गडकिल्ल्यांचा अद्वितीय कोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडकिल्ल्यांचा अद्वितीय कोश
गडकिल्ल्यांचा अद्वितीय कोश

गडकिल्ल्यांचा अद्वितीय कोश

- किरण सोनीवाल

मानवाच्या काही भावनांपैकी ‘भीती’ ही एक प्रमुख भावना आहे. या भावनेतूनच मानवाला संरक्षणाची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच पुढं किल्ल्यांची उभारणी होत गेली. प्रत्येक मराठी व्यक्तीस छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी अतूट नाते असणाऱ्या गडकिल्ल्यांविषयी प्रचंड आत्मियता तर आहेच पण विलक्षण आकर्षण देखील आहे. यांमुळेच की काय, महाराष्ट्रातील या गडकिल्ल्यांबाबत अनेक लेखकांनी विपुल लेखन करून ठेवलेले आहे आणि दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. मात्र महाराष्ट्राबाहेरील राजस्थान हे राज्य सोडले तर अखंड भारतातील किल्ल्यांवरील अभ्यासपूर्ण लेखन फारच क्वचित झाल्याचे आढळते. याला मात्र आता अपवाद म्हणावा लागेल तो ‘फोर्टस्‌ अँड पॅलेसेस इन इंडिया'' या ग्रंथाचा.

देशातल्या किल्ल्यांचे अभ्यासक म्हणून प्रमोद मारूती मांडे यांचे नाव परिचित आहे. ‘इनक्रेडिबल फोर्टस्‌ इन इंडिया'' या त्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. संबंध देशातल्या सोळाशेहून अधिक गडकिल्ल्यांची खडानखडा माहिती असल्यामुळेच त्यांना ‘दुर्गमहर्षी’ आणि ‘सह्याद्रीपुत्र’ या उपाधीने गौरविण्यात आलेले होते. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी लिहून ठेवलेल्या किल्ल्यांच्या नोंदींवरून त्यांचे शिष्य अनिकेत अंकुश यादव व चेतन गजानन घाडगे यांनी हा अजोड ग्रंथ पूर्णत्वास नेला आहे.

या ग्रंथामध्ये २६ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेश यांमधील ५२१ जिल्ह्यांमधील ४ हजार ८८ किल्ल्यांचा समावेश केलेला आहे. या किल्ल्यांचे अक्षांश, रेखांश, त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची, जिल्ह्याच्या मुख्यालयापासून किल्ल्याचे अंतर-दिशा, किल्ल्याची सद्यस्थिती, त्यावरील वास्तू, त्याचा संक्षिप्त इतिहास इत्यादी माहिती तर दिलेली आहेच याशिवाय किल्ल्याच्या आजूबाजूची प्रेक्षणीय ठिकाणे देखील दिल्यामुळे दुर्गप्रेमींना जवळच्या प्रेक्षणीय ठिकाणांचीही माहिती होते. एवढ्या किल्ल्यांना भेटी देणे सर्वांना शक्य नाही हे जाणून महत्त्वाच्या किल्ल्यांना एक-दोन-तीन असे स्टार दिल्याने यांतील भेटी देण्याजोगे किल्ले चटदिशी लक्षात येतात.

काही किल्ल्यांवर कोणतेही अवशेष नसल्यास किंवा उपलब्ध साहित्यानुसार किल्ल्याची काही माहिती नसल्यास ते तसे येथे नमूद केलेले आहे, हा प्रांजळपणाही उल्लेखनीय म्हणावा लागेल. ग्रंथामधील १२८२ रंगीत छायाचित्रांमधून देशभरातील गडकिल्ल्यांचे नयनरम्य दर्शन होते. राज्यांच्या ३३ नकाशांमधून व त्यांच्या भौगोलिक वर्णनावरून भारताचा विस्तीर्ण पसरलेला परिसर ध्यानात येतो आणि तब्बल ३५ वर्षे मांडे यांनी भारत पिंजून काढला; ते ही इंटरनेट पूर्व काळात, याचे अप्रूपही वाटते. ग्रंथाच्या "ऍनसियंट हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन'' या प्रकरणामध्ये दिलेली माहिती पाहून तर थक्कच व्हायला होते. यांत जगातील काही महत्त्वपूर्ण दुर्गांबरोबरच, प्राचीन काळापासून भारतामधील दुर्गबांधणी करणाऱ्या राजवटींची माहिती दिलेली आहे. हडप्पा, मोहेंजोदरो, कालिबंगन, लोथल इत्यादी नगरांभोवती संरक्षणासाठी बांधलेल्या दुर्गांची संक्षिप्त माहिती आहे. वेद, पुराणे, मनुस्मृती, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र अशा तब्बल ४३ हून अधिक प्राचीन ग्रंथांमध्ये किल्ल्यांबाबतची दिलेली माहिती या प्रकरणात संक्षिप्तपणे दिलेली आहे. याशिवाय किल्ल्यांचे विविध प्रकार, किल्ल्यांमध्ये असणाऱ्या विविध घटकांची विस्तृतपणे माहितीही दिलेली आहे.

किल्ल्यांचे संरक्षण करणे किती आवश्‍यक आहे ? याचाही उहापोह यात केलेला आहे. किल्ल्यांचे जिओग्राफीकल कोऑर्डीनेटस्‌ (अक्षांश-रेखांश) दिल्याने पर्यटकांना थेट किल्ल्यावर जाणे सोईचे झालेले आहे. मात्र या अक्षांश-रेखांशाची सुरूवात नेमकी कशी झाली? याचीही रोचक माहिती ग्रंथात वाचायला मिळते. काश्‍मीर ते तमिळनाडू आणि अरूणाचल प्रदेश ते गुजरात अशा संबंध भारतातील चार हजार किल्ले, महाल, वाडे, प्राचीन किल्यांचे अवशेष, तटबंदीयुक्त शहरे, पाणपोई, प्रमुख रस्त्यांच्या देखरेखीकरीता बांधलेले किल्ले, वॉचटॉवर इत्यादींचा समावेश असलेला हा ग्रंथराज वेगळाच आहे. गडकिल्ल्यांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हा दुर्गकोश एक दिशादर्शक आहे.

पुस्तकाचं नाव :

फोर्टस्‌ अँड पॅलेसेस इन इंडिया

लेखक : प्रमोद मारूती मांडे,

सहलेखक : अनिकेत अंकुश यादव,

चेतन गजानन घाडगे

पृष्ठं : ७८० मूल्य : २५०० रुपये.

प्रकाशक - अनिकेत एंटरप्रायझेस, पुणे

(७५८८२९१४८३, ९८२२७४३२४४)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fortbooks
loading image
go to top