

Digital Business Growth
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
एकदा सकाळी काकांचा व्हॉट्सॲप मेसेज : इन्फ्लुएन्सर्स म्हणजे काय असतं रे?
मी : सोशल मीडियावरून लोकांना जे प्रभावित करतात असे लोक. म्हणजे लोकांची मतं, कल, खरेदीचे पॅटर्न यांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती. ज्यांना काही लाखांत फॉलोअर्स असतात ना ते.
काका : थांब, फोनच करतो...
काकांना मेसेजिंगपेक्षा थेट फोन करून बोलणं जास्त सोयीचं वाटतं आणि आवडतंही! त्यांचा फोन आला आणि मी लगेच घेतला.
काका : अरे तुला माहितीच आहे आमचा सोहम आता दुकानात लक्ष घालू लागलाय. (काकांचं कपड्यांचं दुकान आहे. लेडीज आणि जेन्ट्स वेअर असं दोन्हींचं). त्याच्या मित्राची एक एजन्सी आहे. म्हणजे बिझनेस कसा वाढवायचा वगैरे सल्ले देणारी. त्याने सांगितलं, तुमच्या दुकानाचा ‘डिजिटल रीच’ वाढवायला हवा.
मी : अच्छा, आलं लक्षात. म्हणून तुम्ही विचारलंत मला...
काका : हो, त्याच्या एजन्सीने आम्हाला सांगितलं, की ते रील नि काय काय असतं ना ते करा. इन्फ्लुएन्सर्सकडून प्रमोशन करून घ्या. वगैरे.
मी : चांगलंय. पूर्वीसारखं मार्केट आता राहिलं नाही. मला आठवतं, माझे बाबा एक मोठ्ठा तागा आणायचे आणि ठरलेल्या शिंप्याकडून मला आणि भावाला शर्ट शिवून घ्यायचे – बँडवाले! बाबांना कधीतरी कुणीतरी शर्टपीस दिलेला असायचाच, ते त्यातून शिवायचे. मग तयार कपडे मिळू लागल्यावर दिवाळीच्या आधी, बाबांना बोनस मिळाला की आम्ही एखाद्या दुकानात सहकुटुंब जायचो - घाऊक कपडे खरेदी करायला. मग घरी येताना उसाचा रस किंवा भेळ! मग मॉल आणि तिथला पिझ्झा, बर्गर! पण आता लोक पोस्ट्स पाहून खरेदी करतात. ऑनलाइन ऑर्डर दिली की दोन दिवसांत घरी.
काका : मलाही माहीत आहे रे. तुझी काकू करते ना. फेसबुकवर साड्यांच्या पोस्ट्स पाहून तिथून मागवते ती.