निसर्गाचा स्वर्गीय आविष्कार (जयप्रकाश प्रधान)

जयप्रकाश प्रधान
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची इच्छा असलेल्यांना या देशाचं पर्यटन नक्कीच समाधान देऊन जाईल.

राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची इच्छा असलेल्यांना या देशाचं पर्यटन नक्कीच समाधान देऊन जाईल.

मध्य अमेरिकेतला ‘निकाराग्वा’ हा राजकीय अस्थैर्य, युद्ध आणि क्रांती यांसाठी कुप्रसिद्ध असलेला, आर्थिकदृष्ट्या गरीब; पण निसर्गसौंदर्यानं श्रीमंत असा देश आहे. पनामा, कोस्टारिका यांच्याबरोबरच याही देशात आठ दिवसांची भटकंती करण्याचं मी आणि पत्नीनं ठरवलं. या देशात परदेशांतल्या कोणत्याही मोठ्या कंपन्यांच्या सहली जात नाहीत. त्यामुळं आम्ही आमची सहल आखून, कुठं आणि काय पाहायचं याची आखणी करायला सुरवात केली. मात्र, निकाराग्वामध्ये एकट्यानं फिरणं तितकं सुरक्षित नाही, अशी माहिती इंटरनेटवरच्या रिव्ह्यूजवरून मिळाली. अमेरिकेतल्या काही मित्रांशी संपर्क साधला. त्यांनीही हाच सल्ला दिला. त्यामुळं खूप निराश झालो; पण पर्यटनाची मनापासून इच्छा असली, तर काहीतरी मार्ग सापडतोच, असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे...

कोस्टारिकाच्या भ्रमंतीत दोन-तीन दिवस ग्वानाकास्ते इथल्या तामरिंदोमधील समुद्रकिनाऱ्यावरच्या भटकंतीसाठी ठेवले होते. आमचं हॉटेल किनाऱ्यावरच होतं. हॉटेलमालकाशी गप्पा सुरू झाल्या. भारताची त्याला फारशी माहिती नव्हती; पण कोणीतरी पर्यटक एवढ्या लांबून आले असून, कोस्टारिकात तीन आठवडे फिरत आहेत, हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. निकाराग्वाला जाण्याची इच्छा अपुरी राहणार असं सांगताच, त्यानं एक मार्ग सुचवला. ग्वानाकास्ते आणि निकाराग्वा यांच्या सीमा लागून आहेत आणि तामरिंदोहून निकाराग्वाला जाण्यासाठी दीड दिवसांची सहल असते. सकाळी अगदी लवकर म्हणजे चार-साडेचारला ती निघते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत परत येते. विशेष म्हणजे या सहलीतून जाणं सुरक्षित असल्याचं त्यानं सांगितलं. अर्थात दीड दिवसात निकाराग्वा म्हणजे त्या देशाला केवळ भोज्जा होता. पर्यटनाच्या आमच्या व्याख्येत तर अजिबातच बसणारं नव्हतं; पण काहीच न पाहण्यापेक्षा, त्या देशाची तोंडओळख झाली तरी ठीक, असा विचार करन दुसऱ्या दिवसाची सहल बुक केली.

अमेरिकेचा व्हिसा आवश्‍यक
निकाराग्वामध्ये प्रवेश करण्यासाठी अमेरिकेचा वैध व्हिसा आवश्‍यक असतो. कोस्टारिकातून प्रवेश करणाऱ्यांची कडक तपासणी होते. त्यामुळं सीमेवर बराच वेळ लागतो. म्हणून बस पहाटे निघते, असं सांगण्यात आलं. चारच्या ठोक्‍याला बस हॉटेलच्या दारात आली. आठ-दहा प्रवासी आधीच बसले होते. म्हणजे त्यांचा ‘पिक-अप’ साडेतीन वाजताच असावा. एकूण १४ प्रवाशांना घेऊन बस तामरिंदोहून निघाली. अर्थात आम्ही दोघं सोडलो, तर बाकी सर्व जण अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधले तिशी-पस्तिशीचे तरुण-तरुणी होते. त्यांच्याशी परिचय करून घेताना समजलं, की बसनं निकाराग्वामध्ये प्रवेश केल्यावर दीड दिवसांनंतर त्यांचे ते आणखी चार-पाच दिवसांची भटकंती करणार आहेत. आमचीही अशीच इच्छा होती. पण एक तर ते सगळे तरुण होते आणि मुख्य म्हणजे त्यांना स्पॅनिश भाषा चांगली येत होती. भाषेची अडचण तिथं किती मोठी आहे, याची प्रचिती आम्हाला अवघ्या दीड दिवसात क्षणाक्षणाला आली.

साधारणतः दीड तासात आम्ही कोस्टारिका-निकाराग्वा सीमेवर आलो. बस आणि मोटारींची निरनिराळी रांग होती. बऱ्याच मोटारी उभ्या दिसल्या. कोस्टारिकात शासकीय वैद्यकीय मदत खूपच निकृष्ट दर्जाची आणि खासगी बरीच महाग आहे. म्हणून अनेक कोस्टारिकन्स छोट्या शस्त्रक्रिया वगैरे करून घेण्यासाठी निकाराग्वाला जातात. मोटारीतून जात असलेले बहुतेक प्रवासी रुग्णच असल्याचं आमच्या ड्रायव्हर-कम-गाइडनं सांगितलं. बाकी प्रवाशांची व्हिसाची अडचण नव्हती. आमच्या दोघांचा काही प्रॉब्लेम होणार नाही ना, याचीच भीती वाटत होती. कारण अशा देशांत नियम वगैरे कागदावरच असतात. ‘हम करे सो कायदा!’ ड्रायव्हर सर्वांचे पासपोर्ट घेऊन इमिग्रेशन काऊंटरवर गेला आणि जवळजवळ पाऊण तासानं एका अधिकाऱ्याला घेऊन परतला. बाकीच्यांचे पासपोर्ट त्यानं परत केले आणि त्या अधिकाऱ्याला आमच्याजवळ घेऊन आला. ड्रायव्हर दुभाषाचं काम करत होता. आम्ही पासपोर्टमधलं अमेरिकन व्हिसाचं पान त्याला दाखवलं. भारत वगैरे देशाची त्याला कल्पनाच नव्हती. अमेरिकन व्हिसाचं पान वाचून त्यानं सुहास्य मुद्रेनं आमचे पासपोर्ट आम्हाला परत केले. अर्थात हा सर्व देखावा असतो. प्रत्येक प्रवाशामागे चार-पाच डॉलर मोजले म्हणजे निदान एक तासात इथून सुटका होते, असं ड्रायव्हरनं नंतर सांगितलं.

अस्थैर्य, आपत्तींचा तडाखा
निकाराग्वाला स्पेनपासून इसवीसन १८२१मध्ये स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटननं एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कॅरेबियन किनारपट्टीवर ताबा मिळवला; पण हळूहळू त्यांनी तो सोडून दिला. त्यामुळंच कॅरेबियन किनारपट्टीवरचे अनेक लोक इंग्लिश भाषा बोलू लागले. अमेरिकेच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साह्यातून क्रांती, युद्ध यांमुळं एक अशांत देश म्हणूनच जगात निकाराग्वाची प्रतिमा निर्माण झाली. २००६ आणि २०११मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत डॅनियल ओटेंगा यांच्या नेत्तृत्वाखालील सॅंडिनिस्ताज हा पक्ष पुन्हा सत्तेवर आला. आपली दुसरी कारकिर्द पूर्ण करण्यासाठी ओटेंगा यांनी निकाराग्वाची घटनाच बदलून टाकली. आता त्या देशात बरीच शांतता असून उद्योगधंदे, पर्यटन व्यवसाय धीम्या गतीनं का होईना; पण वाढत आहेत. अर्थात वेळोवेळी नैसर्गिक आपत्तींच्या फेऱ्यांतही हा देश सापडतो. इसवीसन १९७२मध्ये झालेल्या भीषण भूकंपात तिथले दहा हजारांपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. हॅरिकन वादळाचा तडाखाही त्याला वेळोवेळी बसतो. त्यामुळंच पश्‍चिम अर्धगोलार्धातला एक सर्वांत गरीब देश म्हणून निकाराग्वा ओळखला जातो.
या देशाचं एकूण क्षेत्रफळ सुमारे एक लाख तीस हजार चौरस किलोमीटर असून, लोकसंख्या साठ लाखांच्या घरात आहे. मानाग्वा हे राजधानीचं शहर. पर्यटनात इंग्लिशचा वापर काही प्रमाणात होत असला, तरी स्पॅनिश हीच इथली मुख्य भाषा आहे. ती येत नसली आणि तुम्ही स्वतःचा स्वतः प्रवास करत असलात, तर ठायी-ठायी अडचण येऊ शकते.

स्वस्त पर्यटन
निकाराग्वाचं निसर्गसौंदर्य खरोखरच अप्रतिम आहे. सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन शहर, ज्वालामुखी ही इथल्या पर्यटनाची मुख्य वैशिष्ट्यं. या देशातले बहुतेक पर्यटक अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधले असतात. मुख्य म्हणजे इथलं पर्यटन तुलनात्मकरित्या खूप स्वस्तात होतं. फिरण्यासाठी उत्तम बसेस, वातानुकूलित टॅक्‍सीज यांची संख्या अगदीच अल्प. परिणामतः इथं पंचतारांकित पर्यटन दिसून येत नाही. त्याउलट बॅक-पॅकर्स म्हणजे पाठीवर बॅग टाकून फिरत असलेले तरुण-तरुणी मोठ्या संख्येनं दिसतात. घरोघरी खोल्या भाड्यानं देण्यात येतात. त्यात आवश्‍यक सोयी असतात. रस्त्यांच्या कडेला असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलांत खाद्यपदार्थ खूपच स्वस्तात मिळतात. त्यामुळं अशा हॉटेलांत गोऱ्या तरुण पर्यटकांची बरीच वर्दळ असते.

निकाराग्वाच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर दारिद्रय म्हणजे काय, हे ठिकठिकाणी दिसून येतं. वाटेतल्या बहुसंख्य घरांची अवस्था धड नव्हती. रस्त्यांवरचे खाच-खळगे चुकवतच वाहनं जात-येत होती आणि बहुसंख्य वाहनंही जुनाट वाटत होती. स्थानिक लोकांच्या अंगावरचे कपडे त्यांच्या कठीण आर्थिक स्थितीची जाणीव करून देत होते. बहुसंख्य नागरिक ‘मेस्टिझो’ आणि बाकी गोरे. अर्थातच अमेरिकन, युरोपियन संस्कृतीचा त्यांच्यावरचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो.

आता आमची नाश्‍त्याची वेळ झाली होती. कोस्टारिकात छोट्या रेस्टारंट्‌सना ‘सोडा’ म्हणतात. तशी इथली उपहारगृहं ‘फ्रिटांगा’ म्हणून ओळखली जातात. मुख्य रस्त्याच्या कडेला, त्यातल्या त्यात मोठ्या अशा ‘फ्रिटांगा’समोर आमची बस उभी राहिली. ब्रेड-टोस्ट-आम्लेट पाहिजे, की स्थानिक नाश्‍ता असं ड्रायव्हरनं विचारलं. आम्ही एक ब्रेड टोस्ट आणि एक स्थानिक नाश्‍ता अशी ऑर्डर दिली. बसण्यासाठी साधी बाकडी होती. भात, बीन्स (द्विदल धान्य), सॅलड, मांस आणि तळलेली केळी असा नाश्‍ता होता. भाताबरोबर बीन्स, सॅलड आणि थोडं मांस खाण्यास बरं वाटतं. केळी मात्र कमालीची गोड असतात. जेवणाचे पैसे आमच्या सहलीच्या खर्चात समाविष्ट होते. इथं ‘कॉरडोबा’ नावाचं चलन आहे. अर्थात अमेरिकन डॉलर चलनात सर्रास चालतात.

वास्तूंसाठी प्रसिद्ध ग्रानाडा सिटी
आमचं पहिलं साईटसीइंग होतं ग्रानाडा सिटी. युरोपियन्सनी अमेरिकेत वसवलेलं एक पहिलं शहर म्हणून ते ओळखलं जातं. पश्‍चिम निकाराग्वामधलं सहाव्या क्रमांकाचं शहर. लोकसंख्या सव्वा ते दीड लाखाच्या घरात. हे स्पॅनिश वसाहतीचं ऐतिहासिक शहर असून, तिथल्या इमारती, त्यांची रचना स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं खरोखरच पाहण्यासारखी आहे. शहरातले रस्ते खूपच अरुंद आहेत. तिथून कार किंवा बस चालवणं म्हणजे कसोटी म्हणावी लागेल. निकाराग्वावर कब्जा मिळविण्यासाठी इंग्रज, फ्रेंच, डच या सर्वांनी ग्रानाडावर वेळोवेळी आक्रमण केलं. त्यामुळं या शहराला अवकळा आली. त्यातच इथल्या ऐतिहासिक इमारतींकडं झालेलं दुर्लक्ष आणि १९८०च्या आर्थिक संकटामुळं अनेक वास्तू कोसळू लागल्या. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत ग्रानाडामधल्या अनेक वास्तूंची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात आली. स्पेन सरकारनंही त्यासाठी मोठं अर्थसाह्य दिलं. त्यामुळं आता चित्र खूपच बदललं आहे. या शहरातून फेरफटका मारताना, त्या वेळची कलाकुसर पाहून आपण थक्क होतो. वस्तुतः इथं स्पॅनिश बोलणाऱ्या ‘मेस्टिझो’ या मूळ लोकांची वस्ती अधिक; पण आता अमेरिका, कॅनडा, स्पेन, जर्मनी, फ्रान्स इथले नागरिकही ग्रानाडात राहायला येणं पसंत करत आहेत. प्राचीन, उत्कृष्ट वास्तुशास्त्राच्या इमारती हे या शहराचं मुख्य आकर्षण. या इमारती विकत घेऊन तिथं राहण्याचा शौक दिवसेंदिवस वाढतोय. सुरवातीला या वास्तू अत्यंत स्वस्तात विकण्यात आल्या; पण आता त्यांना सोन्याची किंमत आली आहे. श्रीमंत परदेशी नागरिक ग्रानाडात मालमत्ता खरेदी करून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

मोठा निकाराग्वा तलाव
ग्रानाडा हे निकाराग्वा लेकच्या काठावर वसलं असून, हा जगातला विसावा सर्वांत मोठा तलाव मानण्यात येतो. त्याच्या जवळच मनारेस, जमैका मोरो आणि प्रसिद्ध अपोयो असे तीन व्होल्कॅनिक लगून्स आहेत. तलाव आणि सभोवताली उंच डोंगर यांमुळं मानाग्वाप्रमाणंच इथंही हवामान वर्षभर गरमच असतं. ग्रानाडात वर्षाला ११०० ते २१०० मिलिमीटर पाऊस पडतो. निकाराग्वा लेक हा ‘निकाराग्वा शार्क मासे’ असलेला जगातल्या ताज्या पाण्याचा एकमेव तलाव आहे. या तलावात मासेमारीचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात चालतो. हौशी फिशरमनही गळ टाकून किनाऱ्यावर बसलेले दिसतात. मात्र, ‘निकाराग्वा शार्क माशांची’ संख्या कमी होऊ लागल्यानं या माशांना पकडण्यास तिथल्या सरकारनं नुकतीच बंदी आणली आहे.

ग्रानाडाच्या जवळ असलेला मुंबाचो ज्वालामुखी हजारो वर्षांपूर्वी जागृत झाला होता. त्यातून अजस्त्र असे खडक निकाराग्वा लेकमध्ये उडाले आणि ग्रानाडासमोर ३६५ लहान-मोठी बेटं तयार झाली. त्यांचे आकार भिन्न-भिन्न. काही शंभर चौरस मीटर, तर काहीचं क्षेत्रफळ शंभर हेक्‍टरपर्यंत आहे. या बेटांवर अगदी वेगळे पक्षी पाहता येतात. निरनिराळ्या बेटांची बोटीनं सफर करता येते. काही ठिकाणी घरांमध्ये पर्यटकांना राहताही येतं.

आता आपण निकाराग्वामधल्या अतिशय सुंदर समुद्रकिनारे असलेल्या ‘सॅन जुएन देल सूर’ या शहरात जाणार असल्याचं ड्रायव्हरनं सांगितल्यानंतर आम्ही सर्व जण खूश झालो. सॅन जुएन हे पॅसिफिक किनाऱ्यावरचं एक बंदर आहे. वस्तुतः हे मच्छिमारांचं गाव; पण आता या गावात पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. याचं कारण इथले नयनरम्य समुद्रकिनारे, किनाऱ्यावरून दूरवर जाणारा रस्ता आणि भरपूर रेस्टॉरंट्‌स. आम्ही बीचवर थोडा फेरफटका मारला. निळ्याशार पाण्यात पर्यटक डुंबताना दिसत होते. मात्र, रात्रीच्या वेळी सॅन जुएन हे अत्यंत असुरक्षित असल्याचं ड्रायव्हरनंच सांगितलं. चाकू-सुऱ्यांनी पर्यटकांवर हल्ले करून लुबाडण्याचे प्रकार इथं सर्रास होत असतात.

मसाया व्होल्कॅनो पार्क
निकाराग्वामध्ये एकूण ७८ संरक्षित विभाग असून, त्यांत मसाया व्होल्कॅनो हा पहिला आणि सर्वांत मोठा नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो. मसाया जिवंत ज्वालामुखीला आणि नॅशनल पार्कला भेट, मसाया गावात आणि बाजारपेठेत फेरफटका असा आमचा तिथला कार्यक्रम होता. सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मसाया व्होल्कॅनो नॅशनल पार्कची स्थापना १९७९मध्ये झाली. त्यात दोन व्होल्कॅनो आणि त्यांची पाच मुखं पाहायला मिळतात. ती समुद्रसपाटीपासून १०० ते १३० मीटर उंचीवर आहेत. इथं आम्ही बसनं व्होल्कॅनोच्या परिघापर्यंत पोचलो. या पार्कमध्ये लाव्हारसामुळे जमिनीखाली एक बोगदा तयार झाला आहे. त्याच्या आत व्होल्कॅनोच्या तोंडाशी अंधारात चमकणारा लाव्हारस दिसून येतो. गेल्या पन्नास वर्षांत या व्होल्कॅनोनं अनेकदा आपला प्रताप दाखविला आहे. २३ एप्रिल २००१ रोजी त्यातून वायू बाहेर आला आणि त्याचं आणखी एक मुख तयार झालं. त्यावेळी ६० सेंटिमीटरपर्यंतच्या आकाराचे दगड, पाचशे मीटरच्या परिसरात फेकले गेले. पार्कमध्ये जिथं मोटारी उभ्या केल्या होत्या, त्यांचंही नुकसान झालं आणि एक जण जखमी झाला. आमची बसही तिथंच उभी होती. त्यावरून अंतराची कल्पना येऊ शकली. पुन्हा २००३ व २००८मध्येही तो जागृत झाला होता आणि त्यातून राख बाहेर पडली. कोस्टारिकातही आम्ही ज्वालामुखी पाहिले; पण इथं जो धगधगता ज्वालारस पहावयास मिळाला, त्यावरून त्याच्या भयंकर उद्रेकाची कल्पना येऊ शकते. मसाया गाव हे ठराविक साच्याचं पर्यटन ठिकाण झालं असून, स्थानिक लोकांनी बनवलेल्या वस्तू तिथं विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

सुंदर ओमेटोपे बेट
निकाराग्वाच्या भटकंतीत पाहायला हवंच असं ठिकाण म्हणजे ओमेटेपे बेट. सुदैवानं आमचा एक रात्रीचा मुक्काम याच बेटावर होता. हे बेट निकाराग्वा लेकमध्येच वसलं आहे. ‘ओमेटेपे’ याचा अर्थ स्थानिक भाषेत दोन पर्वत. सुमारे २७६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या बेटावर जमिनीच्या एका छोट्या पट्ट्याच्या पलीकडं दोन व्होल्कॅनो दिसतात. हे बेट सर्व प्रकारच्या निसर्गसौंदर्यानं अक्षरशः नटलेलं आहे. आम्ही या बेटावर आलो, तेव्हा अंधार झाला होता; पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते सौंदर्य डोळ्यात भरभरून साठवू शकलो. इथं काय नाही? अतिशय नयनरम्य समुद्रकिनारे, दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल, समोर दिसणारे दोन व्होल्कॅनो. हे बेट म्हणजे अक्षरशः स्वर्ग वाटतो. त्यामुळं पर्यटक आणि स्थानिक नागरिक या सर्वांचीच इथं गर्दी दिसते. राहण्यासाठी हॉटेल्स आहेत; पण घराघरांमध्येही चांगली व्यवस्था केली जाते. आम्ही एक कुटुंबाच्या स्वतंत्र घरात राहिलो. त्यात सर्व आवश्‍यक सोयी होत्या. वस्तुतञ त्या कुटुंबातल्या मंडळींशी गप्पा मारण्याची इच्छा होती; पण त्यांना इंग्रजी अजिबात समजत नसल्यामुळं बोलण्याचा प्रश्‍न नव्हता.

निकाराग्वा, पनामा, कोस्टारिकातल्या खाद्यपदार्थांत खूपच सारखेपणा आढळला. बनवण्याची पद्धतही बहुतांशी एकच. इथंही मघात रम हे लोकप्रिय ड्रिंक. अगदी स्वस्त रमही उपलब्ध होती. हा देश खूपच गरीब असला, तरी निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. कोस्टारिका, पनामाच्या तुलनेत इथली सहल खूप स्वस्तात होऊ शकते. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, तेव्हा बाकीच्या सहप्रवाशांनी आमचा निरोप घेतला. आता त्यांची निकाराग्वाची खरी स्वतंत्र भटकंती सुरू होणार होती आणि आम्ही त्याला मुकणार होतो. मात्र, अगदी निराळ्या देशाची अनपेक्षित तोंडओळख तरी झाली, या समाधानात आम्ही त्या देशाचा निरोप घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayprakash pradhan write article in saptarang