खिलते है गुल यहाँ...

सहलीसाठी आलेल्या काही तरुण मैत्रिणी हिमवादळामुळं एका बंगल्यात अडकून पडल्या आहेत. बंगल्यातलं अन्न संपलं आहे.
Khilte Hain Gul Yahan by kishore kumar from movie sharmeelee
Khilte Hain Gul Yahan by kishore kumar from movie sharmeeleeSakal

- डॉ. कैलास कमोद

खिलते है गुल यहाँ

खिल के बिखरने को

मिलते है दिल यहाँ

मिल के बिछडने को

खिलते हैं गुल यहाँ...

माणूस जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्यात त्याला निरनिराळी माणसं भेटत जातात. कुणी रक्तानं जोडलेले नातेवाईक असतात. दीर्घ सहवासातून निर्माण झालेले कुणी मित्र असतात. अडीअडचणीला मदतीला अचानक एखादा कुणी आला तर तो आपोआप आपलासा होतो...कुणी एखादा काही सत्कार्य करतो म्हणूनही आपलासा वाटू लागतो.

परिचितांच्या अशा मेळ्यात मैत्र जमलेले सगळेच काही कायमस्वरूपी राहतात असं नाही. रक्ताचे सगळेच नातेवाईक काही कायमस्वरूपी आपलेसे वाटतात असंही नाही. गैरसमजातून अथवा अन्य काही कारणानं मैत्रीतही अंतर येतं,

तर बऱ्याच वेळा काहीही कारण नसतानासुद्धा माणसं उगाचच दूर जातात. श्रीरामानं राज्यत्याग करावा हे बंधू भरतास मान्य नव्हतं. रामाला वनवासात पाठवून राज्य स्वीकारण्यास भरत तयार नव्हता. अशा प्रसंगी भरताची समजूत काढतानाच्या प्रसंगी ग. दि. माडगूळकर ‘गीतरामायणा’त लिहितात :

दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ

क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

म्हणूनच चार घटकांचं हे क्षणभंगुर आयुष्य प्रेमभरानं जगावं. उद्याचं कुणी पाहिलंय? आज जे मिळेल त्यात आनंद शोधावा. या वास्तवाची जाणीव मनुष्याला अधूनमधून होत असते.

कधी कधी मात्र एखाद्या प्रवासात एका चहापुरती झालेली एखाद्याची ओळख दीर्घ काळच्या मैत्रीत रूपांतरित होते. क्षणिक परिचय झालेल्या आणि आतापर्यंत अनोळखी असलेल्या त्या ‘अगांतुका’चा सहवास हवाहवासा वाटू लागतो. मात्र, त्याची-आपली पुन्हा भेट होणार किंवा नाही याविषयी संदिग्धता असते. भेट घडावी अशी हुरहूरसुद्धा मनात असते.

हिवाळ्याचे दिवस आहेत. हिमालयातल्या बर्फाळ प्रदेशात जोरदार हिमवादळ सुरू आहे. सहलीसाठी आलेल्या काही तरुण मैत्रिणी हिमवादळामुळं एका बंगल्यात अडकून पडल्या आहेत. बंगल्यातलं अन्न संपलं आहे.

दोन दिवसांपासून काही खायला न मिळाल्यामुळं त्या भुकेनं व्याकुळ आहेत. एकांतात असलेल्या त्या बंगल्यासमोर काही अंतरावर अगदी लहानशी वस्ती दिसत्ये; पण ती आहे लष्करी अधिकाऱ्यांची मेस. लष्करातल्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणाला मेसमध्ये प्रवेश नाही. पोटातली भूक तर गप्प बसू देईना, अशी अवस्था त्या मैत्रिणींची झालेली आहे.

त्यांच्यातली एकजण धाडस करायचं ठरवते. सर्वांग कपड्यांनी झाकलेलं आणि डोक्यावरूनसुद्धा माकडटोपी घेतलेली ती तरुणी सोसाट्याच्या वाऱ्यात, स्नोफॅाल सुरू असताना लपत-छपत समोरच्या लष्करी मेसच्या कॅन्टीनमध्ये घुसून खाण्याचे पदार्थ एका टोपलीत जमा करून त्या टोपलीसह बंगल्याच्या दिशेनं पळ काढते.

तिला पळताना पाहून ‘चोर असावा’ अशा समजुतीनं एक कॅप्टन तिचा पाठलाग करतो. तिच्यापाठोपाठ तोही बंगल्यात पोहोचतो. या कुणी सराईत चोर नसून भूक लागलेल्या मुली आहेत आणि आपण ‘ज्याला’ चोर समजून पकडलं आहे ‘तो’ चोर नसून प्रत्यक्षात एक अतिशय सुंदर तरुणी आहे हे कॅप्टनच्या लक्षात येतं. मग तोच त्यांना खायला देतो.

त्यांच्याशी सहकार्याच्या भावनेनं वागतो. कॅप्टनसुद्धा तरुण, उंचापुरा, गोरागोमटा असून त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे. अचानक दैवयोगानं या सुंदर तरुणीशी घडून आलेली आपली भेट फक्त या प्रसंगापुरती असणार आहे...तिच्याशी आपली पुनर्भेट होणं केवळ अशक्य आहे हे तो जाणून आहे. अशा प्रसंगी तो गाणं गाऊ लागतो :

खिलते है गुल यहाँ खिल के बिखरने को...

कल रहे ना रहे, मौसम ये प्यार का

कल रुके न रुके, डोला बहार का

चार पल मिले जो आज, प्यार में गुज़ार दे

खिलते हैं गुल यहाँ...

तोसुद्धा हेच कथन करतो की, ‘उद्याचं कुणी पाहिलंय? उद्याच्या दिवसाला कदाचित आजच्यासारखा बहर फुटलेला नसेल...आज मिळालेल्या आनंदाच्या दोन घटका प्रेमभरानं जगू या...’

बाहेरच्या सुंदर निसर्गाचं वर्णन करताना कवी-गीतकार नीरज लिहितात : ‘फूलों के सीने में ठंडी ठंडी आग है’! मनात आग प्रज्वलित आहे; पण तितकीच ती संयमितसुद्धा आहे, असं ते फुलांचं रूपक घेऊन लिहितात.

झीलों के होटों पर मेघों का राग है

फूलों के सीने में ठंडी ठंडी आग है

दिल के आइने में तू ये समा उतार दे

खिलते हैं गुल यहाँ...

अशा या धुंद वातावरणात काहीतरी गुजगोष्टी करायला ओठ शिवशिवत आहेत, तर प्रेमभराचे दोन शब्दच ओठांबाहेर पडू देत. आजच्या अशा आनंदमय घटिकेवर सुखाचं सर्वस्व ओवाळून टाकू या...

प्यासा है दिल सनम, प्यासी ये रात है

होटों में दबी दबी कोई मीठी बात है

इन लम्हों पे आज तू हर खुशी निसार दे

खिलते हैं गुल यहाँ...

कवी नीरज यांचं हे अर्थपूर्ण गीत अनेकांचं आवडतं गीत आहे. नीरज यांची खासियतच ही की, आपल्या गीतातल्या फक्त एखाद्-दुसऱ्या ओळीतून जीवनावर भाष्य करणं. ‘नई उमर की नई फसल’ या सिनेमातल्या ‘कारवाँ गुजर गया, गुबार देखते रहे’ या त्यांच्या एका गीतावर पीएच.डी. होऊ शकेल इतका गहन अर्थ भरलेला आहे. अभ्यासूंनी ते गीत अवश्य. ऐकावं आणि आपापल्या परीनं त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा.

गोपालदास सक्सेना या हिंदी भाषेतल्या लोकप्रिय कवीनं ‘नीरज’ असं टोपणनाव (तख़ल्लुस) घेऊन हिंदी सिनेगीतं लिहिली आहेत. काही गाण्यांतून ते आपल्या नावाचा संदर्भही देतात. ‘ओ मेरी, ओ मेरी, ओ मेरी शर्मिली...’ या गाण्यात एक ओळ अशी आहे : ‘ओ नीरजनयना आ जरा, आ जरा...तेरी लाज का घुँघट खोल दूँ...’ (नीरजनयना = कमलाक्षी, कमलनयना/मीनाक्षी. कमलदलासारखे किंवा माशाच्या आकाराचे डोळे असलेली. नीरज म्हणजे जो पाण्यात जन्मला तो - म्हणजे, मासाही आणि कमलपुष्पही). असो.

‘खिलते है गुल यहाँ’ या गीताची चाल ‘भीमपलास’सारख्या अवघड रागात बांधून संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी हे गाणं मोठं श्रवणीय केलं आहे. इंटरल्यूडला मध्ये मध्ये येणारे सॅक्सोफोनचे पीसेस मजा आणतात.

सचिनदेव बर्मन यांची तीच तर खासियत आहे. किशोरकुमारनं आपल्या खर्जातल्या आवाजात मस्त सूर लावलाय. सुरुवातीला असलेलं ‘हूं हूंऽऽ’ असं आणि मध्ये एकदा ‘ होऽ होऽ होहो होहो हा’ असं किशोरकुमारचं यॅाडलिंग लक्ष वेधून घेतं.

बाहेर बर्फवृष्टी सुरू आहे. आत थंडीसाठी लाकडी शेकोटी पेटलेली आहे. अशा रोमॅंटिक वातावरणात काचेच्या बंद घरात दहा-बारा तरुणी बसल्या आहेत. त्यांचे विविध पोशाख आकर्षक आहेत.

तितकीच आकर्षक केशभूषा आणि वेशभूषा केलेली राखी त्यांच्यात उठून दिसत आहे. शशी कपूर तिला गुलाबाचं फूल देऊ करतो, तेव्हां तिच्या चेहऱ्यावर स्वीकृतीचे भाव फार छान उमटले आहेत. तो गाणं गाता गाता त्या पोरींना चहा देतो. त्यांचं लक्ष मात्र त्या चहाकडं नसून त्याच्यावरच खिळलेलं आहे. राखीविषयीची असूयासुद्धा काही जणींच्या नजरेतून दिसून येते.

एक मुलगी दुसरीच्या कॉलरमधून तिच्या शर्टमध्ये बर्फ टाकते. त्यांना भूक लागलेली असूनही त्यांच्यातला तारुण्यसुलभ खोडकरपणा त्यातून दिसून येतो. बंद गळ्याचा लालभडक टी शर्ट आणि त्यावर मिलिटरीच्या मळकट हिरव्या रंगाचा लेदरचा कोट पेहेरलेला देखणा शशी कपूर त्या पोशाखात, विशेषत: क्लोजअपमध्ये अधिकच देखणा दिसतो.

(अर्थात हिरव्या कोटमुळेच फक्त तो आर्मी ऑफिसर वाटतो हा भाग वेगळा!). राखीचा मॅाडर्न लूकसुद्धा सुंदर आहे. मात्र, त्या पोरींचं लक्ष नाश्त्याकडं किंवा चहाकडं नसून त्या फक्त शशी कपूरकडंच पाहत आहेत. असा सगळा हॅपी मूडचा माहोल असल्याचं छान दृश्य दिग्दर्शकानं फार मस्त टिपलंय.

सन १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शर्मिली’ या सिनेमाचे दिग्दर्शक होते समीर गांगुली. हेच गीत लता मंगेशकर यांच्या स्वरातही राखीच्या तोंडी आहे. त्याचा पहिला थोडासा भाग काहीसा निराश मूडमध्ये असून पुढचा मोठा भाग आनंदी मूडमध्ये आहे. किशोरकुमारचं गाणं ऐकायला जरा चांगलं वाटतं हेही नमूद करायला पाहिजे.

पूर्वीच्या सिनेमांत एखादं गाणं असं असायचं. नायकाच्या तोंडी पुरुषगायकाच्या स्वरात असलेलं गाणं नंतर नायिकेच्या तोंडी गायिकेच्या स्वरात जसंच्या तसं असायचं. अशा गाण्यांना ‘दो पहलू, दो रंग, दो गीत’ असं संबोधलं जात असे. अशी अनेक गाणी अनेक संगीतकारांनी केली, तरी सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन व कल्याणजी-आनंदजी हे त्यातले खास होते.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com