काश्मिरी एकतेचा नायक! (लक्ष्मीकांत देशमुख )

काश्मिरी एकतेचा नायक! (लक्ष्मीकांत देशमुख )

मकबूल शेरवानीला चक्क येशू ख्रिस्ताप्रमाणे लाकडी क्रॉस बनवून त्यावर लटकवलं. त्याच्या हातापायात खिळे ठोकले व रायफलच्या एकामागून एक अशा चौदा गोळ्या झाडल्या. पण मकबूल असीम धैर्य दाखवत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणायला नकार दिला. त्याचे मरणापूर्वीचे शेवटचे शब्द होते, ‘हिंदू, मुस्लिम, शीख इत्तिहाद (एकता)!’

‘आज काश्मिरी माणसं स्वत:ला भारतीय समजत नाहीत. त्यांना चीनचं प्रभुत्व स्वीकारार्ह वाटतं!’ ५ ऑगस्ट २०१९ ला नरेंद्र मोदी सरकारनं संविधानाचं जम्मू-काश्मिर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केलं, त्या संदर्भात माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी त्यांच्या बेछूट शैलीत अलीकडे हे विधान करून वाद निर्माण केला आहे. हे विधान मी ऐकलं-वाचलं, तेव्हा मला त्यांच्या दिवंगत वडिलांची शेख अब्दुल्ला यांची आठवण झाली.

हेही वाचा : बिहारची दंगल 

जम्मू-काश्‍मीरमध्ये बहुसंख्य मुस्लीम जनता असूनही जिन्नांच्या ‘द्विराष्ट्र वाद’ सिद्धान्ताला मान्यता न देता व पाकिस्तानला न जाता सेक्युलर भारतात होणारं विलीनीकरण मंजूर केलं होतं.  पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलं असलं व आझादीची भावना तरुण वर्गात प्रबळ असली तरी भारताऐवजी काश्मिरी नागरिक चीनचं प्रभुत्व पसंत करतील हे विधान अत्यंत निंदनीय तर आहेच, पण काश्मिरी लढ्याचाही अपमान करणारं आहे. काहीही करून चर्चेत व जमलं तर सत्तेत येण्यासाठीचा हा फारुक अब्दुल्लांचा वांझोटा खटाटोप म्हटला पाहिजे. सात नोव्हेंबर हा काश्मीरला पाकिस्तान पुरस्कृत कबाली टोळधाडीपासून वाचवण्यासाठी व ‘हिंदू - मुस्लीम - शीख इत्तिहात (एकता) झिंदाबाद!’ म्हणत असीम धैर्यानं मरणास सामोरं जात शहीद झालेल्या बारामुल्लाच्या नॅशनल कॉन्फरन्स कार्यकर्ता मकबूल शेरवानीचा शहीद दिन आहे. फारुक किंवा उमर अब्दुल्ला या पिता-पुत्रांनी कधी या दिनी बारामुल्लास जाऊन श्रद्धांजली वाहिल्याचे माझ्या तरी वाचनात - पाहण्यात आले नाही. मुल्कराज आनंदसारख्या जगत् विख्यात भारतीय इंग्रजी लेखकानं ‘डेथ ऑफ ए हीरो’ ही कादंबरी मकबूल शेरवानीच्या हौतात्म्यावर लिहिली, त्याचं आज किती जणांना स्मरण आहे ? १९८९ नंतर आणि खास करून पंडितांच्या स्थलांतरानंतर जम्मू - काश्‍मीर हे संस्थान भारतात महाराजा हरीसिंग सोबत काश्‍मीरचे सर्वांत लोकप्रिय नेते शेख अब्दुल्लांच्या सहमतीने सामील झालं होतं, हा इतिहास पुसून टाकत निव्वळ धार्मिक प्रेरणेनं आज ‘आझादी’च्या नावानं दहशतवाद चालला आहे, त्यांच्यासाठी मकबूल शेरवानीचं स्मरण त्रासदायक आहे. कारण तो हाडाचा सेक्युलर होता. त्याला व त्याचे नेते शेख अब्दुल्लांना काश्‍मीरच्या सुफी परंपरेच्या काश्मिरियतला सेक्युलर भारतात उचित सन्मान मिळेल म्हणून पाकिस्तान धर्माधिष्ठित राज्य नाकारलं होतं. 

बारामुल्लावर जेव्हा कबाली सेनेनं २६-२७ ऑक्टोबर १९४७ ला हल्ला केला तेव्हा मुस्लीम कॉन्फरन्स व मुस्लीम लीगच्या कार्यकर्ते - नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं, तर मकबूल शेरवानीनं नॅशनल कॉन्फरन्सच्यावतीनं हा काश्मिरियतवर घाला समजून प्रतिकार केला होता. आणि शेवटी हौतात्म्य पत्करलं होतं, हा सारा इतिहास मोठा प्रेरक आहे. तो दुर्दैवानं आज जिहादी वृत्तीच्या अतिरेकी झालेल्या काश्मिरी तरुणांना माहीत नाही, हा काश्मीरचे दुर्दैव म्हटलं पाहिजे.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

शेख अब्दुल्लांनी राष्ट्रीय विचारधारा स्वीकारीत हिंदू व शिखांनाही प्रवेश देण्यासाठी १९३९ मध्ये मुस्लीम कॉन्फरन्सचं चं रूपांतर नॅशनल कॉन्फरन्समध्ये केलं, तेव्हा  शाळकरी असलेला मकबूल शेरवानी त्यात सामील झाला होता. तो शेख अब्दुल्लांना आपला आदर्श मानायचा आणि त्यांचा हिंदू पंडित व शिखांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा विचार मनापासून पटला होता. त्या काळी एक लोकप्रिय घोषणा शेख अब्दुल्लांचं सेक्युलर राजकारण स्पष्ट करायला पुरेशी आहे.

‘शेरे काश्मीर का क्या इरशाद ? हिंदू, मुस्लीम, शीख इत्तिहाद!’ काश्मीरच्या वाघाची काय घोषणा आहे? हिंदू, मुस्लीम, शीख एकता आहे.) (शेख अब्दुल्लांना ‘शेरे काश्मीर म्हटलं जायचं) त्यांच्या सेक्युलर व सुफी संतांच्या धार्मिक सहिष्णुतेच्या विचारांचा मकबूल शेरवानीवर गाढा प्रभाव होता.

त्यामुळे १९४४ साली बॅरिस्टर जिन्नांची पाकिस्तानची भूमिका मांडत काश्मिरी मुस्लिमांनी साथ द्यावी, असं आवाहन करणारी बारामुल्लाची सभा मकबूल शेरवानी व त्याच्या काही मित्रांनी उधळून लावली होती. ही त्याची कृती त्याच्या विचारांची निर्देशक आहे. पण जिन्नांच्या अट्टहासामुळे ‘द्विराष्ट्र सिद्धान्त’ स्वीकारत भारताची फाळणी झाली, पण संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानपैकी एका देशात जाण्याचा जसा अधिकार होता, तसाच स्वतंत्र राहण्याचा पण होता. तो स्वीकारत जम्मू - काश्मीर संस्थानाचे महाराजा हरीसिंग यांनी तूर्त स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्याला भारतानं आक्षेप घेतला नाही, पण पाकिस्तानला तो सहन झाला नाही. जिन्नांच्या संमतीनं पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अलींनी अपारंपरिक युद्धाचा मार्ग स्वीकारत ‘नॉन स्टेट ऍक्ट’ म्हणजे नॉर्थ वेस्ट प्रांताचे पठाण कबाली टोळ्यांना जिहादची साद घालत त्यांना शास्त्र व वाहने देऊन काश्मीरवर आक्रमण करायला पाठवलं. त्यांच्यासोबत पाकिस्तानी सेनेतून सुट्टी घेऊन कबाली वेश धारण करून हजारो सैनिक व काही अनुभवी अधिकारी सामील झाले. आणि २२ ऑक्टोबर १९४७ ला कबाली सेनेनं आक्रमण सुरू केलं आणि प्रथम डोमेल हे संस्थानाच्या सीमेवरचं गाव, मग मुझ्झफराबाद हे मोठं शहर विनासायास जिंकलं. कारण संस्थानाच्या सेनेत बहुसंख्य मुस्लीम होते. त्यांनी कबाली लष्कर हे धर्मरक्षणासाठी व आपली हिंदू राजाज्या जुलमातून सुटका करण्यासाठी आलं आहे, असं मानीत ते कबाली सेनेस जाऊन मिळाले. मुझ्झफराबादमध्ये त्यांच्या टोळीपरंपरेप्रमाणे कबाल्यांनी यथेच्छ लूट केली व स्त्रियांवर अत्याचार केले. आणि २६-२७ ऑक्टोबर १९४७ ला त्यांनी बारामुल्ला काबीज केलं.

तिथंही त्यांनी बुभुक्षिताप्रमाणे लूट व स्त्रियांवर बलात्कार करीत क्रौर्य व निघृणतेची सीमा पार केली. त्यामुळे सारे शहरवासी सुन्न व हाताश झाले होते.

मकबूल शेरवानीनं त्याचा जमेल तेवढा प्रतिकार केला. त्यानं शेख अब्दल्लांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीनगरप्रमाणे बारामुल्लातही नागरी रक्षक सेना - पीपल्स मिलिशिया स्थापन केली होती. पण लाठ्या-काठ्या व तलवार-भात्यांनी शस्त्रसज्ज कबल्यांना मुकाबला करणं शक्य नव्हतं. पण मकबूलला हे पक्कं माहीत होतं की, कबाल्यांना पुढे श्रीनगरचा कब्जा करण्यासाठी ताबडतोब न जाऊ देता, बारामुल्लात दोन-तीन दिवस रोखून धरणं आवश्यक आहे. कारण हरीसिंगनी भारतात विलिन होण्याच्या करारपत्रावर स्वाक्षरी केली होती व २७ ऑक्टोबरपासून भारतीय सेना श्रीनगरला विमानानं यायला सुरुवात झाली होती. त्यांना थोडा प्रतिकार व आक्रमणासाठी थोडा अवधी हवा होता. मकबूल शेरवानीनं कबाली सेनेचा प्रमुख खुर्शिद अन्वरचा एव्हाना विश्‍वास संपादन केला होता. त्याला त्यांना खोटं सांगितलं की भारतीय सेना पट्टण जवळ आली आहे. त्यामुळे खुर्शिदनं पाकिस्तानकडून अधिकची कुमक मागवली. त्यात दोन दिवस गेले आणि भारतीय सैन्य काही बारामुल्लापासून काही अंतरावर असणार्‍या पट्टणला आलेले नाही आणि मकबूलनं खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे, हे लक्षात आल्यावर त्याला पकडण्यात आलं. खुर्शिद अन्वरचा संताप एवढा अनावर झाला होता की, त्यानं मकबूलला चक्क येशू ख्रिस्ताप्रमाणे लाकडी क्रॉस बनवून त्यावर लटकवलं. त्याच्या हातापायात खिळे ठोकले व चक्क रायफलच्या एकामागून एक अशा चौदा गोळ्या झाडल्या. पण मकबूल शेरवानीनं असीम धैर्य दाखवत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणायला नकार दिला. त्याचे मरणापूर्वीचे शेवटचे शब्द होते, ‘हिंदू, मुस्लीम, शीख इत्तिहाद (एकता)!’ तो दिवस होता ७ नोव्हेंबर.

भारतीय सेनेनं प्रथम शालटेंगला कबालींचा सात नोव्हेंबर निर्णायक पराभव केला व रात्रीतून बारामुल्ला काबीज केलं. पण त्यांना तिथे यायला थोडा उशीर झाला होता. मकबूलला कबाल्यांनी त्याच दिवशी दुपारी मारलं होतं!

मकबूल शेरवानीच्या असामान्य धैर्य व समयसूचकतेनं कबालींना भारतीय सेना येण्यापूर्वी श्रीनगरवर हल्ला करून कब्जा करता आला नाही. त्याच्यामुळे श्रीनगर वाचलं व दोन तृतीयांश का होईना जम्मू - काश्मीरचा भाग भारतात राहिला. खरोखरच मुल्कराज आनंदनं कादंबरीत म्हणल्याप्रमाणे तो हीरो - नायक होता. त्याच्या बलिदानानं अवघं जम्मू - काश्मीर पेटून उठलं व गावोगावी कबाली सेनेला नागरिकांनी सैन्याला साथ देत मुकाबला केला, प्रसंगी बचाव तर काही ठिकाणी आक्रमण करीत परास्त केलं. महात्मा गांधींनी पण त्यांच्या एका सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी त्याच्या बलिदानाचे स्मरण करीत गौरवोद्गार काढले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय सेना मकबूल शेरवानीला आजही विसरलेली नाहीय. त्यांनी मकबूलच्या नावे एक ‘मेमोरियल हॉल’ बांधला व दरवर्षी ७ नोव्हेंबरला त्याच्या कबरीवर पुष्पचक्र वाहिले जाते. पण ज्या नॅशनल कॉन्फरन्सचा  तो कार्यकर्ता होता, त्या पक्षानं पुढे त्याची उपेक्षाच केली. आता तर ‘आझादी’ची बांग देणारे अतिरेकी मकबूलला इस्लामचा गद्दार व पाकिस्तानचा दुश्मन समजतात. आज ३७० कलम रद्द झालं आहे व एका अर्थानं काश्मिरचं खर्‍या अर्थानं भारतामध्ये पूर्णपणे इंटिग्रेशन - सामीलीकरण झालं आहे. पण मधल्या काळात काश्मीरची बहुधार्मिकतेची सुफी परंपरा व सहिष्णुवृत्तीची खूण म्हणजे काश्मिरियत पद्धतशीरपणे पुसण्यात येऊन तरुण पिढीस बहावी इस्लाम प्रणित कट्टर विचारानं अतिरेकी बनवलं जात आहे. पण १९४७ साली मकबूल शेरवानीसारखा एक काश्मिरी तरुण सेक्युलर विचारधारा प्रमाण मानत पाकिस्तानचा काश्मिर जिंकू देण्याचा मनसुबा प्राणाचं मोल देऊन हाणून पाडतो व ‘हिंदू, शीख, मुस्लीम इत्तिहात (एकता) झिंदाबाद’ म्हणत प्राण देतो... हे त्याचं बलिदान काश्मीरला कडवं इस्लामी बनवण्यासाठी नव्हतं तर हिंदुस्थानच्या गंगा - जमनी तहजिबशी मिळत्याजुळत्या काश्मिरियतच्या रक्षणासाठी होतं!  हे पुन्हा एकदा काश्‍मीरला व देशाला सांगण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारनं त्याचं बारामुल्लाला उचित स्मारक उभारून त्याचा आदर्श आजच्या काश्मिरी व एकूणच भारतीय तरुणांपुढे आणावा असं वाटतं. आणि त्याला मरणोपरांत किमान ‘पद्मश्री’ किंवा ‘वीरचक्र’ देऊन, त्याच्यावर एखादा लघुपट बनवून त्याची स्मती व त्याचं भारतासाठी व काश्मीरसाठी केलेलं बलिदान चिरंजीव केलं पाहिजे. त्यातूनच कदाचित उद्या काश्‍मीरची दिशाहीन अतिरेकी लढाई संपुष्टात येऊ शकेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com