'वडीलकी'चं अवघड वळण (डॉ. वैशाली देशमुख)

'वडीलकी'चं अवघड वळण (डॉ. वैशाली देशमुख)

प्रिय चिनू,

काल सहज जुने फोटो बघत होतो. माझे लहानपणाचे वाढदिवसांचे, बक्षीस समारंभांचे, आम्ही कुठंकुठं केलेल्या ट्रिप्सचे, असे कितीतरी फोटो होते त्यात. मला एकदम आमचं ते जुनं, छोटंसं घर आठवलं. एका वाड्यात, भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही. खासकरून आठवतायत ते हायस्कूलचे दिवस! त्यावेळची अस्वस्थता, हुरहूर आठवतेय. ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,’ ही विचित्र मनोवस्था अनुभवलीय त्यावेळी. आई-बाबांशी कधी त्याविषयी बोललो नाही, तशी टापच नव्हती; पण बोलायला भावंडं, वाड्यातले दादा, मित्र भरपूर होते. त्यांच्याकडून जी काही माहिती मिळायची ती त्रोटक असायची; पण आमचं समाधान व्हायचं त्यानं. रंगीत चित्रांची पुस्तकं, इंटरनेट, टीव्ही, मोबाईल असलं काही नव्हतंच. 

आता मी बाबांच्या भूमिकेत आलोय. तू माझा एकुलता एक मुलगा. मोठा व्हायला लागलायस. आजकाल अनेक गोष्टींबाबत आमची ढवळाढवळ तुला खपत नाही. तुझ्या खोलीचं दार बंद असताना एकदम आत कुणी आलेलं तुला चालत नाही. स्मार्ट फोनची तुझी मागणी हळूहळू हट्टाकडे झुकायला लागलीय. अभ्यासाविषयी प्रश्न विचारले तर तू वैतागतोस. परवा तुला मित्रांबरोबर सायकल घेऊन टेकडीवर जायचं होतं. हे तुला हवं असलेलं स्वातंत्र्य फार अती वाटतं. तुझ्या मागण्या अवास्तव वाटतात; पण हेही पटत असतं, की माझ्यासाठी तू कायम छोटा मुलगाच राहणार आहेस. तू मात्र हळूहळू तुझा निरागसपणा विसरून जाशील. खेकसणारा, बेदरकार टिपिकल टीनएजर होशील. प्रौढ दिसणारा चेहरा, त्यावरच्या दाढीमिशा, पिंपल्स या सगळ्यातून माझा चिनू सापडणं मला कठीण जाईल.

तू मोठा झालायस, तुझी स्वत:ची मतं आहेत हे लक्षात ठेवायला लागेल मला. नाही तर जेव्हा तू मला काही सांगायला हवंस असं वाटेल तेव्हा तू ते टाळशील. तुला पकडायचा प्रयत्न करताकरता हातून केव्हा सुळकन्‌ सुटून जाशील, पत्ताही लागणार नाही. तू सांगितलेली एखादी गोष्ट कितीही अप्रिय वाटली, तरी पटकन्‌ प्रतिक्रिया देण्याचा आवेग टाळायला हवा, हे कळतं; पण वळत नाही. इतकी सवय झालीये तुला सारख्या सूचना द्यायची! पण मग माझी चिंता आणि काळजी कशी पोचवू तुझ्यापर्यंत? मी काही सांगितलं, की तुझा त्रागा दिसतो तुझ्या देहबोलीतून आणि तुझ्या शब्दांतून. तुला ती कटकट वाटते, तुझ्या चेहऱ्यावर वैतागलेले, कंटाळलेले भाव येतात. माझ्या बोलण्याकडं तुझं लक्ष नाहीये, हे स्पष्ट दिसतं. मग मात्र माझा पारा चढतो. आपल्या संवादाचा बोऱ्या वाजतो.... पण काय करू, चाचणी परीक्षेत कमी मार्क्‍स पडण्यासारखी काहीतरी छोटीशी गोष्ट घडते आणि विचार कुठच्या कुठं जाऊन पोचतात. आजूबाजूची स्पर्धा बघता तुला अभ्यास करण्यावाचून आणि मार्क्‍स मिळवण्यावाचून पर्याय नाही. तुझ्या पुढच्या ॲडमिशन्स, डिग्री, करिअर या सगळ्यासाठी तयारी करण्याची हीच तर वेळ आहे. या आव्हानाची तीव्रता तुझ्या का लक्षात येत नाही? कधी तुझा संताप बघून वाटतं- तू हिंसेच्या मार्गानं तर जाणार नाहीस? कधी कधी छोट्याशा गोष्टीनं हिरमुसला होतोस तेव्हा वाटतं- तू डिप्रेशनमध्ये तर जाणार नाहीस? तुझ्या भविष्याची चिंता वेताळासारखी मानगूट सोडत नाही, पुनःपुन्हा येऊन बसते आणि विक्रमादित्यासारखा मीही माझा हट्ट न सोडता पुनःपुन्हा ती चिंता गोंजारत बसतो.

आपल्या दोघांसाठीही हा काळ आव्हानात्मक असणार आहे. अनेक प्रश्न मनात येतायत. किशोरवयातल्या वादळामधून मीही गेलेलो असलो, तरी तुझं किशोरवय माझ्यापेक्षा वेगळं असणार आहे, याची मला कल्पना आहे. माझ्या काही मित्रांची मोठी झालेली मुलं मी बघतो तेव्हा चक्रावून जातो. आयुष्याकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे हे जाणवतं. तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळं त्यांच्याकडं माहितीचा खजिना असतो. त्यांची मूल्यं, नीती-अनीतीच्या कल्पना वेगळ्या आहेत, अधिक धाडसी आहेत. त्यांच्या वयाचे असताना आपली मतं इतकी ठाम नव्हती, काहीसे बावळटच होतो आपण, असं वाटून जातं. 

कुठं तरी मी वाचलं, की वयात येणाऱ्या मुलांसाठी बाबांची भूमिका फार महत्त्वाची असते; पण खरं सांगायचं तर माझी नक्की काय भूमिका असेल हे फार अस्पष्ट आहे मला. माझ्या बाबांसारखं दूर काठावर, अलिप्त राहावं, की तुझ्या हाताला धरून तुझ्याबरोबर हा प्रवास करावा? माहिती द्यावी का? दिली तर काय, केव्हा, कशी आणि किती? तुझ्या बोलण्या-वागण्यावर माझी काय प्रतिक्रिया असेल आणि काय असायला हवी? तुझं उद्धट बोलणं दुरुस्त करावं की वयाचा गुण म्हणून सोडून द्यावं? वयात येताना प्रेमात पडणं, मित्रांच्या आग्रहानं सिगारेट ओढून बघणं, घरी न सांगता काहीतरी धोकादायक उद्योग करणं या गोष्टी मी केल्या आहेत, हे तुला सांगायचं की नाही? आणि सांगितलं तर तुला ते करण्याचा परवानाच दिल्यासारखं नाही का होणार? 

तुझ्याबरोबर टीव्ही बघत असलो, की फार संकोचायला होतं. प्रत्येक गोष्ट सेक्‍शुअल झालीय. तथाकथित कौटुंबिक मालिका असोत, की मध्येमध्ये लागणाऱ्या जाहिराती, सिनेमातले नाच असोत, की रिॲलिटी शोज! तुझ्या वयापलीकडच्या गोष्टी तुला बघायला लागतायत म्हणून वाईट वाटतं आणि त्या पाहून तू काहीतरी प्रश्न विचारलास, तर कसं उत्तर द्यायचं याचं टेन्शन येतं. लहानपणी तू काही विचारलंस, की ‘तू मोठा झाल्यावर सांगेन’ असं सांगायचो. आता तर तू मोठा झालायस. आता फार वेळ पुढं ढकलता नाही येणार मला आणि मी सांगितलं नाही, तर तू पुन्हा मला काही विचारणारच नाहीस किंवा इंटरनेटवरून चुकीच्या पद्धतीनं शोधून काढशील, ही भीती आहेच. 

तुला या धोकादायक, हिंसक जगाला स्वतंत्रपणे तोंड द्यायचंय. प्रत्येक वेळी आम्ही तुझ्याबरोबर असणार नाही. त्यासाठी तुला सक्षम करायला हवं. आणि तुला सांगू, हे जग जितकं भीतीदायक तितकंच सुंदर, अद्‌भुत आणि रोमांचकही आहे. जितकं तू स्वत:ला चौकटीच्या बाहेरचे अनुभव देशील, उघड्या डोळ्यांनी आणि पुरेशा सावधपणे त्याकडं बघशील तितक्‍या तुला त्यातल्या शक्‍यता दिसायला लागतील. 

एक कबुली द्यायचीय मला. वयात येताना शरीरात आणि मनात होणारे बदल नक्की कसे होतात आणि त्याची माहिती तुला कशी सांगायची हे मला नीटसं माहिती नाहीये. तितकं गंभीर, मनातलं बोलायची सवयही नाहीये. एरवी काही बोलायचं असलं, की मी ते तुझ्या आईवर सोपवून देतो. या संवेदनशील विषयांवर तुझ्याशी बोलायची मला सवय करून घ्यायला हवी. त्यासाठी आधी अधिक माहिती घ्यायला हवी. त्यासाठी आजच प्रयत्न सुरू करतो.

मी हे पत्र लिहिलंय खरं; पण ते तुझ्यापर्यंत पोचवण्याचं धाडस मला होईल, की नाही कुणास ठाऊक; पण या निमित्तानं माझ्या मनातल्या प्रश्नांना वाचा तरी फुटली.

काहीसा गोंधळलेला,
तुझा बाबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com