‘लिव्ह इन’मध्ये राहूनही लग्नाला त्याचा नकार

ॲड. सुनीता एन. जंगम
रविवार, 15 सप्टेंबर 2019

‘एकमेकांवर प्रेम असणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी लग्न करायलाच पाहिजे का?’ यावर मला काही सुचत नाही. मी या नातेसंबंधाला पूर्णविराम द्यावा का? 

मी ३० वर्षांची स्त्री आहे. मी एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. मी गेली ६ वर्षे एका व्यक्तीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. ते पण खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. अधून-मधून परदेशांत जातात. लग्न करणार या वचनावर आम्ही एकत्र आहोत. परंतु, सध्या ते मला काही ना काही कारणे सांगून टाळत आहेत. प्रत्येक परदेश भेटीवरून आल्यानंतर करतो, असे वचन देतात. परंतु, प्रत्यक्षात प्रयत्न करत नाहीत. आता मला खूप टेन्शन आले आहे. कारण माझ्या घरी मी या व्यक्तीबरोबरच लग्न करणार, असे सांगितले आहे. मित्र-मैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी सर्वांना आमच्या नातेसंबंधाची माहिती आहे. माझ्यावर खूप प्रेम आहे असेही ते एकीकडे म्हणतात, दुसरीकडे लग्न करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे माझा त्यांच्यावरचा विश्‍वास उडत चालला आहे. माझेपण त्यांच्यावर खूप प्रेम आहे. कधी-कधी ते म्हणतात, ‘एकमेकांवर प्रेम असणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी लग्न करायलाच पाहिजे का?’ यावर मला काही सुचत नाही. मी या नातेसंबंधाला पूर्णविराम द्यावा का? 

************************************************
आणखी वाचा : लग्नाआधीची ती एक भेट...

************************************************

सध्या अशी समस्या बऱ्याच युवक-युवतींची आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये शिक्षण, नोकरी करण्यात बरेच वय होऊन जाते. हे सर्व करत असताना कुठेतरी प्रेम, आकर्षण असणे या गोष्टी नैसर्गिक आहेत. त्यातून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला पसंती दिली जाते. कायद्यानेही या नातेसंबंधाला परवानगी दिली आहे. तरीदेखील अशा नातेसंबंधामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आपली मते लादू शकत नाही. तुमच्या केसमध्ये विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे आहे. तुम्ही तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घ्या. समुपदेशक त्यांना समजावून सांगतील. या नातेसंबंधाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, हे समजावून सांगतील. खरोखरच सदरील व्यक्ती तुम्हाला खोटे वचन देऊन अडकवून ठेवत आहे का, हेदेखील समुपदेशकांना नजरेतून दिसून येईल. अशा व्यक्तीबरोबर तुमचे भविष्य सुरक्षित, सोयीचे असेल का? हेही सांगतील. त्यामुळे तुम्ही समुपदेशन करून घ्या. त्याचबरोबर भविष्याचादेखील विचार करा. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका निकालामध्ये लग्नाचे खोटे वचन देणे आणि लग्नाचे वचन मोडणे या दोन संज्ञा वेगळ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण सुशिक्षित आहात, परिपक्व आहात, सुज्ञपणे वरील उपाय करून निर्णय घ्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leave in relationship