झटपट पुनर्वसनासाठी बांधकाम तंत्रज्ञान

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्यांना सावरण्यासाठी आणि संसाराची फेरउभारणी, वसाहतींची निर्मिती वेगाने व्हायला पाहिजे.
sakal
sakalsakal

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्यांना सावरण्यासाठी आणि संसाराची फेरउभारणी, वसाहतींची निर्मिती वेगाने व्हायला पाहिजे. त्याकरिता तयार बांधकाम साहित्य उपयुक्त ठरते.

निसर्गाच्या अफाट ताकदीचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या दोन वर्षांतील सलग पावसाळा. या पावसाळ्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर आणि सभोवतालच्या परिसरात घडलेल्या हानीचे मूल्यांकन करणे वेळखाऊ काम आहे. या तुफानी पावसामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. जगण्याची मूलभूत गरज असणारे अन्न, वस्त्र आणि निवारा यापासून हजारो कुटुंबे वंचित झाली. यापैकी अन्न आणि वस्त्र पुरवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण सामाजिक बांधिलकीतून धावून आले आहेत. परंतु या पूरग्रस्तांना कायमस्वरूपी निवारा देण्याचे आव्हानात्मक काम बाकी आहे.

भविष्यातील स्वतःची घरे बांधण्यासाठी पूरग्रस्तांची आर्थिक परिस्थिती पाहता प्रशासनालाच पुढाकार घेऊन त्यांना अधिकाधिक मदत द्यावी लागेल. पुनर्वसन करताना पूरग्रस्तांसाठी वसाहत उभारावी लागेल. ज्यामध्ये घरे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, दुकाने, शाळा, अंतर्गत रस्ते यांचा समावेश करावा लागेल. अशी वसाहत प्राधान्याने आणि टिकाऊ पद्धतीची उभारावी लागेल. घरांची बांधणी पारंपरिक पद्धतीने केल्यास अधिक वेळ लागेल. पारंपरिक पद्धतीत वाळू, विटा, सिमेंट, लोखंड इत्यादी बांधकाम साहित्य कामाच्या ठिकाणी आणावे लागते. बांधकाम साहित्याचा साठा करण्यासाठी मुबलक जागा लागते. हाताळणी आणि वापर करताना साहित्य वाया जाते. कमीत कमी वेळात टिकाऊ घरे आणि इतर बांधकाम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यांचा एकत्रित उपयोग केला, तर पुनर्वसन वेगाने होण्यास मदत होईल.

sakal
सत्य शोधणारा प्रतिभावंत

फेरोसिमेंट तंत्रज्ञान

फेरो म्हणजे लोखंड आणि सिमेंटो म्हणजे सिमेंट मॉर्टर. फेरोसिमेंट अथवा फेरोक्रिट हे एक प्रकारचे मायक्रोकाँक्रीट असते. ज्यामध्ये सिमेंट, वाळू आणि पाणी यांचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण वापरले जाते. यामध्ये खडीचा वापर केला जात नाही. इतर साहित्यात लोखंडी लवचिक जाळी म्हणजे वेल्डमेश, कोंबडी जाळी म्हणजे चिकनमेश, ६ आणि ८ मिलिमीटर व्यासाच्या लोखंडी सळया यांचा समावेश असतो. फेरोक्रिटच्या भिंती फक्त दीड ते दोन इंच जाडीच्या असतात. परंतु त्यात प्रचंड दाब आणि ताण शक्ती असते. फेरोक्रिट वजनाला हलके, भूकंपप्रतिकारक, अग्निप्रतिबंधक, उष्णता अवरोधक, ध्वनिरोधक आणि एकसंध असते. या तंत्रज्ञानाने घरे बांधण्यासाठी वेळ कमी लागतो. परंतु वेल्डर, फिटर अशा कुशल कामगारांची आवश्यकता असते. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, भूगाव, धुळे या ठिकाणी बंगले आणि घरे या तंत्रज्ञानाने बांधण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त डोम, कॉलम, बीम, स्लॅब, जिना, पाण्याच्या टाक्या, संरक्षक भिंती, सायलोज, पिरॅमिड इत्यादी अनेक ठिकाणी फेरोसिमेंटने उपयुक्तता सिद्ध केली आहे.

sakal
कृष्णाला तुम्हाला भुलवू देऊ नका!

प्रिकास्ट पद्धती

प्रिकास्ट पद्धतीचे अनेक फायदे असल्याने जगातील अनेक प्रगत आणि प्रगतीशील देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे. प्रिकास्ट पॅनेल बनवताना फ्लायअॅशचा वापर होत असल्याने ही पद्धती पर्यावरणपूरक समजली जाते. यात फॉर्मवर्कच्या साहाय्याने कारखान्यात प्रिकास्ट पॅनेल बनवून प्रत्यक्ष कामावर त्याची उभारणी आणि जोडणी केली जाते. जोडणी जलदगतीने होत असल्याने वेळेची बहुमुल्य बचत होते. पॅनेलची लांबी, रुंदी आणि जाडीचे आवश्यकतेनुसार डिझाइन करता येते. पॅनेलमध्ये दोन तासांपर्यंतची ज्वलनरोधकता असते. पाणी, वाळवी, बुरशी यांचा पॅनेलवर दुष्परिणाम होत नाही. प्रीकास्ट पॅनेलमध्ये उच्च दर्जाची अग्निप्रतिबंध क्षमता असते. भिंतींप्रमाणेच फ्लोरिंगसाठीसुद्धा पॅनेलचा वापर करता येतो. कारखान्यात प्रिकास्ट पॅनेल तयार होत असल्याने गुणवत्ता नियंत्रित ठेवता येते.

आजच्या काळात निवासी इमारती, व्यापारी संकुले, शाळा, महाविद्यालये, टोल नाके, पेट्रोल पंप, पोलिस ठाणे इत्यादी अनेक ठिकाणी प्रिकास्ट पॅनेलचा वापर होत आहे. प्रिकास्ट आणि फेरोसिमेंट या दोन पद्धतीच्या एकत्रीकरणातून प्रिकास्ट फेरोसिमेंट ही नवीन पद्धत आकाराला आली आहे. यात वाळू, सिमेंट, जाळी इत्यादी बांधकाम साहित्य प्रत्यक्ष कामावर आणण्याची गरज नसते. फेरोसिमेंट तंत्रज्ञानावर आधारित पॅनेल प्रत्यक्ष कामावर न बनवता कारखान्यात बनवली जातात. यामुळे वेळेची बचत होते, गुणवत्ता अधिक मिळते. प्रत्यक्ष कामावर पॅनेलची उभारणी आणि जोडणी केली जाते. बांधकामातील पारंपरिक ‘आरसीसी’ला ही नवीन पद्धत उत्तम पर्याय आहे.

sakal
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी...

या पद्धतीचा वापर करून एकमजली घरे, शौचालये आणि स्वच्छतागृहे, लीन्टेल, स्लॅब, बीम, वॉटरटॅंक, संरक्षक भिंत इत्यादी बनवता येतात. पारंपरिक आरसीसी पद्धतीपेक्षा अंदाजे २५ टक्के कमी खर्च प्रिकास्ट फेरोसिमेंट पद्धतीचा वापर केल्याने येतो. या पद्धतीत लोखंडी सळईचा वापर होतो. सॅन्डविच पॅनेल बनवताना इन्स्युलेशन म्हणून थर्माकोलचा वापर केला जातो. अशी पॅनेल उन्हाळ्यातही घराला आतून थंडावा देत असतात. प्रिकास्ट फेरोसिमेंटची पॅनेल भूकंप प्रतिकारक, ज्वलनरोधक, अग्निप्रतीबंध, उष्णताअवरोधक, ध्वनिरोधक आणि एकसंध असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com