खानावळ व्यवसायातून बेबीबाईंची परिस्थितीवर मात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food mess

खानावळ व्यवसायातून बेबीबाईंची परिस्थितीवर मात!

आयुष्याच्या वाटचालीत आलेल्या संकटांमध्ये अनेकदा खचून जाण्याचे प्रसंग वाट्याला. मात्र सकारात्मक विचारांच्या जोरावर त्या लढत राहिल्या. तुटपुंजा मेहनताना घेत घरोघरी स्वयंपाक करून कुटुंबाला आधार देत स्वतःमधील सुगरण उभी केली. केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सटाणा येथील बेबीबाई भदाणे यांनी कसमादे परिसरात स्वतः तयार केलेल्या स्वयंपाकाचा ब्रँड तयार केलाय.

वाखारी- पिंपळगाव (ता. देवळा) येथील माहेर आणि सटाणा शहरातील सासर असलेल्या बेबीबाई छगनराव भदाणे (वय ६६) या अल्पशिक्षित. नेहमीच काहीतरी करण्याच्या धडपडीतून उभ्या राहिल्या. वडील मनाजी गोविंदा आहेर यांचे पत्नी, पाच भाऊ, चार बहिणी असे मोठे कुटुंब होते. मात्र या कुटुंबाने जगण्याच्या वाटचालीत अनुभवलेले अनेक चढउतारांच्या साक्षीदार बेबीबाई राहिल्या. वडील मनाजी आहेर यांनी आयुष्यात आलेल्या प्रसंगांना कधीही खचून न जाता सामोरे जाण्याचं बाळकडू कुटुंबाला दिले होते. यातूनच त्याही घडत गेल्या.
बेबीबाई यांचा विवाह सटाणा येथील छगनराव भदाणे यांच्याशी झाला. सासरी परिस्थिती जेमतेम... मात्र कुटुंबातील संस्कारांचे बाळकडू सोबत असल्याने कष्टाची तयारी असलेल्या बेबीबाई यांनी परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीलाच आव्हान दिले. पती छगनराव रोजंदारीवर दुकानांमध्ये कामगार म्हणून काम करत कुटुंबाचा गाडा हाकत होते. मात्र कुटुंबाची जबाबदारी केवळ पतीचीच नाही तर आपलीही आहे, याची जाणीव असल्याने त्यांनीही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला. स्वयंपाकात सुगरण असलेल्या बेबीबाई यांनी शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या कुटुंबांमध्ये मोलमजुरी तसेच स्वयंपाकाची कामे करायला सुरवात केली.

हेही वाचा: खेड्यातील तरुणीची प्रेरणादायी कथा; शिपाई ते सहाय्यक लेखा अधिकारी!

दिशा केली निश्चित...

कौटुंबिक आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बेबीबाई यांना कष्टाशिवाय पर्याय नव्हता. याच काळात मुलगा अनिल, मुली रंजनाताई व कल्पनाताई यांच्यानिमित्ताने कुटुंबाची सदस्यसंख्या वाढली. आयुष्यात आलेल्या परिस्थितीला सामोरे जातानाच त्यांनी स्वतःला परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटलेल्या बेबीबाई यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवले. मुलगा अनिल यांच्या शिक्षणासाठी मामांनी पुढाकार घेतल्याने माहेरचा मोठा आधार यानिमित्ताने भदाणे कुटुंबाला मिळत गेला. यातूनच मुलगा अनिल याने उच्चशिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षणाचेही धडे घेतले. कमवा व शिका योजनेचाही मुलाला फायदा झाला.

स्वतःचा ब्रँड राहिला उभा

सटाणा शहराचा वाढता विस्तार आणि बाहेरगावाहून आलेल्या शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांसाठी बेबीबाई यांनी स्वतःची खानावळ सुरू केली. येथूनच भदाणे कुटुंबाला दिशा मिळाली. प्रारंभी खानवळीतून महिन्याला एका नागरिकाकडून केवळ दीडशे रुपये कमाई करणाऱ्या बेबीबाई यांच्या कुटुंबाने आज कसमादे परिसरात आमंत्रण हॉटेलच्या माध्यमातून स्वतःची ओळख उभी केली आहे. कुटुंबाची होणारी ओढाताण, नोकऱ्यांमधील स्पर्धा लक्षात घेता मुलगा अनिल यानेही कुटुंबाला मदत करत व्यवसायात पदार्पण केले. कुटुंबांवर खचून जाणाऱ्या प्रसंगांत अनिल यांच्या मित्रपरिवारानेही दिलेला आधार मोलाचा होता.

स्वतःच बनल्या कुटुंबाचा आधार

याच काळात २००० मध्ये पती छगनराव यांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी बेबीबाई यांच्यावर आली, मात्र त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवत भक्कम उभ्या राहिल्या. रंजना शेटे आणि दुसरी मुलगी कल्पना वाणी यांच्याही विवाहाची जबाबदारी पार पाडत मुलगा अनिलसोबत आमंत्रण या नावाने उभा राहिलेला खानावळ व्यवसाय वाढवत आपली ओळख भक्कमपणे सटाणा शहरात उभी केली आहे. एकेकाळी तुटपुंज्या पगारावर घरोघरी जाऊन कष्टाची कामे करणाऱ्या बेबीबाई भदाणे यांनी आज आमंत्रण हॉटेलनिमित्ताने जपलेली सुगरणीची चव प्रत्येकाच्या ओठावर आहे. आज बेबीबाई यांच्या खाणावळीत अनेक वर्षांपासून ग्राहक टिकून आहेत. बेबीबाई यांच्या आमंत्रण हॉटेलच्या निमित्ताने ५ कुटुंबांना कायमस्वरुपी रोजगाराची संधी भदाणे कुटुंबाने उपलब्ध करून दिली आहे. या व्यवसायात त्यांना मुलगी अनिलसोबतच सून आरती यांचेही मोलाचे सहकार्य त्यांना मिळते आहे, म्हणूनच त्या आपली ओळख उभी करू शकल्यात.

हेही वाचा: जागतिक कुटुंब दिन विशेष : एकत्र कुटुंबपद्धतीच्या मदतीने साधली प्रगती

नातवांच्या निमित्ताने शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष

परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सुटले. मुलींना शिक्षणासाठी कमतरता भासू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेबीबाई यांचे नातू अथर्व बी. टेक. तर दुसरा नातू आदर्श पीसीएमचे प्रशिक्षण कोटा येथे घेत आहे. आयुष्यातील आलेल्या प्रसंगांमध्ये खचून जाण्याची परिस्थिती असतानाच नातवांच्या निमित्ताने नक्कीच ही पोकळी भरून निघेल, असा आशावादही त्या व्यक्त करतात.

Web Title: Inspiring Story Of Lady Who Success In Catering Business

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiksaptarang
go to top