करांचं पासबुक (ॲड. सुकृत देव)

ॲड. सुकृत देव 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

तुमच्या उत्पन्नाचं आणि विशेषतः करांचं विवरण असलेला ‘फॉर्म २६ एएस’ अतिशय महत्त्वाचा असतो. ‘करांचं पासबुक’ असंच त्याला म्हणायला पाहिजे. हा फॉर्म नक्की बघायचा कसा, त्याचं महत्त्व नक्की काय आहे, त्याच्यासंदर्भात काय काळजी घ्यायची आदी गोष्टींबाबत माहिती. 

‘फॉर्म २६ एएस’ ही एक अत्यंत उपयुक्त अशी करप्रणाली प्राप्तिकर विभागानं प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांसाठी विकसित केली आहे, ही समांतर अशी करप्रणाली ‘ट्रेसेस’ (TRACES)  या सेलकडून चालविण्यात येते, जी ‘टीडीएस सलोखा विश्‍लेषण’ व ‘दुरुस्तीसाठीची यंत्रणा’ या मूळ संकल्पनेवर आधारित कार्यान्वित आहे.

प्राप्तिकर आणि त्याचं विवरण भरणं ही आता करदात्यांसाठी अत्यावश्‍यक गोष्ट झाली आहे. ज्या करदात्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरणं अनिवार्य आहे. ज्या प्राप्तिकर करदात्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरणं ऐच्छिक असतं; पण विवरणपत्र भरण्याचे फायदे नकीच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, कर्ज घेण्यास मदत होते. कर कापला गेल्यास जे उत्पन्न करमुक्त होतं, त्याच्या परताव्यासाठी विवरणपत्र भरावंच लागतं इत्यादी.

‘२६ एएस’ या प्रणालीमध्ये प्राप्तिकर करदात्यांची माहिती खालीलप्रमाणं मिळते : 

  • करदात्यांच्या वतीनं कंत्राटदारांद्वारे कापलेल्या कराची माहिती.
  • करदात्यांच्या वतीनं कर गोळा करून प्राप्तिकर भरल्याची माहिती.
  • आगाऊ कर किंवा स्वतंत्र मूल्यांकनाद्वारे भरलेला प्राप्तिकर.
  • प्राप्तिकर परतावा जो प्राप्तिकर विभागानं करदात्यांना पाठवलेला असतो त्याची माहिती.
  • मोठ्या व्यवहारांचा तपशील 

‘फॉर्म २६ एएस’ ही करप्रणाली पॅन-आधारित आहे. त्यानुसार ‘टीडीएस’ अथवा ‘टीसीएस’द्वारे कापलेल्या किंवा गोळा केलेल्या प्राप्तिकराची नोंद करदात्यांच्या पॅन नंबरवर करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर कंत्राटदारांनी/ कर गोळा करणाऱ्यांनी ‘टीडीएस’ अथवा ‘टीसीएस’ विवरण टॅन नंबर वापरूनदेखील भरणं अनिवार्य असतं- तरच करदात्यांच्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये ती रक्कम दिसते. 

करदात्यांमध्ये व्यक्ती/ हिंदू अविभक्त कुटुंब/ भागीदारी संस्था/ मर्यादित भागीदारी संस्था/ कंपनी इत्यादी सर्वांचा समावेश ‘फॉर्म २६ एएस’ करप्रणालीमध्ये होतो. ‘फॉर्म २६ एएस’ला एक प्रकारे उत्पन्नाचा दाखला किंवा बॅंक किंवा कर पासबुक म्हणता येईल- कारण त्यामध्ये पगारदाराना मिळणारा पगार, व्यवसाय-धंद्यातून मिळणारं उत्पन्न, प्रॉपर्टीमधून मिळणारं उत्पन्न, बॅंकांमधल्या मुदत ठेवी, बचत ठेवी, आवर्ती ठेवी, सुरक्षा ठेवीवरचं व्याज, कमिशन वगैरे गोष्टी (योग्य प्रकारे नोंदी दाखवल्या असल्यास) दिसतात. या उत्पन्नावर कर कापला गेला असेल, तर कापला गेलेला कर ‘टॅक्‍स क्रेडिट’ म्हणून जमा होतो. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना जर प्राप्तिकर आला, तर तो ‘टॅक्‍स क्रेडिट’मधून वजा होतो. ‘टॅक्‍स क्रेडिट’ जास्त असेल, तर रिफंड म्हणजे परतावा मिळेल, कमी असेल तर प्राप्तिकर भरावा लागेल.  

प्राप्तिकर खात्याच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाइटवर जाऊन, आपल्या अकाउंटवर लॉगिन करून ‘फॉर्म २६ एएस’ आपण डाऊनलोड करू शकतो. त्याचबरोबर बॅंकेच्या इंटरनेट बॅंकिंग सेवेअंतर्गत लॉगिन करूनसुद्धा आपण हा फॉर्म बघू शकतो. ती बॅंक ‘ट्रेसेस’मध्ये नोंदणीकृत असेल तरच हा फॉर्म बघता येईल. ट्रेसेसच्या https://contents.tdscpc.gov.in/en/home.html  या वेबसाइटवरसुद्धा लॉगिन करून ‘फॉर्म २६ एएस’ बघू शकतात.

‘फॉर्म २६ एएस’ बाबतचे मुख्य मुद्दे : 
‘फॉर्म २६ एएस’चा उपयोग करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरताना नक्कीच होतो. कारण त्यामध्ये उत्पन्नाच्या स्रोतांमधून कापलेला कर याची सर्व  माहिती असते- मग तो पगार असो, मानधन असो, व्याज असो, व्यावसायिक जमा पावत्या असोत इत्यादी. त्यामुळं एकीकडं करदात्यांना मिळालेला फॉर्म १६/ १६ अ त्यामध्ये कापलेला टीडीएस/ टीसीएस या गोष्टी असतात, तर दुसरीकडं या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसलेल्या सर्व वजावटींची माहिती असते जी करदाते तपासू शकतात. या सर्व वजावटी तपासल्याशिवाय करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरू नये. ‘प्राप्तिकर विवरण’ आणि ‘फॉर्म २६ एएस’मधल्या सर्व वजावटी जुळल्या गेल्याच पाहिजेत, याची खात्री झाल्यानंतरच विवरण फाइल झालं पाहिजे. 

बऱ्याच वेळेला करदात्यांकडं उत्पन्नाची पुरेशी माहिती नसते किंव्हा अपुरी माहिती असते. (उदाहरणार्थ, सर्व बॅंकांतल्या व्याजाची माहिती- ज्याच्यावर कर कापलेला आहे, त्यासाठी बॅंकेमधून फॉर्म १६ अ आणणं गरजेचं असतं.) या माहितीकरता फॉर्म २६ एएस नक्कीच उपयोगाला येतो.

‘फॉर्म २६ एएस’मुळं टीडीएस/ टीसीएसच्या जमा रकमेवर दावा करण्यास मदत होते.

काही वेळेला कापलेला प्राप्तिकर हा ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसत नाही, कारण तो कंत्राटदारानं सरकारला भरलेला नसतो, किंवा त्याचं टीडीएस/ टीसीएस विवरण भरलेलं नसतं. अशा वेळी करदात्यांनी संबंधितांना कर आणि विवरण भरायला सांगितलं पाहिजे.

जर प्राप्तिकर करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये ‘फॉर्म २६ एएस’मध्ये उत्पन्नाचे काही तपशील दाखवले नसतील, तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस/ ‘कारणं दाखवा’बद्दलचे मेल येतील. 

‘फॉर्म २६ एएस’ नकीच एक उपयुक्त असा फॉर्म/ सारांश/ पासबुक आहे, जे प्राप्तिकर करदात्यांसाठी उपयोगी ठरतं आहे.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Investment tips by Sukrut Deo