esakal | पक्षीदर्शन : कॅमेऱ्यात कैद झाली ‘छोटी फटाकडी’
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षीदर्शन : कॅमेऱ्यात कैद झाली ‘छोटी फटाकडी’

पक्षीदर्शन : कॅमेऱ्यात कैद झाली ‘छोटी फटाकडी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

लोणावळ्यानजीकच्या कासरसाई धरणाजवळ छोटी फटाकडी आल्याचे समजले. हा वाट चुकून आलेला पक्षी परत जाण्याच्या भीतीपोटी आम्ही रात्रीच लोणावळ्याला पोचलो. सकाळी पाचला पाणवठ्याकिनारी पाचेलो. फटाकडीच्या प्रतीक्षेत असताना इतर पक्षी आले. त्यांचे छायाचित्रण करत असतानाच फटाकडी आली अन्‌ कॅमेऱ्यात कैद झाली...

पक्ष्यांचे छायाचित्रण करताना अनेकदा मजेशीर अनुभव येत असतात. नाना वृत्ती-प्रवृत्तींशी गाठ पडते. त्यामुळे लिखाणही समृद्ध होत जाते. पक्षीनिरीक्षकाचे व्रत घेतलेले झपाटून कार्य करत असतात व त्यात छायाचित्रणाचा छंद जडला की बेभान होऊन पक्ष्यांच्या मागे धावत राहतात, वेड्यासारखे. हे वेडेपण एन्जॉय करायचं असतं म्हणून.

छोटी फटाकडी हा पाणथळ जागेवर सापडणारा २०-२२ सेंटिमीटरचा छोटा पक्षी. त्याची वीण युरोपात होते. म्हणजेच युरोपात आढळणारा हा पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेत स्थलांतर करतो. त्या वेळी क्वचित कधी तरी पश्चिम आशियातही आढळू लागतो. आपल्याकडे याच्या फारशा नोंदी नाहीत; मात्र जानेवारी २०१९ मध्ये पुण्याच्या काही पक्षीमित्रांनी लोणावळ्यापासून ४५ किलोमीरटवर असलेल्या कासरसाई धरणाजवळ छोटी फटाकडी दिसल्याचे ‘इ-बर्डिंग’ ग्रुपवर नोंदवले. हा एक अत्यंत दुर्मिळ योग होता. युरोपातून आफ्रिकेत हिवाळी स्थलांतर करताना बहुधा मार्ग चुकला व आपल्या कासरसाईमध्ये विसावला... त्या अर्थाने हा वाट चुकून आलेला स्थलांतरितच. असे थकले-भागलेले पक्षी काही दिवस थांबून विश्राम घेतात. अन्न वेचण्यात मग्न असतात. त्यामुळे त्यांचे इतरत्र फारसे लक्ष नसते. बॅटरी चार्ज झाली की पुढच्या प्रवासाला निघण्यास सिद्ध होतात. पक्षीमित्रांना मात्र याची माहिती मिळाली की अशा ठिकाणी अक्षरश: उत्सव साजरा होतो. फटाकडी प्रजातीतील पक्षी अत्यंत लाजरे असतात. खूप लोक गेले तर तो कदाचित तिथून निघून जाईल.

म्हणून डॉ. रजनीशचा फोन आला. लवकर जाण्याचे ठरले. दरम्यान, सोशल मीडियावर धडाधड फोटो येऊ लागले. प्रथमेश देसाई हा डोंबिवलीचा एक गुणी पक्षीनिरीक्षक, आमचा अत्यंत जवळचा मित्र जाऊन आला होता. त्याला फोन करून अधिक माहिती घेतली. प्रथमेशने लोकेशन मॅप दिला. इतकेच नव्हे, तर ज्या ठिकाणी ती फटाकडी दिसली, त्या ठिकाणचे अचूक चित्र काढून पाठवले. आम्ही रात्रीच क्लिनिक आवरून निघालो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून लोणावळ्याजवळून बाहेर पडलो व कासरसाईजवळच एका छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम केला. आमचे इच्छित स्थळ येथून पाच किलोमीटरवर होते.

पहाटे साडेचारलाच हॉटेल सोडले. काळोख व मार्गदर्शक फलक नसल्यामुळे रस्ता चुकलो; पण तरीही पहाटे पाच वाजता स्थळावर पोहोचलो. आमच्याव्यतिरिक्त तिथे कुणीही नव्हते. प्रथमेशने दिलेले चित्र पाहून खात्री केली व पाणवठ्याकिनारी योग्य जागा निवडून पक्षी दिसू शकेल, पण त्याला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी कॅमेरा, ट्रायपॉड सज्ज करून ठेवला. पुढे प्रतीक्षा... लवकर येऊन मोक्याची जागा निवडल्याबद्दल आम्हीच आमच्यावर खुश झालो. थोड्या वेळाने जसे उजाडू लागले, तसे मुंबई-पुण्याहून एकामागोमाग एक असे बऱ्याच छायाचित्रकारांची गर्दी होऊ लागली. जागा मिळेल तिथे इतरांना त्रास न देता बसू लागले.

तो आठ वाजता झुडुपातून बाहेर येईल... गेले तीनचार दिवस नेमाने येणाऱ्या एकाने सांगितले... प्रतीक्षा करता करता वारकरी, थापट्या, पाणकोंबड्या असे काही पक्षी हजेरी लावून गेले. त्यांच्या छायाचित्रणातही छान वेळ जात होता. इतक्यात चार मुला-मुलींचा ग्रुप आला. बसायला जागा शोधू लागले. त्याच वेळी ‘‘आली आली’’ असं कोणी तरी कुजबुजलं. फटाकडी थबकत थबकत सावधपणे झुडुपातून बाहेर येताच साऱ्यांची नजर तिच्यावर खिळली. प्रयेक जण जमेल तसे फोटो काढू लागले. एकमेकांस साह्य करू लागले. अत्यंत दुर्मिळ पक्ष्याचे अप्रतिम छायाचित्रण करून झाले होते. बाजूला सरकून इतरांना जागा करून दिली. त्या फटाकडीचीदेखील भीती नाहीशी झाली होती. अन्न टिपता टिपता काही वेळातच ती आमच्या अगदी पायाजवळ आली. इतकी जवळ, की कॅमेऱ्यातही मावत नव्हती. एक अत्यंत दुर्मिळ, कदाचित पुन्हा कधीच न दिसणारा पक्षी आमच्या अगदी जवळ पोहोचला होता. कॅमेरा बाजूला ठेवून आम्ही त्याचे केवळ निरीक्षण करू लागलो. कधीही न विसरता येणारा तो अनुभव मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

loading image
go to top