संकटग्रस्त पाणवठे

पाणथळ ठिकाणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातील अनेक जलपर्णी किंवा वनस्पती या जलस्रोतांना प्रदूषित घटक शोषून शुद्ध ठेवण्याचे काम करतात.
संकटग्रस्त पाणवठे
Summary

पाणथळ ठिकाणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातील अनेक जलपर्णी किंवा वनस्पती या जलस्रोतांना प्रदूषित घटक शोषून शुद्ध ठेवण्याचे काम करतात.

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

समुद्र, वने, गवती माळरान आणि वाळवंटी अधिवासापेक्षाही पाणथळ जागा त्याहून महत्त्वाच्या असतात. त्या अधिवासांच्या हृदयस्थानी असतात; पण आज ही हृदयेच निकामी होत आहेत. त्यामुळे या प्रदेशांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाणथळ जागा म्हणजे जलस्रोतांनी जमिनीवर निर्माण केलेला पाणअधिवास! दलदल, तलाव, समुद्राचे किनारे, समुद्राच्या खाऱ्या पाण्याने भरतीच्या वेळी जमिनीवरील खोलगट प्रदेशांत शिरून बळकावलेली ठिकाणे, नद्यांच्या पुराने सखल भागात निर्माण केलेली पाणथळे आदी सर्व जागांचा यात समावेश होतो. गोड्या व खाऱ्या पाण्याचे लहान-मोठ्या आकाराचे असंख्य तलाव निर्माण झालेले असतात.

सागरी किनारे व नद्यांच्या अंगाखांद्यावर अशी पाणथळ ठिकाणे निर्माण झालेली पाहायला मिळतात. याशिवाय पर्वतीय प्रदेशांमध्येही भूजलाच्या साह्याने अनेक पाणथळ जागा किंवा जलस्रोत निर्माण झालेले पाहायला मिळतात. या सर्व जलस्रोतांच्या अंगाखांद्यावर जलपर्णी वनस्पती, नाना प्रकारचे गवत, पाण वनस्पती आणि झुडपे उगवतात. या नैसर्गिक पाणथळ ठिकाणांमध्ये कृत्रिमरीत्या बांधलेले तलाव, जमिनीवर खोदलेले कालवे, पाण्याचे मोठे पाट, मिठागरे, भातशेती, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेतीसाठी बांधलेले तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.

पाणथळ ठिकाणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातील अनेक जलपर्णी किंवा वनस्पती या जलस्रोतांना प्रदूषित घटक शोषून शुद्ध ठेवण्याचे काम करतात. कांदळवनांतील वनस्पती तर समुद्री किनाऱ्यांच्या संरक्षणात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भातशेती सर्वात मोठी पाणथळ क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. समुद्र किनाऱ्यानजीक असणारी मिठागरे पाणपक्ष्यांसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत.

पाणथळ जमिनी या पृथ्वीवरील परिसंस्थेत माणसाच्या फुप्फुसांप्रमाणे भूमिका वठवितात. ती परिसंस्थेतील प्रदूषके स्वच्छ करतात, शिवाय परिसंस्थेत जीव ओतणारे प्रदेश अनेक पक्षी, प्राणी, कीटकांना जगविण्याचे काम करतात. जलाशय भूगर्भातील जलस्तर वाढवून भूजल पुनर्भरणाचे काम करतात. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. पृथ्वीवर मानवी जीवन व वन्यजीवन फुलविण्याचे पूर्ण काम ही जलाशये किंवा पाणथळ ठिकाणे करीत असतात.

महाराष्ट्रात दख्खनच्या पठारावरील नद्या-उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासची पाणथळ ठिकाणे आज संपन्न परिसंस्था म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात उदाहरणे द्यायची झाल्यास विदर्भातील लोणारचे प्राचीन सरोवर, भंडारा जिल्ह्यातील नवेगावचा तलाव, उजनी जलाशय, नंदूर मध्यमेश्वर जलाशय, भिगवण, औरंगाबादमधील जायकवाडी तलाव, जळगाव जिल्ह्यातील हातनूर जलाशय अशी भलीमोठी लांब यादी मांडता येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा महत्त्वपूर्ण जलाशय दाखवता येतील.

अशा या पाणथळ जागांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता भारतीय राज्यघटना, भारतीय पर्यावरणीय कायदे व देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. भारतातील काही महत्त्वपूर्ण पाणथळ जागांना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारे ‘महत्त्वपूर्ण पक्षी क्षेत्र’ म्हणून मानांकित केले आहे. भारत सरकारने देशातील अशा सर्व जलस्रोत, जलाशय किंवा पाणथळ जागांची यादी घोषित करून त्यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियमन व्यवस्था तयार केली आहे. याशिवाय रामसर येथे झालेल्या करारानुसार जगातील महत्त्वपूर्ण जलस्रोतांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येतो. एकदा तो मिळाला की जगभरातील निसर्ग पर्यटक तेथे भेटी देतात. यातून पर्यटनाद्वारे महसूल मिळून त्या पाणथळ जागेच्या संवर्धनासाठी, तसेच देखरेखीसाठी महसूल किंवा निधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतो.

नेदरलँड्सस्थित ‘वेटलँड्स इंटरनॅशनल’ या जागतिक संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात एक गंभीर बाब उजेडात आणली आहे. अशा जगभर असलेल्या पाणथळ जागांच्या संख्येत गेल्या दशकभरात मोठी वाढ झाली असली तरीही या पाणथळ जागांच्या आकारात व दर्जामध्ये मात्र घट किंवा ऱ्हास झाल्याचे लक्षात आले आहे. ‘वेटलँड्स इंटरनॅशनल’ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गेल्या ३० वर्षांत भारतातील अनेक पाणथळ जागांनी त्यांचे नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे. त्यामुळे येथील पाणथळ जैविक परिसंस्था धोक्यात आली आहे. झपाट्याने होणारे नागरीकरण, पाणथळ प्रदेश आणि त्यांच्या परिसंस्थेबद्दल लागणाऱ्या ज्ञानाचा अभाव व विकास योजनांमध्ये त्यांना मिळणारे दुय्यम स्थान यामुळे या पाणथळ जागा धोक्यात आल्याचे म्हटले आहे. भारतातील या पाणथळ जागा ज्या वेगाने नाहीशा होत आहेत, ते पाहता ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे.

भारतात सध्या २.२ हेक्टरपेक्षा अधिक आकाराची सुमारे २.२ लाख पाणथळ क्षेत्रे आहेत. याव्यतिरिक्त ५.५ लाख लहान पाणथळ जागाही आहेत. यातील जवळपास ६० हजार मोठी पाणथळ क्षेत्रे ही संरक्षित वनक्षेत्रांत असून ही क्षेत्रे सुरक्षित मानली जाऊ शकतात. त्यापैकी उर्वरित पाणथळ जागांपैकी १५० ते २०० पाणथळ जागांच्या संवर्धनाचे कार्यही हाती घेण्यात आले आहे. श्रीनगरमधील दल सरोवर आणि पंजाबमधील हरीके पाणथळ यांसारख्या काही महत्त्वपूर्ण पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत; परंतु इतर पाणथळ जागांच्या नशिबी मात्र शासकीय अनास्था आणि दुर्लक्ष आले आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत भारतातील दर पाच पाणथळ ठिकाणांपैकी दोन पाणथळ जागांनी आपले नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे, तर तब्बल ४० टक्के जलस्रोतांमधील पाणी येथील जलचरांसाठी चक्क घातक झाले आहे. दिल्लीजवळील नजफगढ तलाव आणि चेन्नईतील पल्लिकरणाई जलस्रोत तर वेगाने कोरडे झाले आहेत. हीच परिस्थिती देशातील बहुतांश पाणवठ्यांची झाली आहे.

मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, गृहनिर्माण योजनांचा विस्तार आणि पर्यायी धोरणांचा अभाव यामुळे पाणथळी कोरड्या पडत आहेत. यातील अनेक पाणथळ जागांचा तर कचरा विल्हेवाटीची किंवा सांडपाणी विसर्जनाची ठिकाणे म्हणून वापर केला जातो. अनेक ठिकाणी तर या पाणथळ जागांना जन्म देणाऱ्या ओढ्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण केले गेले, अथवा या ओढ्यांचा मार्ग बदलला गेला. या जलस्रोतांना जन्म देणारे अनेक ओढे भूगर्भातून निर्माण झाले आहेत; परंतु भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने व भूजल पुनर्भरणाचे काम न झाल्याने पर्यायाने या पाणथळ जागांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

निदान या अहवालाने तरी आपण खडबडून जागे होण्याची गरज आहे. या जलस्रोत किंवा पाणथळ जागांना धोका पोहोचविणाऱ्या सर्व बाबींवर त्वरित निर्बंध लावणे आवश्यक आहे. पायाभूत विकास, गृहनिर्माण योजना करताना, तसेच पाण्याचा उपसा करताना प्रत्येक प्रदेशातील पाणथळ जागांना नख लागणार नाही, हे पाहणे आता आवश्यक झाले आहे. सोबतच आमचे सांडपाणी किंवा कचरा या पाणथळ क्षेत्रांमध्ये जाणार नाही याची खबरदारी प्रत्येक ग्रामपंचायत, नगर परिषद व महापालिकेने काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी भारतातील पूर्वीच्या ब्रिटिश व्यवस्थापनापासून काही धडे घेणे आवश्यक आहे. ते करणे लाजिरवाणे वाटत असेल तर स्वत:हून पाणथळ व्यवस्थापनाच्या काही नावीन्यपूर्ण गोष्टी अमलात आणल्या जाऊ शकतात, पण काहीच न करता आमचे नैसर्गिक, तसेच कृत्रिम जलस्रोत नासविण्याचे काम होत असताना आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेत असू तर आपल्यापेक्षा ब्रिटिश बरे होते, असे म्हणण्याची पाळी आपल्यावर येऊ शकते, हे ध्यानात घ्यायला हवे.

(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ, तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com