लास वेगासची दोन रूपं!

लास वेगासला निरनिराळ्या शहरांची अन् राज्यांची आकर्षणं निर्माण करून, लोकांना तिथं आकृष्ट करावं
हॉटेल्स
हॉटेल्सsakal

लास वेगासला आम्ही गेलो होतो, असं जर आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगितलं, तर प्रथम त्यांच्या तोंडातून उद्‍गार निघतात, ‘‘अरे व्वा! कॅसिनोचं शहर, मग काय ‘कॅसिनो’ खेळलात का? पैसे किती जमविले? का घालवले?’’ पण आम्ही मात्र लास वेगासला वेगळ्याच कारणांसाठी गेलो होतो, ते शहरही पहायचं होतं.

आमचा भाचा अन् आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून तिथं येणार होतो. तिथूनच आम्ही ग्रँड कॅनियन, हुवरडॅम, सेडोना शहर पाहणार होतो अन् लास वेगासही पहायचंच, असंही ठरवलं होतंच. सर्व गोष्टी पाहून आम्ही लास वेगासला आलो. आम्ही उतरलो ती बिल्डिंग त्रिकोणी होती, म्हणजे तशी पूर्णतः त्रिकोणी नव्हे हं. जर एक बिंदू घेतला, तर त्याच्या तीन बाजूंना मोठमोठ्या बहुमजली इमारती होत्या. अशा विशिष्ट पद्धतीने त्या इमारती त्रिकोणी होत्या. सर्व स्थळं पाहून झाल्यानंतर आम्ही लास वेगासला दोन दिवस मिराज नावाच्या इमारतीत अठराव्या मजल्यावर रहायला आलो. उंच मजल्यावर रहायची मजा काही वेगळीच होती. वरून खिडकीतून पाहिलं, की सर्व लास वेगास शहर दिसून येत होतं.

एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, तसं या लास वेगास शहराचं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी स्वच्छ ऊन, दिव्यांचा झगमगाट नाही; साधं, शांत, निर्मळ असं हे शहर दिसेल. पण, संध्याकाळी साडेसातनंतर मात्र तेच शहर बघावं तर काय! कसला तो झगमगाट, सेंटचा घमघमाट, निरनिराळ्या वेशभूषेच्या माणसांचा किलकिलाट... ती सगळी झगमगती दुनिया पाहून आपल्याला थक्कच व्हायला होतं, आपण आश्चर्यचकित होतो.

लास वेगासला निरनिराळ्या शहरांची अन् राज्यांची आकर्षणं निर्माण करून, लोकांना तिथं आकृष्ट करावं यासाठी सर्वच हॉटेल्समध्ये अनेक राज्यांची, अनेक शहरांची विविध तऱ्हेची प्रतीकं उभी करण्यात, बनवण्यात आली आहेत. बलाजिओ, लॅक्झोर, न्यूयॉर्क अशा अनेक मोठमोठ्या हॉटेल्समधून बडेबडे, अनेक राज्यांचे, शहरांचे, महत्त्वाच्या गोष्टींचे नमुने पहायला मिळतात.

बलाजिओ या हॉटेलमध्ये आतील भागात छोटासा बगीचा, संगीतावर नाचणारं कारंजं, बागेमध्ये वेगवेगळ्या, तऱ्हतऱ्हेच्या पशू अन् पक्ष्यांच्या शिल्पाकृती बनविण्यात आल्या आहेत. लॅक्झोर या हॉटेलमध्ये इजिप्तमधल्या पिरॅमिडसारख्याच आकाराची काचेची एक इमारत उभी आहे. इमारतीसमोर स्फिंक्स नावाच्या एका पक्ष्याचा भव्य पुतळा आहे. एम.जी.एम. हा अमेरिकेतला एक भव्य स्टुडिओ आहे, त्याची एक मोठी इमारत आहे. या इमारतीसमोर सिंहाचा भव्यदिव्य असा पुतळा उभारला आहे. नवनवीन चित्रपटांची दृश्यं तिथं पडद्यावर प्रसारित केली जातात. एम.जी.एम.चा सिम्बॉल म्हणजेच सिंहाचं रूप, चित्रपटाच्या आधी दाखवलं जातं. न्यू यॉर्क... न्यू यॉर्क या हॉटेलमध्ये हर्शीच्या चॉकलेटचा बार, नंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची नक्कल करून हुबेहूब उभा केलेला पुतळा आहे. न्यू यॉर्कच्या ट्रेनचा स्टॉप आहे. मोठं, भलंथोरलं सफरचंद उभं करून न्यू यॉर्क शहराची ही महत्त्वाची प्रतीकं, सिम्बॉल्स दाखवून लोकांना परत आपल्या जुन्या जुन्या देशांविषयीच्या इतिहासात रममाण केलं आहे, गुंतवून ठेवलं आहे.

लास वेगासचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, लास वेगास गावातील गल्ल्यांमध्ये बऱ्याच इमारतींच्या भिंतींवर विविध प्रकारची मोठी मोठी अन् छोटी छोटी चित्रं काढलेली आहेत. लास वेगासच्या कॉस्मॉपॉलिटिन या बिल्डिंगमध्ये तर असं एक महाप्रचंड, अतिशय विशाल असं मोठ्यात मोठं ‘महा’झुंबर आहे, तेही चमकत असतं. आपण ते फार मोहित होऊन पहात असतो. शेकडो लोक ते पाहण्यासाठी झुंडीच्या झुंडीने चालत येत-जात असतात. त्याच्या भोवती लहान झुंबरं आहेत; पण ती आपल्याला दिसतच नाहीत. कारण, ते भव्य झुंबरच आपल्याला खिळवून ठेवत असतं.

त्यानंतर आम्ही चालतच लॅक्झोर इथं कारंज्यांचा खेळ पहायला गेलो. तलावाच्या कठड्याला टेकलेली शेकडो माणसं कारंजी कधी सुरू होणार याकडे उत्सुकतेने पहात होती. पाच मिनिटांतच ठेका धरलेला, गाणी अन् विजेच्या झोताच्या तालावर उंच उंच वर फवारा मारत जाणारी कारंजी सुरू झाली, ती फारच मोहक दिसत होती. ती वर व वरून खाली येताना त्यांच्यावर खूप मोठा प्रकाशझोत पडे. तो कारंज्यांचा डान्स पाहताना कळतच नव्हतं, की आपण इथं किती वेळ उभं आहोत ते, इतकी ती कारंजी आपले पाय खिळवून टाकीत होती. नंतर आम्ही मिराज हॉटेलमध्ये गेलो. मिराज हॉटेलच्या लॉबीसमोरच पेटलेला ज्वालामुखी दिसून येत होता. रूमच्या खिडकीतून तो ज्वालामुखी बघताना फार गंमत वाटली.

लास वेगासच्या प्रत्येक बलाढ्य, भव्य, मोठमोठ्या इमारतींमध्ये वरील बाजूस राहण्यासाठी रुम्स व ग्राउंड फ्लोअरवर खालील भागात वेगवेगळी हॉटेल्स, कॅसिनोच्या मशिन्स, वेगवेगळ्या रचना, वेगवेगळी, तऱ्हतऱ्हेची, निरनिराळ्या देशांची प्रतीकं अशी ही रंगीबेरंगी, चमचमणारी, लखलखणारी दुनिया! एक वेगळ्याच नशेने भरलेली ही रात्रीची लास वेगास दुनिया!

आता एक महत्त्वाचं सांगते हं. या अशा रंगबेरंगी चमचमत्या लास वेगासला एका मोठ्या अशा ‘फ्रीमॉण्ट’ रस्त्याने ‘शह’ दिला आहे. दुसरी लास वेगास दुनियाच ‘फ्रीमॉण्ट’ या रस्त्यावर चितारली आहे. व्वा व्वा! आपलं सगळं चित्त हरण करणारा असा हा ‘फ्रीमॉण्ट’ रस्ता आहे. त्या रस्त्याच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आपल्याला काय दिसतं? तर दिव्यांचा लखलखाट, गाण्याच्या ठेक्यावर नाचणारे दिवे, नाचणारी मुलं, स्त्रिया दिसतात. त्या रस्त्याचं वर्णन करणं फारच कठीण आहे. वरती दिव्यांच्या अन् गाण्यांच्या तालावर निरनिराळी दृश्यं चितारली गेलेलं छत आहे. रस्त्यावर दोन दोन फर्लांगांवर काळ्या पेन्सिलने केलेले गोल. प्रत्येक गोलात एक-एक व्यक्ती किंवा एखादी स्त्री. दिव्यांचा, गाण्यांचा ठेका सतत सुरूच अन् त्या त्या ठेक्यावर, त्या स्त्रिया डान्स किंवा एखाद्या कवायतीचा प्रकार करत असलेली, करणारी काही दृश्यं, काही डान्स पाहताना आपण मात्र हेलावून जातो.

आपणच लाजेने लज्जित होतो, आपणच दुरून चालायला लागतो. आपली नजर वरती छतावरचं दृश्य अन् खालची दिव्य शरीराची कमनीय, बाकदार फक्त विशिष्ट हालचालींची दृश्यं आपण बघत असतो अन् पाहता पाहता दिङ्मूढ होऊन जातो. सकाळी हेच लास वेगास शांत, निर्मळ, स्वच्छ, निरागस, निरामय शहर वाटायचं अन् तोच भाग, तोच रस्ता, त्याच बिल्डिंग, तीच हॉटेलं संध्याकाळी साडेसातनंतर मात्र वेगळ्याच दुनियेत आपल्याला फिरवून आणत असतात. आपल्याच तंद्रीत, आपल्याच मस्तीत, आपल्याच मनस्वी दुनियेत, स्वतःतच मग्न झालेली, इतर काहीही न दिसता आपल्या स्वतःतच रममाण झालेली, मश्गूल झालेली ही रंगिली दुनिया आपण मात्र उगाचंच हतबल होत ते सर्व शांत चित्ताने, विषण्ण मनाने बघत असतो. किती हा विरोधाभास त्या त्याच दुनियेचा! आपण या लास वेगास शहराची रंगिली दुनिया पाहून विचलित होतो, दिङ्मूढ होतो. लास वेगासच्या या रात्रीच्या भुलभुलैया दुनियेत, स्वतःमध्ये गर्क झालेली, मश्गूल झालेली ही दुनिया रात्रीच्या वेळेस केव्हा तरी घरी जाते, ती स्वप्नांच्या दुनियेत झोपी जाते.

दुसऱ्या दिवशी उठून, खाऊन-पिऊन, परत रंगरंगोटी करून, रात्रीच्या दिमाखाला साजेल असा ड्रेसअप करून परत खऱ्याच स्वप्नांच्या दुनियेत रममाण होण्यासाठी, मनमुराद आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडते. लास वेगास हे शहर जसं सकाळच्या वेळेस निर्जीव, शांत, सहजसाधं भावतं, तेच शहर रात्री मात्र रक्त पिसाळून, बेमालूम, वेगळं, तरंगत्या मनाचं, बेधुंद शरीराचं, ठसक्या चटपटत्या दुनियेचं होऊन जातं. आपण मात्र शुद्ध हरपून जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com