एकेकाळचे ऐतिहासिक गाव. पुणे आणि सातारा या दोन मोठ्या शहरांजवळ असलेल्या या गावात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या आणि गावाचा चेहरामोहराच बदलला. विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या या गावाने अक्षरशः कात टाकली.
पुणे- सातारा महामार्गावरील जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीकाठी वसलेले शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) हे औद्योगिक गाव म्हणून उदयास आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला पहिला भुईकोट किल्ला व चालुक्य घराण्यातील पाणपोई या इतिहासातील पाऊलखुणांमुळे हे गाव ऐतिहासिक म्हणूनही प्रसिद्धीला आहे.
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर व पुणे शहरापासून अगदी ५० ते ६० किलोमीटरवर असलेले शिरवळ हे गाव. पुणे- बंगळूर महामार्गालगत वसल्याने दळणवळणाची सर्व साधने ओघाने येथे उपलब्ध झाली. या शहरापासून लगतच नीरा नदी वाहते, तर गावाच्या पूर्वेला भाटघर, तर पश्चिमेला वीर धरण आहे.
तसेच नीरा-देवघरचा कालवाही या गावाच्या उत्तरेकडून गेल्याने औद्योगीकरणाबरोबर येथे बागायती क्षेत्रही झपाट्याने वाढले. मुबलक पाणी व इतर सोयीही याठिकाणी उपलब्ध असल्याने या गावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसंख्या ६५ हजारांहून अधिक आहे.
सातारा जिल्ह्यातील लोकसंख्येने सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरवळ ग्रामपंचायतीची ओळख निर्माण झाली आहे. गावाच्या आजूबाजूला जवळपास १६५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे या गावाचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. खुद्द शिरवळमध्येच ३२ कंपन्या आहेत.
शिरवळ येथे १९९७ मध्ये महाराष्ट्र औद्योगीकरणाचा टप्पा क्रमांक एक व २००२ मध्ये टप्पा क्रमांक दोन मंजूर झाल्याने शिरवळसह विंग, धनगरवाडी, केसुर्डी, शिंदेवाडी, खंडाळ्यामध्ये औद्योगिक वसाहत सुरू झाली. मात्र, सर्व कंपन्यांचा केंद्रबिंदू शिरवळ आहे.
विकासात आघाडीवर...
यावेळी शिरवळच्या विकासासाठी कार्यरत कारभाऱ्यांनी दूरदृष्टीने नियोजनबद्ध विकास केला. त्यामुळे हे गाव अस्ताव्यस्त न वाढता नियोजनबद्धपणे वाढले. टप्प्याटप्प्याने नागरीकरण वाढल्याने येथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी व विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन विकासकामे मार्गी लावण्याबाबत हे गाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून येथील नागरिकांना दररोज २४ तास शुद्ध पाण्यासाठी २४/ ७ ही योजना राबविली. ही योजना पूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठी योजना ठरली. जवळपास पाच हजार नळ कनेक्शन देण्यात आले. २०३७ मधील लोकसंख्या विचारात घेऊन पाणीयोजनेची रचना केली गेली आहे.
लोकांना रोज २४ तास शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळत आहे. जितके पाणी वापराल तेवढीच पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाण्याची बचत झाली व पाणी वापरण्याची काळजीची सवय लागली. २००३ पासून ही योजना सुरू आहे, तसेच गल्लोगल्ली भुयार गटार (सांडपाणी योजना) व सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला.
भुयार गटार योजनेमुळे साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविता आले, तर सिमेंट रस्त्यामुळे फुफाटा व चिखलापासून मुक्तता मिळाली व शहर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली. शहराचा विकास नियोजनबद्ध झाल्याने या ग्रामपंचायतीची ओळख राज्यभर झाली.
हजारोंच्या हाताला काम...
शिर्के पेपर मिल व परांजपे ही कंपनी १९८० च्या दशकात शिरवळमध्ये आली. यानंतर डेटवायलर, गोदरेज, एशियन पेंट, केएसबी पंप, निप्रो, टीईटी कनेक्टिव्ह, विलो, प्रवीण मसाले अशा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मोठ्या तर अनेक लहान लहान कंपन्या यांनी येथे बस्तान बांधले. अनेक छोटे उद्योग सुरू झाले. परिणामी, हजारो तरुणांना काम मिळाले.
स्वच्छतेमध्येही जिल्ह्यात प्रथम
दरम्यान, शिरवळ परिसराचा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला. येथील ग्रामपंचायतीनेही गावाच नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी पाऊल टाकले. विकासाआड येणाऱ्या अतिक्रमणांवर आजपर्यंत दोनवेळा हातोडा टाकून, रहदारीच्या रस्त्याला मोकळा श्वास मिळवून दिला.
परिणामी, या कामामुळे या ग्रामपंचायतीला २०१८- १९ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राममध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला, तर २०२१- २२ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती स्पर्धेत १० लाखांचे बक्षीस मिळाले.
दर्जेदार शिक्षणाची सोय...
पुण्याप्रमाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभारण्यात आले आहे. सर्व सुविधायुक्त हे उद्यान बनविण्यात आले आहे. येथील घनकचरा व्यवस्थापन ही अंतिम टप्प्यात आहे. शिरवळ शहरात एकूण २२ अंगणवाड्या आहेत. यातील १२ अंगणवाड्या चांगल्या आहेत.
त्यांनी विविध क्षेत्रात नामांकन मिळवले आहे, तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण मिळत आहे. राज्यातील चार पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील सर्वात मोठे महाविद्यालय म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक ओपीडी असणारे जिल्हा उपरुग्णालयही येथे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.