शब्दमैफल  :  एक "स्पेशल' गाणं  (कौशल इनामदार)

special-song
special-song

"यलो'च्या बाबतीत ही कथा सांगणारा महेश लिमये स्वतः एक छायालेखक होता आणि कथा समकालीन होती. एक "स्फूर्तिदायक क्रीडापट' या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाचं संगीतही स्फूर्तिदायक आणि उमेद वाढवणारं अपेक्षित होतं. महेश म्हणाला ः ""कौशल, यात मला रॉक संगीत दिसतं.'' महेश रॉक संगीताचा चाहता आहे आणि मला रॉक संगीताची केवळ तोंडओळख होती. इतके दिवस माझ्या गाडीत बालगंधर्व, गुलाम अली, आर. डी. बर्मन, रोशन, श्रीनिवास खळे, इळ्ळैराजा वगैरे लागायचे. त्याच गाडीत आता कोल्ड प्ले, इव्हॅनसान्स, इमॅजिन ड्रॅगन्स, यू-2 वगैरे संगीत ऐकून मुलगा अनुराग मात्र सुखावला होता! 

"अजिंठा' चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता पुढे काय असा प्रश्न माझ्या समोर उभा असतानाच एक दिवस महेश लिमये या माझ्या मित्राचा फोन आला. 

""देवा,'' महेशनं सुरुवात केली. महेश लिमये हा मराठी आणि हिंदी चित्रपटसुष्टीतला एक सुप्रसिद्ध छायालेखक आहे. मी संगीत दिलेल्या "बालगंधर्व' या चित्रपटाचं छायांकनही महेशनंच केलं होतं. तेव्हापासून "बालगंधर्व' केलेले आम्ही सगळे कलाकार एकमेकांना "देवा' म्हणून हाक मारतो! 

""देवा, मी दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट करतोय. संगीत तू करायचं आहेस.'' महेशनं ऑर्डर सोडली. 

"अजिंठा' चित्रपटात दहा गाणी आणि पार्श्वसंगीत असं भरघोस काम असल्यामुळे जवळजवळ दहा महिने दुसरं काहीच काम करता आलं नव्हतं. कामाची आवश्‍यकता ही मानसिक आणि व्यावहारिक अशी दोन्ही होती. शिवाय महेशनं मला होकार वगैरे काही विचारलाही नव्हता, सरळ एक प्रेमळ हुकूम सोडला होता ः ""अंबर (हडप) आणि गणेश (पंडित) पटकथा लिहीत आहेत. पटकथेपासून तू मला या प्रक्रियेत सहभागी हवा आहेस.''

पटकथेच्या वाचनासाठी आम्ही एकत्र जमलो. महेश, गणेश, अंबर यांच्या व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर (चित्रपटाचे निर्माते), मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, चित्रपट संकलक जयंत जठार, आमचा वसईचा मित्र, राजू वनमाळी हे सगळेही हजर होते. 

चित्रपटाची कथा गौरी गाडगीळ नावाच्या एका मुलीच्या आयुष्यावर आधारित होती. गौरी जलतरणपटू आहे आणि त्यात तिला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ही आश्‍चर्याची बाब नव्हती; पण गौरी ही "डाउन सिंड्रोम' असलेली एक "स्पेशल' मुलगी आहे. आपल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकात 23 गुणसूत्रं असतात. जेव्हा पूर्ण किंवा अंशिक प्रमाणात गुणसूत्र क्रमांक 21ची अतिरिक्त प्रत आढळते, तेव्हा "डाउन सिंड्रोम' होतो. डाउन सिंड्रोम हा आजार किंवा रोग नसून ती एक अवस्था आहे. डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास इतर मुलांच्या तुलनेत धिम्या गतीनं होतो. त्यांच्या मांस पेशी अशक्त आणि स्नायू शिथिल असू शकतात. या सर्व अडचणींवर मात करून गौरी पाण्याच्या जगात रमली आणि जलतरणात तिनं विशेष नैपुण्य मिळवलं. चीनमध्ये बीजिंग इथं झालेल्या "स्पेशल ऑलिम्पिक्‍स'मध्ये गौरीनं रजत पदक पटकावलं. गौरीची आणि तिच्या कुटुंबाची जिद्द, चिकाटी, विपरीत परिस्थितीवर मात करण्याची त्यांची चिवट इच्छा, आणि या पलीकडे जाऊन जलतरणासारख्या खेळात तिनं गाठलेलं शिखर हे सगळंच स्तिमित करणारं होतं. 

अंबर आणि गणेशनं लिहिलेली पटकथा पहिल्या क्षणापासूनच श्रोत्यांचं चित्त वेधून घेण्यात सफल झाली होती. अतिशय नाजूक विषय कुठंही पातळी न ढळू देता किंवा बटबटीत न करता त्यांनी समर्थपणे हाताळला होता. संवादलेखनात संयम पाळला होता आणि तरीही जे पोचवायचं ते अचूकपणे पोचत होतं. 

वाचन झाल्यावर मी अंबर आणि गणेशला म्हटलं ः ""तुम्ही जे लिहिलंय त्याच्याइतकंच तुम्ही जे लिहायचं टाळलंय, याबद्दल तुमचं कौतुक करायला हवं. हा विषय सहज मेलोड्रामाकडे झुकला असता आणि ते तुम्ही होऊ दिलं नाहीत.'' 

महेश म्हणाला ः ""कौशल, दोन गाणी करायची आहेत; पण तुला "बालगंधर्व' आणि "अजिंठा' विसरून जायला हवं.''

खरं तर माझ्या संगीताचा एखादा "टाइप' आहे, असं मला वाटत नाही. किंबहुना, तो व्हावा असा मी कधी प्रयत्नही केला नव्हता. उलट गाण्यावर संगीतकारानं आपलं व्यक्तिमत्त्व लादता कामा नये हाच माझा सांगीतिक सिद्धांत आहे. म्हणूनच "बालगंधर्व'च्या संगीताचा पोत हा "अजिंठा'च्या संगीताच्या पोतापासून पूर्णपणे भिन्न होता. चित्रपटसंगीताच्या बाबतीत कथेचा पोत, कथेतलं पात्र आणि कथा सांगणारा दिग्दर्शक यांच्यावर त्या चित्रपटाच्या संगीताचा पोत ठरत असतो. चित्रपट संगीतकाराचा धर्म आहे, या कथेला शरण जाणं. "बालगंधर्व' आणि "अजिंठा' या दोन्ही चित्रपटात कथेच्या विषयानंच संगीताचा पोत ठरवून टाकला होता. 

"यलो'च्या बाबतीत मात्र ही कथा सांगणारा माणूस स्वतः एक छायालेखक होता आणि कथा समकालीन होती. याचाच अर्थ, की संगीताचा पोत प्रामुख्यानं कथा सांगण्याच्या शैलीवर अवलंबून होता. एक "स्फूर्तिदायक क्रीडापट' या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाचं संगीतही स्फूर्तिदायक आणि उमेद वाढवणारं अपेक्षित होतं. 

महेश म्हणाला ः ""कौशल, यात मला रॉक संगीत दिसतं.'' महेश रॉक संगीताचा चाहता आहे आणि मला रॉक संगीताची केवळ तोंडओळख होती. नाही म्हणायला माझा त्यावेळी चौथीत असलेला मुलगा, अनुराग, बऱ्यापैकी रॉक संगीत ऐकायचा. 

इतके दिवस माझ्या गाडीत बालगंधर्व, गुलाम अली, आर. डी. बर्मन, रोशन, श्रीनिवास खळे, इळ्ळैराजा वगैरे लागायचे. त्याच गाडीत आता कोल्ड प्ले, इव्हॅनसान्स, इमॅजिन ड्रॅगन्स, यू-2 वगैरे संगीत ऐकून अनुराग मात्र सुखावला होता! 

पाश्‍चात्य संगीताचा पाया काय आहे, हे जाणून घेण्यास मी पियानो शिकण्यासही सुरूवात केली! "बालगंधर्व'ची 21 गाणी करायला मला नऊ महिने लागले होते आणि "अजिंठाची' 11 गाणी करण्यासाठी आठ महिने; पण "यलो'ची दोनच गाणी करण्यासाठी मला तब्बल सहा महिने तयारी करावी लागली. या सहा महिन्यांत रॉक म्युझिक सोडून मी दुसरं काहीही ऐकलं नाही. 

चित्रपटातली गाणी कुणी लिहावी, यावर माझं आणि महेशचं लगेचच एकमत झालं आणि गुरू ठाकूरलाच विचारायचं असं ठरलं! 

गुरू ठाकूर हा कमालीचा हरहुन्नरी कलाकार आहे. त्याच्या हातात परमेश्वरानं इतक्‍या कला दिल्या आहेत, की कुठल्याही कलाकाराला चांगल्या अर्थानं त्याचा हेवा वाटावा. एकाच माणसाच्या हातातून उत्तम चित्र, व्यंग्यचित्र, कविता, गाणी, कथा, पटकथा, संवाद, नाटकं, छायाचित्र हे सगळं कसं येऊ शकतं हे अचंबित करणारं आहे. गुरूचे अवाक्‌ करणारे कलात्मक विभ्रम पाहिले, की "शोले' चित्रपटातल्या गब्बर सिंगसारखं म्हणावंसं वाटतं ः ""ये हात मुझे दे दे ठाकुर! ये हात मुझे दे दे!'' 

झालं! महेशनंही गुरूच्या नावाची पसंती दर्शवल्यानंतर त्याच दिवशी मी गुरूला फोन लावला. काम सांगितलं. 

""आज भेटूया?'' ः मी. 

""हो. रात्री बारा वाजता?'' ः गुरूनं विचारलं. 

""डन!'' 

कुणाला हे विचित्र वाटू शकतं; पण गुरू आणि मी दोघंही निशाचर आहोत. त्यामुळे रात्री बारा वाजता भेटणं हे आम्हाला सवयीचंच होतं. ठरल्याप्रमाणे गुरूला मी रात्री बारा वाजता घ्यायला गेलो. माझ्या घराजवळच त्याचं दुसरं काही काम होतं. त्यानंतर आम्ही माझ्या गाडीतून जवळजवळ आख्खी मुंबई पालथी घातली. गोरेगावहून मुंबईच्या एका टोकाला म्हणजे कुलाब्यापर्यंत गेलो. 

गौरी गाडगीळ ही एक स्पेशल मुलगी आणि महेशच्या डोक्‍यात होतं, की "स्पेशल' हा शब्द वापरून या चित्रपटाचं थीम सॉंग करावं. एखाद्या स्पेशल मुलीचं आयुष्य कसं असेल हे आपल्याला अनुभवता येत नाही; पण आपल्या संवेदना जागृत ठेवल्या, तर मात्र एक गोष्ट लक्षात येते, की आपणही काही बाबतीत स्पेशल असतो. मी पियानो शिकायला लागेपर्यंत आपल्या डाव्या हातालाही करंगळी आहे, हे मी जवळजवळ विसरून गेलो होतो. पहिल्यांदा माझ्या पियनो शिकवणाऱ्या शिक्षकांनी मला डाव्या हाताची करंगळी वापरायला सांगितली, तेव्हा कळलं की एरवी हलका वाटणारा पियानोचा सूर त्या डाव्या करंगळीनं अजिबात हलेना! 

आम्ही त्या ड्राइव्हवर खूप गप्पा मारल्या. गौरीचं स्पेशल असणं हे तिच्यासाठी अडथळा होतं का तो अडथळाच तिच्या जिद्दीचा आधार होता? त्या काळात मुंबईचं T2 हे विमानतळ नुकतंच नव्यानं बांधलं होतं. कुतूहल म्हणून आम्ही तिथंही फिरून आलो. त्याची भव्यता पाहून आम्ही विस्मयचकित झालो. किती सुंदर, भव्य गोष्टी बांधल्या आहेत माणसानं! मनात विचार आला, की नजर असली तर जग किती सुंदर आहे? आपण रडत राहिलो, स्वतःच्या दुःखाला उगाच उगाळत राहिलो तरच आपण पंगू असतो. खरं अपंगत्व आपल्या मनाचं असतं. शरीराचं नसतं. गौरी गाडगीळला भेटल्यावर पहिली गोष्ट जाणवली होती ती म्हणजे तिची निरागसता आणि तिच्यातली सकारात्मक ऊर्जा. 

तिथून पुढे आम्ही गुरूच्या घराकडे कूच केली. प्रवासाचा उत्तरार्ध आता बऱ्याच शांततेत गेला. गुरूच्या मनात काहीतरी चक्र सुरू झालंय हे मला जाणवत होतं आणि ती शांतता भंग करून गुरूच्या विचारचक्राला मला धक्का द्यायचा नव्हता. 

बराच वेळ आम्ही गुरूच्या घराखाली थांबून राहिलो. गुरू म्हणाला ः 

""पहिली ओळ सुचलीये ः 

मला वाटते स्पेशल नेहमी आकाशीचे सगळे तारे 

अंधाराला ना घाबरता एकएकटे लुकलुकणारे!'' 

""मुखडा मिळालाय म्हणजे गाणं मिळालं!'' मी म्हटलं. 

गाडीतून उतरताना गुरू म्हणाला ः ""उद्या सकाळी देतो पूर्ण गाणं!'' 

दुसऱ्या दिवशी सकाळी फोन उघडून पाहिला, तर गुरूनं संपूर्ण गाण्याचे शब्द पाठवले होते. बहुतेक त्यानं ते रात्रीच पूर्ण केलं असावं! 

मला वाटते स्पेशल नेहमी 

आकाशीचे सगळे तारे 

अंधाराला ना घाबरता 

एकएकटे लुकलुकणारे 

जे जे स्पेशल, ते ते नक्की असते ग्रेट सारे 

म्हणून कदाचित असेल झाले स्पेशल मी आता रे या मुखड्यात एका ओळीची आम्ही वाढ केली आणि एक इंग्रजी ओळ लिहिली ः In this beautiful world, I am never alone! 

आता राहिला प्रश्न गाण्याच्या चालीचा. चाल "रॉक' या संगीतप्रकारात करायची होती. मराठी भाषेतले शब्द इंग्रजाळलेले म्हणायचे हे माझ्या सौंदर्यविचाराला अजिबात न पटणारी गोष्ट आहे. मराठीचे उच्चार हे मराठीच असायला हवेत असा माझा नेहमीच कटाक्ष असतो. 

सहा महिने सतत ऐकत असलेलं रॉक संगीत आता माझ्या शरीरात आणि मनात भिनलं होतं. त्यात येणारे इंट्रो (सुरुवात), व्हर्स (कड्‌वं), रिफ्रेन (गाण्यात ज्याची सतत पुनरक्ती होती अशी ओळ - या गाण्यात - In this beautiful world... ही ओळ), ब्रिज, कोडा हे घटक सहज त्यात येत गेले. 

या गाण्याचं संगीत संयोजन सुस्मित लिमये या माझ्या रॉक म्युझिकप्रेमी मित्राने केलं. रॉक संगीतात वाद्यं कमी असली, तरी त्याचे काही संकेत असतात ः ड्रम्स, इलेक्‍ट्रिक गिटार, बेस गिटार आणि कीबोर्ड या वाद्यसमूहात साधारणतः एक रॉक गाणं बनतं. रॉक म्युझिक म्हणजे केवळ आरडाओरडा आणि कोलाहल हा समज अगदी चुकीचा आहे. अनेक रॉक गीतं ही अतिशय शांत आणि संथही आहेत. 

सुस्मितनं या गाण्यात गोडवा आणण्याकरिता पियानोचा फारच सुंदर वापर केला. इलेक्‍ट्रिक गिटार हे पवन रसैली यांनी वाजवलं. 

आता प्रश्न होता, की हे गाणं कुणी गायचं. "यलो' येण्याच्या खूप आधी महेश लिमयेनेच माझी ओळख इंग्लंडच्या अपेक्षा दांडेकरशी करून दिली होती. अपेक्षा अतिशय सुरेल गायिका आहे. शिवाय अपेक्षाचे मराठीचे उच्चार हे अस्खलित मराठी आणि इंग्लंडमध्ये वाढल्यामुळे इंग्रजी उच्चार हे अस्सल इंग्रजी होते. हे गाणं अपेक्षानं गावं हा महेशचा आणि माझा विचार तंतोतंत जुळला. गाणं "अपेक्षे'प्रमाणंच झालं हे सांगणे न लगे! अपेक्षाला त्यावर्षीची पार्श्वगायिकेची अनेक पारितोषिकं मिळाली. 

...पण गाणं ध्वनिमुद्रित करून थांबतं असं नाही, तर याचं ध्वनिमिश्रणही उत्तम झालं तरच ते खुलून येतं आणि या स्पेशल गाण्याचं खुलून येण्याचं बरंचसं श्रेय हे विजय दयाळ या यशराज स्टुडिओच्या प्रतिभावंत ध्वनिसंयोजकाला जातं. वाद्यांचा आवाज नियंत्रित ठेवून यातले चढउतार सांभाळून विजयनं हे गीत अत्यंत सुंदर रितीनं खुलवलं. 

लॉकडाउनच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच कधी न कधीतरी एकटं वाटलं असेल, निराश वाटलं असेल. मलाही वाटतं; पण अशातच महेश लिमयेनं चित्रित केलेली गौरी गाडगीळची हसरी प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि या गाण्याची ओळ ओठांवर येते ः "In this beautiful world, you're never alone!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com