

Indian Army Martyr Stories
esakal
‘देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा... अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा!’ एका सैनिकाचं बलिदान, समर्पण इतरांमध्ये लढण्यासाठी प्रचंड मोठी शक्ती जागृत करतं. मग त्यांचं रणक्षेत्र कितीही वेगळं असू दे! एका सैनिकाबरोबर सात जन्मांच्या गाठी बांधल्या गेल्या की, संपूर्ण आयुष्यच जणू एक युद्धकथा होऊन जातं. अत्यंत संघर्षाच्या या कथा विलक्षण स्फूर्तिदायी, पण तितक्याच हळव्याही असतात. लान्सनायक राजकुमार महतो आणि त्याची पत्नी जया यांची ही गोष्ट अशीच चित्तथरारक, पण हृदयस्पर्शी आहे.
१९९७-९८ चा काळ! रांचीमधलं मासू नावाचं छोटं गाव. रस्ते, शाळा, रुग्णालयं एवढंच काय, पण वीजही पोहचलेली नव्हती. कोवळ्या वयातली जया, एका सैनिकाशी लग्नं करून इथे आली. वडिलांनी अतोनात कष्ट करून तिला दहावीपर्यंत शिकवलं होतं. पुढे शिकण्याची दुर्दम्य इच्छा तिच्या मनात होती, पण प्रचंड भीतीही! कारण तिच्या बहिणींचं लग्नानंतर जे काही झालं, ते विदारक होतं! भोवतीच्या किर्र अंधारात आशेचा एक किरण मात्र होता, तो म्हणजे तिला मनापासून आवडलेला, हक्काचा फौजी - लान्सनायक राजकुमार महतो! राजकुमार एका गरीब आदिवासी शेतकरी कुटुंबातला. खडतर परिस्थितूनच तो घडला आणि सैन्यात भरती झाला. जयाला खूप शिकवायचं असा त्याचा दृढ निश्चय होता. तिला शिक्षिका झालेलं त्याला बघायचं होतं.