

Sangtye Aika Marathi Movie
esakal
‘सांगत्ये ऐका’, ‘शिकलेली बायको’ या चित्रपटाच्या यशानं मराठी चित्रपटनिर्मितीच्या जगात चैतन्य आलं. मरगळ गेली. दिनकर द. पाटील, अनंत माने, माधव शिंदे, राजा परांजपे यांच्यासारखे निर्माते, दिग्दर्शक पुढे सरसावले. माडगूळकर बंधू, सुधीर फडके, वसंत पवार, राम कदम यांनी गीत-संगीत-संवाद यांची मैफल सजवली. हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या लोकप्रियतेला टक्कर देत मराठी चित्रसृष्टी उभी राहिली, तर हिंदीत धर्मेंद्र, तनुजा, साधना, जॉय मुखर्जी असे नवे चेहरे अवतरले... रफीच्या ‘खोया खोया चाँद...’ने तरुणाईला पुरतं वेड लावलं...
पन्नासचं दशक सरता सरता मराठी चित्रपटानं जणू कात टाकली. सुरेल चित्रचा ‘शिकलेली बायको’ कोल्हापूरच्या ‘जयप्रभा’मध्ये तयार झाला. नाथ माधव यांची ‘डॉक्टर’ कादंबरी म्हणजे ग्रामीण भागातील युवक आणि त्याची शिक्षित पत्नी असा नाजूक भावनिक संघर्ष होता. उषा किरण आणि सूर्यकांत ही जोडी छान जमली होती. सुरेल भावगीत देणाऱ्या वसंत प्रभूंची दोन चित्रपटगीते ‘प्रेमा काय देऊ तुला’ आणि ‘आली हसत पहिली रात’ संगीतप्रेमींच्या पदरात पडली. शहरी आणि ग्रामीण भागातले प्रेक्षक दिग्दर्शक माधव शिंदे आणि पटकथा संवाद लिहिणाऱ्या दिनकर द. पाटील यांनी खेचून आणले, तर ‘सांगत्ये ऐका’ हा पटकथा-संवाद लिहिणाऱ्या व्यंकटेश माडगूळकरांनी, गाणी लिहिणाऱ्या ग.दि.मांनी संगीतकार वसंत पवारांनी आणि निर्माते दिग्दर्शक अनंत माने यांनी ऐतिहासिक यशाचा मानदंड निर्माण केला. पुण्याच्या ‘विजयानंद’मध्ये सलग १३१ आठवडे मुक्काम करणाऱ्या ‘सांगत्ये ऐका’ने सर्वांचं लक्ष वेधलं. हंसा वाडकर, सुलोचना, जयश्री गडकर, सूर्यकांत, चंद्रकांत, रत्नमाला अशी भारी कलाकारांची टीम जमली होती. पुण्याच्या ‘प्रभात’ स्टुडिओत तयार झालेल्या ‘सांगत्ये ऐका’नं एक नवचैतन्य आलं. ‘बुगडी माझी सांडली गं’ ने लावणीचं आकर्षण वाटू लागलं आणि लावणीनृत्याचंही!