केसरीवाडा

टिळकांच्या मूळ वाड्यात त्यांची बैठकीची खोली, तसंच ग्रंथालय होतं. अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी व सल्लामसलती याच ठिकाणी होत असत.
kesariwada
kesariwadasakal

- अंजली कलमदानी

टिळकांच्या मूळ वाड्यात त्यांची बैठकीची खोली, तसंच ग्रंथालय होतं. अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी व सल्लामसलती याच ठिकाणी होत असत. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर महत्त्वाच्या चर्चा इथंच घडल्या. टिळक त्यांचे लेखनिक अप्पाजी विष्णू कुलकर्णी यांना ‘केसरी’चे अग्रलेख इथंच सांगत असत.

राज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशा शब्दांत ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध स्वातंत्र्यसंग्रामाचं आंदोलन छेडणाऱ्या लोकमान्य टिळकांची कर्मभूमी पुणे! टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. शिक्षक, प्राध्यापक, संपादक, इतिहासकार, क्रांतिकारक, प्रखर स्वराज्यवादी...

''केसरी''मधून स्वतःची मतं ठामपणे मांडणाऱ्या टिळकांचं पुण्याशी दृढ नातं होतं. सार्वजनिक गणेशोत्सवाची नांदी त्यांनी पुण्यात केली. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे लोकनायक असलेल्या टिळकांचं वास्तव्य पुण्याच्या नारायण पेठेत होतं. लोकप्रेम, मित्रप्रेम आणि कुटुंबप्रेम हे त्यांच्या हळुवार स्वभावाचे भाग होते.

टिळकांचं वास्तव्य काही काळ शनिवारवाड्याजवळील विंचुरकरवाड्यातही होतं. त्या वेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांच्याबरोबर काही दिवस एकत्र घालवले होते. पुढं १९०४ मध्ये टिळक हे नारायण पेठेतील गायकवाडवाड्यात राहायला आले. हा वाडा आता ''टिळकवाडा'' या नावानं प्रसिद्ध आहे. त्याला ''केसरीवाडा'' असंही म्हणतात.

हा वाडा लाकूडकामात पारंपरिक, तत्कालीन शैलीस अनुसरून कौलारू उतरत्या छताचा होता. त्याचं जुनं छायाचित्र उपलब्ध आहे. आजूबाजूच्या वाड्यांशी साधर्म्य असणारी ही टुमदार वास्तू फोटोतही उठावदार दिसते.

वास्तूचा काही मूळ भाग जुन्या झालेल्या परिस्थितीत तसाच होता, तर काही भागाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. वाड्याच्या समोरील चौकाभोवतीच्या व रस्त्यालगतच्या भागाचंही नूतनीकरण होऊन तिथं आधुनिक इमारत,

''केसरी''चं व इतर कार्यालयं आहेत. लोकमान्य टिळकांचा जीवनपट सांगणारे फोटो, महत्त्वाची कागदपत्रं यांचं संग्रहालय नवीन इमारतीत आहे. टिळकांनी सुरू केलेला केसरीवाड्याचा गणपतीही इथंच स्थानापन्न आहे. या वाड्याचं जतन-संवर्धन करण्याचा प्रस्ताव टिळक कुटुंबीयांनी मांडला व पूर्णत्वास नेला.

दरम्यानच्या काळात मूळ वाड्यात काही बदल केले गेले होते; विशेषतः पहिल्या मजल्यावर माळ्याच्या जागी जागेची उंची वाढवून उतरत्या छताचं स्वरूपच बदलण्यात आलं होतं व बाहेरील बाजूनं या वाढीव मजल्यावर मेघडंबरीमध्ये टिळकांचा पुतळा बसवलेला होता.

पारंपरिक वाड्यात नवीन सामग्रीनं बदल करण्यात आले होते. जास्तीच्या जिन्यानं टिळकांच्या अभ्यासिकेचा दरवाजा बंद केला गेला होता. मागच्या बाजूनं जमीन खचल्यामुळे काही भागाचा पाया डळमळीत होता. पुन्हा जुन्या वास्तूत रूपांतरित होताना या ऐतिहासिक वाड्याचे अस्तित्वातील बदल व नियोजित उलटा प्रवास यासाठी वास्तूची संपूर्ण रेखांकनं,

अस्तित्वातील खराब झालेल्या भागांची, लाकडांची तपशीलवार नोंद ‘किमया’च्या वास्तुविशारदांच्या गटानं केली. सत्यजीत चव्हाण या तरुण वास्तुविशारदानं बारकाव्यांनिशी वास्तूची सर्व निरीक्षणं तपशीलवार तयार केली. पुणे महानगरपालिकेच्या हेरिटेज कमिटीची रीतसर परवानगी घेऊन जतन-संवर्धनास सुरुवात झाली.

जास्तीची उंची व मूळ वाड्याशी फारकत असलेलं काम काळजीपूर्वक उतरवण्यात आलं. स्थैर्याच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर जुनी कुजलेली लाकडं, दरवाजे काढून टाकून नवीन लाकडांमध्ये छताचं काम मूळ पद्धतीनं पूर्ण करण्यात आलं. भिंतींना प्लॅस्टरच्या जागी चुन्याचं प्लॅस्टर पारंपरिक पद्धतीनं करताना लाकूड व मोडकळीस आलेल्या भिंती नव्या रूपात उभ्या राहिल्या.

मधल्या मजल्याचं कुजलेलं लाकूडकाम उतरवून ते नव्यानं करून त्यावर फरशीकाम करण्यात आलं. पाया भक्कम झाला. लाकूडकामाला पॉलिश केल्यानं त्याचं मूळ रूप उजळलं. विद्युतीकरण सौम्य पद्धतीनं करताना वाड्याचं मूळ स्वरूप अबाधित राहील याची काळजी घेण्यात आली.

वाड्याचे जीर्ण झालेले घटक बदलण्यात आले. विसंगत बांधकाम उतरवण्यात आलं. त्यामुळे मूळचा वाडा परत कात टाकून मूळ स्वरूपात रूपांतरित झाला आहे. सचिन विश्वकर्मा या कंत्राटदाराच्या गटानं मनःपूर्वक काम केलं.

टिळकांची अभ्यासिका मूळ पारंपरिक पद्धतीनं सजवण्यात आली आहे. अभ्यासिकेत व तिच्यालगतच्या भागात टिळक कुटुंबीयांनी टिळकांच्या वस्तू मूळ स्वरूपात ठेवल्या आहेत. खुर्चीत बसलेल्या टिळकांचा पुतळाही अभ्यासिकेत आहे. एखाद्या वास्तूचं जतन-संवर्धन करताना तटस्थपणे करणं अवघड असतं. जेव्हा त्याचा संदर्भ माहीत असतो तेव्हा संवेदनशीलता जागृत असते.

टिळकांच्या वाड्याचं काम करताना शाळेतील इतिहासाच्या अभ्यासात वाचलेली पानं, टिळकांच्या गोष्टी मनात रुंजी घालत असत. वाड्याचं जतन-संवर्धन पूर्ण झाल्यावर एकदा जिन्याच्या टोकाशी वरच्या मजल्यावर उभं राहून खाली पाहताना वाटलं की,

मंडालेच्या तुरुंगवासानंतर १५ जून १९१४ च्या रात्री टिळक जेव्हा परतले आणि धीम्या गतीनं याच पायऱ्या चढून वर आले तेव्हा काय विचार चालले असतील बरं त्या वेळी त्यांच्या मनात! या विचारानंच मनात एक अनामिक लहर तरळत गेली व नतमस्तक होऊन आम्ही त्या जिन्यालाच प्रणाम केला.

तसं पाहिलं तर केसरीवाडा हा तत्कालीन पुण्यातील पारंपरिक वाडा; पण त्याचं असामान्य महत्त्व यासाठी की एकेकाळी लोकमान्य टिळकांचं वास्तव्य या वाड्यात होतं! हा वाडा केवळ पुणेकरांसाठीच नव्हे तर, समस्त भारतीयांसाठी वंदनीय अशी वास्तू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com