
- डॉ. गिरीश जाखोटिया
साधारणपणे उद्योगसमूह चालविताना सहा ताळमेळ (मिक्सर्स) सातत्यानं पहावे लागतात व नियंत्रणात ठेवावे लागतात. समूहाचा ‘आरओआय मिक्स’ म्हणजे सामूहिक परतावा व त्याचे उद्योगानुसार सहभागी, हा सर्वाधिक महत्त्वाचा ताळमेळ असतो. परताव्याचा दरानुसार समूहातील उद्योगांना चाल द्यावी लागते किंवा काहींना आधार द्यावा लागतो.
उद्योजकता, प्रामाणिकता व लोकसंलग्नता यांचं अंतिम आणि आखीवरेखीव स्वरूप म्हणजे नामांकित झालेला उद्योगसमूह. जगभरात असे अनेक समूह होते व आहेत. विविध कारणांसाठी भारतातील व अन्यत्र काही ठिकाणी असे काही समूह दुभंगले नि कमकुवत झाले.
भारतीय उद्योजकतेचं नाव मात्र टाटा समूहानं देदीप्यमान पद्धतीनं जगभरात झळकवलंय. हा उद्योगसमूह आपल्या ‘लोकाभिमुखते’मुळं अन्य भारतीय समूहांच्या खूपच पुढं आहे. मुळात मोठा ‘उद्योगसमूह’ उभा राहण्याची सहा कारणं असतात -
१. विविध उद्योजकीय संधींचा लाभ उठवणं,
२. वेगवेगळ्या उद्योगांत गुंतवणूक करून उद्योजकीय धोक्याचं विभाजन करणं,
३. उद्योजकीय परिवारातील प्रत्येक सदस्याला नेतृत्वाची संधी देणं,
४. अतिरिक्त भांडवल, कर्मचारी व अन्य मालमत्तेचा वापर करणं,
५. विविध उद्योगांमध्ये एकमेकांस पूरक अशी सांगड घालून त्यांना बळकट करणं,
६. मोठा, विस्तारित व सर्वस्पर्शी असा उद्योगसमूह म्हणून नामांकित होणं. काही देशांमध्ये ‘अ’ उद्योग केला, तर ‘ब’ उद्योगाची सरकारी अनुमती मिळते. दीर्घ उद्योजकीय वाटचालीत काही वेळा इच्छा नसताना ‘कॅश फ्लो’ सुधारण्यासाठी काही नैमित्तिक उद्योग करावे लागतात, जे नंतर तसेच समूहात राहतात.
उद्योगसमूहाचे चार महत्त्वाचे प्रकार असतात. पहिल्या प्रकारात एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणारे उद्योग सामील असतात. उदाहरणार्थ - वाहननिर्मिती आणि हॉटेल उद्योग. दुसऱ्या प्रकारात एक मोठी मूल्यसाखळी सामावलेली असते.
उदाहरणार्थ - कच्च्या लोखंडाचं खाणकाम, पक्कं लोखंड बनवणं, अशा लोखंडापासून पाइप व पत्रे बनवणं इत्यादी. तिसऱ्या प्रकारात एकच उद्योग हा विविध देशांमध्ये, विविध कंपन्यांद्वारा केला जातो. यात ‘जॉग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन’चा उद्देश असतो.
चौथ्या प्रकारात एकच प्रॉडक्ट विविध तंत्रज्ञानानं किंवा कच्च्या मालानं बनविणाऱ्या अनेक कंपन्या असतात. उदाहरणार्थ - एखाद्या उद्योगसमूहात कोळसा, जल, वायू व आण्विक प्रकारे विद्युत ऊर्जा बनविणाऱ्या कंपन्या असू शकतात, अथवा एकाच प्रॉडक्टचे विविध दर्जाचे प्रकार बनविणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्याही असू शकतात.
जसं की, कापडाचे विविध स्तर व प्रकार किंवा विविध दर्जाचं स्टील इत्यादी. थोडक्यात असं की, कुवत व संधीनुसार उद्योगपती हे ‘मर्यादित डायव्हर्सिफिकेशन’ अथवा ‘पूर्ण डायव्हर्सिफिकेशन’चा व्यूहात्मक वापर करीत असतात व आपला उद्योगसमूह संतुलित करत मोठा बनवत राहतात.
दुसरं असतं ‘कॅपिटल मिक्स’ म्हणजे भांडवलाचं विविध उद्योगांमध्ये केलेलं रेशनिंग. तिसऱ्या ‘लिक्विडिटी मिक्स’मध्ये समूहातील उद्योगांनी एकमेकांचं खेळतं भांडवल गरजेनुसार वापरायचं असतं. चौथा मिक्स हा हुशार कर्मचाऱ्यांचा, विशेषतः व्यवस्थापकांचा असतो.
हे कर्तबगार व्यवस्थापक म्हणजे रमीच्या डावातील जोकरसारखे असतात, जे कोणत्याही परिस्थितीत, प्रक्रियेत व पदावर ‘फिट’ बसू शकतात. पाचवा मिक्स हा भौगोलिक असतो. विविध बाजार व अर्थव्यवस्थांच्या मिश्रणाचा समूहाला फायदा व्हायला हवा.
सहावा व अंतिम मिक्स किंवा ताळमेळ हा समूहाच्या एकूण वृद्धीचा असतो. एखाद्या क्रिकेट टीममधील खेळाडू हे वेगवेगळ्या सामन्यांमध्ये वेगवेगळी बरी-वाईट कामगिरी करीत असतात; परंतु टीम मात्र सांघिकरीत्या जिंकत राहते. उद्योगसमूहसुद्धा एकत्रितरीत्या असा जिंकत रहायला हवा.
समूहाची सुरुवात ही ज्या उद्योगाने होते, त्या उद्योगाचा प्रभाव हा समूहाच्या संस्कृतीवर, बाजारातील लौकिकावर व कार्यपद्धतीवर होत असतो. उदाहरणार्थ - टाटा मोटर्स व टाटा स्टील या टाटा समूहाच्या नामांकित व प्रमुख कंपन्या.
ऊर्जा, मार्गदर्शन, हुशार व्यवस्थापक इ. गोष्टी या प्रमुख कंपन्यांमधून साऱ्या समूहाला मिळत राहतात. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही मुकेश अंबानींच्या समूहातील अशीच प्रमुख कंपनी, जी त्या समूहाचा सुकाणूसुद्धा ठरते. प्रथितयश उद्योग समूहाचा ‘मदर ब्रँड’ एकदा बनला, की तो समूहातील सर्व नव्या-जुन्या उद्योगांचं ब्रँडिंग आपसूकपणे करीत राहतो.
जसं की, ‘टाटा’ हा एक बलाढ्य मदर ब्रँड बनलेला आहे. कोणत्याही नव्या उद्योगाचं प्रमोशन या मदर ब्रँडने करता येत असल्यानं ब्रँडिंगचा प्रचंड होणारा खर्च टाळता येऊ शकतो. अर्थात, या ब्रँडची एकूण ताकद ही उद्योजकता, प्रामाणिकता व लोकसंलग्नता या तीन प्रमुख घटकांनी बनत व वाढत राहते.
समूहातील कोणत्याही कंपनीच्या उत्तम कामगिरीमुळे या मदर ब्रँडची ताकद वाढत राहते. सरकार, बँकर्स, पुरवठादार, वितरक, भागीदार, ग्राहक, महत्त्वाकांक्षी कर्मचारी इ. सर्वजण अशा समूहाशी स्वतःला जोडू इच्छितात.
समूह जसजसा वाढत जातो, तसतसा त्याचा नियंत्रणात्मक ढाचासुद्धा सुधारावा व बळकट करावा लागतो. यासाठी नामवंत समूहांची ‘ग्रुप स्ट्रॅटेजी कौंसिल’ किंवा ‘ग्रुप मॅनेजमेंट कमिटी’ बनवली जाते.
या कौंसिलमध्ये समूहातील कंपन्यांचे मुख्याधिकारी असतातच, सोबतीनं उद्योजकीय परिवाराचे सदस्य, समूहाचे वित्तीय, मनुष्यबळ, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगप्रमुखही असतात. भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, पेटंट्सचा वापर व इतर साधनसामग्रीची समूहातील कंपन्यांनी करावयाची देवघेव ही धोरणात्मकरीत्या ठरवली जाते.
समूहाची सामाईक बँक, संशोधन व विकास केंद्र, मनुष्यबळ विकास केंद्र, सरकारी व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणारं केंद्र इ. गोष्टी समूहातील सर्व कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. काही समान गोष्टींची खरेदी समूह पातळीवर केल्यानं किमतीत मोठी सवलत मिळू शकते.
उदाहरणार्थ - कच्चा माल, कर्जाऊ भांडवल, इमारती, फर्निचर इत्यादी. समूहाच्या एकत्रित ताकदीमुळं आंतरराष्ट्रीय करारमदार सोपे व सुरक्षित होतात. उद्योगपतीच्या परिवारातील तरुण सदस्यांना व विविध कंपन्यांमधील हुशार व तरुण व्यवस्थापकांना समूहात ‘समांतर बढती’ व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. उद्योगपतीच्या परिवारातील ‘सक्सेशन प्लॅनिंग’ हे समूहातील संधींमुळं सोपं होतं.
उद्योगसमूहात उद्भवणारे काही प्रश्न वेळीच सोडवले गेले नाही, तर ते बरेच किचकट व नुकसानकारक होऊ शकतात. साधारणपणे समूहातील कंपन्या एकमेकांचे शेअर्स (मालकी हक्क) खरेदी करतात. या ‘क्रॉस होल्डिंग’मुळं कंपन्यांचं व्हॅल्युएशन नीटपणे होत नाही.
परिवारातील काही सदस्यांना समूहातील वरचढ कंपन्याच हव्या असतात. त्यांना रोटेशन किंवा नियंत्रणातील भागीदारी नको असते. हे सदस्य मग संपूर्ण समूहालाच मागं खेचू लागतात. काही कंपन्या वर्षानुवर्षं कमजोर रहात अन्य बलवान कंपन्यांना बोजा ठरू लागतात.
एखाद्या समूहातील प्रत्येक कंपनी ही आपापल्या इंडस्ट्रीमध्ये अन्य स्पर्धकांच्या तुलनेत लहान असल्यास समूह ताकदवर होत नाही. काही समूहांमध्ये एकच मोठी कंपनी संपूर्ण समूहाचा भार उचलत राहते नि परिणामी आजारी पडत जाते.
काही समूहांमध्ये स्वतः उद्योगपती, जवळचे कुटुंबीय व वरिष्ठ अधिकारी कंपन्यांचा व्यूहात्मक व वित्तीय वापर भ्रष्टाचारी पद्धतीनं करतात व त्यामुळे संपूर्ण समूह हा अडचणीत येतो. समूहातील काही कंपन्यांचा वापर हा ‘डंपिंग ग्राउंड’सारखा केला जातो.
म्हणजे अन्य कंपन्यांमधील नको असलेले कर्मचारी व साधनसामग्री इथं साचवली जाते. बऱ्याचदा समूहाचे नियंत्रक व कंपन्यांचे मुख्याधिकारी यांच्यामधील अहंकारी आचरणामुळे संपूर्ण समूह धोक्यात येऊ शकतो. थोडक्यात असं की, उद्योग समूहाची सामुदायिक संस्कृती ही अत्यंत काळजीपूर्वक जपावी लागते! पुढील भागात आपण पाहूयात ‘उद्योजकीय नेटवर्किंग’.
(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.