आणीबाणीची ‘चूक’ आणि गांधी घराणं!

Rahul-Gandhi
Rahul-Gandhi

कोणत्याही राजकारण्याच्या कौशल्याची आणि हुशारीची चाचणी, तो अवघड आणि अडचणीतल्या प्रसंगांना कसा सामोरा जातो यावरच ठरते. यातील सर्वांत भयंकर गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमची किंवा तुमच्या पक्षाची चूक कबूल करण्याची आणि स्वीकारण्याची वेळ येणं. आणि अशा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा गुण राहुल गांधी यांच्यात अजिबात नाही. खरं तर, संपूर्ण गांधीकुटुंबच यात खूप कच्चं आहे. त्यांची आजीही याबाबतीत फार काही चांगली नव्हती. या महिन्याच्या सुरुवातीला कॉर्नेल विद्यापीठाच्या कौशिक बसू यांनी राहुल यांना आणीबाणीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी असा दावा केला, की ‘आणीबाणी ही चूक असल्याचं इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या’ व राहुल असंही म्हणाले की, ‘काँग्रेसनं देशाच्या संस्थात्मक चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न कधीही केला नाही.’

इंदिरा गांधी आणि आणीबाणी
या दोन्ही विधानांच्या बाबतीत राहुल पूर्णपणे चुकीचे होते. यातील दुसरं विधान हे सत्याचा ढळढळीत विपर्यास आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह कमीत कमी १० हजार जणांना तुरुंगात डांबलं होतं. माध्यमांवरही बंधनं आणली गेली होती. न्यायव्यवस्था व सनदी सेवांमध्येही छेडछाड केली गेली होती. निवडणुका पुढं ढकलल्या होत्या. देशाच्या राज्यघटनेत बेछूटपणे दुरुस्त्या केल्या होत्या. राहुल तेव्हा केवळ पाच वर्षांचे असले, तरी त्यांना नंतर हे सर्व ज्ञात असणारच. दुसरी उघडच दिसणारी; पण तुलनेनं छोटी चूक, खरं तर खोटं वक्तव्य व ते म्हणजे, ‘त्यांची आजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं होतं.’ इंदिरा गांधींनी आणीबाणीची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतरच्या निवडणुकांत झालेल्या पराभवाचीही जबाबादारी स्वीकारली. खरं तर, त्यांनी आणीबाणीच्या काळातील चुकांना व गैरप्रकारांना अगदी कलात्मक पद्धतीनं प्रतिसाद दिला होता. मात्र, प्रत्यक्ष आणीबाणी ही योग्यच ठरवली होती. आणीबाणीबद्दल बोलताना त्यांनी कायम तिचं समर्थनच केलं. त्यांची सुरुवातीची युक्ती, थोडा अतिरेक झाला, असं मान्य करण्याची असे. 

मेरी कॅरिस यांना जुलै १९७८ मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, ‘माध्यमांची मुस्कटदाबी हे खूप कठोर पाऊल होतं.’ याचा दुसरा अर्थ, थोडी सौम्य कारवाई करणं योग्य ठरलं असतं. मात्र, माध्यमांवर नियंत्रण ठेवणं ही काही चूक नव्हती. त्यांची दुसरी युक्ती होती, की इतर लोकांनी चुका केल्या, मात्र त्या त्यांच्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ता. २४ जानेवारी १९७८ ला इंदिरा गांधी यांनी यवतमाळमध्ये दिलेल्या एका भाषणाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्या म्हणाल्या होत्या, ‘इतरांनी चुकांचा व आणीबाणीचा अतिरेक केला व ते त्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्यास मी त्याची जबाबदारी स्वीकारते.’ तिसरी युक्ती, ज्या चुकांची आणि गैरप्रकारांची कबुली द्यायची आहे, त्यांची गणती किरकोळ म्हणून करणं. 

मेरी कॅरिस यांच्याशी बोलताना त्या म्हणतात, ‘राजकीय नेत्यांची धरपकड आणि माध्यमांवर सेन्सॉरशिप याशिवाय आणीबाणीत अस्वाभाविक नव्हतं.’ तुर्कमन गेट येथील हत्यांबद्दल त्या अगदी सहजच म्हणून जातात, ‘तिथं कोणताही हिंसाचार झाला नाही...अशा एखाद्-दुसऱ्याच घटना घडल्या होत्या.’

‘चूक’ नाही आणि माफीही नाही...
नसबंदीसारख्या उत्तर भारताला मोठ्या वेदना देणाऱ्या अत्यंत गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारण्यासही इंदिरा गांधी नकार देतात. त्या पॉल आर. ब्रास यांना ता. २६ मार्च १९७८ रोजी दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘आमचा पराभव खोट्या प्रचारामुळेच झाला. आम्ही चुका केल्या नाहीत किंवा असं घडलंच नाही, असं मुळीच नाही. मात्र, त्या गोष्टी खूप फुगवून सांगितल्या गेल्या. अगदी कुटुंबनियोजनाचा विषय घ्या, विरोधकांनी खोट्या गोष्टी पसरवल्या. 

तो नसबंदीचा कार्यक्रम होता, असं मला अजिबात वाटत नाही. हा खोटा प्रचार होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीच घडलं नव्हतं. काही घटना घडल्या. मात्र, आम्ही जेवढ्या घटनांचा मागोवा घेतला, त्यातील बहुतांश खऱ्या नव्हत्याच.’

या सर्व घटनांसंदर्भात इंदिरा गांधी आणीबाणीच्या काळातील केवळ माध्यमांवरील सेन्सॉरशिप, विरोधकांना अटक, तुर्कमन गेट, नसबंदी अशा विशिष्ट घटनांचा उल्लेख करतात. मात्र, आणीबाणीबद्दल अजिबात बोलत नाहीत. आणीबाणी आणि झालेल्या चुका वेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न त्या करतात. यावरून त्यांना आणीबाणी जाहीर करण्यासंदर्भात कोणतीही समस्या नव्हती हे समजण्यासाठी तुम्हाला कोणत्याही न्यायवैद्यकतज्ज्ञाची गरज नसावी.  

‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ता. २४ जानेवारी १९७८ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार : इतर लोकांनी केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर इंदिरा गांधी आणीबाणीचं समर्थनच करताना दिसतात. त्या लोकांना आणीबाणी लागू होण्याच्या आधीची स्थिती आठवायला सांगतात. त्यावर त्या म्हणतात, ‘देशभरात गोंधळाची स्थिती होती. ती स्थिती कायम राहिली असती, तर बांगलादेशाची पुनरावृत्ती भारतात झाली असती. आणीबाणी लागू करण्यापूर्वीची स्थिती गंभीर होती आणि देशाच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं गेलं होतं.’ इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचं वर्णन ‘रोग बरा करण्यासाठीचं औषध’ असाच केला होता. 

पॉल ब्रास यांनी इंदिरा गांधी यांना विचारलं होतं, ‘तुम्ही आणीबाणीऐवजी दुसरं काही करू शकला नसता का?’ यावर त्यांचं उत्तर ‘नाही’नं सुरू झालं. त्यानंतर गांधी म्हणाल्या, की ‘आणीबाणीमुळे लोकांना झालेल्या त्रासात मी ‘व्यक्तिशः’ लक्ष घातलं नाही ही माझी चूक होती.’ त्यांचे शब्द होते, ‘‘माझी चूक अशी झाली, की मी या प्रश्नात ‘व्यक्तिशः’ लक्ष घातलं नाही आणि चर्चाही केली नाही.’’

यावरून ही गोष्ट स्पष्ट आहे, की इंदिरा गांधींना आणीबाणी ही चूक वाटत नव्हती, त्याबद्दल माफी मागितली नव्हती. यात कोणतीही शंका नाही, की १९७७ मधील निवडणुकांतील पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्याचं कारण आणीबाणी होती हेही मान्य केलं. मात्र, हे चुकीचं होतं असं त्या कधीही म्हणाल्या नाहीत. ‘आणीबाणी ही चूक असल्याचं इंदिरा गांधींनी मान्य केल्याचा एकही पुरावा आपल्याला सापडलेला नाही,’ असं इंदिरा गांधींचं सर्वांत अलीकडचं चरित्र लिहिणाऱ्या सागरिका घोषही मान्य करतात. 

राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असा आरोप करतात, की ते विविध संस्थांमध्ये आपल्या लोकांची भरती करत आहेत. मात्र, काँग्रेसच्या लोकांच्या आणीबाणीच्या काळातील वर्तणुकीत मूलभूत फरक होता. इथं ते पुन्हा एकदा चुकतात. काँग्रेसच्या नेत्यांची वागणूक आतासारखीच होती. तेव्हाचे सरन्यायाधीश एच. आर. खन्ना यांना राजीनामा द्यायला सांगून कनिष्ठ न्यायाधीशांना त्याजागी बसवलं गेलं, सनदी सेवांनाही सोडलं नाही, इंदिरा गांधींना त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी समर्पित असेच लोक हवे होते.

राहुल यांनी ही घोडचूक का केली हे आता मला समजते आहे. त्यामुळे ते दावा करतात, ‘काँग्रेस पक्षानं देशाची संस्थात्मक चौकट ताब्यात घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.’ दुसरं, आपल्या आजीनं लादलेली आणीबाणी ही चूक आहे असं म्हणून कुणी त्याबद्दल अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नयेत, ही सोयही त्यांना करून ठेवायची होती. हा प्रकार म्हणजे, एखादी गोष्ट स्वीकारून त्याविषयीचा संवाद कायमचा संपवून टाकण्यासारखं आहे. मात्र, त्यांच्या उत्तरानं नव्या वादांना जन्म दिला आहे. आता राहुल यांच्या ज्ञानाबद्दल, न्यायनिवाड्याबद्दल, खरं बोलण्याबद्दल व अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी अतिशय दयनीय पद्धतीनं स्वतःला निर्दोष जाहीर केलं आहे. हा असा गुगली चेंडू होता, ज्यावर राहुल स्वतःच क्लीन बोल्ड झाले. ही चाचणी ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांचा उद्देश श्रोत्यांवर प्रभाव टाकण्याचा होता; पण ते पूर्णपणे अयशस्वी ठरले. त्यांना भविष्यात देशाचं पंतप्रधान व्हायचं असल्यास, अशा अडचणीच्या प्रसंगांतून बाहेर कसं पडायचं हे शिकावं लागेल...विशेषतः आपल्या कुटुंबाबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नांबद्दल अधिकच खबरदारी घ्यावी लागेल...

(सदराचे लेखक हे दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
(अनुवाद - महेश बर्दापूरकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com