राज ठाकरेंचे नवे मोहरे 'मनसे'ला नवसंजीवनी देतील?

मनोज आवाळे
रविवार, 9 जुलै 2017

उशिरा का होईना आता राज यांनी पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी तरुणांना जबाबदारीची पदे दिली आहेत. हे करताना त्यांनी पक्षातील जुन्या नेत्यांना बाजूला करण्याची हिंमत दाखविली आहे. हे नवे शिलेदार आता मनसेला पुन्हा चांगले दिवस दाखतील का?

लोकसभा, विधानसभापाठोपाठ महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आता पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. हे करीत असताना पक्षस्थापनेपासून नेतेपदावर असलेल्यांना बाजूला सारले आहे. पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठीच राज यांनी हा कटू परंतु आवश्‍यक असा निर्णय घेतला आहे. पक्षाला नवसंजीनवनी देण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. अर्थात या निर्णयाचे परिणाम कळण्यासाठी काही काळ जावून द्यावा लागणार आहे. 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेची स्थापना केलेल्या राज यांना सुरवातीला प्रशंसनीय असे यस मिळाले. महापालिकाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पक्षाने चांगले यश मिळविले. पहिल्याच निवडणुकीत मनसेचे बारा शिलेदार विधानसभेवर निवडून गेले. सन 20012 च्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत तर सत्ता मिळाली. पुणे, मुंबई महापालिकांमध्ये लक्षणीय असे संख्याबळ प्राप्त केले. त्यानंतर पक्षाचा वारू दौडू लागला. जनतेच्या अपेक्षा वाढल्या. परंतु, विधानसभेत तसेच महापालिकांमध्ये मनसेचे लोकप्रतिनिधी फारशी छाप पाडू शकले नाहीत. पक्षात मोठी गटबाजी निर्माण झाली. मराठी माणसाच्या हितासाठी सुरु झालेल्या या पक्षाला मराठी माणसाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत.

पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रमही दिर्घकालिन नसल्याचा परिणाम पुढील काळात पक्षाच्या वाटचालीवर झाला. परंतु, राज याच्या करिश्‍म्यामुळे पक्ष तग धरू शकला. सन 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेने टोलचा मुद्या उचलला. मात्र, त्यानंतर पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परीणाम झाला. टोलचा झोल करता करता पक्षाचाच तोल कधी गेला हे कळाले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक प्रसिध्दी खरेतर राज यांनीच केली असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात तर भाजपचे लोकही मोदी यांचे नाव घेत नसताना राज राज्यव्यापी दौऱ्यामध्ये मोदी स्तुती गात होते. मात्र, याच मोदी लाटेमुळे मनसेची पिछेहाट होणार आहे हे त्यावेळी राज यांच्या लक्षात देखील आले नसेल.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मोदी यांना आमचे विजयी उमेदवार पाठिंबा देतील अशी भूमिका घेतली. मात्र, लोकसभेला आलेल्या मोदी लाटेत मनसेच काय कॉग्रेस आणि राष्ट्रवादीही तग धरू शकली नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघा एक उमेदवार निवडून आला. त्यानंतर पक्षाला गळती सुरू झाली. पक्ष संघटना विस्कळीत झाली. ज्या नाशिकचा कायापालट करण्यासाठी आटापिटा केला त्या नाशिकमध्येही मनसेला पराभव पत्कारवा लागला. पक्षातील तथाकथित नेत्यांविरोधात कार्यकर्ते बोलू लागले. परंतु, त्यांना बाजूला करण्यात आले नाही. उशिरा का होईना आता राज यांनी पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी तरुणांना जबाबदारीची पदे दिली आहेत. हे करताना त्यांनी पक्षातील जुन्या नेत्यांना बाजूला करण्याची हिंमत दाखविली आहे. हे नवे शिलेदार आता मनसेला पुन्हा चांगले दिवस दाखवितात का हे आगामी काळात दिसणार आहे. एक मात्र खरे की राज यांनी पक्षबांधणीचा विषय गांभीर्याने घेतला आहे..

Web Title: maharashtra news politics raj thackeray mns reshuffle