समुद्रच जेव्हा किनारा खातो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sea beach

समुद्राचा विषय काढला तेव्हा मध्यमवयीन मालक म्हणाले, आमची आई या समुद्राला सतत शिव्या वाहायची. कारण त्याने आमची सर्व जमीन खाल्ली आहे. हे ऐकून मी अवाक् झालो.

समुद्रच जेव्हा किनारा खातो!

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

समुद्राचा विषय काढला तेव्हा मध्यमवयीन मालक म्हणाले, आमची आई या समुद्राला सतत शिव्या वाहायची. कारण त्याने आमची सर्व जमीन खाल्ली आहे. हे ऐकून मी अवाक् झालो. त्याचा पुरावा विचारताच त्यांनी पुराव्यांची जंत्रीच काढली. ते म्हणाले, गेल्या महिन्यात येथील एका व्यक्तीने महसूल विभागाकडे त्याच्या जमिनीच्या मोजणीचा अर्ज केला. त्यांच्या नकाशानुसार जमिनीची मोजणी करून सीमेच्या खुंट्या ठोकण्यात आल्या. त्यातील काही खुंट्या चक्क समुद्रात ठोकाव्या लागल्या.

मराठीतील ‘चक्क कुंपणानेच शेत खावे’ या म्हणीच्या अगदी विपरीत समुद्राबद्दल घडले आहे. आपला समुद्रच आपला सागर किनारा खातो आहे. नुकतेच कोकणातील भोगवे बीचवर गेल्यावर याचा प्रत्यय आला आणि हे किती भयानक आहे, हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. समुद्र किनाऱ्यावरील त्या रात्री मला झोपच लागली नाही. सध्या संपूर्ण जगावर हवामान बदलाचे वादळ घोंघावत आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे, फयान, त्सुनामीसारखी अनेक नवनवीन वादळे येणे, उष्णतेच्या लाटा येणे, ढगफुटी होणे यांसारख्या गोष्टी आता प्रत्यक्ष घडताना दिसत आहेत. या सर्व घटनांचा एकूण परिणाम आपल्या समुद्रकिनाऱ्यांवर होत आहे. समुद्राची पातळी वाढल्याने समुद्र किनाऱ्यावर अनेक बदल घडवून आणले आहे. ते केवळ उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये थोडे डोकावून पहिले, तर गेल्या पाचदहा वर्षांमध्ये समुद्र किनाऱ्यावर काय बदल झाले याबाबत भयावह वास्तव समोर येईल.

खरे तर समुद्र किनारे हे जैवविविधतेने संपन्न असतात. अनेक पारिस्थितिकी आणि पर्यावरणीय घटनांचे ते साक्षीदार असतात. समुद्री जीवांचे तसेच समुद्री पक्ष्यांचे उत्तम अधिवास याच किनाऱ्यांवर आढळतात. अशा समुद्र किनाऱ्यांनजीक वसलेल्या गावांसाठीही हे सागर किनारे आश्रयदाते असतात. या भागात मुळातच शेतजमिनींची कमतरता असल्याने या गावांसाठी हे किनारेच शेती असतात. या समुद्र किनाऱ्यांवर या गावांचा उदरनिर्वाह चालतो. कुठे किनाऱ्यावरील मिठागरे त्यांना रोजगार पुरवतात, तर कुठे खेकडे, झिंगे आणि मासे त्यांची उपजीविका बनतात.

समुद्री जीवांच्या अभ्यास प्रकल्पाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली नजीकच्या भोगवे बीचवर जाण्याचा योग आला. भोगवे किनाऱ्यावर पोहोचता पोहोचता किनाऱ्यालगतच्या डोंगरावरून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. समोर समुद्री लाटांचे आवाज, अस्ताला जाणारा सूर्य आणि किनाऱ्यावर आवरते घेणारे अगदी मोजके पर्यटक यामुळे भोगवेचा समुद्र किनारा प्रेमात पडावा असाच होता. सायंकाळ झाली तसे येथूनच जवळ असणाऱ्या वेंगुर्ला, मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग आणि तारकर्ली या ठिकाणांवरील दिवे स्पष्ट दिसत होते. त्याच्या आसपासच निवती, तळाशी तोंडवली, आचरा, चिवला, खावणे आणि सागरेश्वर अशी समुद्र किनाऱ्यावरील निसर्गसुंदर अप्रतिम ठिकाणे आहेत.

भोगवे किनाऱ्यावरील आमच्या एका मित्राच्या नातेवाईकाच्या एका घरगुती निवासामध्ये (होम स्टे) सामान टाकले आणि घराच्या अंगणाच्या अगदी समोर पसरलेल्या समुद्राच्या लाटा बघत त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. आमचे आई-बाबा त्यांच्या वयाच्या विशीत जेव्हा येथे आले, तेव्हापासूनची या किनाऱ्याची परिस्थिती आमच्या परिवारास चांगली माहिती आहे. कोरोनाच्या कालखंडात म्हातारी आई गेली. समुद्राचा विषय काढला तसे मध्यमवयीन मालक म्हणाले, आमची आई या समुद्राला सतत शिव्या वाहायची. कारण त्याने आमची सर्व जमीन खाल्ली आहे. हे ऐकून मी अवाक् झालो. त्याचा पुरावा विचारताच त्यांनी पुराव्यांची जंत्रीच काढली. ते म्हणाले, गेल्या महिन्यात येथील एका व्यक्तीने महसूल विभागाकडे त्याच्या जमिनीच्या मोजणीचा अर्ज केला. महसूल विभागाचे अधिकारी आले. त्यांच्या नकाशानुसार जमिनीची मोजणी करून सीमेच्या खुंट्या ठोकण्यात आल्या. त्यातील काही खुंट्या चक्क समुद्रात ठोकाव्या लागल्या. आमची नारळाची बागही अशीच समुद्राच्या पाण्यात गडप झाली आहे.

एवढेच काय, तर इकडे दरवर्षी समुद्र किनाऱ्याचे रूप बदलते आहे. तारकर्ली आणि भोगवे यांच्या मध्ये पूर्वी खाडी नव्हती. आता तिथे खाडी तयार झाली आहे. सन २००४ मध्ये त्सुनामीमध्ये काय परिस्थिती होती, असे विचारल्यावर त्यांनी वादळाचा वेग खूप होता, समुद्राच्या लाटा आमच्या अंगणाच्या आत आल्या नाहीत, पण तारकर्ली नदी देवबागजवळ समुद्रात मिळते तेथे मात्र नदीपात्रात एक बेट तयार झाले आहे. आज येथे अनेक पर्यटक बोटीने जातात, पण पूर्वीपेक्षा आता या सततच्या येणाऱ्या वादळांनी भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मी केवळ याची कल्पना करू शकत होतो. पुण्याचे आमचे दोन पक्षी अभ्यासक त्सुनामीदरम्यान अंदमान बेटावर गेले असता लाटांमध्ये समुद्राच्या पोटात सामावून गेले. तेव्हापासून समुद्र किनारे मला असुरक्षित वाटू लागले. रात्री खोलीत झोपायला गेलो, पण रात्रभर समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकत राहिलो. या गावांचे संपूर्ण जीवन या समुद्रावर अवलंबून आहे आणि तो समुद्रच त्याच्या किनाऱ्यांना असा गिळंकृत करत आहे. समुद्र किनाऱ्यावर जगणाऱ्यांसाठी हे किती भयावह आहे, याची कल्पनाच न केलेली बरी.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही समुद्र किनाऱ्यावर पायी फिरून किनाऱ्यावर झालेले बदल स्वतः पाहिले. माणसांनी अर्पण केलेले नारळ किनाऱ्यावर ठिकठिकाणी पडले होते. ‘समुद्र स्वतःकडे काहीच ठेवत नाही. तुम्ही जे द्याल ते तो परत तुम्हाला देतो’, असा माझा मित्र बोलून गेला. तेवढ्यात किनाऱ्यावर असेच लाटांसोबत वाहत आलेले प्लास्टिक वेचणारा गृहस्थ दिसला. मला या स्वच्छतादूताचे आश्चर्य वाटले. तेव्हा येथे वसलेल्या काही खासगी रिसॉर्टमालकांनी किनारा (बीच) साफ राहावा म्हणून त्याला कामाला ठेवल्याचे मित्राने सांगितले. समुद्राला नारळ अर्पण करणारी माणसे त्याला कचरा, प्लास्टिक का बरे देत असतील?

आमच्या धोक्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांच्या या जागतिक समस्येचे मूळ म्हणजे वातावरणातील हरितवायूंच्या प्रमाणात आहे. वातावरणामध्ये हरितवायूंच्या प्रमाणात व त्यातही एकट्या कार्बनच्या (३९० पीपीएम) प्रमाणात वाढ झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढल्याने समुद्र किनारी असलेली अनेक शहरे, देश व बेटे अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. आता यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी भारतासह सर्व जग एकत्र येऊन नवनवीन धोरणे आधुनिक हिरव्या (?) तंत्रज्ञानाचा वापर करून राबवताना दिसत आहेत. वाढलेले हे कार्बनचे प्रमाण ३५० पीपीएमवर आणण्यासाठी वातावरणामध्ये कार्बनचे (हरित वायूंचे) उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण आणणे व वातावरणात असलेल्या कार्बनला शोषून घेणारे वृक्षाच्छादन वाढवणे या दोन्ही गोष्टी साध्य करणे आवश्यक आहे.

भारतात ऊर्जाक्षेत्र हे प्रामुख्याने ७१ टक्के कार्बन उत्सर्जन करते. त्याखालोखाल कृषिक्षेत्र १८ टक्के, उद्योग क्षेत्र ८ टक्के आणि टाकावू कचऱ्यामाधून ३ टक्के कार्बनचे उत्सर्जन होते. पेट्रोल- डिझेलसारख्या तेलांच्या वापरातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित केला जातो. त्यात भारत देश ७८ टक्के क्रूड तेल आयात करतो. कोळसा जाळून वीजनिर्मिती केल्यामुळेही सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होते. त्यासाठी अक्षय्य ऊर्जा हा पर्याय अवलंबला जातोय. दुसरीकडे वनांच्या कटाईमुळे १७ टक्के प्रत्यक्ष कार्बन उत्सर्जन होते. सोबतच वातावरणातील कार्बन शोषून घेणारा हा महत्त्वपूर्ण स्रोतच नष्ट होतो. त्यामुळे वनांचा ऱ्हास व वनक्षेत्रामध्ये होणारी घट तातडीने थांबवणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांचे संरक्षण करणे तसेच ती वाढवणे अत्यंत आवश्यक झाले आहे; अन्यथा समुद्र किनाऱ्यावरील बांधवांचे जगणे आम्ही आणखी कठीण करणार आहोत.

​(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

टॅग्स :beachSeasaptarang