इकडची शहरे, तिकडचे वारे... मेळवावा मतदार नामांतरे!

‘स्वातंत्र्यात व स्वतःच्या कायद्यांच्या अमलाखाली रुळलेली राज्ये मिळवल्यावर ती ताब्यात ठेवण्याचे तीन मार्ग आहेत.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSakal

‘स्वातंत्र्यात व स्वतःच्या कायद्यांच्या अमलाखाली रुळलेली राज्ये मिळवल्यावर ती ताब्यात ठेवण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला म्हणजे, त्यांची लूटमार करणं, तिथं जाऊन प्रत्यक्ष स्वतः राहणं हा दुसरा मार्ग. त्यांच्याच कायद्यानुसार वागण्यास अनुमती देऊन, त्यांच्याकडून खंडणी घेऊन थोड्या लोकांच्या नियुक्तीनं तुमच्याशी मैत्री राखेल, अशी शासनव्यवस्था देशात निर्माण करणं, हा तिसरा मार्ग.

ही शासनसंस्था राजानं निर्मिलेली असल्यामुळे त्याच्या मैत्रीखेरीज व संरक्षणाखेरीज ती जगू शकत नाही हे ती जाणते. म्हणून शक्य असलेलं सर्व यासाठी ती करते. शिवाय आणखी असं की, तुम्हाला ते टिकवायची इच्छा असेल तर स्वातंत्र्याला सरावलेलं नगर इतर कोणत्याही मार्गापेक्षा तिथल्या नागरिकांच्या योगे अधिक सुलभतेनं ताब्यात ठेवता येतं.’

- द प्रिन्स (राजा) : मॅकिॲव्हेली,

अनुवाद : अरुंधती खंडकर,

साहित्य अकादमी, पृष्ठ १५, १९६३.

पंधराव्या शतकात इटलीत जन्मलेल्या मॅकिॲव्हेली या मुत्सद्द्यानं हे विचार मांडले तेव्हा भारतात मुघल जवळपास हीच राजनीती आखत होते. आपला विजय आणि आपली सत्ता सदैव लक्षात राहावी, यासाठी त्यांनी जिंकलेल्या गावांना, मुलखांना - स्वतःच्या नावासह आपल्या नजीकच्या माणसांची नावं - द्यायला सुरुवात केली होती. ते इनामं, वतनं, जहागिऱ्या, सुभेदाऱ्या अशा कुणाच्या तरी नावे करत आणि आपला ताबा कायम करत.

कधी गाव वसवणं, तर कधी छावणी खडी करणं, कधी आलं गाव जिंकणं, तर कधी सत्तेचं प्रतीक असलेले किल्ले सर करणं आणि आपलं साम्राज्य विस्तारणं हा क्रम त्या काळी चाले. ‘पन्हाळगडा’चं नाव ‘नवीशाहदुर्ग’ ठेवणं, साताऱ्याच्या किल्ल्याचं नाव ‘आज्जमतारा’ ठेवणं, ‘देवगिरी’चा ‘दौलताबाद’ करणं, पुणे शहराचं ‘महियाबाद’, ‘कलबुर्गी’चं ‘गुलबर्गा’, ‘रायचूर’चं ‘फिरोजनगर’, ‘खडकी’चं ‘औरंगाबाद’...अशी खूप उदाहरणं बदललेल्या सत्तेच्या खुणा म्हणून अस्तित्वात आली. विजेत्यांची ती गरज, परंपरा आणि निशाणी असे; मग ते विजेते मुघल असोत वा ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच असोत...

या लोकांच्या सत्ता नष्ट झाल्यावर नव्या सत्ताधाऱ्यांनी अशी नावं पूर्ववत् केली किंवा बदलली. म्हणजे परत तेच. आपल्या विजयाचा पुरावा वा दाखला म्हणून नामांतर. या सर्व बदलांमागं धर्म, संस्कृती, परंपरा यांचा मोठा वाटा असणार.

इतिहास घडवताना आणि तो घडल्यावर विजेत्यांचा संपूर्ण ठसा त्या त्या ठिकाणावर पडायला हवा हे पाहूनच सारे बदल केले जात; परंतु कित्येकदा असे बदल सूड, प्रतिशोध, परतफेड या दृष्टीनं होत. म्हणजे ‘ते व आम्ही’, ‘परके व स्थानिक’ आणि ‘विधर्मी व स्वधर्मी’ इतक्या दुरंगी स्वरूपातच. आजची नामांतरं तशाच प्रकारची होत आहेत.

‘आम्ही हिंदू आहोत म्हणून मुसलमानांची नावं बदलून टाकू’ किंवा ‘ब्रिटिशांनी तसं केलं म्हणून आम्ही भारतीय असं करू’, असा काळा-पांढरा रंगभेद सत्ताधारी करत आहेत. औरंगाबाद शहराला शिवसेना १९९० पासून ‘संभाजीनगर’ म्हणू लागली. तिची मुखपत्रं ‘संभाजीनगर’ असा वापर बेलाशक करू लागली. तीस वर्षं झाली त्याला. त्यामुळे झालं असं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता करून टाकलेलं ‘संभाजीनगर’ नंतर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘छत्रपती संभाजीनगर’ केलं तरी त्यात नावीन्य काही उरलं नव्हतं.

इतिहासात आपण खूप ढवळाढवळ करत आहोत याची खंत अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्यांना कधी वाटली नाही. इतिहासाचा वापर राजकीय सत्तेसाठी करण्याचा हा प्रयत्न बऱ्याचदा अज्ञानातून आणि भावना चिथावण्यातून होत असतो. शिवसेना व बाळासाहेब ठाकरे तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराविरुद्धही बोलू लागले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं औरंगाबादमधील शैक्षणिक, संस्थात्मक कार्य, त्यांची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी, निजामाविरुद्ध घेतलेली भूमिका, संविधानसभा व मंत्रिमंडळे यांत केलेलं महत्कार्य यांचा पूर्ण विसर पडून अत्यंत गलिच्छ पातळीवर दलित व डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार सुरू झाला होता. त्याचे पडसाद नुकताच नांदेडजवळ एका दलित युवकाचा खून सवर्णांनी केला, त्यातही उमटलेले आहेत. सारे नामांतरविरोधक जातीय पातळीवर जाऊन डॉ. आंबेडकरांचं कार्य धुडकावू लागले. जगाकडे दुरंगी चष्म्यातून पाहण्याचा हा परिणाम. इतिहास असा उभा दुभंगलेला नसतो. कसा ते समजावून घेऊ :

‘निझामशाहीचा मूळ पुरुष निजाम उल्मुल्ख हा मूळचा देशस्थ ब्राह्मण असून वऱ्हाडातील पाथरी गावचे कुळकरण याच्या पूर्वजांनी केलेले होते. पुढे एका लढाईत बेदरकरांनी त्यास कैद करून बाटवले. याच्या वंशजांनी कोणत्याही प्रकारे मऱ्हाठ्यांना त्रास दिला नाही. उलट, अनेक प्रसंगी मऱ्हाठ्यांची बाजू घेऊन अविंधांबरोबरच त्यांनी लढाया केल्या. आदिलशाहीची स्थापना जरी एका तुर्काने केली तरी एका मऱ्हाठा सरदाराची बहीण बाटवलेली होती.

तिच्यावर याचे मन बसून तीस याने आपली घरधनीण केले. या मूळ पुरुषाचे नाव युसूफ होय. युसूफच्या बायकोचा धर्म जरी बदलला होता तरी तिच्यामध्ये महाराष्ट्रपण पूर्णपणे वसत होते. युसूफच्या पाठी त्याचा मुलगा गादीवर बसला. तो त्याच्या आत्येने वाढवलेला होता. म्हणून पुरा अविंध झाला होता. तरी त्याच्या पश्चात त्याचा मुलगा गादीवर बसला तेव्हा युसूफच्या बायकोच्या हाती सर्व सत्ता आली व दफ्तराची भाषा मराठी झाली.

शहाजी भोसलेंसारख्या अस्सल मऱ्हाठ्यास निझामशाहीचा जीर्णोद्धार करण्याची उत्कट इच्छा झाली. तीवरून निझामशाहीचे जे पुरुष झाले, त्यांनी जातिभेद बिलकुल न राखता आपल्या मूळ पुरुषाच्या पूर्वाश्रमीच्या धर्मबांधवांस बराच आश्रय दिला असावा, असे अनुमान निघते. जर अविंधपण निझामशाहीतील पुरुषांमध्ये वरचढ होते तर त्यात महाराष्ट्रपण जिरून जाते व हिंदू मऱ्हाठ्यांकडेस त्यांचे मन ओढते ना. मलिकंबर जातीचा अविंध होता व त्याचा मुलगा फत्तेखान हाही जातीचा अविंध होता; पण त्यांनी परकी मोगलांचा पक्ष धरून आपल्याच निझामशाहीस समूळ बुडवावे व शहाजी मऱ्हाठ्याने त्या निझामशाहीची पुन्हा प्रतिष्ठा करण्यासाठी जिवावरसुद्धा उदार व्हावे!!! धन्य ती अविंधांची निझामशाही व धन्य तो शहाजी.’ (शिवछत्रपतींचे चरित्र, राजारामशास्त्री भागवत लेखसंग्रह, खंड ४, वरदा बुक्स, पुणे, पृष्ठे १२, १३, १४, १५, १९७१).

वरील उताऱ्यात कुणी चालू घडामोडी पाहू गेल्यास त्या दिसतीलही. राजकारण वा राजनीती कितीही म्हटलं तरी दुरंगी होऊ शकत नाही, याचा इतिहास महाराष्ट्र कायम बघत आला आहे. औरंगजेब आलमगीर झाला अन् त्याच्या धर्मांध व अतिरेकी राजकारणानं हे चित्र पालटलं तरी त्याचा शोकान्त महाराष्ट्रातच व्हावा याचा अर्थ त्याचं सारं चुकत गेलं. औदार्य, सहिष्णुता, शौर्य, शहाणपण, न्याय आणि लोकहित ही छत्रपती शिवाजीमहाराजांची राजरीतच खरी मानवी रीत आहे हे पुन्हा एकवार सिद्ध झालं.

यदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचं जे चरित्र लिहिलं त्यात त्यांनी औरंगजेबाचे अनेक गुण सांगितलेले आहेत. ‘तरीही आत्यंतिक आत्मकेंद्री, संशयी, धर्मनिष्ठ आणि द्वेष्टा असल्यानं त्याची प्रदीर्घ राजसत्ता भारताला फार भोवली,’ असं सांगून ते म्हणतात की, ‘औरंगजेबामुळे भारताचा बौद्धिक व नैतिक स्तर खालावला. लोक सर्वार्थाने खंक बनले. त्याच्या दरबारात परखड, स्पष्टवक्ते कुणी राहिले नाही. त्याने कारभाराचे इतके केंद्रीकरण केले की, बाकीचे सारे कळसूत्री बाहुल्या बनले. सामोपचार व मिळतेजुळते घेण्याची वृत्ती आणि पुढाकार घेण्याचा स्वभाव कारभाऱ्यांत दिसेना झाला. इतक्या अवाढव्य देशात प्रशासकीय अधःपात घडून यायला वेळ लागला नाही. औरंगजेबाकडे म्हणजे मुघलदरबारी जे धाडसी, बुद्धिमान व निपुण अधिकारी होते ते खचले आणि जबाबदार, सल्लामसलत करणारी सरदारांची पिढीच संपून गेली.’

या वातावरणात स्तुतिपाठक, खुशमस्करे, संधिसाधू जन्म घेतात. राजाचा जयजयकार करून त्याची मोहोर सर्वत्र उमटावी म्हणून नामांतर, धर्मांतर, स्थलांतर यासाठी त्याला भरीस घालतात. पराजित समाजाचा अधिकाधिक अपमान करायला उद्युक्त करतात. संबंध नसताना विजयी सत्ताधाऱ्यांना स्थानिक संस्कृती आणि इतिहास मिटवायला लावतात. त्या इतिहासाची उपस्थिती अस्मितादर्शक नसली तरी इतिहासाचा एक घटक म्हणून एक साधी ओळख त्या त्या समाजाला मिळत असते, हे नाकारता येत नाही.

आताचा ‘धाराशीव’ हा जिल्हा खुद्द निजाम उस्मान अलीचं नाव प्राप्त करून होता. ना तो ‘उस्मानाबाद’ म्हणून झळकला, ना आता नामांतरानंतर तो झळकेल, इतका तो राज्यकर्त्यांच्या उपेक्षेला बळी पडला आहे. इतिहासाचा आधार विकासासाठी उपयोगी पडतो हे खरं; मात्र फक्त पर्यटन, व्यापार एवढ्यानंच. इतिहास उपजीविकेसाठी वापरणं ही राजकारण्यांची, व्यावसायिकांची बौद्धिक दिवाळखोरीच. भूतकाळाचा सांधा वर्तमानकाळाशी असतो; पण सांधा म्हणजे समग्रता नव्हे.

‘स्वतःच्या पक्षाच्या किंवा मताच्या किंवा देशाच्या किंवा सत्तेच्या किंवा मतलबाच्या मंडनार्थ एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाच्या किंवा गोष्टीच्या वास्तविक रूपाचा मनास मानेल त्याप्रमाणे जाणूनबुजून विपर्यास किंवा भंग किंवा लोप करणे म्हणजेच इतिहासप्रदर्शनात अप्रामाणिकता करणे होय’, असा इशारा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे देतात. (राजवाडेदर्शन, इतिहासाचे स्वरूप व कार्य, मॉडर्न बुक डेपो, पुणे, पृष्ठ १४९, १९६५).

‘स्वतः राजवाडे चित्पावन ब्राह्मणांना अधिक महत्त्व देतात,’ असा आरोप त्यांच्यावर जुन्या काळी झाला. तरीही राजवाडे महाराष्ट्राचे एक थोर इतिहासकार आहेत हे सर्वमान्य आहे. त्यांनी जो इशारा दिला, तो असं सांगतो की, ‘सत्ता आहे म्हणून वा कायदा झाला की अथवा राष्ट्रवादाचे नवे नमुने उगवले की, त्या त्या राजकीय पुढाऱ्यांना उपयुक्त इतिहास शोधावा लागतो.

काही परंपरांचे पुनरुज्जीवन करावे लागते.’ सोव्हिएत रशियाचा अंत झाल्यावर नवी ११ राष्ट्रं जन्मली आणि जवळपास प्रत्येकानं मार्क्स, लेनिन, स्टॅलिन आदी कम्युनिस्ट नेते व त्यांचा इतिहास मिटवला अथवा बदलला. खरा धोका संभवतो तो इतिहास आणि ऐतिहासिक वारसा, ठेवा, स्थळं यांना. ‘हेरिटेज’ अर्थात् आपला ऐतिहासिक वारसा हा जसा ऐतिहासिक वारसा असतो तसाच तो सांस्कृतिक वारसाही असतो.

संस्कृतीचा अभ्यास माणसाला जय, पराजय एवढंच सांगत नसतो. सामाजिक, नैतिक कारणमीमांसाही तो करून देत असतो. संस्कृती जशी जनतेची तशी राज्यकर्त्यांचीही असते. म्हणून हे जे सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसे असतात ते समाजापुढचे आरसे असतात.

चारशे-दोनशे वर्षांपूर्वी आपले राज्यकर्ते आणि पूर्वज असे होते, असे वागले याची साक्ष ते असतात. त्यामधून भविष्य घडवायची प्रेरणा मिळते. समाजाला नव्या कल्पना आणि ज्ञान यांची प्राप्ती होते. अन्याय, जुलूम टाळता येतात. नामांतरं करणारे राज्यकर्ते वारशांकडे दुर्लक्ष करतात. खऱ्या इतिहासाची उपेक्षा करतात. ऐतिहासिक ठेवा व राष्ट्रीय संस्कृती यांत त्यांना राजकीय स्वार्थ दिसतो, त्यामुळे त्यांचं राजकारण फक्त इतिहास व संस्कृती या दोन स्तंभावरच राहतं.

त्यानं कृषी, अर्थ, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, कला आदी क्षेत्रांचं नुकसान होतं. कारण, सदान् कदा या प्रकारचे राजकारणी त्यामध्ये इतिहास, संस्कृती - म्हणजे थोडक्यात धर्म व जात - शोधत बसतात. त्यांना हे समजत नाही की, भारतासारख्या अगडबंब देशात अनेक धर्म असून प्रत्येकात असंख्य व्यक्ती व विचार यांची उत्तम प्रकारची भर आहे; पण सत्ताधारी पक्ष एकच धर्म व एकच संस्कृती यांचा रेटा लावू लागला की देशाची सामाजिक, सांस्कृतिक वीण उसवू लागते.

वंश, वर्ण, धर्म यांचीच रेलचेल होऊन पोटापाण्याचे सारे प्रश्‍न बाजूला पडतात. समजा, ‘बडोद्याचं नामांतर ‘सयाजीनगर’ करा,’ असं आंदोलन सुरू झालं तर काय अडचणी उभ्या राहतील याची कल्पना सध्याच्या राज्यकर्त्यांना आहे का? ‘महाड’ या गावाचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘आंबेडकरनगर’ का करू नये? आमच्या उदगीरला १७६० मध्ये सदाशिवरावभाऊंनी निजामाचा पराभव केला होता म्हणून त्याला ‘सदाशिवनगर’ म्हणायला हवं का?

असे असंख्य प्रस्ताव, सूचना, मागण्या येतील इतका महाराष्ट्राचा इतिहास पराक्रमी व कर्तबगार स्त्री-पुरुषांनी गजबजलेला आहे; पण भूतकाळ वर्तमानकाळाबरोबर किती काळ संगत करत राहणार? मतांचे हिशेब आणि वर्चस्ववाद यांच्या नादात अवघा इतिहास दुरंगी होऊन दुफळी करणारा झाला की अशांतता, हमरीतुमरी अन् विद्वेष वाढणारच. म्हणून हे ध्यानी ठेवणं की, इतिहास सामूहिकतेचा आविष्कार असतो. त्यानं राष्ट्रीय सामाजिकीकरण तर होतंच; शिवाय आपल्या अस्मितेचाही तो गाभा असतो. भारताचा इतिहास सर्वांचा आहे. त्याचे तुकडे केले की भारताचेही होणार!

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com