महानगरातली वैभवी लेणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Caves

अजिंठा, वेरूळ, हंपी, खजुराहो आणि कोणार्कचं सूर्यमंदिर यांच्याएवढा मोठा नसला, तरी त्यांच्या तोडीस तोड पुरातन कलात्मक वास्तूंचा खजिना मुंबईत आहे, यावर प्रथमदर्शनी विश्वास बसत नाही.

महानगरातली वैभवी लेणी!

अजिंठा, वेरूळ, हंपी, खजुराहो आणि कोणार्कचं सूर्यमंदिर यांच्याएवढा मोठा नसला, तरी त्यांच्या तोडीस तोड पुरातन कलात्मक वास्तूंचा खजिना मुंबईत आहे, यावर प्रथमदर्शनी विश्वास बसत नाही. घारापुरी लेण्यांचं बेट तसं मुंबईबाहेर समुद्रात आहे; परंतु मुंबईतही कान्हेरी (बोरिवली), मंडपेश्वर (दहिसर), महाकाली-कोंडिविटा (अंधेरी) व जोगेश्वरी या दोन हजार वर्षांपूर्वीच्या गुंफा-लेणी आहेत. परकीय आक्रमणांच्या काळात त्यांचा थोडा विध्वंस झाला असला, तरी त्यांचा दर्जा आणि वैभव यांची कल्पना सहजतेनं येते. जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोडवरील महाकाली लेणी या वैभवाची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत.

जोगेश्वरी डोंगरावर दुसऱ्या शतकात निर्मिती झालेल्या गुंफासमूहात वायव्य दिशेला चार; तर आग्नेय दिशेला १५ गुंफा आहेत. पुरातनकाळी इथे मरोळ, मुळगाव या व अन्य मोठ्या वसाहती, तसंच अनेक तलाव होते; मात्र नंतर कालौघात या वसाहती आणि तलाव नष्ट झाले. इथे जंगल पसरलं आणि जवळपास स्वातंत्र्यानंतरच इथे हळूहळू छोटी घरं उभारण्यास सुरुवात झाली. अजूनही या लेण्यांच्या परिसराभोवती जंगल व पर्वत दिसतात.

गुंफा डोंगरावर असून हमरस्त्याने येताना त्या अजिबात दिसत नाहीत. डोंगराला वळसा घालून पुढील भागात आल्यावरच त्या नजरेस पडतात. मागील बाजूने लेण्यांच्या छतावरून उतरून पुढील भागात येण्यासाठी पायऱ्यांचं बांधकाम सुरू करण्यात आलं; मात्र नंतर ते काही कारणांनी अर्धवट सोडल्याचं स्पष्ट जाणवतं. येथील स्तूप, ध्यानधारणा कक्ष, भिक्खूंचं विश्रांतिगृह, जाळीच्या खिडक्या, दारावरील नक्षी, भिंतीवर कोरलेला पक्षी या सर्व बाबी पाहताना आपणही नकळत त्या काळात जाऊन पोहोचतो. लेण्यांमध्ये प्रकाश यावा यासाठी वर काही ठिकाणी खिडक्या केल्याचंही दिसून येतं. या भागात पाऊस भरपूर पडत असल्याने पाणी साठवण्यासाठी खोदलेल्या दगडी टाक्या तर घारापुरी लेण्यांपासून सर्वत्र सर्रास आढळतात. या टाक्यांचं तोंड जेमतेम एक-दोन फुटी असलं तरी खाली त्या आणखी मोठ्या आहेत हे पाहिल्यावर त्या कलाकारांना मुजराच करावंसं वाटतं. सगळ्या लेण्या पाहताना त्या खोदता येतील असा एकसंध डोंगर त्या कारागिरांनी कसा शोधला असेल, हा विचारही राहून राहून आपल्या मनात येतो.

मंडपेश्वर गुंफेत दीपोत्सव

पाचशे फूट लांब व दोनशे फूट रुंद आणि अनेक कोरीव खांब असलेल्या जोगेश्वरी गुंफा आठव्या शतकात निर्माण केल्याचा अंदाज आहे. इथे गणपती, शिव-पार्वती, ब्रह्मा-विष्णू-महेश आदी देवांच्या मूर्ती आहेत. येथील स्तंभ, मंडप, दरवाजे अत्यंत सुबक आहेत. दहिसरच्या मंडपेश्वर गुंफांमध्येही सात-आठ कक्ष असून, तेथेही शंकराची पिंड आहे. त्रिपुरारी पौर्णिमा, तसंच महाशिवरात्रीला इथे हिंदू संघटनांतर्फे दीपोत्सव करण्याची प्रथा आहे.

वैभवशाली बौद्ध गुंफा

एकेकाळी बिबटे, कोल्हे, लांडगे आदी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी अंतर्भागात घनदाट जंगलातील डोंगरावर कान्हेरीसारख्या वैभवशाली बौद्ध गुंफा आहेत. त्याकाळातील या निबिड अरण्यात त्या महान कलाकारांनी ही जागा शोधली कशी व डोंगरावर त्या लेण्या साकारल्या कशा, हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात. येथून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर वसई खाडी आणि त्यापलीकडे नालासापोरा हे एकेकाळचं एक लाख लोकवस्तीचं वैभवशाली बंदर होतं. नदीकिनारी मानवी संस्कृती फुलत गेली असा इतिहास आहे, त्यामुळे दहिसर नदी, तुळशी तलाव यांचा शेजार असलेला हा भागही त्याकाळी नांदता असू शकतो.

दुसऱ्या शतकापासून निर्मिती सुरू झालेल्या कान्हेरी गुंफा मुंबईतील सर्वांत मोठ्या आणि विस्तीर्ण आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी अशा राजांपासून ते व्यापारी आदींच्या दानातून येथील निर्मिती केल्याचे उल्लेख आहेत. या लेण्यांमधील भव्य कोरीव सभागृह, त्याला तोलून धरणारे खांब, बुद्धमूर्ती, नमनमुद्रा, विविध प्रकारच्या मुद्रांमधील बुद्धशिल्प, चित्रं, कैलास लेण्यांसारखे येथील स्तंभ, छताला आधार देणारे काही सरळसोट; तर काही नक्षीदार खांब पाहून आपण थक्क होतो. प्रार्थनेसाठीची चैत्यगृहं, बौद्ध भिक्खूंच्या राहण्यासाठीचे विहार इथे आहेत. येथील पहिल्याच गुंफेचा साठ-सत्तर फूट लांब व वीस फूट रुंद भाग खालून कोणताही पिलरचा आधार न देता छतासारखा कोरला आहे. या छतावर डोंगर असला तरीही हे विनाआधाराचं छत खाली पडणार नाही, याची त्या अनामिक निर्मात्यांना कल्पना होती. यावरून तेव्हाच्या ‘आधुनिक इंजिनिअरिंग’चीही खात्री पटते.

इथे एकाच पर्वतात खोदलेल्या एकूण ११० लेण्या असून त्यांत गर्भगृह, स्तूप, बाह्यदालन, पायऱ्या, कडेला भिंतीशी बसण्यासाठी दगडातून कोरलेली आसनं, जाळीदार भिंती, सज्जावरील नक्षीकाम या वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत. पावसाचं पाणी साठविण्यासाठी जमिनीखाली जलकुंडही आहेत. येथून मागच्या टोकावरून दूरवरील तुळशी तलावही स्पष्ट दिसतो. पावसात येथील धबधबा अत्यंत आकर्षक वाटतो.

घारापुरी अर्थात एलिफंटा लेणी

एकाच वेळी महाकाय बोटींच्या शेजारून जलप्रवास, थोडंसं ट्रेकिंग आणि ‘युनेस्को’ने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या पुरातन कोरीव लेण्यांना भेट असं हटके पर्यटन करायचं असल्यास मुंबई आणि नवी मुंबईच्या कुशीत असलेल्या घारापुरी बेटाला व त्यावरील लेण्यांना भेट दिलीच पाहिजे. दगडांच्या देशा असं महाराष्ट्राबद्दल अभिमानाने म्हटलं जातं. अजिंठा-वेरूळ या लेण्या, तसंच गावागावांत दिसणारी हेमाडपंती कोरीव मंदिरं याचीच साक्ष देतात. कुबेरनगरी मुंबापुरीदेखील या अशा अनेक लहान-लहान लेण्यांच्या रूपाने हे वैभव आपल्या अंगाखांद्यांवर खेळवते आहे.

जेएनपीटीच्या समोर असलेल्या या घारापुरी बेटांवरील लेण्यांमध्ये गेल्यावर आपण वेगळ्याच दुनियेत पोहोचतो. जणूकाही इतिहासात हजारो वर्षं मागे गेल्याचा भास होते. लेण्यांमधील भगवान शिवाचं त्रिमूर्ती स्वरूपातील रूप पाहून आपण नकळत नतमस्तक होतो. हजारो वर्षांपूर्वी त्या महान कलाकारांनी भरसमुद्रात येऊन या लेण्या कशा साकारल्या असतील, हे एवढं कठीण ‘ड्रिलिंग’ कसं केलं असेल, हे करणारे ते कोण अनामिक कलाकार असतील... इत्यादी प्रश्न आपल्याला सतावत राहतात.

सप्तलेण्यांचा प्रदेश

पोर्तुगिजांनी उभारलेल्या दगडी हत्तींमुळे या बेटाला एलिफंटा नाव देण्यात आलं. या लेण्यांमध्ये अनेक देवी-देवतांच्या मूर्ती असून, या शिल्पकलेवरील दाक्षिणात्य प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. एलिफंटा बेटांवर एकूण सात लेण्या आहेत. इथल्या मुख्य गुहेत एकूण दोन खांब आहेत, ज्यामध्ये भगवान शिव विविध रूपांत कोरलेले आहेत. त्यातीलच त्रिमूर्ती सर्वांत आकर्षक आणि विलोभनीय आहे.

व्यापारी मार्गावरील लेण्या

आपल्या महाराष्ट्राला ‘सुंदर देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा’ असं म्हटलं जातं. हे वर्णन किती शब्दशः खरं आहे ते महाराष्ट्रातील लेण्या बघून कळतं. साऱ्या भारतात मिळून बाराशे मानवनिर्मित लेणी आहेत व त्यातील ८० टक्के सुंदर आणि पवित्र लेणी महाराष्ट्रात आहेत. दगडांच्या देशा, असा महाराष्ट्राचा उल्लेख होतो आणि योगायोगाचा भाग म्हणजे महाराष्ट्रात जास्तीत जास्त पर्वत आणि दगड म्हणजे ज्वालामुखीजन्य किंवा अग्निजन्य खडक असल्यामुळे लेणी किंवा गुंफांच्या निर्मितीसाठी हे अत्यंत उत्तम साधन होतं. त्याचमुळे सर्वांत चांगल्या आणि सर्वाधिक कलाकुसर असलेल्या लेणी या महाराष्ट्रातच निर्माण झाल्या आहेत, मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईतील लेण्या इसवी सनपूर्व पहिलं शतक ते इसवी सनानंतरचं तेरावं शतक यादरम्यान उभारण्यात आल्या आहेत.

मुंबईत दहिसरपासून बोरिवली नॅशनल पार्कमधील कान्हेरी गुंफा, मागाठणे, जोगेश्वरी व अंधेरी या प्रमुख लेण्या आहेत. त्याखेरीज मुंबई व जेएनपीटी बंदरांसमोर भरसमुद्रात घारापुरी बेटांवर एलिफंटा लेणी आहेत. मुंबईतील लेणी आज आपल्याला आडवाटेला वाटत असल्या तरी ते तसं नाही. मुंबईतील नॅशनल पार्कमधील लेणी ही आडबाजूला जंगलात असल्याचं आपल्याला वाटतं किंवा मुंबईच्या शेजारी असलेली एलिफंटा बेटावरची लेणी हीदेखील दूर कुठं तरी समुद्रात उभारल्यासारखं वाटतं. मुंबईत नॅशनल पार्कप्रमाणेच त्याच्या शेजारी उत्तरेला दहिसर व दक्षिणेला गेल्यास मागाठणे, अंधेरी, जोगेश्वरी इथपर्यंत आपल्याला लेणी दिसतात.

या लेण्यांच्या निर्मितीमध्ये एक नक्की सूत्र आहे. आज आपल्याला हा भाग जरी आडवाटेला वाटत असला, तरी तो एकेकाळचा राजमार्ग आणि व्यापारमार्ग होता. या परिसराच्या जवळच म्हणजे नालासोपाऱ्याला सोपारे नावाचं प्रसिद्ध बंदर होतं. या शहराची लोकसंख्या तेव्हा एक लाख होती. तेथून दूरदूरच्या देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापारी मार्ग बोरिवली, ठाणे, जुन्नर-माळशेज अशा मार्गाने घाटावर व देशभरात सर्वत्र जात असे. मालाचा व्यापार याच मार्गावरून होत असे. त्यामुळे या व्यापाऱ्यांना-वाटसरूंना विश्रांतीचं स्थान म्हणून या लेणी खोदण्यात आल्या होत्या.

मुंबईतही बौद्ध लेणी आणि पशुपत-शैव हिंदू लेणी, एखादी नाथ संप्रदायाची लेणीही आढळते. मुंबईतील बौद्ध लेणी या इसवी सनाच्या पहिल्या शतकापूर्वीच्या आहेत, तर शैव लेणी पाचव्या शतकातील आहेत. मुंबईतच सुमारे दीडशेपेक्षाही जास्त गुंफांमधील लेण्या आहेत. कान्हेरी गुंफेत अधिकृतपणे ११० गुंफा असल्याचं सांगितलं जातं; पण अभ्यासकांना तिथे अजूनही लेण्या मिळत आहेत. विरारचं जीवदानी मंदिर हे पूर्वी लेणी स्वरूपात होतं. अंधेरीच्या कोंडीविटे गावातील महाकाली लेणी हीदेखील अशीच जुनी आहे. मंडपेश्वर आणि जोगेश्वरीच्या लेणी या पाशुपत पद्धतीच्या लेणी आहेत. मागाठण्यालाही बौद्ध लेणी आहे, मात्र आता तिच्यावर खूप अतिक्रमणं झाली आहेत. व्यवस्थित शोध घेतल्यास मुंबईत अजूनही काही लेणी नव्यानं मिळू शकतील, असं लेण्यांच्या अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक डॉ. शमिका सरवणकर यांनी सांगितलं.

दक्षिण मुंबईतील मूळ सात बेटं जोडून इंग्रजांनी मुंबई तयार केली; मात्र त्यापूर्वीही उत्तर मुंबईचा अखंड भूभाग, ठाणे, साष्टी ही मूळ मुंबई होती. सोपारा बंदरातून निघणारा व्यापारी मार्ग इथूनच घाटावर जात होता. अगदी त्या मार्गावर जुन्नर-नाणेघाट इथेही लेणी-गुंफा किंवा पाण्याचे छोटे टाके सापडतात. हे सर्व एकमेकांशी जोडलेले होते. अजूनही बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधून ठाणे, मुलुंड किंवा अगदी कांदिवलीपर्यंत जंगलातून जाणारे मार्ग आहेत. अजूनही तेथील आदिवासी नागरिक चालत जाण्याकरिता ते मार्ग वापरतात.

या सर्व गुंफा, लेणी तयार करण्यासाठी मोठा निधी आवश्यक होता. राजाश्रय तसंच व्यापाऱ्यांनी वा सर्वसामान्यांनी दिलेल्या निधीतूनच ते शक्य झालं. या लेण्यांमध्ये महिलांचेही उल्लेख आहेत. याचा अर्थ दोन हजार वर्षांपूर्वी महिलाही व्यापारात होत्या हेच त्यातून दिसून येतं. ही लेणी त्यांच्या त्यांच्या धार्मिक संकल्पनांमधून खोदल्या असल्या तरी बौद्ध आणि शैव यांच्यात शत्रुत्व अजिबात नव्हतं हेदेखील त्यातून दिसतं, उलट एकमेकांच्या तत्त्वांचा आणि शैलीचा प्रभावही एकमेकांच्या लेणी उभारणीत पडला आहे. अनेक ठिकाणी ही सर्व लेणी एकत्र आहेत.

इसवी सनाच्या पाचव्या शतकाआधी बौद्ध भिक्खू व नंतर शैवपंथी ही लेणी वापरत असत. जोगेश्वरीच्या लेणीत शिवमंदिर होतं, नंतर तिथे जोगेश्वरीदेवी आली व त्यामुळे त्या जागेचं नाव जोगेश्वरी पडलं. महाकाली गुंफा परिसरातूनही व्यापारी रस्ता जात होता. रस्त्यांबरोबरच समुद्रमार्ग हेही नैसर्गिक मार्ग होते. एलिफंटा म्हणजे घारापुरी हे बेट रायगड आणि मुंबईशी समुद्रमार्गे जोडलेलं असल्याने येथूनच अरबस्थान आणि युरोपशीही व्यापार सुरू होता, त्यामुळे एलिफंटा आणि मंडपेश्वर लेण्यांवर रोमन, पर्शियन आणि ग्रीक कलांचाही प्रभाव दिसून येतो. अर्थात, यावर अजून संशोधनही होणं आवश्यक आहे.

टॅग्स :Mumbaisaptarang