
दुनिया मे हम आये हैं तो जीना ही पड़ेगा, जीवन हैं अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
जगण्याचं सार्थ तत्त्वज्ञान...
- किरण फाटक Kiranphatak55@gmail.com
दुनिया मे हम आये हैं तो जीना ही पड़ेगा
जीवन हैं अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
गिर गिर के मुसीबत मे संभलते ही रहेंगे
जल जाए मगर आग पे चलते ही रहेंगे
गम जिसने दिये हैं वही गम दूर करेगा
दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा
जीवन हैं अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
औरत हैं वही जिसे दुनिया की शरम हैं
संसार मे बस लाज ही नारी का धरम हैं
जिंदा हैं जो इज्जत से वही इज्जतसे मरेगा
दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा
जीवन हैं अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
मालिक हैं तेरे साथ ना डर गम से तू ए दिल
मेहनत करे इन्सान तो क्या कम हैं मुश्किल
जैसा जो करेगा यहाँ वैसा ही भरेगा
दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा
जीवन हैं अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
हे अजरामर गीत ‘मदर इंडिया’ या चित्रपटातलं असून गानसम्राज्ञी लता मंगेशकर, शमशाद बेगम, मीना मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायले आहे. नौशादजी यांनी संगीतबद्ध केले असून शकील बदायुनी यांनी लिहिलं आहे.
मदर इंडिया हा १९५७ मध्ये आलेला भव्य आणि नाट्यमय असा चित्रपट होता. मेहबूब खान यांनी तो दिग्दर्शित केलेला होता. यात नर्गिस, राजकुमार, राजेंद्र कुमार, सुनील दत्त हे नट होते. हा चित्रपट मेहबूब खान यांच्या १९४० मध्ये आलेल्या ‘औरत’ या चित्रपटाचा रिमेक होता. यात गरिबीने गांजलेल्या एका खेड्यातील महिलेची (राधा) कहाणी चित्रित केलेली आहे.
आपल्या पतीच्या पश्च्यात, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे वाढवण्याचा ती प्रयत्न कसा करते ते या सिनेमात दाखविलेले आहे. यात एक जुलमी सावकार सुद्धा दाखवलेला आहे.
या सिनेमाने All India Certificate of Merit for Best Feature Film, आणि "the Filmfare Best Film Award for १९५७ मिळविले. नर्गिस आणि मेहबूब खान यांना अनुक्रमे उत्कृष्ट कलाकार आणि उत्कृष्ट दिग्दर्शकाचे अवॉर्ड मिळाले. ''Academy Award for Best International Feature Film," साठी या सिनेमाला नामांकन प्राप्त झाले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक गीतातून समाजातील जळजळीत वास्तव मांडले गेले आहे. जगात आज अनेक जण गरिबी, आजारपण, एकटेपण याला कंटाळून टोकाचा मार्ग स्वीकारत आहेत. कुठल्याही संकटाला धीराने सामोरे जाणं आज समाज विसरत चालला आहे. वरील गाण्यातून समाजाला एक चांगला संदेश दिला गेला आहे.
जन्माला आल्यावर माणसाला अनेक अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करावी लागते. शरीर हे नाशवंत असून, आत्मा हा अविनाशी आहे असे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे. माणसाला आजारपण, वार्धक्य, अपघात अशा यातनामय प्रसंगांना तोंड द्यावे लागते. जन्मतः बुद्धी नसणे किंवा एखाद्या अवयवाचे दुबळेपण असणे अशा नैसर्गिक कमतरतेला सामोरे जावे लागते. उदा.आंधळेपणा, पांगळेपणा. परंतु यावर धीरोदात्तपणे मात करणे किंवा आल्या प्रसंगाला तोंड देणे ह्यातच खरा पुरुषार्थ असतो. अशा प्रकारे जर तो वागला तर त्याला नक्कीच सुख आणि समाधान प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असावे समाधान".
माणूस गरिबी, मनाप्रमाणे न होणे, संधी न मिळणे, शिक्षणाची संधी न मिळणे, चांगली नोकरी न मिळणे, अपघात होणे अशा अनेक प्रतिकूल प्रसंगातून जात असतो. त्याला या सर्व संकटाशी सामना करत करत जगावे लागते.
जन्म आणि मृत्यू हे ईश्वराने आपल्या हाती ठेवलेले आहेत. माणसाला जन्म हवा तिथे घेता येत नाही आणि मरण सुद्धा त्याला हवं तेव्हा मिळू शकत नाही. ते देवाने आपल्या हातात ठेवलेले आहे. म्हणून आहे त्या परिस्थितीत, आहे त्या मिळालेल्या साधनसामुग्रीतील समाधान मानणे हाच सोपा मार्ग आहे.
कुठल्याशा हिंदी गाण्यात म्हटले आहे, "मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन, ऐसी बातों से क्या घबराना, यहा कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना".
आपला जन्म कशासाठी झाला, कोणत्या कार्यासाठी झाला हे समजून उमजून, जर माणूस दिवसभर त्या कार्यामध्ये व्यस्त राहिला तर त्याच्या मनात इतर त्रासदायक विचार येणारच नाहीत. शिवाय त्याने आपली वागणूक अत्यंत नम्र, संयमी अशी ठेवणे, त्यालाच सुखदायक ठरू शकते. जगात अहंकार हा सगळीकडे पसरलेला दिसतो. आपल्यातला अहंकार जर आपल्याला बाजूला ठेवता आला, तर आपण दुसऱ्याची सेवा चांगल्या प्रकारे करून, जीवनात आनंद निर्माण करू शकतो. आपल्यास नव्हे तर इतरांच्या जीवनात सुद्धा आपण उत्साह, स्फूर्ती भरू शकतो. म्हणून माणसाने नेहमी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सलाम केला पाहिजे. त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन ठेवल पाहिजे. असे झाले तर माणसाला जीवनातील जहर चाखण्याची वेळच येणार नाही. तो नेहमी जीवनातील आनंदाचे अमृत पीत राहील आणि लोकांना देत राहील.
कुठल्याशा हिंदी गीतात म्हटलेच आहे, "दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे, काम कर प्यारे सलाम कर प्यारे,
वरना ये दुनिया जीने नही देगी
खाने नही देगी पीने नही देगी"
असे जर वागले नाही तर ,"ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही" असे म्हणण्याची वेळ येईल.
जगात आपल्या मनासारखे फार क्वचित होते. म्हणून संत रामदासस्वामी म्हणतात,
‘नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे
अती स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारखे दुःख मोठे’
परंतु मनासारखे झाले नाही म्हणून माणसाने आपले विहित कर्म करणे थांबवता कामा नये. काम करणे हे माणसाच्या हाती असते. परंतु त्याचे चांगले वाईट फळ माणसाच्या हाती नसते. ते आजूबाजूची परिस्थिती आणि त्याला मिळणारा इतर लोकांचा सहवास यावर अवलंबून असते. म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा, म्हणजे एक ना एक दिवस त्याचे इच्छित फळ माणसाला नक्की प्राप्त होईल.
म्हणून जीवनात येणाऱ्या कडू गोड प्रसंगांना सामोरे जाऊन जीवन सुसह्य बनविले पाहिजे. संकटापासून दूर पळून न जाता त्यांना संघर्ष करून पळवून लावणे यातच खरा पुरुषार्थ आहे.
(लेखक हे ‘संगीत-अलंकार’ असून संगीतक्षेत्रात चार दशकांपासून कार्यरत आहेत.)