सेशल्स बेटांवरचा "डबल कोकोनट' (जयप्रकाश प्रधान)

जयप्रकाश प्रधान
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

जगातल्या सर्वात मोठ्या नारळाची झाडं सेशल्स बेटावरच्या जंगलात पाहायला मिळतात. काही अतिशय जुनी झाडं इथं आहेत. या नारळांना "डबल कोकोनट' किंवा "कोको द मार' म्हणतात. या नारळाविषयी...

जगातल्या सर्वात मोठ्या नारळाची झाडं सेशल्स बेटावरच्या जंगलात पाहायला मिळतात. काही अतिशय जुनी झाडं इथं आहेत. या नारळांना "डबल कोकोनट' किंवा "कोको द मार' म्हणतात. या नारळाविषयी...

जगातला सर्वात मोठा नारळ कोणत्या देशात आहे? आणि त्याचं वजन किती? तो हिंदी महासागरातल्या सेशल्स बेटांवर आढळतो व त्याचं वजन 15 ते 18 किलोग्रॅमपर्यंत असतं. "डबल कोकोनट' किंवा "कोको द मार' (coco de mar) म्हणून तो ओळखला जातो. सेशल्स हा हिंदी महासागरातल्या 115 लहान-मोठ्या बेटांचा समूह, पृथ्वीवरचा जणू स्वर्गच! मोरपिशी, गडद निळ्या, सोनेरी रंगाचं पाणी व अतिशय स्वच्छ समुद्रकिनारे... त्यामुळे ब्रिटन, युरोपमधले पर्यटक फार मोठ्या संख्येनं इथं येतात. मी व पत्नी जयंतीनं सेशल्सच्या विविध बेटांवर पंधरा दिवसांची मनसोक्त भटकंती नुकतीच केली. त्यावेळी हे अवाढव्य नारळ, त्यांची झाडं प्रत्यक्ष पाहता आली व चांगली माहितीही मिळू शकली.

इथल्या प्राले या बेटावर अनेक जगप्रसिद्ध "बिचेस' तर आहेतच; पण प्रालेचं मुख्य वैभव व आकर्षण म्हणजे इथं "व्हॅले द माय' (vallee de mai) हे फॉरेस्ट. या संरक्षित क्षेत्राला युनेस्कोनं सन 1983 मध्ये "वर्ल्ड हेरिटेज' साईटचा दर्जा दिला आहे. वीस हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात हे जंगल विस्तारलेलं असून, त्यातली अनेक झाडं, फळं, पक्षी अतिशय दुर्मिळ आहेत. आम्ही जवळजवळ दिवसभर या जंगलात फिरलो आणि इंग्लिश बोलणारी-समजणारी गाईड आमच्या बरोबर असल्यानं चांगली माहिती आम्हाला मिळाली. सर्व जंगलाचं अतिशय उत्तम जतन व संवर्धन करण्यात आलेलं असून, उत्कृष्ट रस्ते तयार करतानाच, जंगलाच्या मूळ नैसर्गिक रूपाला कोणतीही बाधा येणार नाही, याची कसोशीनं काळजी घेण्यात आली आहे.

जगातल्या या सर्वात मोठ्या नारळाची झाडं या फॉरेस्टमध्ये पाहायला मिळतात. काही अतिशय जुनी झाडं इथं आहेत. या नारळांना "डबल कोकोनट' किंवा "कोको द मार' म्हणतात. सुरवातीला ते दोन नारळांचे एकत्र फळ पाहिलं. 15 ते 18 किलो वजनाचा तो नारळ पाहून चकितच व्हायला होतं. मग झाडांच्या जवळ जाऊन, त्याला लगडलेले मोठाले नारळ आम्हाला दाखवण्यात आले. या झाडांचा, फळांचा इतिहासही महत्त्वाचा आहे. तीनशे-चारशे वर्षांपूर्वी हिंदी महासागरात सेशल्स बेटांच्या आसपास हे अतिप्रचंड नारळ पडलेले दिसले होते. दर्यावर्दींना सुरुवातीला वाटलं की कदाचित ही फळं समुद्रातूनच वरती आली असावीत! पण "कोको द मार'ची जुनी झाडं शेकडो वर्षांपासूनची आहेत. सन 1768 मध्ये "ला किरुएज' व "लादिक' या बोटींमधून प्रवास करत असलेल्या बारे या व्यक्तीनं ही फळं प्राले बेटावर आणली. त्यामुळे पहिल्या "कोको द मार' नारळाचं श्रेय त्याला दिलं जातं. नारळाच्या या जातीच्या झाडाची वाढ फारच सावकाश होते. झाडांच्या बिया खाली पडल्या की त्या रुजायला निदान तीन वर्षं लागतात. त्यानंतरही झाड बरंच सावकाश वाढतं. झाड चांगलं मोठं होण्यासाठी निदान 20 ते 25 वर्षं लागतात. त्याची उंची 25 मीटरपर्यंत वाढते. त्यानंतर ते झाड नर आहे की मादी आहे, हे समजतं. केवळ मादी झाडालाच फुलं येतात. प्रत्यक्ष मोठा नारळ पूर्ण तयार होण्याचा कालावधी सात वर्षांपर्यंतचा असतो. या नारळाचा आकार भलामोठा असतो. एखादं झाड सुदृढ असेल तर त्याला एकूण 110 ते 115 नारळ लागतात. झाडावरचे ते अजस्र नारळाचे घड बघण्यासारखे असतात. फोटो काढण्यासाठी मी एक नारळ उचलून बघितला; पण खरोखरच तो उचलणं मोठे कठीण होतं. आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 18.3 किलो वजनाचा नारळ माहे बेटावरच्या "सेशल्स नॅचरल हिस्ट्री म्युझियम'मध्ये पाहायला मिळतो.

"कोको द मार'ची झाडं ही अत्यंत दुर्मिळ आहेत व केवळ सेशल्समधल्या प्राले व किरुएज बेटांवरच त्यांची नैसर्गिक वाढ होते. या राष्ट्रीय संपत्तीचे अतिशय उत्कृष्ट संरक्षण व संवर्धन तिथल्या शासनानं केले आहे. तो नारळ फोडून त्यातलं खोबरं खाण्यास, पाणी पिण्यास बंदी आहे आणि सर्वसामान्य जनतेकडूनही या बाबीचं पालन काटेकोरपणे केलं जातं. आमच्या टूरगाईडनं गमतीने सांगितलं ः "कुणीही स्थानिक नागरिक या नारळाचं झाड घराच्या परसात लावण्याचं धाडस करत नाही. कारण, तो नारळ कुणाच्या डोक्‍यावर, अंगावर पडला तर त्याला थेट "वर' जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही!' "कोको द मार'चा डबल नारळ सेशल्सचं "सुव्हिनिअर' म्हणून, प्रतीक म्हणून दुकानात, हॉटेलांमध्येही ठेवलेला आढळतो. "व्हॅले द माय' फॉरेस्टमध्ये अन्य अत्यंत दुर्मिळ वनस्पती, सरपटणारे प्राणी, पक्षीही पाहायला मिळतात. पाहण्यासारखं भरपूर असल्यामुळं तिथं फिरण्यासाठी एक दिवसही कमी पडतो. "सेशल्स आयलंड्‌स फाउंडेशन'तर्फे या वनक्षेत्राची देखरेख केली जाते आणि ही संस्था ते काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडते. त्यामुळेच तिथल्या झाडांचं, फळांचं संरक्षण-संवर्धन, तसेच संशोधन-शिक्षण आणि त्याचबरोबर पर्यटन या सर्वांचा व्यवस्थित समन्वय साधला जातो.

Web Title: jayprakash pradhan write article in saptarang