मोरपिसांची काळी बाजू

मोरपिसांचा मोरपंखी रंग सर्वांनाच माहीत आहे; पण या मोरपिसांची दुसरी बाजू मात्र काळीकुट्ट आहे. केवळ मोरपिसे कमाविण्यासाठी मोरांची हत्यासुद्धा केली जाते.
peacock feather
peacock feathersakal
Summary

मोरपिसांचा मोरपंखी रंग सर्वांनाच माहीत आहे; पण या मोरपिसांची दुसरी बाजू मात्र काळीकुट्ट आहे. केवळ मोरपिसे कमाविण्यासाठी मोरांची हत्यासुद्धा केली जाते.

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

मोरपिसांचा मोरपंखी रंग सर्वांनाच माहीत आहे; पण या मोरपिसांची दुसरी बाजू मात्र काळीकुट्ट आहे. केवळ मोरपिसे कमाविण्यासाठी मोरांची हत्यासुद्धा केली जाते. होय, भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याचे अस्तित्व त्याच्या या पिसांमुळेच धोक्यात येऊ पाहत आहे.

स्वतःचेच नाव ल्यालेला एकमेव रंग म्हणजे मोरपंखी. आपल्या प्रत्येकाच्या ‘मनमोराचा’ पिसारा फुलविणारी मोरपिसेच मोरांच्या हत्येचे कारण बनतेय. लवकर पावले उचलली नाहीत, तर मोर फक्त दिल्ली आणि राजस्थानातील शहरांमध्येच पाहायला मिळतील. भारतीय जंगलांमधून मात्र हा देखणा पक्षी नामशेष होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे.

नर आणि मादीसाठी दोन स्वतंत्र नावे मिरविणारा हा मनोहारी पक्षी. नरास ‘मोर’ आणि मादीस ‘लांडोर’ अशी स्वतंत्र नावे आहेत. या दोहोंमध्ये जास्त प्रसिद्धी मिळते ती नराला. त्याचे कारण म्हणजे त्याचा लांबसडक पिसारा आणि त्यातील आकर्षक मोरपंख. मोर हा तसा पारिवारिक पक्षी आहे. एका कळपात एक नर, दोन ते तीन माद्या आणि त्यांची पिल्ले असतात. कळपातील नर मोर, मादी लांडोराला आकर्षित करण्यासाठी आपला पिसारा फुलवितो व त्यास मादीच्या दिशेने थरथर करीत वळवितो. हे दृश्य पाहून तो नाचत असल्याचे वाटते.

भारतात वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ नुसार मोरांची हत्या करणे हा गुन्हा आहे. मोर हा या कायद्याच्या परिशिष्ट एकमध्ये असल्याने त्याला मारल्यास सात वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो; परंतु याच कायद्यानुसार मोरपिसे बाळगण्यावर मात्र कुठलीही बंदी नाही. याचे कारण म्हणजे दर वर्षी फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात प्रजनन काळ संपला की पावसाळ्याच्या तोंडावर मोर आपली पिसे गाळतात. याला मोल्टिंग असेही म्हणतात. अशी गळलेली मोरपिसे जंगलामध्ये एकगठ्ठा सापडणे कठीण असली, तरी गावांमध्ये, शहरांमध्ये बागडणाऱ्या मोरांची विखुरलेली पिसे सहज उपलब्ध होतात. फक्त प्रजननास तयार झालेल्या नरांचीच पिसे गळतात आणि तीही वर्षातून एकदाच! त्यामुळे शहरी मोरांपासून उपलब्ध होणाऱ्या मोरपिसांचे प्रमाण अत्यल्प असते. अशी गळून जमविलेली मोरपिसे बाजारपेठेत उत्पादने बनविण्यास पुरेशी पडत नाहीत. यावरून बाजारपेठेत येणारी मोरपिसांची विभिन्न उत्पादने बघता त्यासाठी मोरांची हत्या करण्यात येते, हे सिद्ध होते. अशा उत्पादनांना देशांतर्गत तसेच विदेशात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढत्या मागणीमुळे भारतीय मोरांची सर्रास हत्या होत आहे.

आपल्याकडे घरा-घरात मोरपिसे ठेवणे हे शुभ मानले जाते. आयुर्वेदामध्ये तर मोरपिसांना जाळून मयूर पिच्छा मशी (मशी म्हणजे जाळून तयार केलेली राख) बनविण्यात येते. आता बऱ्याच गाव-शहरातून मोर दिसेनासे झाले. त्यामुळे स्थानिक वैद्यांना मशी बनविण्यास मोरपिसे मिळणे कठीण झाले आहे.

भारतात मोरपिसांच्या अवैध व्यापारावर बंदी असली, तरीही कायद्याने मोरांची पिसे बाळगण्यावर कुठलीही बंदी नाही. कायद्यामधील नेमकी ही पळवाट लक्षात घेऊन भारतात मोरपिसांचा काळाबाजार सुरू आहे. मोरपिसांची विक्री करताना कुणाला पकडलेच तर तो विक्री करीत नसल्याचा बनाव आणतो. अशा वेळी वनाधिकाऱ्यांनी त्यावर वन्यप्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ४४ व ५७ अंतर्गत कार्यवाही करून, मोठ्या प्रमाणावर मोरपिसे त्याने कुठून आणली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यास सांगायला हवे. यातील फार कमी लोक कलम ४९-अ (ब) मध्ये नमूद केल्याप्रमाणे धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कारणासाठी मोरपिसे बाळगून असतात; पण वनविभागाकडून कुणावरही कार्यवाही होत नसल्याने मोरपिसांपासून बनविलेल्या अनेक देखण्या वस्तू परवाना नसताना बाजारात दिसतात.

विश्व प्रकृती निधी भारततर्फे १९९१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार स्वातंत्र्यानंतर देशातील मोरांची संख्या ५० टक्क्यांनी घटल्याचे बोलले जाते. काही वर्षांपूर्वी बांगलादेशमधून आलेली विद्यार्थिनी मेळघाटमध्ये मोर पाहून नाचायला लागली. मी तिला विचारले तेव्हा तिने बांगलादेशमधून मोर नामशेष झाल्याने ती पहिल्यांदाच मोर पाहत असल्याचे म्हणाली. भारतातून मोर नामशेष होणारच नाही, या भ्रमात आपण राहू नये, हे सांगणारा हा प्रसंग आहे.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी! मोरांच्या हत्या कशा होतात हे पाहिल्यास धक्कादायक माहिती हाती येते. संरक्षित वनक्षेत्राशिवाय अगदी ग्रामीण भागातही काही जंगल पट्ट्यांमध्ये किंवा माळरानांनजीक मोर रात्रीच्या निवाऱ्याला असतात. प्रजनन काळात मादी लांडोर कुणाचाही वावर नाही, अशा ठिकाणी जमिनीवर घरटे करते. ८ ते १२ अंडी घालते. कोंबडीप्रमाणे ती २८ ते ३० दिवसांपर्यंत उबविते आणि मग अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. भटक्या कुत्र्यांचा जास्त त्रास नसेल, तर अशा शेतशिवारांमध्ये या मोरांची संख्या वाढते. मोरांची संख्या बऱ्यापैकी वाढली की काही व्यापाऱ्यांची नजर अशा ठिकाणावर पडते आणि मग ‘शेतकऱ्यांच्या पिकांना त्रास होतो’ या सबबीखाली मोरांना विषबाधेतून शांतपणे मारण्याचा घाट रचला जातो. त्यासाठी कृषी केंद्रात मिळणाऱ्या विषारी औषधांचा व धान्याचा वापर केला जातो. असे विषयुक्त धान्य टाकून मोठ्या संख्येत मोरांचा खात्मा कुठलाही आवाज न करता केला जातो. यानंतर मेलेल्या मोरांची पिसे जमा करून ती विकल्या जातात. मागील काही वर्षांमध्ये देशभर अशा अनेक घटना वनविभागाच्या नजरेस आलेल्या आहेत; परंतु कुणालाही कठोर शिक्षा झाल्याची उदाहरणे नाहीत.

सप्टेंबर २०१९ मध्ये हाँगकाँगच्या एका प्रवाशाजवळून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४९ किलो मोरपिसे (१६० मोरांचे) आढळून आली होती. यापूर्वीही मलेशिया आणि सिंगापूरला जाणारे असे पार्सल चेन्नई विमानतळावर पकडण्यात आले होते. मार्च २०२१ मध्ये तर कस्टम विभागाकडून चीनमध्ये जाणारी २,५६५ किलो मोरपिसे दिल्लीनजीक तुघलकाबाद येथील कंटेनर डेपोमध्ये जप्त करण्यात आले होते. यावरून मोरपिसांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची कल्पना येऊ शकेल.

(लेखक ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com