Frog
FrogSakal

बेडूक अभी जिंदा है!

पाऊस आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला. पावसाच्या आगमनाने सारी जीवसृष्टी चैतन्यमय होते. त्याची प्रचीती बेडकांच्या आवाजाने येते.

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

पाऊस आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला. पावसाच्या आगमनाने सारी जीवसृष्टी चैतन्यमय होते. त्याची प्रचीती बेडकांच्या आवाजाने येते. पावसाच्या आगमनासोबत बेडकांचे डराव डराव सुरू झाल्याने महाराष्ट्रात अजूनही बेडूक जिवंत आहेत याची खात्री पटते.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने आता जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे; पण पावसाच्या या आगमनामुळे निसर्गातील आणखी एक जीव सुखावला आहे. तो म्हणजे बेडूक! पावसामुळे सारी जीवसृष्टी चैतन्यमय होते; पण त्यातही कुणी अधिक आनंदी होत असेल तर तो म्हणजे बेडूक.

पावसाळ्यात बेडकांचे आवाज ऐकले की भारतात अद्यापही बेडूक जिवंत आहेत, याची प्रचीती येते. अर्थात, काहींना यात काही विशेष वाटणार नाही. कारण आपण काही गोष्टी गृहीतच धरल्या आहेत. पाऊस आला की बेडूक दिसणारच वगैरे, वगैरे; पण असे काही नाही. युरोपीय देशांकडे पाहिले की भारतात पावसाळ्यात दिसणारे बेडूक किती विशेष आहेत हे लक्षात येईल.

इंग्लंडसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये आज बेडूक दिसेनासे झालेत, पण भारतात मात्र अजूनही बेडूक दिसतात. त्यासाठी देशातील शहरीकरण, मानवी वस्त्यांचे नियोजन, वन समृद्धी, जैवविविधता संवर्धन या सर्व गोष्टी पाळणे आवश्यक असते. ते अनेक देशांमध्ये होत नाही. त्यात कीटकनाशकांचा झालेला अतिवापर. मग त्या प्रदूषित मातीत बेडूक कसे जगणार?

त्यामुळेच पावसाच्या आगमनासोबत बेडकांचे डराव डराव सुरू झाल्याने महाराष्ट्रात अजूनही बेडूक जिवंत आहेत याची प्रचीती येते, ही आपल्यासाठी महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आम्ही आता शहरी आवाज कमी करावा, निदान काही दिवस तरी निसर्गातील या अनोख्या प्राण्याचे आवाज ऐकावेत.

पहिला पाऊस आला की महाराष्ट्रातील मेळघाटसह विदर्भातील जंगलांमध्ये असंख्य बेडूक पाहायला मिळतात. त्यातील अनेक रस्त्यावर येऊन वाहनांच्या चाकाखाली चेपले जातात. यातून जे वाचतात, ते पुढची पिढी घडवतात. तुम्हा-आम्हाला आपले आवाज ऐकवण्यासाठी!

अनेक मुंबईकर आता सह्याद्रीमध्ये जाऊन पावसाची मजा लुटणार! काही निसर्गप्रेमी तर बेडूक दर्शनासाठी थेट अंबोली घाटात जातात. अंबोली तालुक्यात विशेषतः उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असल्याने तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर परिसरातही या बेडकाची नोंद माजी वनाधिकारी सुभाष पुराणिक यांनी केली आहे.

पाऊस पडला की मी सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाटमध्ये जातो. येथे इंडियन बुल फ्रॉग हा सोनेरी पिवळाधम्म रंगाचा ‘सोन्या बेडूक’ पाहायला मिळतो. या वेळी मेळघटातील गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा, नद्या, तलाव, ओढे, डबकी यांसारख्या ठिकाणी सर्वत्र ‘डराव डराव’ असा कल्लोळ मजलेला असतो.

सामान्यतः भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या प्रदेशांत आढळणारा हा बेडूक इतर बेडकांच्या तुलनेने दुप्पट किंवा तिप्पट मोठा असून, त्यावरूनच त्याला इंग्रजीत ‘बुलफ्रॉग’ हे नाव मिळाले आहे. त्याच्या सोनेरी रंगामुळे त्याला मराठीत सोन्या बेडूक म्हणतात; पण या रंगामुळेच आज त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर अवैध व्यापार होतो.

सह्याद्री असो की सातपुडा पर्वत, यात बेडकांच्या अनेक प्रजाती वावरताना दिसतात. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलते ठेवतात. म्हणूनच ते अतिशय थंड किंवा अतिउष्ण तापमान सहन करू शकत नाहीत.

मग अशा प्रतिकूल वातावरणात तग धरण्यासाठी ते अतिशय थंड हवामानात जमिनीत स्वतःला गाडून घेऊन दीर्घ समाधी घेतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करून शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात; तर बेडकांच्या काही प्रजाती उन्हाळ्यात स्वतःला जमिनीत गाडून घेतात.

नर बेडकाचा आवाज घोगरा आणि मोठा असतो. तो मादीला आकृष्ट करण्यासाठी आवाज काढतो. मादी बेडूक मात्र क्वचितच आणि हळू आवाज काढते; तर पावसाळ्यात होणारा कीटकांचा संचार त्यांच्या पथ्यावर पडतो. ते संपूर्ण मांसाहारी असल्याने मग या कीटकांचा फडशा पडतात.

अलीकडच्या काळात सर्वच प्रजातीच्या बेडकांच्या तंगड्यांची अवैधरीत्या परदेशी निर्यात करण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या बेडकांची हत्या होते. त्यामुळे भारतातील अनेक भागांमध्ये बेडकांचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झालेली आहे.

पावसाळ्यात शीतनिद्रा समाधी संपवून बेडूक जेव्हा प्रजननासाठी बाहेर येतात, तेव्हा अशा मोठ्या बेडकांना प्रजननाआधीच मारले जाते; तर काही बेडूक हे शेतात फवारलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रभावित होतात. असे प्रदूषित झालेले पाणी ते त्वचेद्वारे श्वसनक्रियेसाठी शोषून घेतात आणि मग बळी पडतात.

निसर्गचक्रात अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या या बेडकांना संरक्षण मिळावे म्हणून त्यांना वन्यप्राणी संरक्षण कायद्यात स्थान देण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर या कायद्यानुसार बेडकांना पकडण्यावर व मारून खाण्यावर बंदी घातली गेली आहे. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांसाठी कायद्याने पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षे तुरुंगवास अशा कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पूर्वी महाविद्यालयामधील प्रयोग शाळांमध्ये चिरफाड करण्यासाठी या महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर बेडूक खरेदी केले जायचे, परंतु वन्यप्राणी संरक्षण कायदा कठोर होताच बेडकांची महाविद्यालयांमधील खरेदी आता बंद झाली आहे. त्यामुळे बेडकांना बरे दिवस आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. तरीही या बेडकांची खाण्यासाठी विक्री व हत्या केली जाते.

म्हणूनच भारतातून बेडूक संपले तर... असा विचार क्षणभर करून बघा! पावसात आनंद शोधणाऱ्या माणसासाठी तो अतिशय वेदनादायी आणि नीरस क्षण असेल. त्यामुळे भारतातील बेडूक वाचला पाहिजे यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

(लेखक तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com