आई... पडद्यावरची, घरातली! (कांचन घाणेकर)

आई... पडद्यावरची, घरातली! (कांचन घाणेकर)

प्रेमळ वहिनी आणि त्याहून प्रेमळ आई अशा विविध रूपांत पडद्यावर अनेक मोठ्या अभिनेत्यांची आई साकारणाऱ्या सुलोचनादीदी उद्या (सोमवार, ता. तीस) नव्वदी पूर्ण करत आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीलाही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं त्यांच्या कन्या कांचन घाणेकर यांनी सांगितलेल्या आपल्या आईच्या आठवणी... 

आईचं पहिलं प्रेम अभिनयावरच होतं. अगदी मनस्वी. माझ्या जन्मानंतर अगदी १५ दिवसांतच आईनं लगेचच चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. बाबा म्हणजे भालजी पेंढारकर यांच्या ‘मीठ भाकर’ या चित्रपटाचं चित्रीकरण आई त्यावेळी करत होती. अर्थात, त्यावेळी मी फक्त १५ दिवसांची असल्यानं आईपासून लांब राहणं कठीण होतं. मग बाबांनीच आईसाठी जयप्रभा स्टुडिओमध्ये माझ्यासाठी व्यवस्था केली. मग गरज भासेल, तेव्हा मला आईजवळ नेलं जायचं. अगदी कोवळा जीव पदरात असूनदेखील आईनं मला सांभाळत तिच्या कामालाही तितकंच प्राधान्य दिलं. 

आई बऱ्याचदा चित्रीकरणानिमित्त कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी असायची. आम्ही एकत्रित कुटुंबात वाढलेलो. मग माझं संगोपन आजी आणि वडिलांनीच केलं. मी नऊ वर्षांची असताना माझे वडील गेले. आई आणि माझ्या वडिलांमध्ये २५ ते २६ वर्षांचं अंतर. वडील गेले त्यावेळी आईचं वयही कमी होतं; पण माझ्या संगोपनात तिनं काही कमी पडू दिलं नाही. त्यानंतर आम्ही कोल्हापूरहून मुंबईला राहायला आलो. वडील गेल्यानंतर आईला लग्नाच्या मागण्यादेखील आल्या; पण मग माझ्या मुलीला कोण सांभाळणार म्हणून आईनं दुसऱ्या लग्नाचा विचारदेखील केला नाही. आई तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त बाहेरगावी असली, तरी माझ्या वाढदिवसाला घरी ती आवर्जून यायची. माझा वाढदिवस तिनं कधीच चुकवला नाही. 

मी आईबरोबर तिच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला जायचे; पण त्यातही आई मला फक्त सुटीच्याच दिवशी चित्रीकरणाला न्यायची. मुलांच्या शिक्षणाकडं तिचं बारीक लक्ष होतं. मुलांनी निदान पदवीधर तरी झालं पाहिजे, असं तिचं पहिल्यापासूनचं मत. त्यामुळं शिक्षणाबाबत आमचे लाड कधीच झाले नाहीत. स्वत: आईनं फक्त प्राथमिक शिक्षण घेतलं होतं; पण शिक्षणाचं महत्त्व कळल्यानं मुलांनी तरी शिकावं, अशी तिची इच्छा होती. एक किस्सा मला आठवतो, आईचं बोलणं कमी झालं, की तिला खूप राग आला आहे, हे मला समजायचं. आजही आईचा तो स्वभाव कायम आहे. पाचवीला असताना आम्ही कोल्हापूरहून मुंबईला आलो. मग आईनं मला दादरच्या शाळेत घातलं. आम्ही कोल्हापूरहून आल्यानं माझी भाषाही कोल्हापुरी होती आणि आई त्यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री. मग शाळेत प्रवेश घेतल्यानंतर सुलोचनादीदींची मुलगी म्हणून मला मधल्या सुटीत बघायला शिक्षकांची आणि मुलांची गर्दी व्हायची. मात्र, मी बोलायला सुरवात केली की, ते सगळे माझी खिल्ली उडवायचे. मग मला शाळेत जाणं नको वाटायचं. मी शाळेला दांड्या मारायला लागले. जवळपास महिनाभर आईनं माझं हे शाळेत न जाण्याचं प्रकरण अगदी शांतपणे हाताळलं; पण एक दिवस आईचा संयम सुटला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच तिनं दिग्दर्शकाकडं घरी जाण्यासाठी वेळ मागितला. घरी आल्याबरोबर आईनं मला हाताला धरून एका खोलीत नेलं. आतून कडी लावली आणि अक्षरश: डोक्‍यापासून पायापर्यंत मला फोडून काढलं होतं. 

एकत्रित कुटुंब असल्यानं मी आणि माझी मामेभावंडं आम्ही एकत्र राहायचो. मग फक्त मलाच नव्हे, तर माझ्या बाकीच्या भावंडांनादेखील आई सुटीच्याच दिवशी तिच्याबरोबर चित्रीकरणाला घेऊन जायची. फक्त इथंच नव्हे, तर बाहेरगावी म्हणजेच राजस्थान, काश्‍मीर, म्हैसूर या ठिकाणी कुठंही चित्रीकरण असेल, तर आई तिथंही आम्हाला घेऊन जात असे. मात्र, आईनं तिचे हेअर ड्रेसर किंवा मेकअपमॅन यांच्या येण्या-जाण्याचा खर्च सोडला, तर आम्हाला बाहेरगावी चित्रीकरणाला घेऊन जायचा खर्च कधीच चित्रपटांच्या निर्मात्यांना करू दिला नाही. दिवाळीला फटाके आणणं, सगळ्यांसाठी कपड्यांची खरेदी करणं याची आईला मोठी आवड. बाहेर आई प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून वावरत असली, तरी कुटुंबावर तिचं प्रचंड प्रेम. आईनं नेहमीच माणसं जोडली. तिनं एखाद्या व्यक्तीवर विश्‍वास टाकला, की तो विश्‍वास कधीच तिनं मोडू दिला नाही. आईने मलाही माणसं जोडायला शिकवलं. आईचं एकच होतं, कितीही प्रसिद्धी किंवा पैसा आपल्याकडं असला, तरी आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत. पैशानं माणूस कधीच मोठा होत नाही, हे तिचं वाक्‍य  ठरलेलं. आईचं एक वैशिष्ट्य मी अभिमानानं सांगीन. तिला कधीच कुणाकडं जाऊन चित्रपटात काम मागायला लागलंय असं नाही झालेलं.  

कामाव्यतिरिक्त आई कोणत्या कधी पार्टीला वगैरे गेली आहे किंवा कुठं चित्रपटाला, फिरायला गेली असं मला आठवतदेखील नाही. तिला कधी चित्रपट पाहायला जायचं असलं, तर पूर्ण कुटुंबाला बरोबर घेऊनच ती गेली. अशा चित्रपटांना जाताना साधारण १२ ते १५ चित्रपटांची तिकिटं ती काढायची आणि आम्हा सगळ्यांना घेऊनच जायची. सायनला राहत असताना चौपाटीला रात्री कधी आईस्क्रीम खायला जायचं झालं, तरीही आईला सगळी पलटण बरोबर लागायची. ती चित्रीकरणात व्यग्र असली, तरी तिचं घराकडं कधीच दुर्लक्ष झालं नाही. 

चित्रपटसृष्टीनं आईला एवढं सगळं भरभरून दिलं, तर त्याचा ती अगदी मनापासून आदर करते. मात्र, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईनं या क्षेत्राकडं वळण्यासाठी माझ्यावर कधीच जबरदस्ती केली नाही. कसलं बंधन माझ्यावर घातलं नाही. कारण आईचं एक ठाम मत आहे : ‘कलावंत मुळातच जन्माला यावा लागतो.’ आईनं तिच्या जवळच्या माणसांना जोडून ठेवलं, तसंच चित्रपटसृष्टीतही तिनं अनेक माणसं जोडली. एक गोष्ट अजूनही माझ्या लक्षात आहे. दिवाळी असली, की घरात फराळ तयार व्हायचा. साधारपणे दिवाळीला मिठाईचे डबे देण्याची पद्धत असते; पण आई नेहमी चित्रीकरणादरम्यान सेटवर घरात बनवलेला फराळ घेऊन जायची. राजेश खन्ना यांना आईनं नेलेली चकली फार आवडायची. मग इतर वेळी कधी आईनं चकली नाही नेली, की ते विचारायचे : ‘‘आपकी भाभी वो चकली नही बनाती क्‍या?’’ मग घरी येऊन आई माझ्या मामीला ‘‘चकली बनव,’’ असं सांगायची आणि त्यांना घेऊन जायची. एवढंच नव्हे तर ती केव्हा चित्रीकरणानिमित्त कोल्हापूरला गेली, तर शत्रुघ्न सिन्हा अगदी हक्कानं अर्धा डझन कोल्हापुरी चप्पल आणायला सांगायचे. कधी चेन्नईला गेली, की मराठीतल्या तिच्या काही जवळच्या कलाकार मंडळींसाठी ती सिल्कची लुंगी, कुर्ते आणायची. 

आईला विणकामाचीही फार आवड. दिल्लीहून ती विणकामासाठी लोकर मागवायची. ‘मामा-भाचे’ म्हणून एक मराठी चित्रपट होता. त्या चित्रपटात यशवंत दत्त आणि विक्रम गोखले दोघं होते. मग आईनं दोघांसाठी एकाच रंगाचे दोन स्वेटर विणले. विक्रम यांनी स्वेटर घेतला. ते शांत राहिले; पण यशवंत दत्त स्वेटर घेताच खोडकरपणे आईला म्हणाले : ‘एकाच रंगाचे दोन स्वेटर आता आम्ही घातले, की आम्ही अगदी शाळेतील मुलांसारखे दिसणार!’’ 

बाळासाहेब ठाकरे आईला बहीण मानायचे. आईनं त्यांनादेखील भगव्या रंगाचा मफलर करून दिला होता. तेव्हा त्यांना तो मफलर पाहून फार आनंद झाला होता. आई आजही म्हणते : ‘‘आजवर मी पैसे किती कमावले, हे मला माहीत नाही; पण माणसं इतकी कमावली, की मी एका रात्रीत जरी कोणाला फोन केला, तर शंभर माणसं माझ्यासाठी उभी राहतील.’’ गरजू लोकांसाठी आमच्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असायचे. कधी कोणाला पैशांची गरज लागली, तर आईनं त्यांना कधीच नकार दिला नाही. तिची इतरांना मदत करायची पहिल्यापासूनची सवय हे सगळे बाबांचेच संस्कार. मला अभिमान आहे की, माझ्या आईवर प्रेम करणारी इतकी मंडळी आज तिच्या आजूबाजूला आहेत.

आजही आईला जेव्हा लोक भेटायला येतात, तेव्हा तिचा ‘वहिनीच्या बांगड्या’ चित्रपटाचा विषय निघाल्याशिवाय त्यांची भेट पूर्णच होत नाही. पन्नास वर्षं होऊन गेली आईच्या या चित्रपटाला, तरी तिचा हा चित्रपट अजूनही रसिक प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. ‘वहिनीच्या बांगड्या’ चित्रपटानं आईला घरोघरी पोचवलं.  हिंदीतल्या बड्या स्टार्सची लोकप्रियता दहा-दहा वर्षांच्या पलीकडं टिकत नाही; पण पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी आईची लोकप्रियता तितकीच कायम आहे, हे मला जास्त कौतुकास्पद वाटतं. माझ्या आईनं एका संपूर्ण पिढीचे संस्कार जपले आहेत, हे मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छिते. तिनं आजवर चित्रपटांत ज्या भूमिका केल्या, जे चित्रपट तिनं काम करण्यासाठी निवडले, त्यांमध्ये आपली भारतीय संस्कृती जपली जाईल, असंच काम आईनं केलंय. रुपेरी पडद्यावर ती जशी प्रेमळ आई होती, तशी ती आम्हाला खऱ्या आयुष्यातही लाभली. 

(शब्दांकन : काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com