संकेत पायदळी

 जयंत पाटील
रविवार, 26 मे 2019

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शीपणाबद्दल आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणाबद्दल देशातील जनतेत संशय निर्माण झाला आहे. स्वतःच्या हक्काच्या बूथवर उमेदवारांना कमी मते मिळणे अत्यंत संशयास्पद आहे.

लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष बाब म्हणजे, निवडणूक लढवण्याचे सर्व संकेत पायदळी तुडवून सत्ताधारी पक्षाने प्रचार केला. आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने प्रचारात सातत्याने मांडला, त्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाकला, ध्रुवीकरण घडवले. राष्ट्रवादाचा पुरेपूर वापर भाजपने या निवडणुकीत केला. प्रसंगी भारतीय सैन्याला निवडणुकीचा प्रचार मुद्दा बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागेपुढे पाहिले नाही. आत्मघातकी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर खालच्या भाषेत बोलून मोदींनी रोजगार, भ्रष्टाचार, महागाई इत्यादी मुद्द्यांवरून जनतेचे आणि विरोधकांचेही लक्ष विचलित केले.

निवडणुकीच्या काळात ईव्हीएमबद्दल विविध गैरप्रकारदेखील समोर आले आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शीपणाबद्दल आणि निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणाबद्दल देशातील जनतेत संशय निर्माण झाला आहे. स्वतःच्या हक्काच्या बूथवर उमेदवारांना कमी मते मिळणे अत्यंत संशयास्पद आहे. जनतेच्या मनात ही निवडणूक खरंच पारदर्शक होती का, याबद्दल प्रश्न आहेत. लोकसभेत मोदी विरुद्ध कोण असा प्रश्न होता, हेच निवडणुकीतील पराभवाचे कारण असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, हे सत्य आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होऊन ती निवडणूक आम्ही पूर्ण सामर्थ्यानिशी लढू.

 जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil criticized the BJP