गारेगार... थंडगार (माधव गोखले)

गारेगार... थंडगार (माधव गोखले)

आइस्क्रीम म्हणजे खाद्यानंदाचा परमोच्चबिंदू. रंग, रस, स्वादानं सगळ्या जगाला भुरळ घालणारा, काळाबरोबर बदलणारा आणि जिथं जाईल तिथल्या चवी स्वीकारत सदैव तरुण राहणारा हा पदार्थ. गोठणं हा चैतन्याचा अंत मानला जातो; पण गोठलेलं आइस्क्रीम मात्र गेली कित्येक शतकं खाद्ययात्रेला चैतन्य देत आलं आहे. या अफलातून पदार्थाच्या प्रवासाची ही ‘गारेगार’ कथा.

अखेरीस आख्यायिका म्हणजे तरी काय?... अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर पणज्यांकडून आज्ज्याकडं, त्यांच्याकडून मुलांकडं, मुलांकडून त्याच्या मुलांकडं अशा पिढ्यान्‌ पिढ्या वारसाहक्कानं जात राहणाऱ्या कथा. पिढ्यांकडून पिढ्यांकडं स्रवणाऱ्या या कथांसाठी दर वेळी पुरावे लागतातच, असं नाही. आख्यायिकांचं मूळ सापडत नाही, आणि ते शोधूही नये; कारण अनेकदा आख्यायिकांना एकच एक सुरवात असतेच, असं नाही. आधुनिक सु‘रस’यात्रेतली अशीच एक आख्यायिका म्हणजे आइस्क्रीम्स. म्हटलं तर हाही बर्फच. बर्फाचीही गंमत आहे. इंग्रजी भाषेशी झटापट सुरू झाल्यावर केव्हा तरी ‘स्नो’ आणि ‘आईस’मधला फरक कोणाकडून तरी कळला. ‘हिम’ आणि ‘बर्फ.’ दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. शब्दांना स्वभाव असतात असं मानलं, तर बर्फ म्हणजे थंड. भावनाविहीन. झोंबरा. ‘हिम’ म्हणजे शुभ्र. मऊसूत. भुरभुरणारी, आवाज न करता झरत राहणारी मुलायम रिमझिम. आपण बऱ्याचदा सगळ्यालाच सरसकट बर्फ करून टाकतो; पण हाच बर्फ दूध, साखर, एखाद्या फळाचा रस किंवा अन्य एखाद्या स्वादाचं लेणं लेवून येतो, तेव्हा त्या बर्फाचं रूपडंच पालटलेलं आसतं. जिभेवर पडताक्षणीच अगदी एखाद्या गोठलेल्या अरसिक आत्म्यालाही आपादमस्तक हलवून टाकणारं. रंग, रस, स्वादानं सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या; काळाबरोबर बदलत जगात जिथं-जिथं गेलं, तिथल्या चवी स्वीकारत सदैव तरुण राहणाऱ्या आइस्क्रीम्सची कूळकथाही अशाच दंतकथांच्या जातकुळीतली.

म्हटलं तर आइस्क्रीमची कथा काही हजार वर्षांपासून ते सातशे-साडेसातशे वर्षांपर्यंत मागं जातं. म्हटलं तर ती तशी अगदी अलीकडची. जेमतेम साडेतीनशे वर्षांपूर्वीची. काही खाद्य इतिहासकार आइस्क्रीमला इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सच्या काळात नेतात, तर काही जणांच्या मते आइस्क्रीमचं मूळ सापडतं चीनमध्ये, तर आणखी काहींच्या मते शुभ्र हिमाच्छादित पर्वतशिखरांवरून मुलायम हिम आणवून त्यात दूध, फळं, मध असे पदार्थ मिसळून एक थंडगार मिठाई तयार व्हायची जग जिंकणाऱ्या सिंकंदराच्या राजवाड्यात. आणखी काही जण हा शोध ‘रोम जळत असताना फिडल वाजवत बसल्यानं’ इतिहासात बदनाम झालेल्या रोमनसम्राट निरोच्या नावावर मांडतात. मात्र, आइस्क्रीमच्या इतिहासातली सर्वांत लोकप्रिय आख्यायिका आइस्क्रीम युरोपात घेऊन जाण्याचं श्रेय देतं ते मार्को पोलोला. इटलीतल्या या दर्यावर्दी व्यापाऱ्यानं चीनच्या सफरीत पहिल्यांदा हा अद्‌भुत पदार्थ चाखला, आणि त्यांनी तिथून तो इटलीत नेला. भारतीय खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासकांच्या मते भारतात आइस्क्रीम आलं ते मुघलकाळात- अरबस्तान, अफगाणिस्तानमार्गे.

ही कूळकथा काहीही असो, गेली कित्येक शतकं बर्फ, दूध आणि विविध चवीच्या रसांचं हे मिश्रण जगाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येकाला भुरळ घालतं आहे. आइस्क्रीम न आवडणारी मंडळी भेटतील; पण आइस्क्रीमचा तिरस्कार करणारे महाभाग विरळेच असतील. सध्याचे भाजून काढणारे दिवस तर आइस्क्रीमप्रेमींसाठी पर्वणीच. शाळांना सुट्या पडलेल्या असाव्यात, एखाद्या मामाच्या, मावशीच्या किंवा आत्याच्या घरात चुलत, आत्ते, मामे, मावस भावंडांनी दंगा मांडलेला असावा, दिवसभर कडक उन्हात तापून निघालेला दिवस कलताना कुठूनशा येणारी थंडगार झुळूक दिलासा घेऊन यावी आणि अशा वेळी आइस्क्रीमचा ‘बूट’ निघावा.... किंवा अचानक झोडपून काढणाऱ्या वळवाच्या सरींनी ओलंचिंब झाल्यावर गळणाऱ्या पागोळ्या चुकवत एखाद्या झाडाखाली, पुलाच्या कमानीखाली, कुठल्याशा आडोशाला उभं असावं आणि त्याच आडोशाला, त्याच पावसात तसाच चिंब भिजलेला आइसफ्रूटवाला सायकलीवरची आपली पेटी सांभाळत उतरावा; आणि त्या आइसफ्रूटच्या पेटीतून असंख्य ओल्या आठवणींनी फेर धरावा.... तुडुंब जेवण झालेलं असावं आणि पानाच्या आधी आइस्क्रीम कोणाकोणाला अशी विचारणी व्हावी आणि यच्चयावत हात वर व्हावेत.  
वाढत्या उन्हाबरोबर आइस्क्रीमचा भाव (इथं ‘भाव’चा अर्थ ‘महत्त्व’ असाही घ्यावा) वाढत जात असला, तरी हा एक खाद्यपदार्थ वय, लिंग, पंथ, स्थळ, काळ, वेळ, ऋतू यांच्या बंधनात अडकून पडलेला सहसा दिसत नाही. अगदी थंडीतही आइस्क्रीमप्रेमींची गर्दी खेचणारी आइस्क्रीमची ठाणी प्रत्येक गावात सापडतात. आइस्क्रीमच्या व्यवसायाची जगभरातली उलाढाल कित्येक लाख कोटींच्या घरात असली, त्यात नवे, जुने, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असंख्य ब्रॅंड असले, तरी जगभरात असंख्य गावातल्या असंख्य ‘गारेगार’वाल्यांनी, कुल्फीवाल्यांनी आणि आइस्क्रीम ‘मंदिरं’ ते ‘पार्लरां’नी आपापले अस्तित्वही टिकवून ठेवलं आहे. पारंपरिक उद्योगांपासून ते खाण्यापिण्याच्या सवयींपर्यंत जुनं संपून नवं येत राहण्याच्या सध्याच्या लाटेत टिकून राहिलेला घरगुती ते मल्टिनॅशनल्सपर्यंतची आइस्क्रीम्स हा एक अपवाद असावा.
***

आइस्क्रीमच्या ज्ञात-अज्ञात इतिहासकारांनी पारंपरिक माहितीच्या आधारे केलेल्या नोंदी मात्र आईस्क्रीमच्या मूळ रूपाचं श्रेय चिनी बल्लवाचार्यांच्या पारड्यात टाकतात. चीनमध्ये इसवी सनाच्या आधीपासून हिमवर्षावातून मिळणारा बर्फ, दुधाची मलई आणि अन्य काही रसांचं मिश्रण करत असत. मुख्यतः तो आइस्क्रीमपेक्षा आजच्या सरबतांशी जवळीक सांगणारा असावा, अशा नोंदी वाचायला मिळतात. खारट पाण्यात मातीचं भांडं ठेवून पाणी किंवा अन्य काही पदार्थ गार करण्याची युक्ती जगात अनेकांना पूर्वापार माहीत होती. हीच पद्धत वापरून चीनमध्ये बर्फ बनवायला सुरवात झाली. खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत म्हणाल, तर कदाचित नैसर्गिक हिम गोळा करून तो वापरण्याचा खटाटोप करण्याच्या त्या दिवसांत, बर्फ तयार करणं हा शोध आगीच्या शोधाइतकाच क्रांतिकारक असणार. जगातल्या आईस्क्रीम उत्पादकांची एक संघटना आहे. ती आहे अमेरिकेत. या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आइस्क्रीम मॅन्युफॅक्‍चरर्सनी (आता ही संस्था इंटरनॅशनल डेअरी फूड असोसिएशनचा भाग आहे) १९७८ मध्ये ‘द हिस्ट्री ऑफ आइस्क्रीम’ प्रसिद्ध केलं. त्यांच्याही मते आइस्क्रीमच्या ‘कूळ’कथेची सुरवात फक्त आख्यायिकांच्या रूपातच जिवंत आहे.

सतराव्या शतकात इंग्लंडचे राजे पहिले चार्ल्स यांनी एक मेजवानी आयोजित केली होती. राजेशाही थाट होता. राजवाड्यातल्या मुदपाकखान्यातलं सारं कौशल्य जणू पणाला लागलं होतं. मेजवानी शेवटाकडं झुकत असताना राजाच्या पदरी असलेल्या फ्रेंच बल्लवाचार्यांनी एक खास पदार्थ सादर केला. खूप जामानिमा करून आलेल्या त्या पदार्थानं राजाच्या पाहुण्यांना अचंबित केलं. तो थंड पदार्थ दिसायला नुकत्याच पडलेल्या हिमासारखा दिसत असला, तरी प्रत्यक्षात कितीतरी मलईदार आणि गोड होता. पाहुण्यांनी आतापर्यंत चाखलेल्या सगळ्या डेझर्टसपेक्षा किती तरी वेगळा. या अद्‌भुत पदार्थानं त्या दिवशी चार्ल्स राजाच्या मेजवानीत एक वेगळीच चव भरली. प्रसन्न झालेल्या राजानं त्या फ्रेंच शेफला- त्याचं नाव कॅथरीन डीमिर्को- बोलावून घेऊन हा पदार्थ फक्त राजाच्या मेजवान्यांमध्येच दिसला पाहिजे, असं बजावलं. तो अद्‌भुत हिमपदार्थ करण्याची कृती गुलदस्तातच राहावी म्हणून त्याला दर वर्षी पाचशे पौंडाचा खास बोनस देऊ केला; पण राजाच्या दुर्दैवानं काही वर्षांतच राजा जनतेच्या रोषाला बळी पडला. मिर्कोही दिल्या शब्दाला जागला नाही. हिमपदार्थाच्या कृतीला पाय फुटले. ‘द हिस्ट्री ऑफ आइस्क्रीम’मध्ये लिहिल्यानुसार, आइस्क्रीम या सर्वाधिक लोकप्रिय पदार्थाच्या भोवती फिरणाऱ्या असंख्य आख्यायिकांपैकी ही आणखी एक आख्यायिका.

आपल्याकडंही मुघल काळात बादल्यांमध्ये बर्फ भरून गुलमर्गहून नद्यांमार्गे मैदानी प्रदेशात आणला जात असे. आइस्क्रीमच्याच वंशातली; पण आता खास ‘इंडियन डेलिकसी’ म्हणून जगाला माहीत असलेली आणि आईस्क्रीम्सच्या जमान्यातही आपला तोरा स्वतंत्रपणे टिकवून ठेवणारी कुल्फी याच काळातली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून तयार केलेल्या पदार्थांचं नाव कुल्फी. कुल्फी म्हणजे खरं तर ‘पदार्थ तयार करायचा साचा’ असा उल्लेख विष्णू मनोहर यांच्या एका पुस्तकात आहे. साच्याचंच नाव आतल्या मिश्रणालाही चिकटलं आणि जगभर गेलं. खारट पाण्याचा वापर करून पदार्थ थंड ठेवण्याची क्‍लृप्तीही मुघल काळात वापरली जायची.
आइस्क्रीमचं जनकत्व कोणा एकाकडं जात नाही एवढाच या सगळ्या आख्यायिकांचा अर्थ. जगज्जेता सिकंदर आणि सम्राट निरोपासून, इसवी सनापूर्वी खारट पाणी वापरून पदार्थ थंड करणाऱ्या चिन्यांपासून ते सोळाव्या-सतराव्या शतकातल्या अनेक पाककलाकृतीनिपुणांच्या आपापल्या प्रयत्नांचा परिपोष म्हणजे आज महानगरांपासून ते खेड्यापाड्यातल्या आबालवृद्धांना भुरळ घालणारं आइस्क्रीम. कोणत्याही ऋतूत जिभेवर रेंगाळणारी त्याची चव आणि त्याभोवती उभी राहिलेली कोट्यवधी रुपयांची उलाढाल.

आधुनिक आइस्क्रीमचा प्रवास
आधुनिक आइस्क्रीमचा प्रवास सुरू होतो अठराव्या शतकापासून. ऑक्‍सफर्ड शब्दकोशातल्या उल्लेखाप्रमाणं आइस्क्रीम हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला १७४४च्या आसपास. अमेरिकेत पहिलं आइस्क्रीम पार्लर सुरू झालं १७७६मध्ये. आइस्क्रीम म्हटल्यावर आज जे डोळ्यांसमोर येतं त्याचं श्रेय आइस्क्रीमच्या इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणं सॅली शेड या कृष्णवर्णीय अमेरिकन महिलेकडं जाते. त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष जेम्स मॅडिसन यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दिलेल्या पहिल्या पार्टीच्या निमित्तानं मॅडिसन यांच्या पत्नी डॉली मॅडिसन यांनी आइस्क्रीमला व्हाइट हाउसची दारं उघडून दिली. ही गोष्ट १८१३मधली. त्याआधी १७७४मध्ये फिलिप लेंझी नावाच्या फ्रेंच केटररनं आइस्क्रीमसह लंडनहून आणलेल्या काही खास पदार्थांची जाहिरात न्यूयॉर्कमधल्या वर्तमानपत्रांमध्ये केली होती; पण व्यवसाय म्हणून आइस्क्रीमचं उत्पादन सुरू व्हायला १८५१ वर्ष उजाडावं लागलं.

कुल्फी मुघलकालीन असली, तरी आईस्क्रीम आपल्याकडे कसं आलं, याबद्दल काही निश्‍चित उल्लेख सापडत नाहीत. सरबतं, फालुदा, थंडाई अशा पदार्थांचा वावर असला, तरी विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातल्या वैयक्तिक लिखाणांमध्येही आइस्क्रीमचे फार उल्लेख आढळत नाहीत; पण आपल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीच्या तुलनेत कानामागून आलेल्या या लुसलुशीत बर्फील्या पदार्थानं आपलंही खाद्यजीवन व्यापून टाकलं आहे. एके काळी लग्नसमारंभाची उंची रिसेप्शनमध्ये आईस्क्रीम कोणतं आणि किती आहे, यावर ठरायची. जिलबीच्या किती चवडी किंवा लाडवांची ताटं उडवली, याचे पूर्वी जसे हिशेब मांडले जायचे, तसे अमुकच्या लग्नात आइस्क्रीमच्या किती प्लेटी उडवल्या या आठवणींत मंडळी रमायची. त्या वेळच्या सर्वांत लोकप्रिय ब्रॅंडचं आइस्क्रीम किंवा त्या-त्या गावांतले कावरे, गणू शिंदे, सोळंकी, बुवा, राजमंदिर यांच्याकडचे सर्वांत भारी ब्रॅंड्‌स किंवा रिसेप्शनला ऐन वेळी आइस्क्रीम कमी पडायला नको म्हणून आणखी अर्धा डझन आइस्क्रीम पॉट्‌स कसे आणले किंवा आणले नाहीत म्हणून व्याही कसे खूष किंवा नाराज झाले आणि मग ती नाराजी नंतर बारशाला कशी भरून काढली अशा सुरस (आणि चमत्कारिकही) कथा मोठ्यांच्या गप्पांत पेंगुळलेल्या अवस्थेत ऐकल्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. आता हॉटेलांत होणारे विवाह समारंभ सोडले, तर बऱ्याचशा लग्नांत रिसेप्शनलाच फाटा मिळाल्यानं हा मुद्दाच येत नाही.

अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत आइस्क्रीम खाणं इतकं सहजशक्‍यही नव्हतं. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तसा तो चैनीचाच भाग होता. दारावर येणारी आईसफ्रूट, कुल्फी किंवा बर्फाचा गोळाही ‘कसलं पाणी वापरत असतील’ किंवा ‘कुठला बर्फ वापरला असेल देव जाणे’ या प्रश्‍नावर निकालात निघायचा. एखाद्या वेळी आई किंवा पाहुणा म्हणून आलेला एखादा काका, मामा किंवा आज्जी प्रसन्न व्हायची आणि तो दैवी ऐवज पदरात पडायचा. आजची कर्ती पिढी मात्र पुढच्या आणि मागच्या पिढीला सोबत घेऊन फॅमिली पॅकची मजा लुटतातच; पण कुल्फी किंवा बर्फाच्या गोळ्यांच्या ‘पार्लर’पुढंही गर्दी करतात. (हल्ली आईस्क्रीम आणि कुल्फीसारखे बर्फाच्या गोळ्यांतही पारंपरिक कालाखट्टाला पारच ‘आउटडेटेड’ ठरवणारे केशर, पिस्ता, मलई वगैरे फ्लेवर आलेत. बर्फ मिनरल वॉटरचा असतो आणि गोळा पार्लर एसी.)
एक मात्र खरं, भावंडांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना जमवून आइस्क्रीम पॉट आणून घरी आइस्क्रीम करणं हा एक सोहळा असतो. आता कोपऱ्याकोपऱ्यावर आइस्क्रीम पार्लर झाल्याने हे सोहळे कमी झालेत; पण पुण्यासह अनेक शहरांत काही पॉट आइस्क्रीमवाले अजूनही आपला आब टिकवून आहेत.

पॉट आइस्क्रीम म्हणजे धमाल. आइस्क्रीम खाण्याचा मुहूर्त उद्या संध्याकाळचा असेल, तर घरी आइस्क्रीम करण्याची धांदल आजच सुरू व्हायची. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आइस्क्रीम पॉट सांगणं. वाड्यात, चाळीत किंवा ओळखीपाळखीत स्वतःचं आइस्क्रीम पॉट असणारा एखादा भाग्यवंत असायचा. या प्रसंगी या आईस्क्रीम पॉटच्या ‘प्राऊड ओनर’ला त्याच्या दारात म्हणजे ‘गजांतलक्ष्मी’ झुलत असावी असं महत्त्व असायचं. ‘नेबर्स एन्व्ही, ओनर्स प्राईड’चं एक मऊसूत उदाहरण. हा सोहळा चालू असेतो अनेक घरांमध्ये ‘पुढच्या वर्षीचं आइस्क्रीम आपल्या घरच्या आइस्क्रीम पॉटमध्ये,’ असे संकल्प व्हायचे. मग जादा दूध सांगावं लागायचं. आपल्यासह या उद्योगात सामील असणाऱ्यांच्या घरातल्या रेफ्रिजरेटरमध्ये बर्फासाठी पाण्याची लहानमोठी भांडी भरून ठेवायला लागायची. हा कार्यक्रम बहुधा उन्हाळ्यातला म्हणजे आंब्यांच्या दिवसांतला, त्यामुळं मॅंगो हा सगळ्यात फेव्हरिट ब्रॅंड. मग आईस्क्रीमसाठी म्हणून खास हापूस यायचा. दूध आधी आटवायचं, की त्यात आमरस घालून आटवायचं यावर एक माफक चर्चा व्हायची. प्रत्यक्ष पॉटमध्ये घालून आइस्क्रीम करायला सुरवात करण्याच्या किती आधी दूध आटवायला हवं, हा चर्चेचा आणखी एक मुद्दा असायचा. बर्फ बाहेरून आणायचा झाल्यास किती आधी आणावा यावरही मतभेद व्हायचे. या सगळ्यांतून त्या दिवशी दुपारी ते आइस्क्रीम पॉट नावाचं हॅन्स ॲन्डरसनच्या परिकथांमधल्या चित्रांत पाहिलेल्या लाकडी बादल्यांसारखं यंत्र यायचं. त्यात मध्यभागी एक ॲल्युमिनियमचं उभं भांडं असायचं. त्याच्या आजूबाजूने बर्फ आणि खडे मीठ घालायचं आणि मग हात दुखून येईपर्यंत ते भांडं फिरवायचं. मध्येच ते भांड उघडायची परवानगी नसायची, कारण मग आईस्क्रीम ‘सेट’ होत नाही म्हणे. फिरवता-फिरवता भांडं जड लागणं हा आईस्क्रीम तयार होण्याचा संकेत असायचा. या सगळ्या मंथनातून तयार झालेलं ते आइस्क्रीम समुद्रमंथनातून अवतरणाऱ्या दैवी रत्नासारखं भासायचं. या प्रक्रियेचं वर्णन ‘धुमाकूळ’ याच शब्दात नीट होऊ शकेल. हा सोहळा साधारणपणे वर्षातून एकदा किंवा दोनदाच होत असला, तरी त्याचं कवित्व मात्र वर्षभर पुरायचं.
***

विविधतेची समृद्धी
आइस्क्रीमच्या रंगाढंगात, चवींमध्येही प्रचंड वैविध्य आलंय. आंबा, केशर, पिस्ता, व्हॅनिला (या पदार्थाचीही शेती करतात), चॉकलेट या पारंपरिक चवी. अवघं जग कवेत घेणाऱ्या आईस्क्रीमनं काँटिनेंटलबरोबर स्थानिक फळांना, स्वादाला आपलंसं करत चवी खऱ्या अर्थानं (ग्लोबल + लोकल) ‘ग्लोकल’ केल्या. गारेगार आइस्क्रीमबरोबर गरमागरम गाजर हलवा किंवा जिलबी, खीर, चॉकलेटचा उकळता सॉस असे पदार्थही जोडून दिले. तवा आइस्क्रीम आणि फ्राईड म्हणजे चक्क तळलेलं आईस्क्रीम ही त्याच्याही पुढची पायरी. ‘मस्तानी’ हा आइस्क्रीमचा खास मराठी अवतार. नव्वदी पार केलेल्या या मस्तानीला जणू शाश्‍वत तारूण्याचं वरदान आहे. गुलकंद, शतावरीसारख्या औषधी वनस्पती वापरून आइस्क्रीमनं आयुर्वेदिक बाजही स्वीकारला आणि गोडाचं वावडं असलेल्यांसाठी खास ‘शुगर फ्री’ अवतारही घेतला. आईस्क्रीम हा पदार्थ कसाही खावा. सप्ततारांकित हॉटेलमध्ये सजवलेल्या डिशमधून खावा, पळसाच्या किंवा वडाच्या सुकलेल्या पानावर खावा, खास बनवलेल्या आईस्क्रीम कटलरीतून खावा, कोनातून, कपातून, (नंतर चाटून साफ करत ती चव जिभेवर मुरवून घेता येईल अशा) साध्या ताटलीतूनही. उन्हात तर खावाच; पण पडता पाऊस काचेआडून पाहताना आणि बाहेर थंडी असताना स्वतःला पांघरुणात गुरफटून घेऊनही खावा. आकाशात सूर्य असताना खावा, नसतानाही खावा.

आईसफ्रूट किंवा आइस्क्रीमचा बार खाणं ही एक साधना आहे. काडीभोवती गोठवलेला तो रस वितळायच्या आत आणि मुख्य म्हणजे अंगावर न सांडता खायला जबरदस्त अभ्यास लागतो. अर्थात आंबा खाताना जसे रसाचे ओघळ कोपरापर्यंत गेले, की आंब्याची चव नीट कळते असं म्हणतात, तशीच हे वितळणारं आइस्क्रीम खाण्यातही मजा असते. शिवाय वितळणारं आइस्क्रीम खाताना आयुष्यातल्या एखाद्या उत्तम क्षणाची क्षणभंगुरता उमगण्याचा आध्यात्मिक आनंद मिळतो, हा भाग वेगळाच. (चांगलं जमलंय ना वाक्य?) लहानपणी भरपूर आइस्क्रीम खायला मिळेल, या एका गाजरामुळं मी दंतवैद्यकातल्या (बऱ्याचशा भीतिदायक) करामती विनातक्रार सहन केल्या आहेत. आजारी असताना आइस्क्रीम खावं किंवा कसं यावर विविध तज्ज्ञांचं अजूनही एकमत झालेलं नाही. मध्यंतरी जपानमधल्या एका विद्यापीठातल्या संशोधकांनी तर सकाळी न्याहरीतही आइस्क्रीम खावं असा सल्ला दिला होता. त्यानं म्हणे मेंदू तल्लख राहतो.

बाकी, ‘बदलेल तो टिकेल’ या आजच्या काळातल्या सर्वांत महत्त्वाच्या मंत्राचं मूर्तिमंत रूप म्हणजे आइस्क्रीम. आइस्क्रीमचा सगळा प्रवासच ‘इनोव्हेशन’ या शब्दाशी जोडलाय. मनुष्यबळ विकासाच्या (सो कॉल्ड) आधुनिक कल्पनांशी अचानक जोडले गेलेले एक अधिकारी ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करण्याचा सल्ला देतान एक किस्सा नेहमी सांगायचे. आइस्क्रीमच्या कोनाचा शोध कसा लागला? तर एक दिवस एक छोटी मुलगी आपल्या बाबांबरोबर सिनेमा पाहायला गेली होती. मध्यंतरात डोअरकीपरनं तिला आइस्क्रीमच्या कपासकट आत सोडलं नाही. तिनं बाबांना विचारलं- ‘आइस्क्रीमसकट खाता येईल असा कप नसतो का?’ या प्रश्‍नातून आइस्क्रीमचा प्रवास आणखी एका निराळ्या ट्रॅकवर गेला. किस्सा खरा का खोटा माहीत नाही. आइस्क्रीमच्या कूळकथेच्या सुरवातीला येणाऱ्या दंतकथांसारखीच ही पण एक दंतकथा असणार. मात्र, एखादी वरवर वेडगळ वाटणारी कल्पना एखाद्या उद्योगाचं स्वरूप कशी पालटून टाकते याचं हे उत्तम उदाहरण नक्कीच आहे; पण आइस्क्रीमचा कोन १८९६मध्ये इटालो मर्किओनी या इटालियन सद्‌गृहस्थानं बनवला, १९०३मध्ये त्याला त्यासाठी पेटंटही मिळालं.
***

‘स्टॉप मी अँड बाय वन’ अशी जाहिरात करत लंडनच्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या ते जागतिक सत्तेचं प्रतीक असणाऱ्या व्हाईट हाऊसमधल्या मेजवान्यांचा अविभाज्य भाग असलेल्या आइस्क्रीमचा हा प्रवास आता आईस्क्रीम विरुद्ध फ्रोजन डेझर्ट या वादाच्या ताज्या वळणापर्यंत आला आहे. दूध, फळं, मध यांच्या या गोठवलेल्या मिश्रणाभोवती फिरणारी बाजारपेठ वर्षाला बारा ते पंधरा टक्‍क्‍यानी वाढते आहे, असा एक अंदाज आहे. भारतातल्या आइस्क्रीम उद्योगाच्या एकूण उलढालीपैकी चाळीस टक्के उलाढाल नॉनब्रॅंडेड आइस्क्रीम्सची आहे. असंख्य माणसं आणि त्यांचं जगणं या उद्योगात गुंतलं आहे. गोठणं हा चैतन्याचा अंत मानला जातो; पण गोठलेलं हा आइस्क्रीम नावाचं रसायन मात्र गेली कित्येक शतकं या सु‘रस’यात्रेला एक नवं रसरशीत चैतन्य देत आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com