नियोजन पावसाचे आणि बाजारपेठ

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) देशभरातील खरीप हंगामासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Rain
RainSakal

देश सध्या सर्वसाधारण मान्सूनच्या स्वागताच्या तयारीत आहे. वेळेवर पाऊस येणं आणि पुरेसा पाऊस पडणं ही यंदाची चांगली बातमी आहे. ही बातमी केवळ शेतीपुरतीच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा यावर अवलंबून आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबरच हा खरिपाच्या तयारीचाही काळ आहे. पुरेसा पाऊस हा केवळ शेतीला चांगला फायदा मिळवून देत नाही तर त्याचबरोबर वेळोवेळी कृषी विकासालाही पोषकही ठरत असतो.

मान्सूनचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी योग्य वेळी पेरणी करणे आवश्‍यक असते. या काळात अचूक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक हवामानाबाबत दिलेल्या सूचनांकडे लक्ष देऊन त्यांचे पालन करावे. भारतीय हवामान खाते (आयएमडी) हे देशभरातील कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि अन्य गैरसरकारी संस्थांमार्फत हवामानाची माहिती पुरवते. चांगल्या मोसमी पावसाचा अंदाज असताना अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीचे अचूक नियोजन उपयुक्त ठरते. यावर्षी महाराष्ट्र खरीप हंगामाबाबत आशावादी असून विक्रमी उत्पादनाची अपेक्षा बाळगली जात आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) देशभरातील खरीप हंगामासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन, भुईमूग, ऊस, धान, वाटाणे आणि केळी, आंबा, डाळिंबांसह अन्य पीक घेताना काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचनांचा समावेश केला आहे.

उदा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात जूननंतर लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यात पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी दहा टन सेंद्रीय खत वापरावे, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पिकाचे पांढऱ्या माशीपासून संरक्षण करण्यासाठी सिंचन व्यवस्थापनाबरोबरच क्लोरपायरीफॉस किंवा फिंग्रोनिलचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. सोयाबीनचे पिक घेणाऱ्यांना पेरणी करण्याअगोदर बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याचा सल्ला दिला आहे. चांगल्या प्रतीचे बियाणे जे ७० टक्क्यांपेक्षा अधिक विकसित होतात, त्याचा पेरणीत वापर करण्यास सुचविण्यात आले आहे. त्याबरोबरच, सुधारित वाणांच्या बियाणांचा उपयोग करण्याचा देखील शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.

शेतीकामात मदत करणारे जनावरे हे सध्याच्या उच्च तापमानामुळे सैरभैर राहू शकतात. म्हणून जनावरांची अधिक काळजी घ्यायला हवी. त्यांना वाढत्या तापमानाचा अधिक त्रास होऊ नये यासाठी गोठ्याच्या छताला पांढरा रंग लावायला हवा. त्याचवेळी छतावर वाळलेले गवत आणि ऊसाचे चिपाडाचे आच्छादन करायला हवे. पाण्याची फवारणीही करायला हवी आणि या उपाययोजनांमुळे गोठा थंड राहील. याशिवाय जनावरांसाठीच्या चाऱ्याची देखभाल करायला हवी. साठवणूक योग्य करावी आणि पावसामुळे ओला होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. केवळ चाराच नाही तर धान्याची सुरक्षा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.धान्यांना कीड लागू नये आणि पावसापासून बचाव करण्यासाठी त्याची सुरक्षितपणे साठवणूक करणे आवश्‍यक आहे. कीड रोखण्यासाठी कडुनिंबाच्या पिशव्यांचे पिकांवर आच्छादन करायला हवे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेळ्यांसह अन्य जनावरांचे लसीकरण करायला हवे. ही लस त्यांना सुरक्षित ठेवेल आणि विविध आजार टाळण्यासाठी मदत करेल. अलीकडच्या काळात हवामान बदलाच्या विपरीत परिणामामुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. पण या हवामान बदलाचा परिणाम हा स्थानिक वातावरणावर होतो आणि शेतीलाही अडथळे येतात. याशिवाय बदलत्या हवामानामुळे नवीन रोग आणि कीटक तयार होतात. हवामानाबाबत तत्पर आणि योग्य अंदाज व्यक्त करणारी माहिती मिळाल्यास पावसाळ्याबरोबर येणाऱ्या नवीन रोग आणि कीटकांबाबत माहिती मिळू शकते. पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ किंवा कृषी उपकेंद्र यासारख्या संस्था शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचा सल्ला देतात. त्यामुळे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासाठी आपत्कालीन योजनाही राबविली जाते. यामध्ये डाळी, तेलबिया आणि पोषक धान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याबरोबरच पाण्याचा आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा करता येईल, या गोष्टींचा अंतर्भाव असतो. दुसरीकडे कोरडवाहू पीक आणि पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांचे अधिकाधिक उत्पादन व्हावे यासाठी हवामानाचा अंदाज महत्त्वाचा असतो. मात्र या कोरडवाहू पिकांना बाजारात अधिक मूल्य मिळावे यासाठी धान्योत्पादनास व्यावहारिक रूप देण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, मान्सूनचा पाऊस अनियमित पडल्यास बचावाचा मार्ग म्हणून कापूस आणि डाळींबरोबर सूर्यफूल, सोयाबीन किंवा तिळाचे आंतरपीक घेत तेलबियांचे उत्पादन वाढवण्याची योजना राबवता येऊ शकते.

सध्याचा कोरोना संसर्गाचा काळ पाहता यंदा शेतीकामांसाठी मजुरांची कमी संख्या हा दुसरा चिंतेचा विषय आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर ताण येण्याची शक्यता आहे. परंतु गेल्यावर्षी कोरोनाचे सावट असतानाही कृषी आणि कृषीसंबंधी व्यवहारांमध्ये वाढ झाल्याची सकारात्मक बाब दिसून आली. यावर्षी देखील अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. शेतीकामे करताना कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, याची खबरदारी घ्यायला हवी. हवेतून विषाणू पसरत असल्याचे पुरावे अलीकडेच आढळून आले असून शेतीची कामे करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्क घालणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना अधिक फायदा होण्यासाठी ‘ विकेल तो टिकेल’ हे बाजार आणि मूल्य साखळीवर आधारलेले मॉडेल विकसीत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याचा बाजाराचा कल पाहून पीक घेण्याची गरज आहे. पावसाचे नियोजन आणि बाजारपेठ या दोन घटकाच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्था ही आगामी काळातील चांगल्या मान्सूनला आणि कृषी हंगामाला सामोरे जाऊ शकते.

(लेखिका कृषिक्षेत्राच्या अभ्यासक आणि रिलायन्स फाउंडेशनमध्ये काम करतात.)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com