अनुभवानुसार वाचन बदलतं...

किशोर कदम saptrang@esakal.com
Sunday, 10 January 2021

ग्रंथप्रभाव
पुस्तकांनी आयुष्य बदलतं. अशा विविध पुस्तकांमुळे वाचकाला नवनवे मार्ग सापडतात. आयुष्य घडवणाऱ्या अशाच पुस्तकांविषयीचं हे साप्ताहिक सदर

वाचनामुळं प्रेरणा मिळते, आपण बौद्धिकदृष्ट्या समृद्ध होतो, ही बाब खरी असली, तरी मुळात वाचनाची आवड असणं आवश्‍यक आहे. वाचन हे काही ठरवून केलं जाऊ शकत नाही किंवा चांगलं काम करण्यासाठी वाचन केलंच पाहिजे असंही नाही. मुळात वाचन ही एक अशी प्रक्रिया आहे, की ती आपोआप माणसामध्ये घडायला लागते. ती आपोआप आतमध्ये समृद्ध व्हावी लागते. आपल्या प्रयत्नानं ती समृद्ध करावी लागते. या गोष्टीसाठी मी वाचन करीन आणि ती गोष्ट मी मिळवीन असं मला आत्तापर्यंतच्या अनुभवावरून वाटत नाही.

वाचनाची सुरुवात होते तेव्हा तुमच्या वाट्याला जी पुस्तके येतात, ती तुमच्या पुढच्या वाचनाची दिशा ठरवतात. आपलं तेव्हा आयुष्य कसं जाणार आहे हे कळतं. मला वाटतं की वाचनाची सुरुवात भयकथा, गूढकथा, रहस्यकथा यापासून होते. ती पुस्तके वाचत असताना माणूस हळूहळू आपले आयुष्य जगत असतो आणि त्याचं वयदेखील वाढत असतं. तसा त्याचा अनुभवदेखील वाढत असतो. त्यानुसार त्याची पुस्तकं बदलत असतात. लेखक बदलत असतात. त्याच्या कविता बदलत असतात आणि कवीदेखील बदलत असतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हळूहळू सगळं बदलत जातं आणि अनुभवानुसार तो माणूस स्वतः किती समृद्ध होतोय, तो जगण्याबद्दल किती उत्सुक आहे, तो जगण्याबद्दल उत्सुक असेल तर त्याच्या वाचनाची दिशा तसंतशी ठरत जातं आणि वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं त्याच्या वाचनात येत जातात. मग त्यात भाषेचा अडथळा होत नाही. परकीय भाषांतील पुस्तकांचे अनुवादही तो शोधू लागतो. इंग्रजीतील पुस्तकंसुद्धा तो शोधतो. भारतीय इतर भाषांतील पुस्तकंही तो शोधू लागतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता वयाच्या एका टप्प्यावर वाचनाचा आनंद जेव्हा त्याला मिळायला लागतो तेव्हा त्या त्या भाषेतील प्रसिद्ध लेखक कोण आहेत, चांगले लेखन कुणाचे आहे, त्याकडे तो वळतो. हळूहळू स्वतः तो लेखक शोधतो. कवी शोधतो. जो जगण्यासाठी उत्सुक आहे, तो नंतर उत्तम वाचक बनतो. जो उत्सुक वाचक आहे, तो आपोआप  पुस्तके वाचणारी लोकं जोडत जातो. अशी माणसे त्याला आपोआप भेटतात. विविध प्रकारचे वाचक त्याच्या संपर्कात येतात. त्यांचे विविध विषय त्याच्यापर्यंत येतात. हळूहळू त्याचा परीघ वाढत जातो. 

ही पुस्तके वाचत असताना त्याच्या असं लक्षात येतं, की हा विषय आपला नाही. मग काही ठरावीक विषय त्याचे ठरून जातात. काही लोकांना फिक्‍शन वाचायला आवडते; तर काही लोकांना नॉनफिक्‍शन वाचायला आवडते; पण वाचनाची आवड मनात रुजते.

जे पुस्तके वाचत नाहीत, ते एकटे असताना काय विचार करीत असतील, ते जगत कसे असतील, असा प्रश्‍न मला पडतो. आता तुम्ही म्हणाल, की रस्त्यावरचा मजूर आहे तो काही वाचत नाही. मग तो समृद्ध आयुष्य जगत नाही का...? तर तो जगतो, पण त्याचा अनुभव वेगळा असतो आणि त्याला आलेला अनुभव त्याच्या परिघामध्ये वेगळा असतो. जे शिकलेले आहेत तरीही वाचन करत नाहीत, ते शिकले जगण्याचं साधन मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी. त्यांची पुस्तकांशी कधी मैत्री होऊ शकली नाही. अशा लोकांना आयुष्य आतल्या आत कसं उलगडत असेल, हे जाणून घेण्याची मला नेहमी खूप उत्सुकता वाटत आलेली आहे. 

जे लोक वाचत नाहीत ते मला आवडत नाहीत असे मी म्हणणार नाही, पण नवीन लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे वाचन किती आणि कसे आहे, हे मला त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लगेच समजते. मग अशा माणसांशी मी संवाद कमी साधतो किंवा शक्‍यतो टाळतो. अशी माणसे मला निरस वाटतात. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आपण म्हटले, की आता मला खूप वाचन करायचे आहे. आता मी निवृत्त झालो आहे आणि मला खूप वाचायचे आहे; तर असे काही होऊ शकत नाही. वाचनाची आवड ही ठरावीक वयापासूनच व्हावी लागते. मग ती आवड आपोआप विकसित होते. त्यामुळे मग समृद्ध होता येते.

माझ्यावर कोणत्याही लेखकाचा किंवा पुस्तकाचा प्रभाव नाही, कारण असे एकाचे नाव घेता येणार नाही. मला कुणी विचारलं, की तुमचा आवडता एक कवी सांगा, आवडता एक चित्रपट सांगा; तर तो मला सांगता येणार नाही. जो माणूस जगायला उत्सुक आहे, त्याला अनेक गोष्टी आवडत असतात. त्याच्या आयुष्यात अनेक आवडते लेखक आणि कवी असतात. अनेक आवडते चित्रकार असतात. अनेक आवडती पुस्तके असतात. अलीकडच्या काळात वाचनाची आवड कमी कमी होत चाललेली आहे आणि याला कारण आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे लोकांची वाचनातील एकाग्रता कुठे तरी कमी झाली आहे, परंतु ती एकाग्रता तसूभरही कमी न होऊ देता जो वाचन करेल तो खरा वाचक आणि आपल्यातला तो वाचक जागृत ठेवणं, हे आपल्या हातात आहे.
(शब्दांकन : संतोष भिंगार्डे)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kishor Kadam Writes about reading