वायुसंगे येई श्रावण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shravan

श्रावण हा महाराजासारखा असतो. हिरव्यागार झाडांचा, मऊ गवताचा अप्रतिम कोट त्याने परिधान केलेला असतो.

वायुसंगे येई श्रावण

श्रावणात, ऊन-पावसाचा खेळ चालू असतो तेव्हा इंद्रधनुष्य त्याचे अनेक रंगांनी स्वागत करते. या श्रावणावर केलेल्या अनेक कविता व गाणी आपोआपच ओठांवर येऊन मन रिझवत असतात. पुढच्या आठवड्यात या श्रावणाचे आगमन होत आहे, त्यानिमित्त...

श्रावण हा महाराजासारखा असतो. हिरव्यागार झाडांचा, मऊ गवताचा अप्रतिम कोट त्याने परिधान केलेला असतो. जाई, जुई, मोगरा, अनंत अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांचे त्याने सुगंधी अत्तर लावलेले असते. त्याच्याभोवती त्याचे सेवक म्हणजे सुंदर नक्षीदार फुलपाखरे फिरत असतात. मोर नर्तकासारखे नृत्य करून त्याचे मन रिझवतात. या महाराजाचा प्रत्येक दिवस म्हणजे सण असतो व तो पंचपक्वानांनी भरलेला असतो. व्रतवैकल्यांनी त्याचे राज्य समृद्ध असते. म्हणूनच या श्रावणात आपण आनंदी असतो.

या महाराजा श्रावणात ऊन-पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा इंद्रधनुष्य त्याचे अनेक रंगांनी स्वागत करते. या श्रावणसाठी अनेक सुंदर कविता व गाणी मन रिझवायला केलेली आहेत. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ या कवितेत तर आपण लहानपणापासून हरवून गेलेले आहोत. श्रावणात पाऊस पडायला लागतो आणि आपल्या ओठी ‘श्रावणात घननीळा बरसला’ हे शब्द येतात. ‘हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला’ असे म्हणतो. ‘वायुसंगे येई श्रावणा, जलधारांची छेडीत वीणा’ असे वाटते. मग आपण अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला, मयूरा रे, फुलवीत ये रे पिसारा किंवा हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा, फुलवून पिसारा सारा, तू नाच आज रे मोरा, अशी मयूराला विनंती करतो.

या श्रावणात एखाद्या अल्लड तरुणीची ‘अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटूनी आभाळ आले, मेघ बरसू लागले’ अशी स्थिती होते. ‘आज कुणी तरी यावे, ओळखीचे व्हावे, जशी अचानक या धरणीवर गर्जत यावी वळवाची सर, तसे तयाने गावे’ अशी तिची इच्छा ती प्रकट करते. एखादी श्रावणाच्या पावसात भिजते आणि तिला चिंब पावसानं रानं झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी अशी काळजी वाटायला लागते. कुणाचा प्रियकर दूर असेल अशी प्रेयसी, ‘का धरीला परदेश, सजणा का धरीला परदेश, श्रावण वैरी बरसे रिमझिम, चैन पडेना जीवा क्षणभर’ अशी तक्रार करते. असा हा श्रावण आपल्या मनामनात भरलेला असतो.

Web Title: Madhuri Sathe Writes Shravan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :shravansaptarang