सागरी पक्षी

सध्या मुंबईत ‘समुद्री पक्षी’ यावर एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सुरू आहे.
Sea Birds
Sea Birdssakal

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

सध्या मुंबईत ‘समुद्री पक्षी’ यावर एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सुरू आहे. समुद्री पक्ष्यांना आवश्यक असणारे अधिवास, त्यांना हवे असणारे थांबे, प्रजननासाठी आवश्यक जागा, समुद्री अधिवासांदरम्यान प्रवासामध्ये येणारे अडथळे या सर्व विषयांवर यानिमित्ताने चर्चा केली जात आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही पक्षी अभ्यास व पक्षी संशोधनाच्या क्षेत्रात मागील १४० वर्षांपासून कार्यरत भारतातील सर्वांत प्राचीन संस्था आहे. या संस्थेने पक्षीशास्त्राबरोबरच निसर्गातील वन्यप्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी अशा सर्वच अंगांचा अगदी बारकाईने अभ्यास केला आहे.

बीएनएचएस व बर्डलाईफ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने बीएनएचएसच्या मुंबईस्थित मुख्यालयात सध्या हिंदी महासागरातील (अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर) समुद्री पक्ष्यांवर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत ३४ प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि १७ ऑनलाईन सहभागी झाले आहेत.

मागील महिन्यात नवी दिल्ली येथे मध्य आशिया खंडातील ‘प्रवासी पक्षी’ (सेंट्रल एशियन फ्लायवे) या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. भारत, बांगला देश, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, मंगोलिया, इंग्लंड आदी देशांमधील अधिकारी आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे भारताकडे आयोजक पद असल्याने भारत या संपूर्ण उपक्रमात अग्रस्थानी होता.

या परिषदेपाठोपाठ मुंबईत ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेत समुद्री पक्षी, त्यांचे महत्त्वाचे अधिवास आणि हिंद महासागरातील समुद्री पक्ष्यांच्या हालचाली व त्यांचे अधिवास अशा महत्त्वपूर्ण विषयांवर मंथन होत आहे. बीएनएचएसचा मागील १४० वर्षांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. तसेच संस्थेच्या पक्षी शास्त्रज्ञांचे मागील दोन दशकांतील मध्य आशियाई उड्डाणमार्ग (सेंट्रल एशियन फ्लायवे) (CAF) याविषयीचे काम जागतिक स्तरावर नोंद घेण्यासारखे आहे.

या कार्यशाळेत बर्डलाईफ इंटरनॅशनल यूकेच्या डॉ. टॅमी डेव्हिस यांच्यासह बीएनएचएसचे डॉ. बालाचंद्रन आणि डॉ. आसद रहमानी, एनसीएफचे डॉ. अश्विन विश्वनाथन व प्रवीण जे., झेडएसआय अंदमानचे डॉ. शिवापेरुमन, कर्नाटकचे डॉ. एस. सुब्रमण्य आणि शिवा शंकर, पुद्दुचेरी विद्यापीठातील प्रा. के. शिवकुमार, टाटा केमिकल्स गुजरातचे डॉ. धवल वर्ग्य, डब्ल्यूसीएस इंडियाचे डॉ. अनंत पांडे, पुद्दुचेरीचे रवीचंद्र मोंद्रेती, श्रीलंकेचे प्रा. संपत सेनेविरत्ने, गायोमिनी पानाघोडा आणि रियुनियन विद्यापीठाचे प्रा. मत्थीयू ली कॉर आदी भारत, इंग्लंड, श्रीलंका, रियुनियन, नेदरलँड, मालदीव या देशांमधील पक्षीशास्त्रज्ञ या विषयावर मंथन करीत आहेत.

मुख्य म्हणजे या कार्यशाळेत राज्य सरकारे तसेच भारत सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकारीही सहभागी आहेत. कार्यशाळेत महत्त्वाचे सागरी पक्षी अधिवास (मारिन इम्पॉर्टन्ट बर्ड एरियास MIBA), त्यांना भेडसावणारे धोके आणि त्यासाठी आवश्यक संशोधन सादर करण्यात आले. त्यासोबतच हिंदी महासागरातील समुद्री पक्ष्यांवर उपलब्ध संकलित माहितीचे सामूहिक विश्लेषण करण्यात आले. महत्त्वाचे समुद्री पक्षी क्षेत्र आणि त्यांचे स्थलांतर लक्षात घेता समुद्री-पक्ष्यांविषयीचे धोरण आणि व्यवस्थापन यावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

समुद्री प्रवासी पक्ष्यांच्या संशोधनामध्ये भारतातील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही प्राचीन संस्था मागील १४० वर्षांपासून कार्यरत आहे. समुद्री पक्ष्यांच्या अभ्यासातून संस्थेच्या पक्षी शास्त्रज्ञांनी आजवर पक्षीशास्त्रातील अनेक गूढ उकलणारे अभ्यास केले आहेत. जन जंगलमधून आपण यापूर्वी ब्लॅक टेल्ड गॉडवीट (Black-tailed godwit) या इवल्याशा पक्षाने कसा चक्क नऊ हजार कि.मी. लांबीचा मुंबई ते सायबेरिया प्रवास पूर्ण केला आणि तो मुंबईत नेमके भांडुप पंपिंग स्टेशनमध्येच पुन्हा कसा परतला हे आपण पहिले आहे. असे शोध लावण्यासाठी या संस्थेचे पक्षीशास्त्रज्ञ दरवर्षी हजारो पक्ष्यांच्या पायात रिंग घालतात तसेच काही पक्ष्यांना चिप बसवून त्याच्यावर उपग्रहीय प्रणालीद्वारे पळत ठेवतात. आता ही माहिती या सर्व देशांमधून जमवलेल्या महितीशी जुळवल्यानंतर त्यातून अनेक नवीन गूढगोष्टींची उकल होते.

प्रवासी पक्ष्यांच्या दीर्घकालीन प्रकल्पासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे देशाच्या महत्त्वपूर्ण पक्षी अधिवासानजीक काही अभ्यास केंद्र उभारण्यात आले आहेत. देशाच्या दक्षिण टोकावर तमिळनाडू राज्यात नागापट्टनम जिल्ह्यात पॉइंट कॅलीमर येथे संस्थेने एक केंद्र उभारले आहे. पॉइंट कॅलीमर येथे बंगालचा उपसागर आणि पाक स्ट्रीट भेटतात. संस्थेचे दुसरे अभ्यास ठिकाण मुंबईमध्ये ऐरोली येथे आहे. रोहित म्हणजेच मोठे अग्निपंख (Flamingo) पक्षी तसेच गॉडवीट, रेडशांक, युरेशियन कर्लयू, कसपीयन टर्न (सुरय), पलोवरची असे अनेक समुद्री पक्षी येथे हजारोंच्या संख्येत दरवर्षी येतात. दक्षिणेतील पॉइंट कॅलीमर तसेच मुंबईतील ऐरोली येथे असलेल्या मिठागरांमुळे या प्रवासी पक्ष्यांना समुद्र किनाऱ्यानजीकचा मोठा प्रदेश भक्ष्य शोधण्यासाठी उपलब्ध होतो.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीप्रमाणेच इंग्लंडमधील बर्ड लाईफ इंटरनॅशनलसारख्या अनेक संस्थांकडून समुद्री पक्ष्यांचे होणारे लांब पल्ल्याचे स्थलांतर अभ्यासण्यासाठी जगभर अनेक संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. या संशोधन प्रकल्पांमधून समुद्री पक्ष्यांचे ठराविक उड्डाणमार्ग असतात ही महत्त्वपूर्ण बाब आता समोर आली आहे. यातूनच आता समुद्री पक्ष्यांच्या या प्रवास कथांमागील कारणमीमांसाही आपल्यासमोर येत आहे. आपल्याला उपलब्ध झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने पक्ष्यांच्या थक्क करणाऱ्या या प्रवासकथांचे गूढ उकलणे शक्य झाले आहे.

अनेक देशांमधील पक्षी शास्त्रज्ञांनी एकत्रित अभ्यासातून पक्ष्यांचे उत्तर-दक्षिण आणि त्याविरुद्ध किंवा पूर्व-पश्चिम आणि त्याविरुद्ध असे स्थलांतर होते तसेच असे अनेक उड्डाणमार्ग असल्याचे लक्षात आले आहे. यातील एक मार्ग मध्य आशिया खंडातून (सेंट्रल एशियन फ्लायवे) जातो. हा युरेशियामधून जात असून बंगालचा उपसागर आणि आर्टिक समुद्र यामध्ये येतो. यामध्ये भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, मालदिव, आर्मेनिया अजरबैजान, बहरिन, भुतान, इराक, कुवैत, ओमान, कतार, कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, मंगोलिया यांसारख्या सुमारे ३० देशांचा समावेश होतो. यामधून १८२ प्रजातींचे सुमारे २७९ पक्षी प्रवास करतात.

आज विमान वाहतुकीची वर्दळ जगभर वाढली. ते होत असतानाच अनेक पक्षी प्रजाती हजारो किलोमीटर अंतर कापून उत्तरेकडून दक्षिणेकडे तसेच आशिया खंडातून आफ्रिका खंडात, युरोपातून आशिया खंडात तसेच त्या उलटसुद्धा प्रवास करतात. यातून समुद्री पक्ष्यांच्या मार्गातून होणारी विमान वाहतूक आणि त्यातील धोके हा विषयही महत्वाचा आहे.

बीएनएचएसने आतापर्यंत सुमारे २१ हजार पक्ष्यांच्या पायात रिंग घातली आहे. ही पद्धत वापरण्याला २०२७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या दीर्घकालीन संशोधनातून या पक्ष्यांच्या थांब्यांच्या ठिकाणांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी रिंग घातलेले पक्षी पुन्हा सापडण्याचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे आता रंगीत बॅन्ड लावण्यासारख्या इतर अनेक गोष्टी स्वीकारण्यात आल्या आहेत. यात आता उपग्रहीय प्रणालीसारख्या आधुनिक पद्धतींची भर पडली आहे.

बीएनएचएसने समुद्री तसेच प्रवासी पक्ष्यांचा अभ्यास करताना १९९५ पासून सुमारे १७ प्रजातींच्या १७५ पक्ष्यांना उपग्रहीय टॅग बसवून त्यांच्या उड्डाणमार्गांची माहिती जमवली आहे. एप्रिल २०२२ मध्ये तीन मोठे रोहित /अग्निपंख (ग्रेटर फ्लेमिंगो) व तीन लहान अग्निपंख (लेसर फ्लेमिंगो) यांनाही जीपीएस/ जीएसएम उपग्रहीय टॅग लावले होते. त्यांचा मागोवा घेण्यात आला त्या वेळीही रोहित/ अग्निपंख पक्ष्यांच्या (फ्लेमिंगोंच्या) स्थलांतरणाची महत्त्वपूर्ण माहिती हाती आली होती. त्यातील एक अग्निपंख पक्षी (फ्लेमिंगो) एका दिवसात गुजरातमधील भावनगर येथे पोहोचल्याचे लक्षात आले होते. हा संपूर्ण अभ्यास ठाणे खाडीमध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा दीर्घकालीन अभ्यास करण्यासाठी हाती घेतलेल्या एका अभ्यास प्रकल्पाचा भाग आहे.

या कार्यशाळेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली. श्रीलंकेपासून तर बांगलादेश आणि गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर समुद्रात समुद्री पक्ष्यांचे असणारे थांबे, अधिवास, त्यांची संख्या यावर महत्त्वपूर्ण माहिती जमवली गेली. सोबतच विशिष्ट ठिकाणांना असणारे धोके यांचाही ऊहापोह करण्यात आला. इंग्लंडच्या बर्डलाईफ इंटरनॅशनल या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सर्व देशांच्या मांडणीमध्ये साधर्म्य आणण्याचा प्रयत्न केला. समुद्री पक्ष्यांच्या मध्य आशिया खंडातील मार्गामध्ये येणाऱ्या देशांमध्ये असणारे धोके, त्यांचे स्वरूप याची शास्त्रीय मांडणी केली. या सर्व धोक्यांवर मात करून प्रवासी पक्षी आणि त्यांचे अधिवास सुरक्षित राखण्यासाठी कायदा, व्यवस्थापन व संवर्धन यासाठी काय ठोस पावले उचलणे आवश्यक आहे यावरही चर्चा झाली.

समुद्री पक्ष्यांना भारतातील तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गोवा व गुजरात या राज्यांमध्ये अभय देण्यासाठी तसेच संवर्धन व संशोधन करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे यावरही ठोस निष्कर्ष काढण्यात आले. समुद्री पक्ष्यांच्या खुलेआम शिकारी केल्या जातात, तसेच बंदरे तसेच अनेक विकास कामे यामुळे प्रदूषण वाढून माशांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्यावर जगणाऱ्या समुद्री पक्ष्यांच्या संख्येवर झाला आहे.

समुद्री पक्ष्यांच्या प्रजननासाठी अनेक बेटे महत्त्वपूर्ण असतात, पण आज तेथेही विकासाच्या विनाशी कल्पना पोहोचल्या आहेत. इकडे मालवाहू व इतर जहाजांची समुद्री मार्गावरून वर्दळ वाढली आहे. त्यातून समुद्री प्रदूषणात भर पडली आहे. समुद्री किनाऱ्यानजीक मिठागरांची संख्या आता कमी होत आहे. खरे तर समुद्र किनारे हे जैवविविधतेने संपन्न असतात. अनेक परिस्थितीय व पर्यावरणीय घटनांचे ते साक्षीदार असतात. समुद्री जीवांचे तसेच समुद्री पक्ष्यांचे उत्तम अधिवास याच किनाऱ्यांवर आढळतात.

समुद्री पक्षी समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आश्रयाला येतात, पण आता तेथेही शहरी मलब्याचे ढीग उभे राहू पाहत आहेत. प्रसंगी कंदळवनांना संपवून त्यावर मलब्याचे ढीग उभे राहू पाहत आहेत. पावसाळ्यात मलब्याने गाळ निर्माण करून रेताळ समुद्र किनाऱ्यांचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे कंदळवण नसणाऱ्या भागात कंदळवण उगवणे सुरू आहे. या सर्वांचा परिणाम माशांच्या प्रजाती व संख्येवर झालेला आहे. याचा परिणाम त्यांच्या उपजीविकेवर झाला आहे. तिकडे समुद्र गावांमध्ये आक्रमण करीत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी तसेच धनदांडग्यांनी आता गावात शिरणाऱ्या लाटांना थांबवण्यासाठी किनाऱ्यावर दगड टाकून भिंती उभ्या करणे सुरू केले आहे. समुद्र किनाऱ्यावर चालणारे हे सर्व उद्योग थांबवणारा समुद्र किनाऱ्याचे नियमन (सीआरझेड) हा कायदा अस्तित्वात आहे, पण कायद्याला कोण जुमानतो?

कार्यशाळेच्या शेवटी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मत्स्यपालन आयुक्त आणि वन विभाग अशा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया यापुढील काळात सर्व संबंधित विभागांना एकत्रित आणणारी ठरणार आहे. म्हणूनच समुद्री पक्ष्यांच्या संरक्षणासाठी तसेच मासेमारांच्या उपजीविकेसाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com