महत्त्व शेतीतल्या पारंपरिक ज्ञानाचं !

राष्ट्रपती भवनात काही दिवसांपूर्वीच पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अर्थातच हा सोहळा नेत्रदीपक होता. कारण, काही पुरस्कारार्थी व्यक्ती अत्यंत पायाभूत स्तरावर काम करणारे होते.
Rahibai Popare
Rahibai PopareSakal

राष्ट्रपती भवनात काही दिवसांपूर्वीच पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अर्थातच हा सोहळा नेत्रदीपक होता. कारण, काही पुरस्कारार्थी व्यक्ती अत्यंत पायाभूत स्तरावर काम करणारे होते, ज्यांनी आपल्या भोवतालच्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. कृषी क्षेत्रात संशोधन आणि योगदान देणाऱ्या लोकांचा नेहमीच सन्मान केला जातो. परंतु पारंपरिक शेतीच्या ज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींचाही यंदा समावेश होता. एकीकडे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली जात असताना पारंपरिक ज्ञानाचाही सन्मान केला गेला. कृषी क्षेत्रातील पारंपरिक ज्ञान पुढे नेण्यास त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सध्याच्या काळात उत्पादन वाढीसाठी आणि कृषी क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आधुनिक तंत्राची मदत घेतली जात आहे. अवकाळी पाऊस, रोगराई, जमिनीचा कस यासारख्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा उपयोग केला जात आहे. पण या तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपयोगामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे पारंपरिक कृषी तंत्र आणि ज्ञान विस्मृतीत जाण्याचा धोका वाढला आहे. अर्थात हे ज्ञान अन्य कोठेही सापडत नाही तर आपल्या सभोवताली, कुटुंबातच दिसून येते.

यासाठी आपण बीजमाता राहीबाई पोपरे यांचे उदाहरण घेऊ. राज्यातील अहमदनगर येथे धान्यासाठी बीज विकसित करण्यास त्यांचे अमूल्य योगदान असून या कार्याच्या आधारे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. वास्तविक हे बीज कृषी क्षेत्राला समृद्ध करणारे असून त्याचा अलीकडच्या काळात आधुनिक पीक सुधारणा कार्यक्रमातही वापर करण्यात आला आहे. हे बीज आताच्या काळातील शोध नसून तो पिढ्‌यानपिढ्या काम करून विकसित करण्यात आले आहे. उत्पन्न वाढीसाठी आणि कृषी मूल्यात सुधारणा करण्यासाठी आदर्श शेतीचे निकष निश्‍चित करण्यात आले आणि त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला. विविध प्रकारच्या बियाणांचे वर्गीकरण केले आणि प्रयोगाच्या आधारे त्याची निवड केली. अर्थात अनेक वर्षांपासून हे बीज व्यावसायिक दृष्टीने वापरले जात नसले तरी जैवविविधता वाढवण्यास योगदान दिले आहे. या जैवविविधतेतून आपल्याला हवामान बदलासारख्या जागतिक कळीच्या मुद्द्याचे आकलन होण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर पिकातील जैवविविधतेच्या वैशिष्ट्यामुळे कृषी क्षेत्रात सुलभता आणण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आपल्याला पारंपरिक बियाणांच्या विकासावर आणि संवर्धनावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

गेल्या काही दशकांत ७५ टक्के पिकांतील जैवविविधता नष्ट झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका संशोधन पेपरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश पिकांचा विकास नैसर्गिकरीत्या कसा काय खुंटला याचा जर विचार केला तर त्याचा आकडा खूपच मोठा आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या फळे किंवा पिकांचे सेवन कमी होऊ लागल्याने लोकांमध्ये आजाराचे प्रमाणही बळावले आहे. तसेच प्रतिकारशक्ती देखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सकस आहार हा मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. परंतु जगभरातील ३० टक्के लोकसंख्या ही आहाराशी निगडित आजाराने ग्रस्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने निरीक्षण नोंदवले आहे. म्हणूनच सकस आहाराअभावी निर्माण होणारे आजार कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर आणि सहजपणे उपलब्ध होईल अशा पोषण आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. फळे, भाज्या, कडधान्य आणि बियांचे उत्पादन हे पौष्टिक आहारासाठी आवश्‍यक असल्याचे ‘अलायन्स ऑफ बायोव्हर्सिटी इंटरनॅशनल’ने म्हटले आहे. परंतु त्याचेही उत्पादन सध्या २२ टक्क्यांनी घटले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी एकाच प्रकारचे पीक घेण्यावर भर दिला जात आहे. भारत सरकारने तेलबियांच्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पोषण आहारासाठी आवश्‍यक असणाऱ्या पिकांचे प्रमाण कमीच आढळून येत आहे.

पोषण आहाराच्या अभावी लोकांचे आरोग्य ढासळत असल्याचे पाहून अहमदनगरच्या श्रीमती राहीबाई यांनी बीज मोहिमेला सुरुवात केली. लोकांच्या आरोग्यासाठी सकस, पौष्टिक आणि स्थानिक पातळीवर घेतलेल्या पिकांची, अन्नाची गरज असल्याचे त्यांना जाणवले. यासाठी पारंपरिक कृषी ज्ञानाचा आधार घेण्यात आला. वास्तविक पारंपरिक ज्ञानात सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक गोष्टींचा समावेश असतो. कोणत्याही क्षेत्रातील पारंपरिक ज्ञान हे एखाद्या समुदायापुरतीच मर्यादित नसते. ते एखाद्या क्षेत्राचे सखोल आणि विशेष संदर्भ समजून घेण्यास मदत करते. पारंपरिक ज्ञान औपचारिक शिक्षणातून मिळेल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. त्यासाठी अनौपचारिक अनुभव देखील घ्यावा लागतो. राहीबाईच्या कृतीतून आपल्याला हेच दिसले आहे. पारंपरिक शेती आणि पिकांतून पर्यावरण जोपासताना मानवीय आणि सांस्कृतिक जबाबदारीचे पालनही झाले आहे. म्हणूनच राहीबाईचे विचार, योगदान आणि कार्य हे अदभूत मानले जाते. पारंपरिक बियाणे किंवा बीज यांच्याबाबत एक आक्षेप घेतला जातो आणि तो म्हणजे व्यापक प्रमाणात शेतीचे रूपातून व्यावसायिक रूपात करताना हे तंत्र व्यावहारिक आणि आर्थिक कसोटीला फारसे उपयोगी ठरत नाही. जागतिक पातळीचा विचार केल्यास शेती उत्पादनाची गरज दर दशकाला चौदा टक्क्याने वाढत आहे. अलीकडच्या काळात कृषी उत्पादनात होणारी घट, कमी होणारे कृषी क्षेत्र आणि केवळ उदरनिर्वाहासाठी केली जाणारी शेती या मुळे केवळ पारंपरिक शेतीच्या आधारे अन्नाची गरज भागवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे बदलत्या काळाचा विचार करताना आपल्याला केवळ पारंपरिक ज्ञानाची गरज नाही तर त्याचे आकलन करून त्याचा प्रभावीपणे आणि शाश्‍वत शेती पद्धतीचा देखील अंगीकार करावा लागणार आहे.

शाश्‍वत शेतीपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना ‘इकोसिस्टिम’चा देखील विचार केला जातो. इकोसिस्टिम म्हणजे वनस्पती, प्राणी, समुदाय आणि निर्जीव वातावरण यांच्यात परस्पर संवाद वाढीवर भर देत समन्वय वाढवणे. श्रीमती राहीबाई यांच्यासारखे पारंपरिक शेतीचे ज्ञान बाळगणारे मंडळी ‘इकोसिस्टिम’चा अर्थ चांगल्या रीतीने जाणून असल्याने अशा स्थितीत त्यांची भूमिका खूपच मोलाची ठरते. आपल्याला राहीबाईसारख्या शेतीची शास्त्रीय जाण असणाऱ्या, समजून घेणाऱ्या आणि सक्रिय रितीने सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची गरज आहे. या आधारे आपल्याला पारंपरिक ज्ञानाचा प्रसार करता येईल आणि तो सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येईल. पारंपरिक कृषी ज्ञानासंदर्भात सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन केले जात असताना पारंपरिक बियाणे आणि बिजांची ओळख पटवून त्यांचे गुणधर्म जाणून घ्यायला हवेत आणि त्यानुसार त्याचे मूल्यांकन करायला हवे. या मूल्यांकनाच्या मदतीने लोकप्रिय ठरणाऱ्या वाणांचा विकास करता येईल आणि त्यासाठी अधिक जमिनक्षेत्र वाढवता येईल. अर्थात या सर्व कामाचा आरंभबिंदू हा बियाणातील वैविध्यपणा असून हा वैविध्यपणा पिढ्यान पिढ्या जोपासल्या गेलेल्या कृषी ज्ञानातून आला आहे.

आपल्याला पारंपरिक कृषी ज्ञान जाणून घेण्यासाठी आणि त्याला पुढे नेण्यासाठी समाजमान्यता आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. पद्मश्री सारखा सन्मान हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करत नाही तर तो अनेक पिढ्याने दिलेल्या योगदानाचा देखील सन्मान करत असतो. आता आपल्याला आणखी पुढे जाण्याची गरज आहे. बदलत्या गरजा आणि सुरक्षा यादरम्यान समतोल साधत पारंपरिक ज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना कृषी आणि पर्यावरणासंदर्भातील निर्णयप्रक्रियेत सामील करून घेणे गरजेचे आहे. जसे की राहीबाई यांचे पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे कार्य. यानुसार राहीबाई या एका भागातून दुसऱ्या भागात जाऊनही काम करू शकतील आणि आपल्या कार्याच्या प्रभावातून देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील.

(सदराच्या लेखिका कृषिक्षेत्राच्या अभ्यासक असून रिलायन्स फाउंडेशनमध्ये त्या काम करतात, लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com