अक्षरांतून उमटवले विज्ञान

डॉ. पंडित विद्यासागर prof_pbv@yahoo.com
Sunday, 31 January 2021

विशेष
नाशिक येथे येत्या २८ मार्चपासून होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विज्ञानकथा लेखक व ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या कारकिर्दीचा वेध...

नाशिक येथे येत्या २८ मार्चपासून होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विज्ञानकथा लेखक व ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या कारकिर्दीचा वेध...

मराठी साहित्यात गेल्या पाच दशकात अनेक स्थित्यंतरं झाली. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असे सशक्त प्रवाह निर्माण झाले. मराठी साहित्यानं त्यांचा अंगीकार केला. विज्ञान साहित्याचं दालनही त्याच काळात विकसित झालं, विज्ञान साहित्याचा मुख्य प्रवाहात समावेश ही नवनिर्मितीची नांदी ठरू शकते. नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड त्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची आहे. त्या घटनेचा अन्वयार्थ केवळ एका शास्त्रज्ञाला साहित्यिक म्हणून मिळालेली मान्यता एवढ्यापुरताच मर्यादित नाही. एकूण मराठी साहित्याला परिवर्तनशील, भविष्याचा वेध घेणारं तसेच वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर फुलणारे साहित्य असे आयाम देणारी ही घटना आहे. याचं कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जीवनाच्या सर्व अंगांवर वाढत जाणारा प्रभाव. अशा वेळी त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांचं प्रतिबिंब साहित्यात उमटणं आवश्‍यक आहे. त्यामुळे विज्ञानाचा आविष्कार साहित्यात सहजपणे व्हायला हवा. या दृष्टीनं डॉ. जयंत नारळीकरांचं अध्यक्ष या नात्यानं केलेलं मार्गदर्शन निश्‍चितच दिशादर्शक असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. जयंत नारळीकरांचा पिंड मूळ शास्त्रज्ञाचा असला तरी त्यांनी विज्ञान साहित्यात मूलगामी आणि बहुमोल योगदान दिलंय. त्यांच्या साहित्य संपदेवर नजर टाकली तरी याची प्रचिती येते. या लेखनाची सुरुवात त्यांच्या कथालेखनातून झाली. ‘यक्षाची देणगी’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या कथासंग्रहानं वाचकांना मोहिनी घातली. एक नवं अनुभव विश्‍व त्यांच्यासाठी खुलं झालं. या विश्‍वानं सामान्य वाचकांना भुरळ घातली नसती तरच नवल.

यामागं नारळीकरांची शास्त्रज्ञ ही जनमानसातील प्रतिमा जशी कारणीभूत होती त्यापेक्षा अधिक कारणीभूत होते ते या कथांमधील नावीन्य, ताजेपणा आणि आकलनाच्या पातळीवर उलगडणारे अद्‌भूत विश्‍व. या अगोदर विज्ञान साहित्य लिहिले गेले नव्हते असे नाही. ते कसदार नव्हते असेही नाही. परंतु, त्या साहित्याची जनमानसावरची पकड अगदीच कमी होती. त्यानंतर जवळजवळ चार दशके त्यांनी विज्ञान लेखन केले आहे. त्यात अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव इत्यादीचा समावेश आहे. 

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनी ‘वामन परत न आला’ आणि ‘व्हायरस ’ या दोन कादंबऱ्यांचं लिखाण केलं आहे. या शिवाय अवकाशविषयक अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. त्यात आकाशाशी जडले नाते, नभात हसरे तारे, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्‍वाची रचना, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुड झेप, गणितातील गमती जमती या आणि अशा अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलंय. त्यांची लेखणी सिद्धहस्त आणि विचार स्पष्ट आहेत. विज्ञानातील रूक्षपणा टाळण्यासाठी ते यशस्वी होतात मात्र लालित्याची मात्रा थोडी कमी पडते असा काहींचा आक्षेप असतो. मात्र आशयातील सखोलतेनं ही उणीव ते भरून काढतात.

या पार्श्‍वभूमीवर डॉ. नारळीकर यांची संमेलनाध्यक्ष पदावरील निवड किती सार्थ ठरू शकेल याचा विचार करावा लागेल. 

डॉ. नारळीकर यांची शास्त्रज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी ओळख आणि त्यांची विज्ञान लेखक म्हणून जनमानसात असणारी प्रतिमा निश्‍चितच उपयुक्त ठरेल. डॉ. नारळीकर यांना संशोधनाचा आणि संस्था उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे. ते मितभाषी असले तरी सतत कार्यरत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. वक्तशीरपणा हा त्यांचा स्थायिभाव आहे. त्यामुळं कामाचं नियोजन ते काटेकोरपणे करतात. एकाच वेळी ते प्रशासक, संशोधक, शिक्षक, लेखक आणि मार्गदर्शक या जबाबदाऱ्या यशस्वीपणे संभाळीत होते. 

उद्‌घाटनं, प्रकाशनं आणि समारंभ यापासून ते दूर असतात. आता ते शरीराने थकले असले तरी त्यांच्या मनाची उभारी कायम आहे. त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांच्या शब्दाखातर अनेक सहकारी झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांची उपस्थिती तरुणांसाठी प्रेरणादायी असते. त्यामुळे मराठी साहित्याला नवी दिशा ते देऊ शकतात.

मराठी भाषा आणि साहित्यापुढं अनेक प्रश्‍न उभे आहेत. मराठी शाळांची कमी होणारी संख्या, मातृभाषेतून शिक्षण, मराठी ज्ञानभाषा आणि अभिजात होण्याचा प्रश्‍न, मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ हे त्यातील काही प्रश्‍न. मराठी भाषा काळाच्या ओघात टिकून राहणार का? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून खूप अपेक्षा असतात. आतापर्यंतच्या अनुभवावरून हे पद बहुतेक वेळा भाषण आणि समारंभापुरतेच मर्यादित राहिले आहे. डॉ. नारळीकरांचा जीवन प्रवास पाहता त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे..

(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Narlikar Writes about Science rooted in letters