esakal | शोकान्तिका!

बोलून बातमी शोधा

aan-san-suki}

‘करण’मीमांसा
शेक्सपीअरच्या शोकान्तिकांमध्ये नायक असतात; पण कथेच्या शेवटी ते मर्द ठरत नाहीत. नाटक पुढं सरकत जातं तसे ते कोसळत चालल्याचा अनुभव तुम्ही घेता. खरं तर, त्यांच्यात खूप खोलवर रुजलेल्या दोषांमुळेच ते स्वतःलाच नष्ट करून टाकतात. ही अपरिहार्य आणि अटळ प्रक्रिया असते. हा शेवट अटळ असतो व त्यामुळेच ती शोकान्तिका ठरते.

saptarang
शोकान्तिका!
sakal_logo
By
करण थापर saptrang@esakal.com

शेक्सपीअरच्या शोकान्तिकांमध्ये नायक असतात; पण कथेच्या शेवटी ते मर्द ठरत नाहीत. नाटक पुढं सरकत जातं तसे ते कोसळत चालल्याचा अनुभव तुम्ही घेता. खरं तर, त्यांच्यात खूप खोलवर रुजलेल्या दोषांमुळेच ते स्वतःलाच नष्ट करून टाकतात. ही अपरिहार्य आणि अटळ प्रक्रिया असते. हा शेवट अटळ असतो व त्यामुळेच ती शोकान्तिका ठरते. वरील सर्व वर्णन आन सान स्यू की यांना तंतोतंत लागू पडतं. मी पाच वर्षांचा असल्यापासून त्यांना ओळखतो. त्या वेळी स्यू की यांच्या आई ब्रह्मदेशाच्या भारतातील राजदूत होत्या व स्यू - मी याच नावानं त्यांना कायम हाक मारतो - दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पदवीपूर्व शिक्षण घेत होत्या. आमचे पालक एकमेकांचे चांगले मित्र होते व माझी बहीण किरण आणि स्यू कॉलेजला एकत्र जात असत. स्यूचा कल लहानपणासूनच राजकारणाकडे होता. आपण भविष्यात ब्रह्मदेशाचं नेतृत्व करणार याची त्यांना खात्री होती (आता ब्रह्मदेशाला ‘म्यानमार’ म्हणून ओळख मिळाली आहे) आणि त्या विनोदानं बोलत असल्यावरही ही महत्त्वाकांक्षा लपत नसे. त्यांनी माझी बहीण किरणच्या ता. ११ ऑक्टोबर १९६२ या दिवशी काढलेल्या पेन्सिल-पोर्ट्रेटच्या खाली लिहिलं आहे, ‘किरण थापर यांना बर्मामध्ये कधीही प्रवेश करण्याची अनुमती आहे.’ त्या वेळी स्यू केवळ १७ वर्षांच्या होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकीय महत्त्वाकांक्षा 
‘ब्रह्मदेशाकडून बोलावणं आल्यास तिथं जाणं हा माझा प्राधान्यक्रम असेल,’ अशी कल्पना मला तिनं आधीच दिलेली होती,’ असं तिचे पती मायकेल यांनी मला ऑक्सफर्डमध्ये त्यांच्या लग्नाच्या वेळी सांगितलं होतं. स्यू त्या वेळी २७ वर्षांच्या होत्या. खरं तर, त्या १९८८ मध्ये ब्रह्मदेशात आपल्या घरी आल्या तेव्हा, आपण कधीही परतू शकणार नाही, याची त्यांना कल्पना आली होती आणि त्या कधीही परतल्या नाहीत. मायकेल यांचं निधन होईपर्यंत ते वेगळेच राहिले. स्यू यांनी स्वतःला आपल्या दोन लहान मुलांपासूनही कायम वेगळंच ठेवलं. पुढील २१ वर्षांपैकी १५ वर्षं त्यांनी तुरुंगात किंवा घरामध्ये अटकेत काढली. याचा स्यू यांना खूप त्रास झाला. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

मात्र, राजकारण आणि ब्रह्मदेशाची सत्ता ताब्यात घेण्याची तीव्र इच्छा हे त्यांच्या दृष्टीनं एक मिशनच होतं. हे घडणारच होतं. यातून स्यू यांची मनोवृत्ती समजते. खरं तर त्यांना आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. ब्रह्मदेशाच्या स्वातंत्र्यापूर्वी काही महिने आधी क्रूरपणे ठार मारत त्यांचं स्वप्न चिरडण्यात आलं होतं. मी सप्टेंबर २०१५ मध्ये, स्यू सत्तेवर येण्याच्या थोडेच दिवस आधी, त्यांची मुलाखत घेतली होती. रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नानं त्या वेळी डोकं वर काढलं होतं व जिंकून आल्यावर आपल्याला या प्रश्नाचा सामना करावा लागणार यांची कल्पना स्यू यांना आली होती. 

या प्रश्नाबाबत चिंता किंवा सहानुभूती व्यक्त करणं त्यांना शक्य नव्हते किंवा तशी त्यांची इच्छाही नव्हती. मी त्यांना या प्रश्नावर शांत राहण्याचं कारण विचारलं. यावर त्यांचा खुलासा होता, ‘दोन्ही बाजूंना मी निःपक्षपाती असल्याचं दाखवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.’ आपण सत्तेवर आल्यावर सध्याचं शांत राहणं हेच आपल्याला हा प्रश्न निःपक्षपातीपणे सोडवण्याची संधी व विश्वासार्हता देईल, अशी त्यांची धारणा होती. त्यांचा उद्देश समेट घडवून आणण्याचा होता व काही मत व्यक्त केल्यास तो अडथळा ठरेल  असं त्यांना वाटलं. त्यातून आग विझण्याऐवजी भडकेल असंही त्यांना वाटलं. 

मला त्यांच्या हेतूबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं. देशाची सर्व सूत्रं कधीही त्यांच्या हाती येणार नाहीत आणि अंतर्गत सुरक्षा कायमच लष्कराच्या हातात राहील, हे स्पष्टच होतं.  ‘आपण सर्वोच्च स्थानी आहोत,’ हा त्यांचा दावा लष्करानं फोल ठरवला होता. स्यू यांना जिवंत राहण्यासाठी तडजोडी करणं आवश्यक होतं. 

हे सर्व समजण्यासारखं होतं. मात्र, तडजोड करणं किती भयानक ठरेल याचा अंदाज त्यांना नव्हता. स्यू विजयी झाल्यावरच ते स्पष्ट झालं. त्या सत्ता कायम ठेवण्यासाठी तडजोडी करतील किंवा आपल्या तत्त्वापासून दूर जातील, अशी शंका मला कधीही आली नाही. मात्र, असं घडलं हे नाकारता येणार नाही. 

राजकीय स्वार्थासाठी... 
स्यू रोहिंग्यांबद्दल बोलताना केवळ दहशतवाद आणि सुरक्षारक्षकांच्या हत्यांबद्दल सांगत. शेकडोंच्या संख्येनं मारल्या जाणाऱ्या, बेघर होणाऱ्या निरपराध पुरुष-महिला-मुलांबद्दल त्या अवाक्षर काढत नसत. राजकीय स्वार्थानं त्यांच्या मूल्यांवर पूर्णपणे कुरघोडी केली आहे, असंच वाटत होतं. त्या सहानुभूती व्यक्त करत नसत. त्यांनी लष्कराला आव्हान द्यावं किंवा ब्रह्मदेशाच्या लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याबद्दल बोलावं अशी माझी अपेक्षा नव्हती. मात्र. त्यांचे ओठ एवढे शिवलेले राहतील अशी अपेक्षाही मी केली नव्हती. यातून काही प्रश्न निर्माण होतात : त्यांनी दावा केल्याप्रमाणे रोहिंग्यांच्या प्रश्नावर शांत राहणं निःपक्षपातीपणाचं होतं की ब्रह्मदेशातील बहुसंख्याकांचा सत्तेसाठी पाठिंबा मिळवण्याचा तो एक भाग होता? हा लोककल्याणाचा भाग होता की संधिसाधूपणा? सुरवातीला मला असं वाटलं, की यात दोन्ही गोष्टी आहेत. मात्र, आज मला असं वाटतं, की हा त्यांनी आपल्या ब्रह्मदेशाची सत्ता हस्तगत करण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या मार्गात येणाऱ्या आकस्मिक अडथळ्यांना रोखण्यासाठी जाणूनबजून घेतलेला निर्णय होता. आपली मुलं आणि पतीपासून विभक्त होणं आणि दीड दशक नजरकैदेत राहणं त्यांना नाउमेद करू शकलं नाही, तसंच हेही. याबद्दलच्या प्रतिक्रिया ब्रह्मदेशाबरोबरच जगभरातून आल्या. 

जगानं त्यांच्या रोहिंग्यांबद्दलच्या भूमिकेकडे अत्यंत खालच्या पातळीवरील तडजोड म्हणून पाहिलं. त्यांनी त्याआधी नीडरपणे केलेला त्याग मातीमोल ठरला. उंच मनोऱ्यावर असलेली त्यांची प्रतिमा जमिनीवर येऊन आदळली. स्तुतीची जागा टीकेनं घेतली. ब्रह्मदेशाच्या बाहेर त्या अधःपतन झालेल्या देवदूत ठरल्या...त्यांच्या देशात मात्र वेगळी परिस्थिती होती. त्यांचा उल्लेख आदरानं ‘द लेडी’ किंवा ‘मदर स्यू’ असा केला जातो आणि त्यांना २०२० च्या निवडणुकांत मिळालेलं यश २०१५ मधील प्रचंड यशापेक्षाही अधिक मोठं होतं आणि लष्करानं स्यू यांचं सरकार बरखास्त करून त्यांना तुरुंगात डांबल्यानंतर लोक त्यांच्या करत असलेल्या गुणगौरवाला कोणत्याही सीमा राहिलेल्या नाहीत. दुर्दैवानं, यामुळे तेथील लष्कराचे प्रमुख आपला विचार बदलणार नाहीत आणि स्यू यांना पुन्हा सत्ता बहालही करणार नाहीत. 

कणखर नेत्या? 
स्यू आता शेक्सपीअरच्या शोकान्त नायकाप्रमाणे असा प्रश्न विचारू शकतील की, माझ्या महत्त्वाकांक्षेचं हेच फळ मला मिळावं का? यातून त्यांना केवळ पाच वर्षांची सत्ता उपभोगता आली असेल, ती पुन्हा मिळण्याची फारशी शक्यताही नसेल, तर त्यांनी या अत्यंत छोट्या फायद्यासाठी आपल्या तत्त्वाशी तडजोड केली व आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करून घेतली असं म्हणता येईल का? कधीही हिरावून घेतली जाईल अशी सत्ता, कायमच नियंत्रण असलेल्या व कधीही काढून घेतलं जाईल अशा अधिकारपदासाठी त्यांनी खूप काही गमावलं असं म्हणता येईल का? शेक्सपीअरच्या शोकान्तिकांमधील नायकांना कायमच या द्विधा मनःस्थितीचा सामना करावा लागला आहे. मात्र, ते अभावानंच या प्रश्नाला भिडण्यासाठी किंवा त्याचं उत्तर देण्यासाठी जिवंत राहिले. कथेचा शेवट कायम त्यांच्या मृत्यूनेच झाला. स्यू तुरुंगवासात असल्या तरी या प्रश्नांचा सामना करण्यासाठी जिवंत आहेत. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळू शकेल. मात्र, या प्रश्नांची उत्तरं तेवढी सोपी नसतील... 

स्यू यांनी २०१५ मधील मुलाखतीत स्वतःचं वर्णन ‘कणखर नेत्या’ असं केलं होतं. त्या वेळी या विशेषणातून त्या भविष्यात काळजीपूर्वक समतोल साधतील, असा संदेश मिळत होता. मात्र, आज त्यातून अशोभनीय तडजोडीला झाकण्याचा प्रयत्न दिसतो. मी त्यांना ‘तुम्ही ब्रह्मदेशाचं नेतृत्व करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहात का,’ असा प्रश्न विचारल्यावर त्या उत्तरल्या होत्या, ‘हे अत्यंत भीतिदायक आव्हान आहे...यातून माझ्यातील सर्वोत्तम बाहेर येईल अशी आशा आहे...’ दुर्दैवानं तसं घडलं नाही. मात्र, शेक्सपीअर म्हणतो त्याप्रमाणे, हे अपरिहार्य आहे. आणि तसं घडलं असतं तर स्यू या स्यू बनल्याच नसत्या...

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Edited By - Prashant Patil