पाकिस्तानात गहू महागलाय; काय आहे कारण?

किशोर जामकर 
Friday, 24 January 2020

सख्खे शेजारी : पाकिस्तान : पोटाची खळगी भरल्याशिवाय सरकारबद्दल कोणतीही जनता समाधानाची दुवा देत नाही. नेमके पाकिस्तानवासीयांच्या पोटावरच तेथील सरकारचे धोरण उठल्याने, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. गव्हाच्या आणि त्याच्या पिठाच्या गगनाला भिडलेल्या किंमतीने महागाईची घोडदौड सुरू आहे. दुसरीकडे गुप्तपणे पाकिस्तानने अफगाणिस्तानात हजारो टन गहू पाठवल्याने जनता उपाशी आणि शेजारी भरपेट अशा स्थितीने आगीत तेल ओतले गेले आहे. 

आर्थिक बेशिस्तीमुळे उधळलेल्या महागाईत आधीच कंबरडे मोडलेला पाकिस्तानी नागरिक आता गहू आणि त्याचे पीठ मिळण्यासाठी विविध शहरांमध्ये तासन्‌तास रांगेत घालवत असल्याचे चित्र सध्या पाकिस्तानभर दिसत आहे. या नव्या समस्येला जबाबदार कोण? यावरून तेथील केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये (आपल्याप्रमाणेच) चिखलफेक सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकाला गव्हाच्या एक किलो पिठासाठी तब्बल सत्तर रुपये मोजावे लागत आहेत. मार्च-एप्रिलमध्ये नवा गहू बाजारात येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहील, अशी स्थिती आहे. पाकिस्तानला अद्दल घडवताना त्यांना आता "दाल-आट्या'चे भाव कळतील, असे आपण म्हणत असतो. आपली ही अपेक्षा आता खरी होताना दिसत आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने गहू आणि त्याचे पीठ महाग झाले असल्याचे मिल ओनर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. अनेक महिन्यांपासून गहू आणि त्याच्या पिठाची कमतरता पाकिस्तानमधील सर्वच भागात जाणवत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यांत पाकिस्तानातील पंजाबमध्ये गव्हाच्या 20 किलोच्या गोणीची किंमत 810 रुपयांवर पोचली होती. सिंध प्रांतात तेवढ्याच वजनाच्या गव्हाच्या गोणीची किंमत 1 हजार 113, खैबर-पख्तुनवा प्रांतामध्ये 981, तर बलुचिस्तान प्रांतामध्ये 970 पाकिस्तानी रुपये एवढी होती. एक किलो गव्हाचे पीठ करण्यासाठी मिल मालक 10 रुपये आकारतात. आठ रुपये दळणाचे आणि दोन रुपये गहू स्वच्छ करण्याचे असतात. त्यामुळे आज चांगल्या दर्जाच्या पिठासाठी किलोमागे तब्बल 70 रुपये मोजावे लागत आहेत. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आक्राळ-विक्राळ महागाई 
काश्‍मीरमधील घडामोडींनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यातच पेट्रोल शंभर रुपयांवर आणि टोमॅटो तीनशे रुपयांवर पोचले असताना आता गव्हाचे पीठ सत्तर रुपयांवर गेल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एखाद्या समस्येने आक्राळ-विक्राळ रूप धारण केल्यानंतर आपल्याकडे जसे होते अगदी तसेच पाकिस्तानमध्येही झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोपांच्या फैरी झडू लागल्यात. या टंचाईस प्रामुख्याने पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध हेच प्रांत जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारतर्फे करण्यात आला. मागील हंगामात सिंध प्रांताने 16 लाख टन गव्हाची खरेदी करणे अपेक्षित असताना या सरकारने गव्हाचा एकही दाणा खरेदी केलेला नाही. तर तेथील केंद्र सरकारने राज्याच्या निधीचा वाटा न दिल्यामुळे खरेदी करता आली नाही, असे सिंध सरकारचे म्हणणे आहे. दुसरीकडे राज्यांमध्ये गव्हाची साठेबाजी आणि फायद्यासाठी चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याचा आक्षेप केंद्रीय सरकारने घेतला आहे. गव्हाच्या टंचाईवरून गदारोळ उडाला असताना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरीफ अल्वी यांनी अशी काही समस्या असल्याचे आपल्या ऐकिवातच नाही, असे वक्तव्य केल्याने ते टिकेचे धनी झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष अल्वी हे सत्तारूढ पाकिस्तान-तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे आहेत. या जखमेवर मिठ चोळणारे वक्तव्य केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर त्यांची यथेच्छ खिल्ली उडवण्यात येत आहे. सिंध प्रांताचे मंत्री सईद गिलानी यांनी "किमान ते खरे बोलत आहेत,' अशा शब्दांत त्यांच्यावर प्रतिटीका केली. दुसरीकडे बिलावल भुत्तो यांनी पाकिस्तान सरकारने 40 हजार टन गहू गुपचूपपणे अफगाणिस्तानमध्ये पाठवल्याचा आरोप केला गेल्याने या समस्येने पेटलेल्या आगीत राजकारणाचे तेल ओतले गेले. त्याने जनमानस चांगलेच तापले आहे. खरे तर जुलै-ऑगस्टमध्येच गहू टंचाईची समस्या पाकिस्तानला भेडसावणार असे स्पष्टपणे दिसून येत होते. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमधील गव्हाचा साठा 74 लाख टन होता. मागील वर्षी याच महिन्यात गव्हाचा साठा एक कोटी 7 लाख टन होता. जुलैमध्ये सरकारने गहू आणि पिठाच्या (आट्याच्या) निर्यातीवर बंदी घातली होती. तरीही जुलै ते सप्टेंबरपर्यंत आयात करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. दुसरीकडे खैबर-पख्तुनवामार्गे अफगाणिस्तानमध्ये गहू आणि आट्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. नंतर सरकारला जाग आली खरी, पण तोपर्यंत देशांतर्गत परिस्थिती हाताबाहेर पोचली होती. आता किंमत कमी करण्यासाठी सरकारने 3 लाख टन करमुक्त गहू आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी व्यावसायिकांनाही गहू आयात करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. आयात गहू बाजारात आला तरीही नव्या हंगामातील गहू बाजारात येईपर्यंत त्याच्या किमती चढ्याच राहतील, असा अंदाज आहे.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाक : बेस्ट हॉलिडे डेस्टिनेशन 
आर्थिक आघाडीवर हातघाईची परिस्थिती असताना पर्यटनाच्या क्षेत्रात आशेचा किरण दाखवणाऱ्या बातमीने पाकिस्तान सुखावला आहे. "कॉन्डे नास्ट ट्रॅव्हलर' या नियतकालिकाने "बेस्ट हॉलिडे डेस्टिनेशन' या श्रेणीत पाकिस्तानचे नाव वरच्या क्रमांकावर घेतले आहे. गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानमधील पर्यटकांची संख्या तब्बल 317 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. परदेशी पर्यटकांची संख्या तिपटीपेक्षा अधिक झाली आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या अंदाजानुसार, 2019 या वर्षात 14 लाख विदेशी पर्यटकांनी पाकिस्तानला भेट दिली. साहसी पर्यटनाच्या शौकिनांनी पाकिस्तानला जरूर भेट द्यावी, अशी शिफारस या "लाइफ स्टाइल' नियलकालिकाने केली आहे. या यादीत लेबानन, पनामा, क्रोएशिया, मोरोक्को आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथील काही "टुरिस्ट डेस्टिनेशन'चाही समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kishor jamkar writes blog about inflation in pakistan