nature
naturesakal

निसर्गाची साद

निसर्ग आणि माणूस यांतील अतूट नातं अधोरेखित करणारं असं हे गीत आहे. निसर्ग आणि माणूस हे वेगवेगळे असू शकतच नाहीत.
Summary

निसर्ग आणि माणूस यांतील अतूट नातं अधोरेखित करणारं असं हे गीत आहे. निसर्ग आणि माणूस हे वेगवेगळे असू शकतच नाहीत.

- किरण फाटक, Kiranphatak55@gmail.com

सुहाना सफर और ये मौसम हसीं

हमें डर है हम खो न जाए कही

सुहाना सफर और ये मौसम हसीं

ये कौन हँसता है फूलों में छुप कर

बहार बेचैन है किसकी धून पर

कही रुनझुन कही गुनगुन के जैसे नाचे जमीं

सुहाना सफर और ये मौसम हसीं ।।

हे गाणे भैरवी रागातील. कारण यात सर्व स्वर कोमल लागतात. काही स्वर मात्र शुद्ध लावले आहेत. भैरवीत काही शुद्ध सूर रंजकतेसाठी लावले तरी चालतात. सिनेसंगीतात रागाच्या चौकटी विशेष पाळल्या जात नाहीत. रंजकता व शब्द यांना महत्त्व असते. खरंतर काव्यातच चाल लपलेली असते, ती ज्या संगीतकाराला दिसते, तो संगीतकार यशस्वी होतो. मला वाटतं, आपले सर्वच संगीतकार याबाबतीत यशस्वी म्हणावे लागतील. ‘ये आसमा झुक रहा है जमीं पर’ याची चालसुद्धा अवरोही (स्वरावली खाली येणे) केली आहे. स्वरांच्या आकाशाला थोडं खाली झुकवलं आहे. यातील सर्वच अंतऱ्यांची चाल ही अवरोही बेतलेली आहे. कारण हे गाणं म्हणजे स्वतःचा स्वतःशी केलेला सुखद संवाद आहे. निसर्गसौंदर्य पाहून अत्यंत आनंदी झालेल्या मनाचा हा सांगीतिक उन्मुक्त आविष्कार आहे.

दिलीपकुमार यांच्या सहजसुंदर अभिनयाने स्मरणीय झालेल्या ‘मधुमती’ या चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे सलिल चौधरी यांनी, तर लिहिलंय शैलेंद्र यांनी व मुकेश यांनी ते गायलं आहे.

निसर्ग आणि माणूस यांतील अतूट नातं अधोरेखित करणारं असं हे गीत आहे. निसर्ग आणि माणूस हे वेगवेगळे असू शकतच नाहीत. कारण जे निसर्गात आहे, ते माणसाच्या शरीरातसुद्धा भरलेलं आहे. माणसाचं शरीरसुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्यामुळे माणूस हा नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहिला तर नक्कीच निरोगी राहील असं मला वाटतं. आज परिस्थिती खूपच बदलली आहे. कार्यमग्नतेमुळे माणसाला चंद्र, सूर्य, चांदणं यांचं दर्शन अप्राप्य झालं आहे. त्याचप्रमाणे मोकळा वारा, हिरवाई, पाण्याचा मंजूळ नाद हेसुद्धा अनुभवायला मिळेलच असं नाही. माणूस त्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतका गढून गेलेला आहे की, निसर्ग त्याच्यापासून रोज दूर दूर जात आहे.

आज आपण पर्यावरण या विषयावर भरपूर बोलत असतो; परंतु यावर आपण किती जण गंभीरपणे विचार करतो हे पाहण्याजोगं आहे. आपल्याला आज शुद्ध हवा मिळते का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आज धूर, धूळ, अनेक प्रकारचे रासायनिक घटक यामुळे आपली हवा अशुद्ध होत आहे आणि ती आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरात संक्रमित होत आहे. म्हणूनच आजकाल शनिवार, रविवार म्हणजेच आठवड्याचे दोन शेवटचे सुटीचे दिवस बरेचसे लोक निसर्गरम्य ठिकाणी जात असतात.

परंतु, एवढ्या उपायाने आपलं जीवन सुधारणार आहे का, याचा प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. आज हवामानात असंख्य बदल होत आहेत. पूर्वी नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असं आपले वडीलधारे आपल्याला शिकवत असत; परंतु ती परिस्थिती आज राहिली नाही. आज निसर्गातील प्रत्येक घटक लहरी झाला आहे. आजकाल हिवाळ्यातसुद्धा पाऊस बरसत असतो आणि उन्हाळ्यातसुद्धा थंडी वाजत असते. नद्या कोरड्या पडत चालल्या आहेत.

निसर्गाचा समतोल हा केवळ माणसाच्या निसर्गावरील आक्रमणाने बिघडलेला आहे. माणूस ईश्वराला अनादी काळापासून शोधत आहे. परंतु, हा परमेश्वर निसर्गातच लपला आहे, हे त्याला अजूनही समजून येत नाही. फुलांमधून हसणारा आणि बहरलेल्या वातावरणातून हुंकारणारा, तसंच अमर्याद पसरलेल्या हिरवळीतून गोड असं नृत्य करणारा असा तो निसर्ग हा साक्षात ईश्वराचं स्वरूपच म्हणावं लागेल आणि हेच सांगण्याचा प्रयत्न वरील गाण्यातून केलेला आहे.

जंगलात अनेकरंगी पिसारा फुलवून नाचणारे मोर, अनेक प्रकारचे रंगबिरंगी पक्षी, अनेक प्रकारच्या सुगंधांनी भरलेली वेगवेगळी फुलं आपल्याला ईश्वराचं दर्शन घडवीत नाहीत का; पण आपण या सर्व सुगंधाला, रंगांना पारखं झालेलो आहोत. कारण आज आपल्याभोवती निसर्गातील जंगलांऐवजी काँक्रीटची जंगलं उभारली जात आहेत, त्यात आपण फसत चाललो आहोत.

पूर्वीच्या अनेक हिंदी चित्रपटांत पायी प्रवास करताना नायक किंवा नायिका दिसून येतात. फार झालं तर घोड्यावरून किंवा घोडागाडीतून नायक आणि नायिका प्रवास करीत असत, त्यामुळे घोड्यांच्या टापांचं संगीत लोकप्रिय झालं.

‘नया दौर’ या चित्रपटातील ‘मांग के साथ तुम्हारा’ हे घोडागाडीतील गाणं खूपच लोकप्रिय झालं आणि याला घोड्यांच्या टापांचा सुंदर असा ताल मिळाला होता. त्याचप्रमाणे ‘परिचय’ या हिंदी चित्रपटातील ‘मुसाफिर हू यारों’ हे जितेंद्र यांच्यावर चित्रित झालेलं गाणं घोडागाडीमधीलच आहे. हे गाणं किशोर कुमार यांनी अतिशय सुरेल अशा आवाजात पेश केलं आहे.

अगदी अलीकडच्या काळातील ‘शोले’ या सिनेमातील एक प्रसंगसुद्धा घोडागाडीतील आहे. यात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे हेमामालिनीच्या घोडागाडीतून हवेलीवर पोहोचतात असं दाखवलं आहे. नंतर हळूहळू चित्रपटात वेगवेगळ्या कार दिसू लागल्या, रेल्वेगाड्या दाखवल्या जाऊ लागल्या, रेल्वेगाडीतील प्रसंगसुद्धा दाखविले जाऊ लागले.

‘मधुमती’मधल्या या गाण्याचं चित्रीकरण, स्थळ, संगीत आणि गायन हे अप्रतिम असं झालं असल्याने, हे गाणं दीर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेलं आहे आणि पुढेही राहील.

(लेखक संगीत अलंकार असून, संगीतक्षेत्रात चार दशकांपासून कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com