रोचक व दिशादर्शक यशोगाथा

पाणीप्रश्नाचं स्वरूप हे अत्यंत तांत्रिक आहे, त्यात भूगर्भशास्त्र, हैड्रोलॉजी, आयटी अशा अनेक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शास्त्रांचा संबंध येतो.
book abhinav jalnayak
book abhinav jalnayaksakal
Summary

पाणीप्रश्नाचं स्वरूप हे अत्यंत तांत्रिक आहे, त्यात भूगर्भशास्त्र, हैड्रोलॉजी, आयटी अशा अनेक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शास्त्रांचा संबंध येतो.

आपल्या महाराष्ट्रात आज अनेक व्यक्ती व संस्था पाणीप्रश्नावर खूप मौलिक व मूलभूत स्वरूपाचं काम करीत राज्यव्यापीच नव्हे, तर देशव्यापी सार्वत्रीकरणाची क्षमता व उपयुक्तता असणारे प्रकल्प राबवत आहेत व नवं तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. त्यामुळे मानव समाज प्रज्ञा व विवेकानं वागला, तर या पाणीप्रश्नावर आपण मात करू शकतो, अशी आशा बाळगायला जागा आहे. काही दशकांपूर्वी म्हैसाळचा प्रकल्प, विलास साळुंकेंची पाणी पंचायत आणि विजयअण्णा बोराडेंचा जलसंधारणाचा प्रयोग आदींची राज्यात खूप चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर जेव्हा माझ्या हाती सतीश खाडे यांचं ‘अभिनव जलनायक’ हे पुस्तक आलं, तेव्हा मी चकित झालो व समाधानही वाटलं. कारण या पुस्तकात आज महाराष्ट्रात मनापासून व सर्वस्वाने झोकून देऊन काम करणाऱ्‍या काही वॉटर वारियर्स - जलयोद्ध्यांच्या प्रयोगाच्या यशोगाथा सतीश खाडेंनी सोप्या मराठी भाषेत तांत्रिक माहिती सुलभ व रंजक करून कथन केल्या आहेत.

पाणीप्रश्नाचं स्वरूप हे अत्यंत तांत्रिक आहे, त्यात भूगर्भशास्त्र, हैड्रोलॉजी, आयटी अशा अनेक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शास्त्रांचा संबंध येतो. प्रस्तुत पुस्तकातील सर्वच जलनायकांचं पथदर्शी काम नीटपणे समजून घ्यायचं असेल, तर तांत्रिक माहिती ही सुलभ करून सांगणं आवश्यक आहे. सतीश खाडेंना यासाठी पैकीच्या पैकी मार्क्स दिले पाहिजेत. या साऱ्‍या जलनायकांच्या यशोगाथा वाचताना वाचकांना पाणीप्रश्नांची व्याप्ती व शास्त्रीय गुंतागुंत सहजतेने समजते, हे या पुस्तकाचं सामर्थ्यस्थळ आहे, हे मला विशेषत्वाने अधोरेखित करावंसं वाटतं.

गेली अनेक वर्षं लेखक सतीश खाडे रोटरीच्या माध्यमातून तीन ते सात दिवसांची एक पाणी परिषद निष्ठेने आयोजित करतात. त्याचा उद्देश अर्थातच पाणीप्रश्नांचे विविध पैलू तज्ज्ञांमार्फत सामान्य माणसांना कळावेत हा आहे. या कामात त्यांचा या क्षेत्रात काही एक मूलभूत काम करणाऱ्‍या असंख्य जलयोद्ध्यांशी संपर्क आला, त्यांचं काम खाडेंनी डोळसपणे अवलोकलं, त्यांच्या कामामागचं विज्ञान अभ्यासलं आणि मग त्यातील निवडक अशा जलनायकांच्या अत्यंत रोचक व सोप्या कथा मराठीत कथन केल्या असून, ते पुस्तकरूपाने मराठी वाचकांपुढे आलं आहे. हे पुस्तक अत्यंत प्रेरक व तेवढंच वाचनीय झालं आहे. ते मराठी साहित्याच्या वैचारिक आणि विज्ञानाच्या दालनात मोलाची भर टाकणारं आहे.

पाण्यासकट एकूणच पर्यावरणाची हानी करणारे राजकारणी, संवेदनहीन व बेजबाबदार नोकरशाही, नैसर्गिक संसाधनांची लूट करणारे व्यापारी व उद्योगपती यांच्या हितसंबंधांच्या विरुद्ध जाणाऱ्‍या व शाश्वत उपाययोजना शोधणाऱ्या पुस्तकातील जलनायकांचं काम सोपं नव्हतं. एका टप्प्यानंतर त्यांचा काही ना काही संघर्ष झाला असणारच; पण तरीही समाजहिताचं उच्चध्येय बाळगत आणि कामाप्रति अभंग निष्ठा ठेवत त्यांनी पाणीप्रश्नाच्या विविध प्रश्नांवर जे काम केलं, ते वाचणं हा एक मन प्रबोधित करणारा सुंदर अनुभव आहे.

सतीश खाडे यांचं हे पुस्तक मराठी ही प्रगत ज्ञानभाषा होण्याच्या मार्गावरचं एक दमदार पाऊल आहे, असं मला वाटतं. विज्ञानाची कास धरणाऱ्‍या जलयोद्ध्यांची त्यांनी जी ठसठशीत अशी शब्दचित्रं लिहिली आहेत, त्यामुळे शब्दचित्र हा साहित्य प्रकार नव्याने वाचकांपुढे त्यांनी आणला आहे. पुस्तकाची खुमारी नायकांच्या कामाप्रति समर्पित जीवनासोबत सखोल जलविज्ञानही आल्यामुळे अधिकच वाढली आहे.

पुढील काळात पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे, त्यामुळे जल, जंगल व जमीन - एकूणच पर्यावरणाचं रक्षण झालं नाही, तर मानवजातीपुढे अस्तित्वाचं संकट उभं राहू शकतं व तो दिवस फार दूर नाही, याचे संकेत हे पुस्तक पुरेशा गांभीर्याने व आकडेवारीसह देतं; त्यामुळे सामान्य नागरिकांची जलसाक्षरता वाढीस लागण्यात मदत होईल.

पुस्तकाचं नाव : अभिनव जलनायक

लेखक : सतीश खाडे

प्रकाशक : मेनका प्रकाशन,

पुणे (०२०- २९५२७९६०, २४३३६९६०)

पृष्ठं : २४० मूल्य : ३५० रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com