हिंदू आणि देशभक्ती

करण थापर saptrang@esakal.com
Sunday, 10 January 2021

‘करण’मीमांसा
राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय घटना-घडामोडींविषयीचं परखड भाष्य वाचा या पाक्षिक सदरातून... 

मूर्खासारखी बडबड करण्याची आपल्याला सर्वांनाच सवय असते. मीही अनेकदा करतो. खरं तर, कदाचित आपल्याला माणूस ठरवणाऱ्या अनेक लक्षणांपैकी ते एक लक्षण आहे. दुसरीकडे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे रोबोट्‌स किंवा जीव कधीही मूर्ख नसतात; तथापि ते चुकू शकतात. निरुपद्रवी मूर्खपणा आणि बेपर्वाईनं केलेला मूर्खपणा यांमध्ये फरक असतो. विशेषतः बेपर्वाईनं केलेली बडबड कृतीत उतरवणं हे धोकादायक ठरू शकतं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी नुकतंच केलेलं वक्तव्य दुसऱ्या प्रकारात मोडतं असं मला अत्यंत खेदानं नमूद करायचं आहे. सरसंघचालकांच्या चाहत्यांच्या फौजेला आणि ‘आरएसएस’च्या स्वयंसेवकांना माझं विधान आवडणार नाही याची मला जाणीव आहे. मात्र, माझ्याकडे पर्याय नाही. शब्दच्छल करत, आढेवेढे घेत सांगण्यापेक्षा सरळ सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या शुक्रवारी पुस्तकप्रकाशनाच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले : ‘‘एखादी व्यक्ती हिंदू असेल तर ती देशभक्त असलीच पाहिजे. तो त्या व्यक्तीचा मूलभूत गुण आणि स्वभाव असला पाहिजे.’’ इतकं वक्तव्य अपुरं होतं म्हणून की काय, ते पुढं म्हणाले : ‘‘हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही.’’

भागवत यांना हिंदू असा हवा असला तरी ते सत्य नाही. हिंदूंमध्ये गद्दारांची कधी कमतरता नव्हती असं आपला इतिहास सांगतो. त्या वेळी या देशाला भारत हे नाव नव्हतं हा वेगळा मुद्दा आहे. राजा अंभी हे सर्वांत पहिलं उदाहरण. अलेक्झांडरला सिंधू नदी ओलांडण्यासाठी पूल बांधण्यात त्यानं मदत केल्याचं दिसतं. ही घटना इसवीसनपूर्व ३२६ ची. काही शतकं उडी मारून आपण राजा जयचंदपाशी येऊ. पृथ्वीराज चौहानांच्या विरोधात त्यानं सन ११९२ ला मुहंमद घोरी याला मदत केली. चौहान आपला जावई आहे याचीही त्याला फिकीर नव्हती. चौहाननं आपल्या मुलीबरोबर पळून जाऊन लग्न केल्याचा राजा जयचंदला संताप इतका होता, की सूड घेण्याची भावना त्याला अफगाणी आक्रमकापाशी घेऊन गेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ प्राचीन किंवा मध्ययुगीन भारतातल्या हिंदूंमध्येच गद्दार होते असं समजू नका. आधुनिक हिंदूही त्याला अपवाद नाहीत. ब्रिटिश राजवटीत हिंदूंनी केलेल्या विश्वासघाताची अनेक उदाहरणं सापडतात. त्यातलं सर्वात लक्षणीय उदाहरण आहे ते म्हणजे सन १८५७ मध्ये आपल्या जेत्यांना सामील होणारे ग्वाल्हेरचे महाराज जयाजीराव शिंदे यांचं. झांशीच्या राणीला पकडून देण्यात ब्रिटिशांना मदत करणाऱ्यांमध्ये त्यांचाही वाटा होता याचे दाखले आहेत.

आता सध्याच्या काळाकडे येऊ. छोटा राजन, विजय मल्ल्या, नीरव मोदी किंवा अगदी ललित मोदी यांच्याबद्दल तुम्ही कसा विचार करता ते मला ठाऊक नाही. या लोकांना मी देशद्रोही म्हणणार नाही; मात्र त्यांना देशभक्तही नक्कीच म्हणणार नाही. आणि हो...लक्षात घ्या की हे सर्व हिंदू आहेत.
तथापि, मी आतापर्यंत मांडलेला इतिहास भागवत सहजपणे झटकून टाकतील अशी शंका आहे. 

भारतातले अल्पसंख्य हे हिंदू नागरिकांइतके देशभक्त असू शकत नाहीत, असा खरा मुद्दा भागवतांना मांडायचा होता, जो त्यांनी थेटपणे मांडला नाही अशी मला खात्री वाटते. ‘देशभक्ती हा हिंदूंचा मूलभूत गुण आणि स्वभाव,’ किंवा ‘हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही’, या वक्तव्याचा बहुधा असाच अर्थ निघतो. 

कोणत्याही अर्थानं तपासलं तरी सरसंघचालकांचं वक्तव्य निखळ असत्य ठरतं. पाकिस्तानविरुद्ध दाखवलेल्या पराक्रमाचं त्यांना खूप कौतुक असतं. त्यामुळे, ते जरी विसरले असले तरी मला त्यांना आपल्या शेजाऱ्याविरुद्धच्या लढायांमध्ये मुस्लिम जवानांनी बजावलेल्या शौर्याची आठवण करून द्यायची आहे. हवालदार अब्दुल हमीद यांना सन १९६५ च्या लढाईतल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय लष्करातल्या सर्वोच्च परमवीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं होतं. सन १९४७ मधल्या शौर्याबद्दल ब्रिगेडिअर महंमद उस्मान यांना मरणोत्तर महावीरचक्र प्रदान करण्यात आलं होतं. सन १९६५ मध्ये लेफ्टनंट कर्नल सलीम खलीब यांना महावीरचक्रानं सन्मानित केलं गेलं होतं.

तरीही भागवत यांचं समाधान होणार नसेल तर त्यांना आणखी ठोस सत्ये मला सांगायची आहेत. ‘आरएसएस’, ज्याला सन १९७१ च्या युद्धातल्या विजयाचा अभिमान आहे, त्या युद्धात पाकिस्तानला हरवणाऱ्या भारतीय लष्कराचे प्रमुख पारशी होते. सन १९६५ च्या युद्धातल्या भारतीय लष्कराच्या कामगिरीचं श्रेय ज्यांना दिलं जातं ते जनरल शीख होते. ढाक्यात पाकिस्तानच्या जनरल नियाझी यांना शरण येण्यास भाग पाडणारे पूर्व कमांडचे चीफ ऑफ स्टाफ ज्यू होते. या तिघांपैकी कुणालाही हिंदू म्हटलं असतं तर त्यांना कधी अपमान वाटला नसता; मात्र त्यांना सरसंघचालकांचं वक्तव्य हास्यास्पद जरूर वाटलं असतं.

दुर्दैवानं हे केवळ हास्यास्पद वक्तव्य नाही, तर ते त्याहूनही अधिक आहे. ते धोकादायक आहे. सरसंघचालकांचं वक्तव्य आपल्यात - भारताच्या नागरिकांमध्ये - फूट पाडणारं आहे. ‘हिंदू मूलतःच आणि स्वभावतःच देशभक्त असतात आणि अन्य तसे नसतात,’ या बनावट पायावर ते वक्तव्य आधारित आहे. हे वक्तव्य खोटारडंच नव्हे, तर दुष्टपणाचंही आहे. भारतीयांमध्ये शंका, कुशंका, अविश्वास आणि अंतिमतः फरक करण्याविषयीची बीजं पेरणारं हे वक्तव्य आहे.
 एखाद्याला आपल्या देशाविषयी किती प्रेम वाटतं यावरून देशभक्ती ठरते; धर्मावरून नव्हे, हे नाकारता न येणारं एकमेव सत्य आहे. याच्या अगदी उलटही तितकंच सत्य आहे. अन्य कोणत्याही धर्माची व्यक्ती जितकी देशद्रोही असू शकते तितकाच हिंदूही असू शकतो हेही सत्य आहे.

सरसंघचालकांनी आणखी एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारायला हवा होता, जो त्यांनी विचारलेला नाही. भारत सोडून अन्य देशांत स्थायिक झालेल्या आणि तिथले नागरिक झालेल्या लाखो हिंदूंनी देशभक्ती कुठल्या तराजूत तोलायची? त्यांच्याकडे ब्रिटिश, कॅनेडियन, अमेरिकी पासपोर्ट आहेत. त्यांची मुलं बहुतांशपणे भारतीय भाषांमध्ये बोलत नाहीत. केवळ मूळ म्हणून ते त्यांचं भारतीयत्व मान्य करतात. अन्य सर्व कारणांसाठी ते स्वतःला ब्रिटिश, कॅनेडियन किंवा अमेरिकी मानतात. त्यांच्यासाठी ते ज्या देशात जन्माला आले, ज्या देशाचा पासपोर्ट ते बाळगतात आणि जो देश त्यांचं भविष्य घडवणार आहे त्या देशाविषयी प्रेम असणं म्हणजे देशभक्ती आहे. भागवत यांना याची जाणीव आहे का आणि ते ती मान्य करतात का?

मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे. सरसंघचालक असंही म्हणाले की ‘एखाद्यानं देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त भूमीवर प्रेम करणं नव्हे; तर लोकांवर, नद्या, संस्कृती, परंपरा आणि सर्वांवर प्रेम करणं होय.’ त्यांच्या या विधानाशी मी सहमत आहे. कारण, ते स्वाभाविक अपेक्षित विधान आहे. ते काही केवळ भारतावर प्रेम करणाऱ्या हिंदूंनाच लागू नाही. फ्रान्स, जर्मन, नायजेरिया, बुरुंडी, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना; अगदी लॅपलँडमधल्या नागरिकांनाही, हेच विधान लागू आहे.

मला वाटतं, माझा मुद्दा अगदी सोपा आहे. आपला देश आपल्याला जगवायचा असेल आणि समृद्ध करायचा असेल तर देशभक्तीची व्याख्या हिंदूंशी जोडणं थांबवलं पाहिजे. हिंदू कुणीतरी विशेष आणि उच्च आहेत ही भावना दूर सारली पाहिजे. अन्यथा, आपला ‘युगोस्लाव्हिया’ होण्याचा धोका आहे.

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karan Thapar Writes about Hindus and patriotism