नर्मदेच्या काठावरील जंगल सफारी

मागील दोन वर्षांपासून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायला जाण्याचा प्लॅन करत होतो; मात्र दरवेळी कोणत्या न् कोणत्या कारणामुळे नियोजन फिस्कटत होतं.
statue of unity
statue of unitysakal
Updated on

मागील दोन वर्षांपासून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायला जाण्याचा प्लॅन करत होतो; मात्र दरवेळी कोणत्या न् कोणत्या कारणामुळे नियोजन फिस्कटत होतं. कधी तिकीट कन्फर्म होत नव्हती; तर कधी मित्रांच्या अन् माझ्या सुट्टीच्या तारखा जुळत नव्हत्या.

यंदा होळीच्या दिवशी जोडून सुट्टी आली आणि मित्राला रोज रात्री ११.५० मिनिटांनी दादरहून सुटणाऱ्या एकतानगर एक्स्प्रेसचं तत्काळ तिकीट मिळतं का, हे बघायला सांगितलं. १३ मार्चची तीन तत्काळ तिकिटं अगदी सहज मिळाली. अखेर मी, माझा मित्र अन् त्याचा भाऊ असे तिघे जण गुजरातला निघालो.

जातानाचं तिकिट होतं; मात्र येताना कधी येणार, कसे येणार, कुठे राहणार हे काहीच माहीत नव्हतं. ते आम्ही जाताना प्रवासात ठरवणार होतो. त्यात प्लॅन अचानक ठरलेला असल्याने रात्री ऑफिसमधील कामे संपून तसेच बाहेरच्या बाहेर जाणार होतो. त्यामुळे फारशी तयारीही करता आली नव्हती.

ऑफिसमध्ये काम सुरू असतानाही जाऊया की नको, याबद्दल तळ्यात-मळ्यात होतं. त्या दिवशी काम लवकर झालं होतं. दुसरा मित्र कल्याणहून दादरला एकतानगर गाडी पकडायला निघालाही होता. ऑफिसवरून थेट जाणार असल्याने रात्रीचं जेवण बाहेर केलं. तिकीट कन्फर्म असल्याने तशी चिंता नव्हती.

दादरला आम्ही साडेअकरालाच पोहोचल्याने गाडी सुटायला वीस मिनिटं बाकी होती. दिवसभर थकल्याने आधी सीटवर जाऊन पडलो. बोरिवली स्थानक येईपर्यंत जागा होतो; मात्र जास्तच पेंग आल्याने कधी झोपलो कळलंच नाही. पहाटे गाडी बडोद्याला आल्यावर जाग आली. पहाटे-पहाटे बडोद्यात अतिशय बोचरी थंडी जाणवत होती.

बडोद्याहून गाडी पुढच्या दिशेने न जाता पुन्हा मागे प्रवास करून एकतानगरच्या दिशेने जाते. एकतानगरला जात असताना सर्वत्र मैदानी अन् ओसाड प्रदेश दिसत होता. फार तुरळक अन् कमी उंचीची झाडं नजरेस पडत होती. कोकणी माणसाला झाडं, निसर्ग पाहायला मिळाला नाही, की तो अस्वस्थ होतो. काहीशी माझी स्थिती तीच झाली होती. तो ओसाड प्रदेश पाहून भ्रमनिरास झाल्याने मी पुन्हा झोपी गेलो ते थेट एकतानगर आल्यावरच उठलो.

एकतानगर स्थानक सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. इथे आंघोळीची व्यवस्था आहे. तुमचा एका दिवसात पुन्हा परत येण्याचा प्लॅन असेल आणि कुठल्या हॉटेलला थांबणार नसाल तर सर्व सोयी-सुविधा इथे उपलब्ध आहेत अन् त्याही मोफत! आम्हाला थेट ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे जायचं होतं. म्हणून आम्ही स्थानकावर फार टाईमपास केला नाही.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एकतानगर स्थानकातून थेट ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध आहेत. हे अंतर अवघं सात ते आठ किलोमीटरचं आहे. बसमधून जाताना नियोजन पद्धतीने उभारलेलं शहर पाहून मन सुखावतं. आपल्या स्वप्नातील गावात आल्याचा भास होतो.

आजूबाजूला असलेली हिरवळ, दुभाजकांमधील फुलझाडे अन् सकाळची बोचरी थंडी अशा आल्हाददायक वातावरणामुळे आपण त्या जागेच्या प्रेमात पडतो. बसमधून काही मिनिटांचाच प्रवास केल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा नजरेस पडतो. ते मनमोहक दृश्य पाहताना, व्हिडिओ काढण्याचा, ते क्षण कैद करण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही.

अगदी काही मिनिटांनीच आम्ही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ पोहोचलो. तिथेही आंघोळीपासून सर्वच व्यवस्था आहे. आम्ही फ्रेश होऊन दिवसभरात काय करायचं? आधी काय पाहायचं? नाश्ता, जेवण याचं सगळं नियोजन केलं. सर्वात आधी जंगल सफारी, त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केट्स गार्डन, बटरफ्लाय गार्डन, त्यानंतर डॅम, स्टॅच्यू ऑफ युनिटी, लेझर शो, नर्मदा आरती करायची अन् त्यानंतर रात्रीच्या गाडीने बडोद्याला जायचा प्लॅन केला.

त्याप्रमाणे आम्ही आधी जंगल सफारीचं तिकीट काढलं. बसथांब्यावरून आम्हाला जंगल सफारीला नेण्यासाठी बस होती. तिथेच नाश्त्याची व्यवस्था होती. आम्हाला जंगल सफारीबद्दल काहीच कल्पना नव्हती अन् पुढे जे काही पाहिलं ते सगळं अद्‍भुत होतं. नर्मदा काठावर चित्ता, सिंह, बिबट्या असतील याची कल्पनाही केली नव्हती. सिंह पाहताना मध्ये काचेची भिंतदेखील नव्हती.

जंगल सफारीच्या पहिल्या टप्प्यातच वाघ, सिंह पाहिल्यानंतर पोटात कावळे ओरडायला लागले होते. जंगल सफारी अर्धवट सोडून आम्ही पोटपूजेसाठी आलो. पोटपूजा केल्यावर पुन्हा जंगल भटकंतीला निघालो. तिथे आमच्या स्वागतासाठी इलेक्ट्रॉनिक बस उभ्याच होत्या.

दुसऱ्या पॉइंटवर आम्हाला वेगवेगळ्या प्रजातींचे साप, अजगर, सरपटणारे प्राणी पाहायला मिळाले. काही काही सापांची नावं तर मी पहिल्यांदाच ऐकली होती. सरड्याच्या विविध प्रजाती एकाच ठिकाणी पाहता आल्या. त्यानंतर पुढे पक्षी अभयारण्यात गेलो. तिथे विविध जातींचे पोपट, चिमण्या, मोर, धनेश, सुतार पक्षी असे असंख्य देशी-परदेशी पक्षी पाहायला मिळतात.

तुमच्यासोबत कायम गाईड असतो. प्रत्येक पक्ष्याची सविस्तर माहिती फलकांवर असल्याने आपलं काम सोपं होतं. पक्षी सहज ओळखता येतात. पक्षी अभयारण्यातून पुढे प्रत्येक पॉइंटवर सोडण्यासाठी गाडी असते. पूर्ण जंगल भटकंती करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात.

जंगल भटकंतीत हरीण, चितळ, जिराफ, झेब्रा, घोडे, पाणघोडे, चिंम्पांजी, गवे, नीलगाई, तसेच आफ्रिकन प्राणी पाहायला मिळतात. जंगल भटकंती केल्यावर आम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहायला गेलो. इथून तुम्हाला सरदार सरोवर पाहायला मिळते. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहताना दुपारचे बारा वाजले होते.

रखरखतं ऊन वाढत होतं; पण वेगवेगळ्या प्रकारची फुले, फुलझाडे पाहताना ऊन अन् थकवा जाणवत नव्हता. फुलं पाहताना उन्हापासून संरक्षण व्हावं, यासाठी मधूनमधून पाण्याचे तुषार तुमच्यावर उडवले जातात. जेणेकरून उन्हाचा फार त्रास होत नाही. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नर्मदेच्या काठावर आहे.

नर्मदेच्या दुसऱ्या काठावर केट्स गार्डन अन् बटरफ्लाय गार्डन आहे. ते तुम्हाला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स येथून सहज नजरेस पडतं; मात्र तिथे जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा वळसा घेऊन जावं लागतं. एव्हाना पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले होते अन् ऊनही वाढल्याने आराम करायचं ठरलं.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’बाहेरच काही नागरिकांचे ढाबे आहेत. तिथे उत्तम अन् अगदी कमी पैशांमध्ये जेवणाची व्यवस्था आहे. तुम्ही तिथली गुजराती जेवणाची थाळी घेतली तर १२० रुपयांमध्ये अनलिमिटेड आहे. आम्ही गुजराती थाळीलाच प्राधान्य दिलं. अतिशय स्वादिष्ट अन् गोड जेवण होतं. त्यात दुपारी गरमी वाढल्याने आम्ही ताकाचे पाच ते सहा ग्लास रिचवले.

जेवल्यावर थोडा टाईमपास केल्यावर केट्स गार्डनकडे गेलो. त्यासाठी तुम्हाला मिनी बस उपलब्ध आहेत. हा सगळा प्रवास मोफत आहे. केट्स गार्डनमध्ये जवळपास दोन हजार प्रजातींचे निवडुंग आहेत. ते पाहण्यातच दीड तास गेला. केट्स गार्डनच्या खालच्या बाजूला नर्मदेच्या घाटाचे सुशोभीकरण केलं आहे.

तिथून सरदार वल्लभभाई पटेल यांचा मनमोहक पुतळा लक्ष वेधून घेतो. आम्हाला पुन्हा त्या पुतळ्याकडे जायचं होतं म्हणून लगेच बटरफ्लाय गार्डनकडे गेलो. तिथे मात्र पदरी निराशा पडली. फार विविध प्रजातींची फुलपाखरे पाहायला मिळाली नाहीत. तिथून पुढे नर्मदा नर्सरीत जायचा विचार होता. संध्याकाळी सहाची वेळ झाली होती.

त्यात अजून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अन् लेझर शो पाहायचा असल्याने नर्सरीचा मोह आवरला अन् तत्काळ निघालो; मात्र आम्ही सकाळी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची तिकिटं काढली नव्हती. तिथे जाऊनच काढायची होती; पण तिथे जाईपर्यंत सायंकाळचे सहा वाजल्याने तिकीट काउंटर बंद झालं होतं. आता आम्हाला पुतळा पाहता येणार नव्हता.

त्यामुळे पदरी निराशा पडली; पण अनेकदा अहमदाबादहून जे पर्यटक येतात त्यांना फार उशीर होतो, त्यामुळे तिथे काउंटरवरच ५० एक्स्ट्रा तिकिटं आरक्षित ठेवलेली असतात. त्यात सायंकाळी सहानंतर प्रवेश बंद असतो; मात्र आम्हाला सुदैवाने आरक्षित तिकीट मिळाल्याने पुतळा पाहता आला.

पुतळ्याच्या आतमधून व्ह्यूइंग गॅलरीतून नर्मदा घाट, सरदार सरोवर अन् सूर्यास्ताचा विहंगम नजारा पाहता आला. सायंकाळी सातला लेझर शो होत असल्याने साडेसहालाच पुतळा बंद केला जातो. त्यामुळे आम्हाला घाईघाईत उतरताना संग्रहालय पाहता आलं नाही; मात्र आम्ही आठवणी कायम सोबत राहाव्यात म्हणून फोटो मात्र काढून घेतले.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या यात्रेत तुम्ही लेझर शो पाहायला विसरू नका. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनक्रम, संघर्ष पाहताना अक्षरश: अंगावर काटा येतो. मनात देशभक्तीची जाज्ज्वल्य भावना निर्माण होते अन् आपल्या महापुरुषांविषयी, आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत याची किंमत कळते. लेझर शो पाहताना, डोळे नकळत पाणावल्याचं कळलंच नाही.

ती देशभक्तीची भावना मनात साठवून जड अंतःकरणाने आमची पावलं नर्मदा घाटाकडे वळली. तिथे जाण्यासाठी पुन्हा बस होती. आठ वाजता आरतीची वेळ असते. आरती अन् लेझर शो असा अर्धा ते पाऊण तासाचा कार्यक्रम असतो. तो फार सुंदर अन् देखणा असतो. नर्मदा घाटावरून काही अंतरावरच महादेवाचं मंदिर आहे.

आम्हाला पुन्हा मुंबईच्या दिशेने यायचं होतं. कारण दुसऱ्या दिवशी धुळवड होती. त्यामुळे बडोद्यात जायचा प्लॅन कॅन्सल केला. मुंबईला येण्यासाठी एकतानगरहून रात्री ९.२५ची गाडी आहे. त्यामुळे मंदिरात न जाता थेट रेल्वेस्थानकात जाण्याचा विचार केला होता; पण पुन्हा कधी परत येण्याचा योग येईल, हे माहीत नसल्याने शिवमंदिरात गेलो.

तिथे दर्शन घेतले अन् खासगी रिक्षाने एकतानगरला निघलो. या वेळी रिक्षावाल्याशी संवाद साधला. त्याच्याकडून अनेक गोष्टी नव्याने समजल्या. पाच वर्षांपूर्वी येथे काहीच नव्हतं. सर्वत्र ओसाड जमिनी होत्या. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला. त्यांना पक्की घरे मिळाली. त्यांचा जीवनस्तर उंचावला.

आज दररोज हजारोंच्या संख्येने येथे पर्यटक येत असल्याने येथील ग्रामीण भागात लोकांना आपसूक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. काही व्यवसाय करतात; तर प्रत्येक कुटुंबातील एकाला छोट्या-मोठ्या स्वरूपात नोकरी मिळालेली आहे. रिक्षावाल्यासोबत बोलता बोलता स्थानक आलं होतं. गाडी सुटायला अवघी काहीच मिनिटं शिल्लक असल्याने आम्ही धावतपळत गाडी पकडली आणि डोळ्यात अन् मनात साठवून ठेवलेल्या एका अविस्मरणीय ठिकाणाला अलविदा केला.

गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायचा योग अनेक वर्षांनी एकदाचा आला. अचानकच ठरलं आणि मित्रांना घेऊन निघालो. एकतानगरला जात असताना सर्वत्र मैदानी अन् ओसाड प्रदेश दिसत होता. सर्वात आधी जंगल सफारी, त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केट्स गार्डन, बटरफ्लाय गार्डन, त्यानंतर डॅम, स्टॅच्यू ऑफ युनिटी, लेझर शो, नर्मदा आरती करायची अन् रात्रीच्या गाडीने बडोद्याला जायचा प्लॅन होता.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या आतमधून व्ह्यूइंग गॅलरीतून नर्मदा घाट, सरदार सरोवर अन् सूर्यास्ताचा विहंगम नजारा पाहता आला. सर्व आठवणी आम्ही कॅमेऱ्यात टिपल्या आणि तृप्त झालो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com