं जातं. बंगला असेल तर त्याची रंगरंगोटी केली जाते. कुठं खापराचे तेल-वातीचे दिवे मिणमिणतात, तर कुठं इलेक्‍ट्रिकच्या दिव्यांनी घर झगमगून जातं. दोन्ही घरांतल्या माणसांचा आनंद मात्र एकसारखाच असतो. 

जो गोपाळ गमे प्रभात समई गाई वनीं चारितां, 
वाटे रव्यूदयी नदीवर मुनी अर्घ्यास जो अर्पिता, 
जो भासे दिवसा कृषीवलशिरी खोवूनिया लोंबरे 
तो आता ऋतू शारदीय बहुदा शेतांतुनी संचरे 

राजा जो धनधान्यदायक असे साचा कुबेरापरी 
त्या श्रीमंडित शारदीय ऋतुची राणी दिवाळी खरी 
रूपैश्वर्यगुणाढ्य ती जवळ ये; द्याया तिला स्वागता सारेही शुभयोजनात गढले - काही नुरो न्यूनता! 

भिंती रंगवल्या नव्या फिरुनिया, केली नवी अंगणे, 
वीथी झाडुनि, रान काढुनि, दिसे सर्वत्र केराविणे; 
दारी उंच दिवे दिले चढवुनी, हंड्या घरी लाविल्या, 
लोकीं शक्‍त्यनुरूप आत्मसदनी भूषा नव्या जोडिल्या 

नोव्हेंबर १९०० मध्ये, म्हणजे बरोबर १२० वर्षांपूर्वी, कविवर्य केशवसुत यांनी लिहिलेल्या ‘दिवाळी’ नावाच्या कवितेतल्या या काही ओळी. गावाकडच्या दिवाळीचं दर्शन घडवणाऱ्या. दिवाळीचा सण हा कृषिजीवनातला सर्वोच्च आनंदाचा काळ असतो. 

हेही वाचा : बिहारची दंगल 

सर्वत्र आनंदीआनंद असतो. दिवाळीचा आनंद प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार व आपापल्या पद्धतीनुसार साजरा करतो. साधं मातीचं घर असेल तर ते  सडा-सारवणानं सजवलं जातं. बंगला असेल तर त्याची रंगरंगोटी केली जाते. कुठं खापराचे तेल-वातीचे दिवे मिणमिणतात, तर कुठं इलेक्‍ट्रिकच्या दिव्यांनी घर झगमगून जातं. दोन्ही घरांतल्या माणसांचा आनंद मात्र एकसारखाच असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अंधार उजळल्याचा आनंद असतो. 

पूर्वी गावागावातून दिवाळीचा हा सण गुराखी मोठ्या प्रमाणात साजरा करत असत. शेतात लव्हाळी नावाचं गवत असतं. त्याचे दोन प्रकार असतात. रानलहू आणि पानलहू. रानलहू हा रामायणाशी, तर पानलहू हा महाभारताशी संबंधित आहे. रानलहू म्हणजे रामाच्या दोन मुलांपैकी लव जो होता ते हे गवत, तर पानलहू म्हणजे महाभारतात यादवी झाले तेव्हा नशेतल्या यादवांनी याच गवताची शस्त्रं करून एकमेकांची हत्या केली. पानलहू हे गवत नदीच्या पाण्यात असतं, तर रानलहू हे मोकळ्या रानात असतं. याच रानलहूची - म्हणजे रामाच्या मुलाचं नाव असलेल्या गवताची - मुलं दिवटी करतात. खरं तर लहू म्हणजे लवचिक, लवणारा, नम्र. त्यावरूनच लहू, लहुजी हे नाव प्रचलित आहे. 

तर या लवचिक गवताची मुलं दिवटी करतात. ही दिवटी करण्याची एक रीत आहे. हे गवत उंच असतं. दिवाळीच्या पाच दिवसांत रोज एकेक ताळ चढवत गुराखी मुलं त्याची पाच ताळांची दिवटी करतात. या पाच ताळांच्या दिवटीनं गाई-वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतात. दिवटी हे दिव्याचं आदिम, मूळ रूप आहे. एका जुन्या कवितेत एक ओळ आहे ‘आधी होते मी दिवटी । शेतकऱ्याची आवडती.’ आताच्या मुलांना ही दिवटी पाहायलाही मिळत नाही. घरोघरी जाऊन गाई-वासरांना ओवाळताना ही मुलं एक गाणं म्हणतात : 

दिन दिन दिवाळी 
गाई-म्हशी ओवाळी 
गाई-म्हशी कुणाच्या? 
लक्षीमनाच्या 
लक्षीमन कुणाचा? 
आई-बापाचा 
आई-बाप कुणाचे? 
लक्षीमनाचे 
दे माय खोबऱ्याची वाटी 
वाघाच्या पाठीत घालीन काठी 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या गाण्याच्या शेवटी वाघाच्या पाठीत काठी घालण्याचा जो संदर्भ आहे तो कशासाठी असावा हे आताच्या लोकांच्या लक्षातही येणार नाही. जुन्या काळात वाघ हाच गाईंचा आणि गुराख्यांचा मोठा शत्रू होता. रानावनातून नेहमीच वाघ गाईला, गुराख्याला झडप घालून पळवून न्यायचा. तेव्हा वरील गाणं म्हणणारा गुराखी आईला म्हणत असे, ‘आई आता हिवाळा सुरू झाला आहे, मी खूप व्यायाम करीन, तू मला खोबरं खायला दे, मग मी इतका पुष्ट होईन की वाघ जरी आला तरी मी त्याच्या पाठीत काठी घालण्याइतका धैर्यवान होईन. कोणत्याही संकटाला मी घाबरणार नाही,’ असा त्या ओळीचा अर्थ. 

गुराख्यासोबतच गुराख्याच्या आईचाही संबंध दिवाळीत गाई-गुरांशीच येत असे. दिवाळीत गुराख्यांनी गुरं चरायला नेली की बाया गोठा साफ करून, सगळं शेण एकत्र करून, ते पिठासारखं मळून त्याचा एक गायवाडा तयार करतात. हा गायवाडा म्हणजे गोकुळ. त्यात गाई, गुराखी, कृष्ण, गाव, वेस असं सगळं शेणापासूनच तयार करायचं आणि त्याची छानपैकी पूजा मांडायची. दुसऱ्या दिवशी असेच शेणाचे पांडव, द्रौपदी, वेसकर, गावगाडा तयार करून त्या सगळ्यांची पूजा मांडली जाते. तिथं दुधातला भात शिजवला जातो. त्याला ‘उतू घालणं’ असं म्हणतात. म्हणजे ते एका अर्थानं शेतासाठी भविष्य असतं. तो भात शिजताना गंगेच्या बाजूनं उतू गेलं तर त्या वर्षी भरपूर सुगी येणार, शेतकरी आबादीआबाद होणार असं समजलं जातं. 

माझ्याच एका कवितेतल्या दोन ओळी आहेत : 

उतू गेलं गंगंकडं उतू घातलेलं बोणं 
हासू हासू सांगतय वटीमधी घ्या हो सोनं 

आदल्या दिवशीचा गायवाडा आणि दुसऱ्या दिवशीचा गावगाडा उचलून गोठ्याच्या झोपडीवर ठेवला जातो. तो वाळून कोळ होतो. पुढं नागदिव्याचा स्वयंपाक याच गोवऱ्या जाळून केला जातो. इतर वेळी जळण म्हणून त्याचा उपयोग करत नाहीत. 

माझ्या लहानपणी माझ्या चारही बहिणी दिवाळीला माहेरी येत. घरातला आनंद उतू आलेला असे. आई डाल भरून तळण करत असे. कधीच खायला न मिळणारे बुंदीचे लाडू या काळात खायला मिळत. आणखी काय काय खाण्याची चंगळ असे. अगदी लहानपणी दिवाळी संपली की मलाही नांदायला एकेका बहिणीबरोबर जावं लागायचं! नुकतंच लग्न झालेल्या प्रत्येक बहिणीबरोबर जाऊन दोन-तीन वर्षं तरी मी तिच्या सासरी राहायला असे. तेव्हा लहानपणी लग्न झालेल्या बहिणी नांदायला जाताना खूप रडत असत. मी त्यांच्याबरोबर गेलो तर तेवढाच माहेरचा अंश सोबत आहे असं त्यांना वाटे आणि दुःख हलकं होई. माझं सगळं लहानपण असं एकेका बहिणींच्या सासरी तिच्याबरोबर राहण्यातच गेलं.  

दिवाळी संपली की नातेवाइकांकडं लाडू-करदोरे पोचवणं हे थोडा मोठा झाल्यानंतर माझ्यावर येऊन पडलेलं काम असे. यानिमित्तानं सगळ्या माम्या-मावश्यांच्या भेटी होत. तिथला पाहुणचार आणि लाड अनुभवायला मिळत. या लाडाकोडात पुढचं वर्ष आनंदात जात असे. त्या आठवणी अजूनही काळजात गोडवा निर्माण करतात. आमच्या दिवाळीच्या आनंदात फटाक्‍यांचा समावेश नव्हता. त्याची गरजच नव्हती. नात्यागोत्यांच्या भेटी-गाठींचा आनंद अंगावर मूठ मूठ मांस चढवत असे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आमच्या गावाकडच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज नव्हती. जसजसा लोकांचा शहराशी संबंध आला तसतसे हे दोन दिवस अलीकडच्या काळात आमच्या दिवाळीत समाविष्ट झाले. आमचं लक्ष्मीपूजन म्हणजे पिकाचे पाचुंदे खांबाला बांधून त्यांवर दिवे लावणं. अलीकडच्या काळात चित्रपटांमुळे आणि दूरचित्रवाणीमुळे भाऊबीजेलाही गावाकडे महत्त्व आलंय. 

मी महाविद्यालयात शिकायला गेलो आणि माझ्या दिवाळीच्या आनंदात दिवाळी अंकांनी प्रवेश केला. दिवाळी अंक विकत घेणं आणि वाचणं ही दिवाळीच्या आनंदाची परमावधी वाटू लागली. लिहायला लागलो आणि आनंद आणखीच वाढला. दिवाळी अंकांत लेखन प्रकाशित होऊ लागलं. वाचकांच्या प्रतिक्रियांचं आणखी एक परिमाण दिवाळीच्या आनंदाला मिळालं. गेल्या दहा वर्षांत गावात होणारे दिवाळी अंकांचे प्रकाशनसमारंभ आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या लेखक-वाचकांच्या भेटी ही एक परमानंदाची पर्वणी वाटू लागली. 

आमच्या परिसरात दिवाळीत आणखी काही उपक्रम लोक गावागावातून करू लागले. अलीकडच्या काळात दिवाळी-व्याख्यानांचे कार्यक्रम धूमधडाक्‍यात होत आहेत. त्यानिमित्त गावात ज्ञानाचा नवा प्रकाश उजळत आहे. माझ्या गावातही गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ‘विचारांची भाऊबीज’ हा उपक्रम राबवतो; पण या वर्षी या सगळ्याच उपक्रमांना कोरोनाच्या साथीमुळे खीळ बसली. सुरुवातीला अगदी वेळेवर आणि छान पाऊस झाल्यामुळे पेरण्या वेळेवर झाल्या आणि पिकंही उधाणून आली; पण पुढं पावसानं अतिरेक केला आणि शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. आता मोठ्या पेरण्या सुरू झाल्या आहेत आणि खत-बियाण्याच्या तुटवड्यानं, चढ्या भावानं शेतकरी त्रस्त आहे. कापूस वेचायला आला आहे; पण मजूर नाहीत, त्यामुळे दिवाळी साजरी करण्याऐवजी आधी कापूस वेचावा लागणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तरी दिवाळी तर साजरी करावीच लागते. चिल्यापिल्यांना या अडचणी कुठं सांगत बसायच्या? आणि सण तरी रोज रोज कुठं असतो? कविवर्य अनिल यांनी त्यांच्या एका कवितेत बैलाविषयी लिहिलं आहे 

‘सण एक दिन। बाकी वर्षभर। ओझे मर मर। ओढायाचे’ 
बैलाचा मालक असलेल्या शेतकऱ्यालाही हे लागू होतंच की. 
बैल मुका, तर शेतकरी हा बोलणारा बैलच असतो. बैलाचे सगळे भोग त्यालाही भोगावेच लागतात, म्हणूनच मी माझ्या एका कवितेत म्हटलेलं आहे :

दिवाळीचा सण। गाई-वासरांचा। 
माम्या-भाचरांचा। आनंदाचा।। 
नदीतले पाणी। होउनी निर्मळ। 
वाहे खळखळ। दिवाळीत।। 
रानातली सारी। रोगराई हटे। 
जिथे तिथे भेटे। हिरवाई।। 
घरात दिसती। धनधान्यराशी। 
शेतातही खुशी। जागोजाग।। 
घुमती आखाडे। पहिलवानांचे। 
कण्‌खर तनाचे। कष्टकरी।। 
खाउनिया चारा। हिरवा हिरवा। 
भोगुनी गारवा। पुष्ट बैल।। 
गाई-वासरांचा। ज्या देशी सुकाळ। 
तिथे कधी काळ। येत नाही।।