मोहीम उत्तम पोषणमूल्यांची!

Vegetable
Vegetable

कोरोनाच्या महामारीनं आरोग्य, आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलं, त्याचप्रमाणं नागरिकांच्या आहारातल्या पोषणमूल्यांची गरजही पुढं आली. कुपोषणामुळं प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता दुणावते. भारत जगाच्या भूक निर्देशांकामध्ये १०७ देशांत ९४ व्या क्रमांकावर असून, याकडं  देशाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

पोषणमूल्यांना अनेक परिमाणं आहेत. सुरुवातीला ते केवळ उपलब्धता, वापरण्याची संधी व अन्नाचं पचन या तीन गोष्टींशी निगडित होते. मात्र, आता संशोधनाद्वारे असं सिद्ध झालं आहे, की पोषण अन्नाव्यतिरिक्त अनेक घटकांवर अवलंबून असतं व त्यामध्ये पाणी, स्वच्छता, चांगलं आरोग्य, गरिबी, सामाजिक व सांस्कृतिक स्थिती, पर्यावरणविषयक घटक व विषमता यांचा समावेश होतो. कोरोनामुळं लोकांचा पाणी, स्वच्छता व आरोग्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे व त्याचा पोषणमूल्यांवरही परिणाम झाला आहे. मात्र, अन्नाशी संबंधित पोषणाचा महत्त्वाचा घटक केवळ लोकांना त्यांच्या आयुष्यात मिळणारं वैविध्यपूर्ण अन्न नसून, ग्रामीण भारत काय पिकवतो यालाही महत्त्व आहे. येथे पोषणमूल्यांच्या दृष्टिकोनातून शेती हा पैलू समोर येतो. विविध पिकांची निवड करणे, त्यावर प्रक्रिया करणं, पदार्थ बनवणं व असं वैविध्यपूर्ण आणि योग्य असं अन्न ग्राहकांपर्यंत पोचवणं या शेती ते अन्न या मोठ्या साखळीची पोषणामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.  

या संदर्भात शेतीच्या दृष्टिकोनातून काही संशोधनं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील काही खाली दिली आहेत.

बायोफोर्टिफिकेशन : या प्रक्रियेमध्ये पैदाशीदरम्यान पिकांमधील पोषणमूल्यांत वृद्धी केली जाते. त्यामुळे अंतिम उत्पादनामध्ये लोकांना हवी असलेली मायक्रो-न्यूट्रियन्टस आपोआपच वाढतात. लोकांना आपला डाएट प्लॅन न बदलता भात, मका व गव्हामधून सुधारित पोषणमूल्ये मिळतात. उदा. संत्र्याचा स्वाद असलेल्या रताळ्यांच्या संशोधनामुळं लाखो लोकांची सूक्ष्म पोषणमूल्यांची कमतरता मोठ्या प्रमाण भरून निघाली होती. हे संशोधन हार्वेस्ट प्लस आणि इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरने केले होते.

पोषक तृणधान्यांच्या उत्पादन व वापरता वाढ : बाजरीसारख्या धान्याला आधी ‘गावठी तृणधान्य’ असे हिणवलं जायचं, मात्र भारत सरकारनं त्याला ‘पोषक तृणधान्या’चा दर्जा दिल्यानंतर त्याचं महत्त्व खूप वाढलं. (‘पोषक तृणधान्ये’ हा शब्द एम. स्वामीनाथन यांनी सर्वप्रथम वापरला.) अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत बाजरीचं स्वस्त धान्य दुकानांमधून वितरण होऊ लागलं. बाजरीत मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम, झिंक आणि प्रथिनं असतात. भारतानं २०१८ हे वर्ष ‘ राष्ट्रीय बाजरी वर्ष ’ म्हणून जाहीर केल्यानंतर व तिला  किमान आधारभूत किंमत दिल्यानंतर तिचं महत्त्व आणखीनच वाढले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्चने (आयसीएआर) बाजरीवरील संशोधन मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. 

न्यूट्री गार्डन : देशातल्या शेतीचा भर प्रमुख पिकांवर असताना घराच्या अंगणात पिकणाऱ्या भाज्या आणि फळांना समाजातील सर्वच स्तरांमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. अशा प्रकारे पिकवलेल्या भाज्यांमुळे प्रतिकारशक्तीमध्ये मोठी वाढ होते आणि वर्षभर आवश्यक पोषणमूल्ये मिळत राहतात. मानव संसाधन विकास मंत्रालयानं शाळांमध्ये स्थानिक शेतकी विभागाच्या मदतीनं अशी ‘न्यूट्री गार्डन्स’ उभारावीत असा सल्ला दिला आहे. त्यातून मुलांना बागकामाचा अनुभव मिळेल व माध्यान्ह भोजनामध्ये या पोषक भाज्यांचा समावेशही करता येईल. लॉकडाउननंतर शाळा उघडतील तेव्हा यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर, उपनगरांतील बागकाम : लॉकडाउनच्या काळात उद् भवलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे नाशवंत फळं आणि भाज्यांची वाहतूक. काही अभ्यासांनुसार या काळात उत्पन्नातील कपात आणि त्याचबरोबर नाशवंत भाज्या आणि फळं मिळवणं अवघड झाल्यानं नागरिकांमध्ये आहारात घेत असलेल्या पोषणमूल्यांमध्ये मोठी घट झाली. वाढणाऱ्या नागरी लोकसंख्येला शाश्वत, स्वस्त आणि भरपूर पोषणमूल्ये असलेली उत्पादने घेणे हा शहरी आणि निमशहरी शेतीचा उद्देश आहे. 

पोषणमूल्यांसाठीची शेती :  यामध्ये एकात्मिक शेती व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक घराची पोषण सुरक्षा मिळायला हवी. यामध्ये स्थानिक शेती उत्पादने, पशुधन, कुक्कुटपालन व शक्य तिथं मत्स्यपालनाच्या माध्यमातून लोकांच्या आहारात विविधता राखणे हा आहे. 

कापणी आणि कापणीनंतरच्या प्रक्रिया : कापणीच्या किंवा सुगीच्या कालावधीवर पोषणमूल्यांची मात्रा अवलंबून असते. उदा. टोमॅटोला द्राक्षाच्या वेलावर पिकवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी व बिटा-कॅरोटेनचे प्रमाण खूप वाढते. त्याचबरोबर शेती उत्पादने कापणीच्या वेळी व नंतर व्यवस्थित हाताळल्यास, त्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पॅकिंग, साठवणूक व वाहतूक केल्यास त्यांतील पोषणमूल्ये ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत टिकून राहतात. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी (आयआयएफपीटी) यासंदर्भातील समस्यांवर काम करीत आहे. 

पोषण जागरूकता : उत्पादनामध्ये अधिक पोषणमूल्यांचा समावेश व्हावा यासाठी शेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये अधिक जागरूकता आणण्याची गरज आहे. पोषणमूल्ये वाढण्यासाठी काय योगदान देता येऊ शकेल व त्यातून आर्थिक फायद्याचे गणित उलगडून फायदा मिळू लागल्यास शेतकरी अशा पद्धतीच्या शेतीचा अवलंब अधिक प्रमाणात करतील. प्रोफेसर स्वामीनाथन यांनी समाजाच्या भुकेविरोधातील योद्धे (कम्युनिटी हंगर फायटर्स) ही संकल्पना मांडली. पोषण अभियानामध्ये पोषण जागरूकता आणि आचरणावर लक्ष केंद्रित केले गेले असून, यामध्ये शेतकरी कुटुंबांचाही समावेश केला जाऊ शकतो. 

पोषण सुरक्षेमध्ये आणखी एक घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. सर्व पशुधनाला पोषक चारा उपलब्ध करून देणे, पोषणामध्ये मासे बजावत असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन केवळ मनुष्याला खाण्यासाठीच मासेमारी करणे या गोष्टींचा पोषण सुरक्षेत समावेश होतो. जमिनीचे आरोग्य व तिला दिला जाणारी पोषणमूल्ये, पोषक भाज्या व फळे पिकवणे, नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या झाडांची लागवड करून जैवविविधता टिकवून ठेवणं व योग्य पाककृतींबद्दल जागरूकता निर्माण करणे हे त्यातील आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 

अन्न उत्पादक शेतकरीच कुपोषणाची समस्या सोडवू शकतात, याबद्दल शंका नाही. व्यवस्थित पोषण झालेल्या नागरिकांचा देश बनवणे आणि त्यांच्या ताटात पोषक अन्न देण्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. देशभरात शेतीवर आधारित पोषणमूल्यांची चळवळ उभारून आपण आपल्या शेतीतून नागरिकांसाठी योग्य पोषणमूल्ये पुरवू शकतो, यात कोणतीही शंका नाही. 
(सदराच्या लेखिका ‘एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’च्या संचालक आहेत.)
(अनुवाद : महेश बर्दापूरकर) 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com