
बोल्ड ॲण्ड ब्युटिफूल
डॉ. सबिहा contact@drsabiha.com
सेक्स वैज्ञानिक पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे. ‘सेक्स आणि रिलेशनशिप कोच’ अशी ओळख असलेल्या डॉ. सबिहा त्याबाबतच मार्गदर्शन करतात. आपल्या पाक्षिक सदरातून विवाहितांच्या नात्यातील रोमान्स त्या उलगडून दाखवणार आहेत.
माय नेम इज डॉ. सबिहा ॲण्ड आय ॲम नॉट अ कॅरेक्टरलेस’ असं मला अनेकदा सांगावं लागतं, कारण माझं अनोखं प्रोफेशन... मी जेव्हा कोणाला सांगते, की मी डॉक्टर आहे तेव्हा छानपैकी संवाद होतो. मग, कोणते डॉक्टर आहात? कुठली प्रॅक्टिस करता? वगैरे प्रश्न ओघाने येतात. जेव्हा मी त्यांना सांगते, की ‘मी सेक्स कोच डॉ. सबिहा आहे’ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे बदलतो. त्यांच्या नजरेत अचानक एक ऑकवर्डनेस जाणवतो. त्यांची देहबोलीच बदलून जाते. एक सन्नाटा पसरतो. ते अवघडलेपण किंवा सन्नाटा दूर होत नाही, तोवर आपण समजून जायचं की असा काही पेशा किंवा अशी काही सेवा अस्तित्वात आहे हे त्यांच्या गावीही नसतं. दुर्दैवाने खरंय ते, कारण अजूनही आपल्याकडे असं काही स्वीकारलंच जात नाही. सेक्स कोचिंग नावाचं काहीतरी प्रोफेशन आहे, जिथे जाऊन तुम्ही एकटे किंवा जोडीने संवाद साधू शकता... तुम्ही प्रौढ अन् विवाहित आहात आणि लैंगिकदृष्ट्या ॲक्टिव्ह आहात, तर तुम्ही अशा विश्वासार्ह अन् सर्टिफाईड सेक्स कोचकडे जाऊन नक्कीच चर्चा करू शकता, बोलू शकता; कारण ते बंद दाराआडचं समुपदेशन असतं. आपल्या नात्यात सेक्सकडे भावनिकदृष्ट्या बघितलं पाहिजे. त्यात एका शरीरापलीकडे भावनिक गुंतवणूक असते आणि त्याचं महत्त्व जाणून घ्यायलाच हवं. शारीरिक गरजांमधली एक क्रिया म्हणून एखादा प्राणीसुद्धा कामक्रीडा करतोच की? आपण तर मानवप्राणी आहोत, म्हणजे त्यापलीकडे जात एक शारीरिक भावना व्यक्त केलीच पाहिजे... सेक्स म्हणजे आपल्या जोडीदाराप्रतीची भावना व्यक्त करण्याचं एक महत्त्वाचं अन् तितकंच गरेजचं साधन आहे. लाजेखातर म्हणा किंवा कामाच्या ताणामुळे अशी भावना दाबून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. महत्त्वाचं म्हणजे, ती नजाकतीने व्यक्त व्हायला हवी. कधी, कुठे आणि नेमकं काय केलं म्हणजे आपण सेक्सचा परमोच्च क्षण गाठू शकतो, आपलं काय चुकतंय, योग्य पद्धत कोणती वगैरे वगैरे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक सुरक्षित आणि स्वतंत्र अशी स्वतःची स्पेस लागते आणि तीच एक विश्वासार्ह सेक्स कोच तुम्हाला देत असतो. तिथलं सर्व ‘गुपित’ तुमच्यात आणि त्याच्यात असतं.
मी एक स्त्री आहे, मुलगी आहे, बहीण आहे, बायको आहे, मैत्रीण आहे आणि आई आहे... तब्बल वीस वर्षे वैद्यकीय सेवेत असलेली एक प्रशिक्षित आणि मान्यताप्राप्त डॉक्टर आहे, आयसीएफ (इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशन) संस्थेची मानद पदवी मिळवलेली लाइफ कोच आहे. इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे. ‘मास्टर एनएलपी’ची प्रॅक्टिशनर आहे. और क्या चाहीये? एवढं सगळं जर मी माझ्यात सामावलं आहे तर मला सांगा, अवघ्या महाराष्ट्रात तुम्हाला माझ्यापेक्षा प्रणयाराधनासारख्या विषयावर कोण मार्गदर्शन करू शकेल का?
असो, आत्मस्तुतीचा मुद्दा बाजूला ठेवून मी तुम्हाला सांगू शकते, की सेक्स म्हणजे एका निखळ प्रेमाची भाषा आहे आणि ती शिकून घ्यायलाच हवी. वाटलं आणि केलं, असं कधी होत नाही. आपल्या जोडीदाराकडून मिळणारं शारीरिक सुख किंवा समाधान म्हणजे एका मानवी जीवनाचा अधिकार आहे. मी नेहमी सांगत आलीय की, ‘प्लेजर इज युअर बर्थ राईट.’ आता शरीरशास्त्र काय, परमसुखाचं मानसशास्त्र काय किंवा त्यामागचं शारीरिक विज्ञान काय ते जाणून घेणं गरजेचं आहे. एक डॉक्टर आणि सेक्स कोच म्हणून जर मी निरपेक्ष सेवेने जर कोणाला मानसिक अन् शारीरिक आधार देत असेल, तर महाराष्ट्रवासीयांना मी सांगेन, की मला आणि माझ्या अनोख्या प्रोफेशनला आपल्या समाजाने आनंदाने स्वीकारावं. कारण, स्वतःला कर्करोग झालाय म्हणून कोणी कॅन्सर सर्जन होत नाही ना... तसंच आहे हे.
एखादा सेक्स कोच आहे म्हणजे तो काय सतत नुसता वेगवेगळ्या पार्टनरबरोबर कामक्रीडा करत बसत नाही. तो अव्हेलेबल आहे, अनेकदा त्याचे कोणाशी तरी शारीरिक संबंध आलेत किंवा त्याला प्रणयाराधनेतला अनुभव आहे म्हणून तो सेक्स कोच आहे, असंही नसतं. खरं तर अशा प्रोफेशनकडे अत्यंत आदराने पाहायला हवं. ती आपली गरज आहे. कारण, आज कोणत्याही आईच्या पोटातून रेपिस्ट अर्थात बलात्कारी मुलगा जन्माला येत नाही. जन्मतः तो बलात्कारी नसतो. तो समाजात वावरतो, वयाने मोठा होत जातो, कालांतराने त्याच्यात लैंगिक इच्छा प्रबळ होत जाते, त्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवावं किंवा कशा पद्धतीने तिचं अभिसरण करायचं याची माहिती त्याला कोणी देत नाही. शरीरशास्त्र किंवा शारीरिक व्यवस्थापन याचं ज्ञान त्याला कोण देणार? त्यासाठी काही विशेष अभ्यासक्रम नाही. मग एके दिवशी तो नराधम होतो आणि एखाद्या जनावरासारखा बलात्कार करून रेपिस्ट होतो... किती उदाहरणं आहेत अशी. आज आपण बलात्कार किंवा अत्याचार थांबवण्यासाठी जेवढे उपाय योजतो आहोत ना तेवढेच रेपिस्ट तयार होऊच नयेत म्हणून प्रयत्न करायला हवेत. उगाच सेक्सच्या नावाने बोटं मोडण्यात किंवा त्याकडे पाठ फिरवण्यात काही अर्थ नाही. सेक्सचा विषय निघाला तर ‘शी शू’ न करता त्याबाबत निसंकोच संवाद साधायला हवा. जी कामक्रीडा आपण आपल्या बेडरूममध्ये करणार आहोत त्याबाबत निदान डायनिंग टेबलवर एखाद्या प्रौढ माणसासारखं बसून अत्यंत सहजतेने बोलता आलं पाहिजे आणि इथेच सेक्स कोच महत्त्वाचा ठरतो.
आजकाल सोशल मीडिया फार बदनाम झाला आहे. काही इन्फ्लुएन्सर ‘तशा’ प्रकारच्या रील्स बनवतात. तिथे सेमी-नेकेड शो सुरू असतो आणि असभ्य किंवा अश्लील कंटेंट व्हायरल केला जातो. अशा फेक रील्सची किंवा तकलादू फॅन्टसीची गरजच नाहीय. त्याच्यासाठी आपल्याकडे पोर्न आहेच ना... एक लक्षात घ्या, शरीरशास्त्र किंवा प्रणयाराधना म्हणा हवं तर, तो आपल्या आनंदाचा आणि समाधानाचा भाग आहे. आपल्याला तेवढ्याच ग्रेसफुली तो येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. वैवाहिक नात्याचं समीकरण अवलंबून असतं ते जोडीदारांत किती जवळीक आहे त्यावर. दुसरा मुद्दा असतो, भावभावनांचा. बघायला गेलं तर ती क्षुल्लक गोष्ट वाटते; पण तोच नात्यातला महत्त्वाचा धागा आहे. मग त्याबाबतचं प्रशिक्षण द्यायला काहीतरी स्पेस हवी ना... त्याबाबत समजून सांगणारं कोणी हवं ना... आम्ही त्यासाठीच तर आहोत! अशा प्रसंगी आमच्यासारखे सेक्स कोच पिक्चरमध्ये येतात. कारण, माझं धोरणच आहे, की प्लेजर इज ॲट युवर फिंगर टिप्स...
मी पुन्हा सांगेन, की ७० टक्के विवाहित महिलांनी आजवर शरीरशास्त्रातलं चरमसुख अनुभवलेलंच नाहीय. ते काय असतं, तेच त्यांना माहीत नसतं. पुरुषांचंच फक्त पतन होतं का? स्त्रीचंही होतंच की. आता थोडं धाडसी विधान करते... स्त्रीला तो चरमसुखाचा फिल फक्त पुरुषच देऊ शकतो का? जसा पुरुष हस्तमैथुन करतो तसा पर्याय स्त्रीकडेसुद्धा असतो की! अनेक स्त्रियांना माहीत नसतं की काय केल्याने चरमसुख मिळू शकतं; पण एक शारीरिक गरज म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. आज वैद्यकशास्त्राशी निगडित अनेक पुस्तकं आहेत; पण त्यातही अशा ‘खासगी’ गोष्टींबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. कारण, आजही सेक्स म्हणजे आपल्याकडे ऑप्शनचा विषय आहे. एक प्रजनन संस्था म्हणूनच आपण त्याकडे पाहत आलो आहोत. आता आपल्या पुढच्या पिढीलाही प्रेम कसं करायचं याची माहिती द्यायला हवी ना. मग, ते आपल्याला शिकवायचं आहे.
सेक्स म्हणजे प्रेमाची एक सगळ्यात निखळ, नितळ, शुद्ध आणि तृप्त भाषा आहे. सेक्स म्हणजे फक्त अवयवांची लांबी-रुंदी नाही. सेक्स म्हणजे फक्त पुरुषाचं चरमसुख नाही, तर तो बरोबरीचा मामला असतो. आजच्या जमान्यात त्याचंही शिक्षण गरजेचं आहे आणि आम्ही तेच करत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, शारीरिक संबंधांसाठी जवळ येण्याला वयाचं बंधन नसतं. हो, पण बेडवरील परफॉर्मन्सला असतं... इथे तुम्ही तुमच्या विवाहित जोडीदाराला किती सुख देता आणि त्याच्या किंवा तिच्या अंतरंगात अन् अंतर्मनाच्या खोलात किती शिरता त्यावर तुमचा परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो. अर्थातच त्यासाठी हवा अत्यंत सशक्त संवाद. विनासंवाद किंवा सहमतीशिवाय होणारा जो ॲक्ट असतो ना तो माझ्या मते तरी ‘रेप’ असतो. एक लक्षात घ्या, सेक्स केल्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मनमोकळा श्वास घेऊ शकता. तुमचं प्रेम व्यक्त करणं कृतीत दिसणंही महत्त्वाचं आहे आणि त्यात दिवसेंदिवस प्रगती व्हायला हवी. कारण, आपण संवेदनशील आणि भावभावनांनी भरलेल्या मानवजातीत जन्माला आलो आहोत. आम्ही आमच्या सेक्स कोचिंग, काऊन्सिलिंग, सेशन आणि वेबिनारमध्ये त्याबाबतच प्रशिक्षण देत असतो.
आमचं प्रोफेशन आहे ते वैवाहिक नातं टिकवण्याचं. त्यात कामक्रीडा फार महत्त्वाची ठरते. आम्हाला समाजाचा मोठा विरोध पत्करावा लागतो. सोशल मीडियावर आम्ही ट्रोल होतो. मोबाईलवर अनोळखी कॉल आला की छातीत धस्स होतं. आमचं कुटुंब-मित्रमंडळीही आमची काळजी करत असतात. अनेक जण वाईट नजरेने बघतात; पण मी सर्वांना मोठ्या अभिमानाने सांगते, की ‘आय ॲम डॉ. सबिहा... आय ॲम अ सेक्स कोच ॲण्ड नॉट अ कॅरेक्टरलेस.’ मी अशा अनोख्या फिल्डमध्ये कशी आली ते कळेलच ओघाओघाने...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.