
Timepass
sakal
गिरीश कुलकर्णी - writetogpk@gmail.com
‘‘तुला मन आहे का रे टाइमपास?’’
असावं. कारणं अनेकदा मी शिणलो असता तू न बोलावता येतोस. मऊ अंग घासतोस आणि विसावा होतोस. मागच्या महिन्यात तू आठ दिवस गल्ली जागवत ओरडत होतास. समजावून सांगितलं, रागावून पाहिलं. शेवटी तर धपाटा घालायची तयारी केली तरी तू बधला नाहीस. अखेर तू कर्कश ओरडून जिला बोलावत होतास ती आली आणि तुझं ओरडणं थांबलं. नंतर तासभर तुम्ही दोघं कुठेतरी लुप्त झालात आणि नंतर तुझ्या इच्छेचंच रूप असलेली ती मैत्रीण तर गायबच झाली. तरी तू मात्र नेहेमीसारखा निर्विकार स्कूटरच्या सीटवर बसून राहिलास. हे कसं साधलं तुला? हट्टानं आपल्या मनासारखं घडवून आणायला दुसऱ्यांना भाग पाडायचं आणि मन भरलं की झाल्या प्रकाराची आठवणही न ठेवता मन निश्चल करून बसायचं. हे अवघड आहे रे.